त्या क्षणी तुझ्या चेहेर्यावर खूप काही बदल घडत जातात. आभाळ भरून यावे तसे तुझे ते टप्पोरे डोळे भरून येतात. तुझ्या तोंडून हुंदका फुटत नाही इतकेच. तू कसबसे स्वतःला सावरलंस. आणि तुझ्या हातातले मोरपीस माझ्या हातावर फिरवत म्हणालीस ' मी ते मोरपीस आहे असे समज."
तुझ्या शब्दांचे अर्थ समजण्याचे वय नव्हते ते माझे. पण ते कुठेतरी आत खोलवर भिडले. मी नि:शब्द झालो
मागील दुवा http://misalpav.com/node/50189
माझ्या हाताला घट्ट धरून जवळजवळ ओढतच तू मला नंदवाड्यात घेऊन गेलीस. माय अंगणात माझी वाटच पहात बसली होती. मला पहाताच ती पुढे आली. तीच्या हातात माझा हात दिलास. मायला हात जोडून नमस्कार करत नकारार्थी मान हलवलीस. मग माझ्याकडे पाहिलेस. तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला वाट मिळाली.
पदराचा बोळा तोंडावर दाबत हुंदका दाबलास. आणि लगबगीने तेथून निघून गेलीस.
तुझ्या त्या हुंदक्याने मायला काय सांगितले माहीत नाही. पण तुझ्या पाठमोर्या आकृतीकडे माय पहात राहिली. मी तिथेच उभा होतो. मग तू दिसेनाशी झाल्यावर असेल बहुतेक मायने माझ्याकडे पाहिले. मायने माझ्या दंडाला पकडले. थोडे घट्टच. पण तीच्या डोळ्यात पाणी होते. मायने माझे दोन्ही हात हातात घेतले. आणि माझे तळवे तीच्या डोळ्यांवर ठेवले.मग माझ्या हनुवटीला धरून ती काहितरी सांगू पहात होती. पण तीच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही.डोळ्यातून अश्रुधारा लागल्या होत्या. मग तीने मला घट्ट पोटाशी धरले. माय माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती.तीच्या डोळ्यातले अश्रु माझ्या डोक्यावर पडत होते. का माहीत नाही मलाही रडू आवरले नाही. मायला असे रडताना कधी पहिले नव्हते. त्या संध्याकाळी मी तू आणि माय तिघात काहीतरी वेगळा बंध तयार झाला. आपल्या तिघांच्या अश्रुंनी निर्माण केलेला.
दुसर्या शिवा काकाने साम्गितले. की संपूर्ण दिवसभर मायने मला शोधण्यासाठी गोकुळ पालथे घातले होते. दिवसभर अन्नच काय पण पाणीही घेतले नव्हते तीने.मायला माझ्या वागण्यामुळे खूप त्रास झाला होता. तु म्हणाली होतीस ते वाक्य माझ्या मनावर कोरले गेले. आपल्या माणसांना आता कधीच दुखावणार नाही.
ते वयच असतं की माणूस भूतकाळात रमत नाही. मायनेही पुन्हा तो विषय कधीच काढला नाही. आयुष्य पुढे जात राहिले.
गोकुळात वसंतोत्सव होणार होता. सगळे गोकुळ वसंतोत्सवाच्या तयारीत मग्न होतं. वसंतोत्सव म्हणजे एक पर्वणी असते सगळ्यांसाठीच. पानगळ संपलेली असते. वृक्षांना नवी पालवी फुटलेली असते. बागांमधून वेगवेगळी फुले फुललेली असतात. मोगरा चम्पक जुई, अनंत आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. पंचक्रोशीत वेगेवेगळ्या गावांच्या यात्रा भरतात. यात्रेत तर स्त्री पुरूष मुले मुली नटून येतात. निसर्गा सारखीच रंगीत वस्त्रे परिधान करून येतात. यात्रेत वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात, या सर्वांचा , रंगपंचमीला सर्वात कळस होतो. सगळे रंग खेळत असतात. चेहेर्यावर कपड्यांवर निरनिराळे रंग लावून एकमेकांच्या अंगावर पिचकारीने रंग उडवतात. मोठे विलोभनीय दृष्य असते ते. लाल हिरवा केशरी पिवळा निळा जांभळा सगळे रंग येतात.
त्या दिवशी गोकुळात रंगपंचमी होती. आम्ही सगळे गोपाळ रंग अगदी ठरवून कोणावर रंग टाकत होतो एखाद्या सावजाची शिकार केल्यासारखे. ज्या कोणी आमच्या तक्रारी केल्याअसतील त्यांना तर अगदी प्रत्येक रंगात भिजवून टाकत होतो. कानल , रीवा , क्षिप्रा यांच्यावर रंग फेकत सुरवात केली होती. मला देखील कोणी कोणी रंग फासलेले होते. मायने पाहिले असते तरी तीने मला ओळखले नसते इतका रंगलो होतो मी. कुठूनशी तू धावत आलीस.दोन्ही हातांच्या मुठीत रंग घेऊन आली होतीस. अचानक तुला मी दिसलो. कसे कोण जाणे तु मला ओळखलेस. तू माझ्या समोर आलीस. आणि थबकलीस. तु मी पुढे झालो . तुला काही सूचत नव्हते. तू तशीच माझ्या चेहेर्याकडे पहात राहिलीस. मी पुढे झालो. तुझ्याच मुठीतले रंग घेऊन तुझ्या गालावर लावले. तू तुझे हात सोडवून घेण्याचा प्रयत्नही केला नाहीस. एरवी असे कोणी वागले असते तर तीला वेडीच म्हणाले असते लोक. मग तू तेथून लगबगीने निघून गेलीस. इतर गवळणी तुला रंग खेळायला बोलावत होत्या. त्या तुला रंगही देत होत्या. पण कोणाहीकडे लक्ष्य न देताच तू गेलीस. जणू काही तुझ्या साथी त्यावेळेस त्या तिथे नव्हत्याच.
गोकुळात तुझ्या वागण्याबद्दल लोक काहीबाही बोलायला लागले. काहीजण तर तुला वेड लागलंय असेही म्हणायला लागले. तू काहीनाकाही कारण काढुन माझ्या अवतीभवती असायचा प्रयत्न करायचीस. मला हे समजत नव्हतं. पण आज समजतय. एका विवाहितेला असं वागताना पाहून लोक काय काय बोलत असतील. घरात सासू , जावा , कायकाय म्हणत असतील पण ते तुझ्या ते गावीही नव्हतं.
गौराकाकी कोणाला तरी सांगत होत्या. पूर्वी अशी नव्हती ही पोर. लग्न झाले तेंव्हा चांगली होती. घरातली कामे नीट करायची.गायींचे दूध काढणे , दही लावणे , तूप काढणे सगळे किती छान करायची. नटण्यामुरडण्याची हौस होती. हाताला कायम अळता लावायची. पण हल्ली हीचे कशातच लक्ष्य नसते. नटण्यामुरडण्यातही नाही. सकाळ झाली की यमुनेकडे धावते. कसली तरी बाधा झाली आहे म्हणे तीला, गोवर्धन पर्वताच्या वाटेवर एक आश्रम आहे. तिथले आचार्य यावर उतारा देतात तिकडे न्यायचे आहे एकदा तीला."
लोक असे काहीबाही बोलत होते. पण ते तुझ्या कानावरच येत नव्हते.
आणि मग तो दिवस आला.
क्रमशः
प्रतिक्रिया
19 May 2022 - 11:45 pm | सुखी
बहोत भालो __/\__
23 May 2022 - 9:08 am | विजुभाऊ
माझी राधा - http://misalpav.com/node/50263