तुझी वाट पाहत.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
23 Feb 2022 - 9:33 am

अवखळ वारा
रिमझिम धारा
हळूहळू सांजावता
वाटतं ... तू येशील आता.

पावसानं झालंय
ओलंचिंब रान
मातीलाही सुचलंय
दरवळणारं गाणं.

मन माझं हेलकावतंय
विरहाच्या लाटेवर
नजर लावून बसलंय
तुझ्या नेहमीच्या वाटेवर.

असेच एकदा आठवणींचे
मेघ भरून आलेले
नकळत डोळ्यातून
झरुन गेलेले.

तुझी वाट पाहत तिथे
भिजलो होतो चिंब
म्हणून कुणा दिसले नाहीत
आसवांचे थेंब.

नाहीतर मित्रांना
हे गुपित कळलं असतं
खरं सांगतो त्यांनी मला
खूप-खूप छळलं असतं.

आता हळूहळू
होऊ लागलेय रात
मंद मंद जळते आहे
दिव्यामधील वात.

झोपलीत पाखरं
गाणं गात गात
मन माझं सैरभैर
तुझी वाट पाहत.

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

23 Feb 2022 - 6:15 pm | कर्नलतपस्वी

आवडली

Deepak Pawar's picture

23 Feb 2022 - 8:20 pm | Deepak Pawar

कर्नलतपस्वी साहेब आपले मनःपूर्वक आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2022 - 7:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

मन माझं हेलकावतंय
विरहाच्या लाटेवर
नजर लावून बसलंय
तुझ्या नेहमीच्या वाटेवर.

प्रेमात पडलात की वाट पाहणे आलंच.

आता हळूहळू
होऊ लागलेय रात
मंद मंद जळते आहे
दिव्यामधील वात.

मंद मंद जळते दिव्यामधील वात हे आवडलं.
खासच. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे
(मंद मंद तेवत असलेला )

Deepak Pawar's picture

23 Feb 2022 - 8:21 pm | Deepak Pawar

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब आपले मनःपूर्वक आभार.

राघव's picture

16 Mar 2022 - 4:28 pm | राघव

मंद मंद जळते दिव्यामधील वात हे आवडलं.

सहमत. छान रचना! आवडली.