आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
15 Feb 2023 - 6:55 pm

✪ प्रखरता नव्हे शीतलता
✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी
✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर
✪ "छांदसी आणि सुमित्रा"
✪ पतझड़ है कुछ, है ना?
✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो?
✪ मै अहम हूँ यही वहम था

सर्वांना नमस्कार. मनामध्ये आलेल्या अनेक भावना आणि विचारांना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. आत्या... आणि त्याबरोबरच मामा, काका अशा जागा अतिशय जिव्हाळ्याच्या असतात. सतत जवळ असल्यामुळे आणि उग्र अशा प्रखरतेमुळे आई- बाबा ही नाती काहीशी दुरावलेली असतात. किंवा निकटता आणि प्रखरता असल्यामुळे डोळ्यांवर काहीशी अंधारी आलेली असते. सतत समोर असलेली गोष्ट आपले डोळे हळु हळु बघणं कमी करतात. त्याउलट आत्या किंवा मामा- काका, आजी- आजोबा, नातू- नाती ही नाती प्रखर नसून शीतल असतात. सतत जवळ नसल्यामुळे कोवळी आणि जास्त जीवंतही असतात. अनौपचारिक, मनमोकळी आणि भावनिक. अनेकदा सतत जवळ असलेली व्यक्ती तटस्थपणे गोष्टी बघू शकत नसते. पण काही अंतरावरून आणि सौम्य प्रकारे असलेली ही नाती त्या गोष्टीही बघू शकतात. दोषसुद्धा बघू शकतात आणि गुणही. वेगळ्या जिव्हाळ्याबरोबरच एक वेगळा बंध, आणि ओलावा अशा नात्यामध्ये असतो. अशा वेगवेगळ्या नात्यांनी नात्यांचं इंद्रधनुष्य साकार होतं आणि भावजीवन समृद्ध होत जातं. हे लिहीताना एक खंत जाणवते आहे की, आजच्या पिढीमध्ये नात्यांमधलं हे इंद्रधनुष्य हरवत जातंय. आजच्या पिढीला काका- आत्या- मावशी अशी नाती व त्यातली रंगसंगती आणि गमतीसुद्धा मिळत नाही आहेत. असो.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे माझ्या अशाच जिव्हाळ्याच्या व्यक्तीबद्दल मी हे लिहीतो आहे. खरं तर लिहीण्याची मनाची तयारी अजूनही होत नाही आहे. मन धजत नाही आहे. माझी आत्या- मूळची वासंती वेलणकर आणि नंतरची सुमित्रा माधव भांडारी. तिचं गेल्या महिन्यात देहावसान झालं. तिच्या चेतनेने ३ जानेवारी रोजी शरीराची साथ सोडली. अतिशय दुर्धर स्वरूपाच्या कँसरसोबत तिने दीड वर्ष झुंज दिली. तिच्याकडे जवळून लक्ष देणा-या बाबांच्या शब्दांत सांगायचं तर अतिशय हिमतीने तिने दिलेला हा लढा होता... तिच्याबद्दल लिहायला अजूनही मन धजत नाही आहे. पण तरी मनातल्या भावना व विचारांना शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.

कडक शिस्तीचे व चाकोरीचे आई- वडील ह्यांच्या प्रखर ऊन्हामध्ये वेगळ्या अर्थाने भाजून गेल्यानंतर मिळणारा शीतलतेचा कवडसा म्हणजे आत्या- माझी वासंती आत्या. आठवणी तर असंख्य आहेत. अनेक प्रसंग, अनेक किस्से, अनेक घटना सांगता येण्यासारख्या आहेत. तिच्या कामाबद्दल अनेकांनी लिहीलंही आहे. कॉलेजमध्ये असताना मुलांप्रमाणे असलेलं तिचं बिनधास्त वागणं (जे खरं तर माझ्या आजही ९२ वर्षांच्या तरुण आजीकडून तिने घेतलं होतं), विद्यार्थी परिषदेचं तिचं काम, बस्तरचे अनुभव, पुढे कार्यकर्त्यासोबत मांडलेला संसार, मराठवाड्यातून थेट कोकणामध्ये झालेला संसार, २००५ पासून पुण्यामध्ये कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उभी केलेली दुसरी इनिंग, कविता आणि सामाजिक कार्य! हे अनेकांना थोडं परिचित आहे. जे खूप दूर आहेत, तेही आपण नीट बघू शकत नाही, आणि जे खूप जवळ आहे, तेही नीट दिसत नाही. इथे मी त्याबद्दल जास्त लिहीणार नाही. भाचा म्हणून मी ज्या कोनातून तिच्याशी जोडलेलो होतो, त्या कोनातून मला दिसलेल्या जिव्हाळ्याच्या स्पेसबद्दल मी लिहेन. आणि आपण समोरच्या माणसाला आपण जितके तयार असतो, तितक्या प्रमाणातच बघू शकतो.

थोडक्यात सांगायचं तर शीतल अशा ह्या नात्याने (नात्यामध्येही आत्या आहे) मला अनेक गोष्टी दिल्या. आयुष्यातले वेगवेगळे चढ- उतार- शैक्षणिक किंवा भावनिक वाटचालीतले वळणं, व्यक्तिमत्व विकासाशी जोडलेले पैलू, नवीन शिकणं- वाचन अशा अनेक बाबतींमध्ये वासंती आत्याची सोबत मला मिळाली. कधी कधी खूप सरळ रेषेमध्ये एखादी गोष्ट सांगितली तर व्यवस्थित पोहचत नाही. पण तीच थोडी फिरवून- इकडे तिकडे नेऊन सांगितली तर पोहचते. अशा अनेक वळणांवर तिची सोबत मला मिळत होती. मग तो बीएससी फर्स्ट यीअरमधून बीए करण्याचा आणि तेही पुण्यात येऊन शिकण्याचा निर्णय असेल किंवा माझ्या अगदी अंतर्मुख व्यक्तिमत्वाला बहिर्मुख करण्याचा तिचा प्रयत्न असेल. भावना व आठवणींचा बांध एकदा मोडला की पूर आल्यासारखं होतं आहे. आठवणी आठवल्यावर असंख्य आठवतात. देवगडचं भावविश्व, तिथे घालवलेले कित्येक दिवस, तिने सलग २२ दिवस माझ्या आवडीची केलेली आमटी, देवगडच्या एक एक गमती जमती, आत्या व चिन्मयसोबत फिरलो होतो ते कुणकेश्वर- विजयदुर्ग! माझ्या रम्य त्या बालपणातला खूप मोठा भाग आत्या व चिन्मयसोबत देवगड- जामसंडेमध्ये गेलेला आहे. मोबाईल- इंटरनेट नसलेल्या काळातलं ते वेगळंच जग होतं! तिथलं माळरानावरचं घर, महानायक व घरातली शेकडो पुस्तकं, डोक्यावर दोन्ही पाय ठेवून आशीर्वाद देणारा रौद्र पण प्रेमळ जिमी, बीच- समुद्र, मोकळ्या जमिनीवर खेळलेले खेळ! देवगड इतक्या प्रेमाचं ठिकाण होतं की, कुठल्याही समुद्र किना-यावर गेलो तरी तिला सांगायचो की, देवगडच्या समुद्राला भेटलो म्हणून. किंवा ठाण्यात गेलो तरी ते देवगडचंच कोंकण असायचं! आठवणींची भरती येते आहे हे लिहीताना.

पुण्यात पुढे मी कर्वे समाज सेवा संस्थेत MSW करताना ती कर्वे स्त्री संस्थेमध्ये रेक्टर म्हणून काम करत असल्यामुळे सहवास जास्त मिळाला. योगायोगाने माझी पत्नी- आशा घरातल्या पहिल्या ज्या व्यक्तीला भेटली होती, ती म्हणजे वासंती आत्याच होती. त्यावेळी ती नोकरी + संसार + घरी येणारे अनेक कार्यकर्ते- पाहुणे अशा सगळ्यांचं कसं करत असेल हा प्रश्नही मनात येण्याची तेव्हा समज नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या स्टेजनंतर हळु हळु उलगडत गेल्या. आणि जेव्हा संसाराचा कॅनव्हास माझ्या बाबतीत उलगडत गेला, एक एक गोष्टीची समज आली, तेव्हा कळालं की, त्या काळात म्हणजे १९८७ मध्ये मराठवाड्यातल्या परभणीतून लग्न करून कोकणात आणि तेही जामसंडे अशा खेडेगावात राहणं किती मोठा बदल असेल. वेगळी परिस्थिती, वेगळे रिवाज आणि अगदी भाषासुद्धा वेगळी! तिथे ते माळरानावर राहायचे तेव्हा तर दीड वर्ष तिथे वीज नव्हती. आणि आमचं परभणी गाव असलं तरी घरातलं वातावरण खूप वेगळं होतं. एक वर्ष ती बस्तरमध्ये आदिवासी भागामध्ये जाऊन काम करायला किंवा दुस-या आत्याला जम्मूसारख्या ठिकाणी चाललेल्या आंदोलनात सहभागी व्हायला घरातून समर्थन होतं. त्या काळात मुलींना अशी स्पेस देणारे आजोबासुद्धा आता अजून जास्त कळतात. असो.

आठवणींच्या भरतीच्या लाटांमध्ये स्मृतींचे अनेक तरंग समोर येतात. घरातले असंख्य हास्य विनोद, लहानपणीची भांडणं- रुसवे- फुगवे, सोबत केलेले अनेक प्रवास, सोबत बघितलेले चित्रपट, शिरीष काका गेल्यानंतर तिने इतरांना दिलेला धीर आणि सोबत... त्याबरोबर नंतरच्या आयुष्यात तिने कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत केलेलं काम, तिथल्या मुलींवर असलेली तिची माया आणि बारीक नजर, मृण्मयी ह्या संग्रहातून तिच्या समोर आलेल्या काही कविता. अटलजींच्या कवितांचा आजोबांनी केलेला भावानुवाद तिच्याच पुढाकाराने प्रसिद्ध झाला. आणि "छांदसी" सारखे तिचे इतर उपक्रम. पण तिने तिच्या उपक्रमासाठी निवडलेला छांदसी शब्द खरं तर तिचंच वर्णन करतो. स्वच्छंद, स्वत:च्या पद्धतीने पण तरीही समाजासोबत align केलेलं तिचं आयुष्य होतं.

“छांदसी" आणि "सुमित्रा" अशा ह्या अभिव्यक्तीला मात्र रोगांचा शाप लागला. अखेर कँसरचा ससेमिरा सुरू झाला. सहा महिने, डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तिने दीड वर्षं झुंज दिली. चिन्मयचा संसार नाही, पण सोबतीण तिला बघता आली. तो संसार बघण्यासाठी ती केमोथेरपीच्या वेदना सहन करण्यासाठीही तयार झाली. पण तोपर्यंत उशीर झाला. कुटुंबातल्या सगळ्यांसाठी हा मोठा आघात होता आणि आहे. तिच्याच आवडत्या इजाजत चित्रपटातल्या गाण्याची ओळ आठवते- पतझड है कुछ, है ना? अशी आज सगळ्यांची अवस्था झाली आहे. एक समाधान हे आहे की, मरणप्राय यातनांमधून त्या मृत्युने तिची सुटका केली. “मै भी वही सो जाऊँगी" तिला म्हणता येईल अशी सद्गती तिला मिळो, इतकीच प्रार्थना सगळ्यांच्या मनात आहे.

जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यु होतो, तेव्हा तो अंश रूपाने आपलाही मृत्यु असतो. मृत्युच्या धक्क्यामध्ये, आघातामध्ये आणि शॉकमध्ये हे नीटसं लक्षात येत नाही. पण मृत्यु परत परत आपल्याला आठवण करत असतो की, तुझेही दिवस ठरलेले आहेत. Your days are numbered. प्रत्येकाचं वास्तव्य इथे क्षणभंगुरच आहे. मृत्युच्या दृष्टीने इथे कोणीच indispensable नाही. आणि मृत्यु टाळताही येत नाही. पण मग आपण मृत्युसाठी काय करू शकतो? अशी ताटातूट होते, आपले लोक गमावतो आपण. त्यासाठी आपण काय करू शकतो? त्याबद्दल इतकंच वाटतं की, आत्ता जे आहे आणि जे सोबत आहेत, त्यांच्याकडे आपली दृष्टी आपण नेऊ शकतो. ध्यानाच्या अनुषंगाने आपण कधीच "वर्तमानात" नसतो. सतत एक प्रकारच्या पोस्टपोनमेंटमध्ये किंवा फ्लॅश बॅकमध्ये असतो. आपण वर्तमानाकडे सजगता आणू शकलो तर आज जे लोक आहेत आणि आज जी स्थिती आपल्या भोवती आहे, ती आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसू शकेल. आणि मग ह्या गोष्टी किती दुर्मिळ आहेत ते कळेल, त्यांची rarity आणि value जाणवेल. त्याबरोबर एका अर्थाने जे सोबत आहेत, त्यांच्यासोबतचं आपलं नातं केवळ व्यवहार किंवा औपचारिक- शारीरिक पातळीवर न राहता त्यापलीकडे मनाच्या व चेतनेच्या पातळीवर जाऊ शकेल. आणि आपण ज्यांच्याशी मनाच्या व चेतनेच्या पातळीवर जोडलेलो असतो, तिथे ताटातूट होऊ शकत नाही. तसंच आज जे आयुष्य आहे, जे सगळं आहे, जे लोक आहेत, ते किती मोलाचे आहेत, ते कळेल. प्रत्येकाला सगळं कधीच मिळत नाही, खूप काही "न मिळणारं" राहतं हे कळेल. आणि त्याबरोबर आपली भविष्यातली इनव्हेस्टमेंट कमी होईल. कारण कोणताही दिवस शेवटचा असू शकतो. अगदी आजसुद्धा. आणि एकदा ही दृष्टी प्राप्त झाल्यावर प्रत्येक गोष्ट हे आनंदाचं निमित्त ठरेल. कृतज्ञतेचं कारण ठरेल.

मै अहम हूँ
यही वहम था
इतनी समझ देनेवाली जिन्दगी
यह तेरा ही रहम था

- निरंजन वेलणकर 09422108376
15 फेब्रुवारी 2023

जीवनमानव्यक्तिचित्रलेखअनुभव

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

15 Feb 2023 - 8:32 pm | आनन्दा

श्रद्धांजली.
बातमी कळली होती, पण कोना मिपाकरांच्या जवळच्या नात्यात असतील असे वाटले नव्हते

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Feb 2023 - 10:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

हळवी नाती असलेली माणसे जाणे मनावर आघात करणारेच असते. पण "मरे येक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे" ही जग रहाटी कशी चुकेल?
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!!

सौंदाळा's picture

16 Feb 2023 - 10:41 am | सौंदाळा

भावपूर्ण श्रध्दांजली.
आठवणी अतिशय हृद्य आणि जपून ठेवाव्या अश्या.

श्वेता व्यास's picture

16 Feb 2023 - 3:48 pm | श्वेता व्यास

श्रद्धांजली!
आठवणी अशाच सोबत करत राहतील कायम! खूप मनापासून लिहिलंत.

कर्नलतपस्वी's picture

17 Feb 2023 - 10:32 am | कर्नलतपस्वी

छान आठवणी लिहील्या. जगातून गेलं तरी मनातून जात नाही तेच खरं प्रेम.

मार्गी's picture

20 Feb 2023 - 1:28 pm | मार्गी

सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार.