श्री गणेश लेखमाला २०२३

1

हे पाहा: माय ऑक्टोपस टीचर

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
9 Jun 2022 - 4:29 pm

कटाक्ष-

नेटफ्लिक्स माहितीपट
वेळ - ८५ मिनिटे
भाषा- इंग्रजी

ओळख-

क्रेग फॉस्टर हा दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर राहणारा चित्रपट निर्माता 'माय ऑक्टोपस टीचर' या माहितीपटाचा निवेदक आणि ऑक्टोपस सोबत विभागून मुख्य पात्र आहे. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरच जडणघडण झालेली असल्यामुळे क्रेगसाठी समुद्र नवा नाही. स्वतःची चित्रपटांशी संबंधित कारकिर्द एका निराशेच्या कालखंडातून जात असताना क्रेगची पावले बालपण ज्या समुद्रात तासनतास डुंबत घालवले तिकडे वळतात. व्यवसायिक आयुष्यात आलेला शीण घालवण्यासाठी समुद्रात घुसलेल्या क्रेगला किनाऱ्याजवळच्या उथळ समुद्रात तळाशी वाढणाऱ्या पाणथळ जंगलात (केल्प फॉरेस्ट) एक नवीन विश्व गवसते. क्रेगची एका ऑक्टोपसशी ओळख होते. ही ओळख होण्याची प्रक्रिया मोठी रंजक आहे. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. एरवी स्वजातीयांशी सुद्धा फटकून एकांतात आयुष्य व्यतीत करण्याला प्राधान्य देणाऱ्या ऑक्टोपसने एका मनुष्याच्या सोबतीत रस घ्यावा ही आश्चर्यकारक गोष्ट होती.

दररोज ठराविक वेळी समुद्रात बुडी घ्यायची आणि काही काळ ऑक्टोपसचे छायाचित्रण करायचे हा क्रेगचा नित्यनियम बनला. क्रेग बरोबर आपण सुद्धा तीनशेहून अधिक दिवसांकरिता ऑक्टोपसच्या जीवनातील विविध टप्प्यांचा भाग होतो. मधल्या काळात काही नाट्यमय घडामोडी होत नसल्या तरी संपूर्ण चित्रीकरण पाण्याखालचे असल्याने केवळ सागराचे सौंदर्य अनुभवने सुद्धा कंटाळवाणे वाटत नाही. माहितीपटाच्या शीर्षकात ऑक्टोपसला शिक्षकाची उपमा का दिली याचा उलगडा उत्तरार्धात होतो. ऑक्टोपसचा नैसर्गिक शिकारी पायजामा शार्क सोबत दररोज जीवनमरणाचा खेळ खेळत स्वतःच्या उदरनिर्वाहाची कसोटी पार करण्यात ऑक्टोपस बुद्धी आणि कौशल्य यांचा अनोखा मेळ घालतो. तिथे आपल्याला ऑक्टोपस मधील शिक्षकाचे दर्शन होते. क्रेगची ऑक्टोपसशी एवढी भावनिक जवळीक होते की तो ऑक्टोपसच्या दररोजच्या आयुष्यात स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब पाहू लागतो. आता माहितीपट संपेल असे वाटत असताना ऑक्टोपसच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनेला सुरुवात होते. येथे शिक्षक ऑक्टोपस आणखी मोठ्या स्वरुपात आपल्या समोर प्रकट होतो. क्रेगच्या एक अत्यंत महत्वपूर्ण वाक्याने माहितीपटाची सांगता होते. ते वाक्य कदाचित आज मानवाला ग्रासलेल्या सर्व समस्यांचे एक उत्तर असू शकते आणि नसले तरी सर्व समस्यांच्या उत्तराकडे घेऊन जाण्याची ताकद त्या वाक्याच्या शिकवणीत आहे एवढे नक्की.

शिल्लक-

हा माहितीपट डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक इ. यांच्या माहितीपटांसारखा वैज्ञानिक माहिती देणारा नाही. याउलट यात ऑक्टोपस आणि केल्प फॉरेस्टचा भावनिक अंगाने धांडोळा घेतला आहे. आपण क्वचितच निसर्गाविषयी अशा दृष्टिकोनातून विचार करत असू. आपल्या बहुतेक अडचणींची उत्तरे निसर्गाकडे मोफत उपलब्ध असताना आपण स्वतःला (/मनुष्यांना) लायकी पेक्षा जास्त श्रेष्ठ समजत आपल्याच कृत्रिम जगात या अडचणींचे उतारे शोधत राहतो. पर्यायाने फरफट वाढत राहते. 'ऑक्टोपस माय टीचर' हा माहितीपट केवळ जीवनाचे शिक्षण देत नाही तर ते जगण्यासाठी बळ आणि उर्मी यांचा मोठा साठा आपल्या हवाली करतो. सागर किनाऱ्यावर हयात घालवणाऱ्या क्रेगने आपल्याला एक ऑक्टोपस कधी काही शिकवेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता. तसा विचार आपणही कधीच केला नसेल. न केलेले विचार प्रत्यक्षात उतरणे यालाच जीवन म्हणतात नाही का?

चित्रपटआस्वादसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

कंजूस's picture

9 Jun 2022 - 5:49 pm | कंजूस

वेळ काढून पाह यला हवे.
माहिती आवडली.

सौन्दर्य's picture

15 Jun 2022 - 11:27 pm | सौन्दर्य

मला असले माहितीपट बघायला आवडतात.