चालून चालून थकलो होतो. सकाळी न्याहारीही केली नव्हती. भूक बरीच लागली होती. नदीचे पाणी प्यालो. औदुंबराच्या झाडावरची काही फळे तोडून खाल्ली. झाडाची एक जाडशी फांदी पाहिली त्या,झोप लागली तरी पडणार नाही अशी खात्री करून घेतली अणि वर चढून बसलो. आता येऊ दे मायला शोधत मी सापडणारच नाही तीला.
मग कळेल की आपल्या कान्ह्याशी अबोला धरला की काय होते ते.
मागील दुवा : http://misalpav.com/node/50097
बराच वेळ त्या फांदीवर बसून राहिलो. डोक्यातला राग जात नव्हत. मग मीच माझ्याशी बोलू लागलो. "बघ तुला आता कळेल कान्हा किती चांगला आहे ते. दहीदूध की काय एकटा खातो का. माझ्या सगळ्या मित्रांनाही देतो. मग मला एकट्यालाच का रागवतेस. तू माझ्याशी अबोला धरतेस. आता मीच तुझ्याशी अबोला ठेवतो की नाही ते बघ. बघच तू आता बघच तू." तेच तेच शब्द मी पुन्हा पुन्हा बोलत रहातो . पण असं तरी किती वेळ करणार. थोड्यावेळाने त्याचाही राग यायला लागला. बासरी सोबत आणली आणली असती तर बरे झाले असते. . मी बासरी काढली असती.आणि ओठाला लावली असती.. राग आलेला असताना बासरी वाजवता येत नाही म्हणे. स्वरच सुचत नाहीत.बासरीनेही माझ्याशी अबोला धरला असता मग .बासरी माझा श्वास आहे.मी बासरीतून जबरदस्तीने स्वर काढायचा प्रयत्न केला असता. कशी वाजली असती बासरी? फुंकणीतून हवा जावी तशी ? त्याला स्वर नक्कीच म्हणता येणार नाही. बासरीचे हे असले बोल मी कधीच ऐकले नसते. बरं झालं आणली नाही ते.
सगळं जग माझ्या विरुद्ध कट रचतंय माझ्याशी अबोला धरतय.किती वेळ गेला असेल कोण जाणे. सूर्य माथ्यावर आला. मध्या:नीची किरणे कुंजवानातील हिरवळीवर झाडांवर पडून त्यांचा रंग वेगळाच भासत होता. मी अजूनही फांदीवरच बसलोय. यशोदा माय मला शोधायला आली तर तीला मी कुठे आहे ते दिसणारच नाही.मला मात्र ती दिसत राहील. पण मायच्या लक्ष्यात आले असेल का की मी कुठे दिसत नाहीये ते! . एका शंकेने मी कावराबावरा झालो. आत्ता धावत घरी नंदवाड्यात जावे आणि मायच्या कुशीत जाऊन बसावे. ती पण आपली वाट पहात असेल. कान्हा कुठे गेला म्हणून शोधत असेल. काळजी करत असेल. माय आपल्याला पाहून आश्चर्यचकीत होईल. ती आपल्याला कुशीत घेईल आपले लाड करेल............ खरंच करेल लाड ? की मग तीचा राग अजून गेला नसेल. माय कधीच रागवत नाही कान्ह्यावर.मग आज का रागावली. कान्हाही कधी रागवत नाही मायवर. पण आज माय रागावली.कान्हाही रागावणार. नकोच घरी जायला. माय पुन्हा विचारेल चोरी का केलीस म्हणून. लहनपणी तीने म्हणे आपल्याला उखळाला बांधून ठेवले होते. ... नाहीच जाणार मी घरी. करू देत तीला काळजी.
इतके विचार माझ्या त्या इवल्याशा मेंदूला झेपत नाहीत. मी चक्रावतो. त्या गुंगीतच कधी झोप लागली तेच समजले नाही.
पायाला काहीतरी हुळहुळले. मी डोळे उघडले. उन्हे कधीचीच उतरली होती. पश्चिमेकडचं आकाश संध्याप्रकाशाने वेगळेच दिसत होत. पायाला काय हुळहुळले म्हणून मी पायाकडे पाहिले. एक मोरपीस पायाला स्पर्ष करत होते. झाडाच्या फांदीवर मोरपीस ? मी खाली पहातो. झाडाखाली तू दिसतेस. काठीला मोरपीस बांधून ती काठी उंचावत तू माझ्या पायाला मोरपीसाने हुळहुळवत होतीस. मी जागा झाल्याचे पहाताच तू आनंदलीस.
झाडाखालूनच तू माझ्याशी बोलू लागलीस. मी घरात नाही हे समजताच यशोदामाय खूप व्याकूळ झाली होती.तीने आख्ख्या गोकुळात विचारले. तुला जेंव्हा हे समजले तेंव्हा यमुनेच्या काठावरून तू घरी परत न जाता सगळी कडे मला शोधत फिरत होतीस. यशोदामायपेक्षा तूच जास्त व्याकूळ झाली होतीस. कुठे कुठे शोधलंस मला! आणि शेवटी इकडे आलीस.
झाडावरून उतरत मी काही सांगायचा प्रयत्न केला पण तू मला बोलूच देत नव्हतीस. शेवटी तू माझा हात हातात घेतलास.म्हणालीस शपथ आहे कान्हा तुला.जी माणसे आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात त्यांना असे कधीच दुखवू नकोस. त्यांचं तुझ्यावरचं प्रेम हा त्यांचा प्राण असतो. त्याला असा कसावीस करून नकोस. आपल्या प्राणाची परिक्षा घेऊ नकोस.माय तुझ्यावर जीवापाड प्रेम करते तीच्यावर रागावून असं कधीच सोडून जाउ नकोस. आपल्या माणसांचं प्रेम हे या मोरपिसासारखे असते. कितीही रंग बदलले तरी त्यातला मायेचा स्पर्ष बदलत नाही.
मी विचारले " माय माझ्यावर जीवापाड प्रेम करते. आणि तू? "
त्या क्षणी तुझ्या चेहेर्यावर खूप काही बदल घडत जातात. आभाळ भरून यावे तसे तुझे ते टप्पोरे डोळे भरून येतात. तुझ्या तोंडून हुंदका फुटत नाही इतकेच. तू कसबसे स्वतःला सावरलंस. आणि तुझ्या हातातले मोरपीस माझ्या हातावर फिरवत म्हणालीस ' मी ते मोरपीस आहे असे समज."
तुझ्या शब्दांचे अर्थ समजण्याचे वय नव्हते ते माझे.
पण ते कुठेतरी आत खोलवर भिडले.
मी नि:शब्द झालो.
क्रमशः
प्रतिक्रिया
12 May 2022 - 10:23 pm | सुखी
विजुभाऊ मस्त लिहिलंय... ६ वा भाग लगेच टाकल्याबद्दल धन्स
13 May 2022 - 4:07 am | कर्नलतपस्वी
शब्दांकन आवडले.
लि.र.वा.रा.
13 May 2022 - 2:59 pm | विजुभाऊ
धन्यवाद कर्नल साहेब , सुखी.
पुढचे भागही लवकर टाकायचा प्रयत्न करतो
19 May 2022 - 12:10 am | विजुभाऊ
माझी राधा - ७ http://misalpav.com/node/50243