कसली तरी बाधा झाली आहे म्हणे तीला, गोवर्धन पर्वताच्या वाटेवर एक आश्रम आहे. तिथले आचार्य यावर उतारा देतात तिकडे न्यायचे आहे एकदा तीला."
लोक असे काहीबाही बोलत होते. पण ते तुझ्या कानावरच येत नव्हते.
आणि मग तो दिवस आला.
मागील दुवा माझी राधा http://misalpav.com/node/50243
एक दिवस ,मथुरेहून दूत एक निरोप घेऊन आला. मथुरेत युवक दिनाचा उत्सव होता. त्यासाठी येण्याचे आमंत्रण होते. त्यात मल्ल युद्धाचे सामने देखील होते.
युवादिनाचे म्हणून खास मला आणि बलरामदादाला उत्सवाचे निमंत्रण होते. माझ्या कानावर आले तेंव्हा मला आणि बलरामदादाला कोण आनंद झाला होता.
मग तो दिवस आला
अकृर काका रथ घेऊन मला आणि बलरामदादाला न्यायला आला होता. राजधानी मथुरा कशी ते पहायची उत्सुकता होतीच मला. तुला जेंव्हा ही बातमी समजली तेंव्हा तू मला विचारले देखील.. मला ही तुझ्या इतकीच माहिती होती. नंदबाबांनी इतक्या लहान मुलांना कसे पाठवायचे म्हणून अगोदर नाहीच सांगितले. पण कंसमहाराजांचे आमंत्रण मोडायचे कसे हे पण होतेच. दोन दिवस राजधानीत गेल्यावर कसे वागायचे , कोणाशी काय बोलायचे हे शिकण्यातच गेले. तूच काय इतर पण मित्र वगैरे कोणाशीच काही बोलता आले नाही. कोणाचा निरोपही घेता आला नाही. मग जान्याचा दिच्वस उजाडला. अकृर काकांचा रथ घरासमोर तयार होता. घोडे फुरफुरत होते. सारथी त्यांना शांत करत होता. सकाळच्या उन्हात त्या सोनेरी रथावरची पताका फडकताना पाहून एकदम उत्साह वाटत होता. घरात एकदम वेगळेच वातावरण होते. नंदबाबा वरवर काही दाखवत नव्हते पण त्यांच्या चालण्याबोलण्यात नेहमीचा उत्साह वाटत नव्हता. चेहेर्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.मी आणि बलरामदादा नंदबाबांच्या पाया पडलो. त्यांचे आशिर्वाद घेतले. मग यशोदामायने आम्हाला ओवाळले. अजूनही आठवतय.ओवाळणीच्या तबकातल्या निरांजनाच्या प्रकाशात यशोदामायचा चेहेरा काही वेगळाच वाटत होता. निरांजनाच्या ज्योतीचे प्रतिबिंब तीच्या डोळ्यात उतरले होते. मला आणि दादाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला , मस्ताकावर अक्षता टाकल्या. माय च्या डोळे भरून आले होते. मला मायच्या कुशीत शिरावे आणि तीला धीर द्यावा असे वाटले.
मला मथुरेला जायचे होते आणि इथेही थांबायचे होते. गोकूळ सोडून आत्तापर्यंत कधीच गेलो नव्हतो.
नंदवाड्याच्या प्राम्गणात ही गर्दी झाली होती. जाताना निरोप द्यायला म्हणुन सगळे आले होते. गोकुळातलेच काय पण आजुबाजूच्या पंचक्रोशितले सगळे मोठे आणि मातबर लोक होते. ज्यांच्या आजवर खोड्या काढत होतो त्या गवळणीही आल्या होत्या . अगदी गोदावरीमावशी , निशा काकू , शर्मिष्ठा , क्रुतिका आत्या सगळ्या आल्या होत्या. यशोमायला त्या आम्हाला पाठवू नका म्हणून सांगत होत्या. पेंद्या ,वाकड्या , निशाद , कांत्या सगळे सवंगडीही होते. आम्हाला निरोप द्यायला अवघे गोकुळच जमले होते म्हणाना. इतक्या गर्दीत तू दिसत नव्हतीस. तुला पहायला माझी नजर भिरभिरत होती. पण तू दिसत नव्हतीस.
अकृर काका पुन्हा एकदा नंदबाबांना काहितरी समजावून सांगत होते. यशोमाय आमच्या साठी वाटेत तहानलाडू भूकलाडू साठी दिलेल्या पुरचुंड्या बलरामदादाला पुन्हा पुन्हा दाखवत होती. नंदवाड्याच्या अंगणातल्या या सगळ्या गर्दीत माझी नजर तुला शोधत होती. मला निरोप द्यायला तू नाहीस हे मन मानायला तयार नव्हते.
इतक्यात एका कोपरर्यात तू दिसलीस. तुझ्यासोबत तुझा पति अनयही होता. त्या सकोचामुळे तू पुढे येवू शकत नसावीस. पण माझी तुझी नजरानजर झाली. आणि आसपासच्या गर्दीची पर्वा न करता तू अचानकक धावत सुटलीस माझ्या दिशेने. वाटेतल्या अडथळ्यांची लोकांची तुला काहीच तमा नव्हती. तू वेगाने माझ्या जवळ आलीस. मला काही समजायच्या आत माझ्या कमरेची बासरी हिसकावून घेतलीस आणि आली होतीस त्याच वेगाने गर्दीत दिसेनाशी झालीस.तू गेलीस त्या दिशेकडे मी पहात राहिल्प. पण पाण्यात काठीने मारून उमटवलेली रेशा जशी क्षणार्धात नाहिशी होते तशी त्या गर्दीत तू गेलीस तो मार्ग पुसला गेला.
तुझा निरोप घ्यायचा राहूनच गेला.
ते तुझे शेवटचे दर्शन. अकृर काकांच्या सोबत रथात बसून मथुरेला गेलो त्या नंतर एकामागून एक घटना वेगाने घडत गेल्या. गोकुळाला येणे झाले नाही.
कधी कधी मनात विचार यायचे . विशेष करून बासरी वाजवताना.तू कशी असशील?
कोण होतीस माझी तू? मित्र , सखी , बहीण ? काय होते तुझे माझे नाते? या प्रश्नांची उत्तरे कधी मिळवाविशी वाटली नाहीत. कारण उत्तराने त्या नात्याला नाव दिले असते.
त्या नंतर आयुष्यात इतक्या व्यक्ती आल्या पण तूझी सर कोणालाच नाही. तू .... तूच. एकमेव.
अर्जूनासारखा मित्र आला. द्रौपदी सखी म्हणून आली. लग्न केले म्हणून आठ भार्या आल्या. मित्र , सखा नवरा ही नाती जुळली.
नाते म्हंटले की व्यवहार येतो. अपेक्षा येतात. या प्रत्येकाच्या माझ्याकडून काही ना काही अपेक्षा होत्या. मी आठ जणींशी विवाह केला. त्यातली रुक्मिणी सोडली तर इतर सगळे विवाह हे राजकीय तडजोडी होत्या. जांबवती, सत्यभामा , कालिंदी, मित्रविंदा ,भद्रा , लक्षणा कोशलदेशची नग्नजिता, या सगळ्याच जणी माझ्या अलोट प्रेम करतात . पण एक पत्नी म्हणून त्यांच्या अपेक्षा साहजिक आहे.
या सगळ्यांशी संसार करताना तुझी आठवण मनात कायम असते.
कारण माहीत नाही. जानून घ्यायची भिती वाटते. मन कावरेबावरे होते.
गोकुळातून जाताना तुला न सांगता निघालो. म्हणून असेल .
तुझे नी माझे नाते काय आहे?
मागचा सगळा काल झरझरा डोळ्यांसमोरून फिरून गेला. मी तो पहाण्यात मग्न झालो. कसलीशी चाहूल लागली म्हणून भानावर आलो.
अरे आपण तर आपल्या महालात आहोत. मग या आठवणी आत्ता कशाला येत आहेत. आणि येवून तरी काय उपयोग. भूतकाळात जावून एखादा क्षण बदलता आला असता तर....... क्षणभर वाटून गेले. कित्ती छान होईल ना. एक क्षण बदलता आला तर मी ज्या क्षणी मी गोकुळातून बाहेर पडलो तो क्षण बदलेन.
मी स्वतःशीच हसतो. कल्पना आणि वास्तव यात हेच तर अंतर असते. आपण म्हणतो कालचक्र पण चक्रावरचा विशिष्ठ बिंदू पुन्हा गाठता येतो. अगदी स्थिर राहिलो तरी. पण कालचक्रावरचा एखादा क्षण पुन्हा कधीच गाठता येत नाही. स्थिर रहा की गतिमान रहा.
सूर्य अजून उगवला नाही. उजाडलेलं नाही पण रात्र संपली आहे, आकाशातल्या चांदण्या फिकट होत चालल्या आहेत. काठावरची वेळ आहे ही. एका पुन्हा कसलीशी चाहूल लागते. गवाक्षाच्या बाहेर कसलीशी हालचाल जाणवते. मी पडदा दूर करतो. बाहेर अजूनही काळोख आहे. पहाटवारा आपल्या सोबत कसलासा मंद सुगंध घेऊन येतो. ओल्या मातीचा, ओल्या गवताचा, खळाळत्या नदीच्या पाण्याचा.
बाहेरच्या अंधाराला सकाळच्या धुक्याची जोड आहे. वातावरण अधीकच गहिरे झालंय. अशा वेळेस आपल्या एकटेपणाची जाणीव जास्तच होते.
पैंजणाच्या घुंघरांचा आवाज येतो. मी चमकून समोर पहातो. समोरच्या धुक्यातून एक आकृती जवळ येताना दिसते. मी सावध होतो. हात मंचकाशेजारी ठेवलेल्या खड्गाकडे जातो. पण तो तेथपर्यंत पोहोचत नाही. मधेच थांबतो. धुक्यातून येणारी आकृती म्हणजे तू आहेस. हे जाणवताच मी थबकतो
क्रमशः
प्रतिक्रिया
23 May 2022 - 10:04 pm | सुखी
सुरेख झालाय हा भाग पण..
31 May 2022 - 8:46 am | विजुभाऊ
पुढील भाग http://misalpav.com/node/50296