अवघाचि संसार -रजायना,सास्काचवेन,कॅनडा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
17 Nov 2021 - 12:23 pm

आधीचे भाग

अवघाचि संसार-हिंदळे

अवघाचि संसार- हिंदळे-२

अवघाचि संसार- जांभुळपाडा

अवघाचि संसार - कल्याण

अवघाचि संसार- पुन्हा कल्याण

अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

अवघाचि संसार - अनगाव ते अंबरनाथ

अवघाचि संसार - आणि पुढे

अवघाचि संसार -प्रभाकर आणि नारायण

नेहमीप्रमाणे काम करता करता विकेंड आला होता. नशिबाने या वीकेण्डला डेटासेंटरमध्ये काही मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी वगैरे नव्हत्या.मागचे दोन तीन वीकेंड्स त्यातच गेले होते. या ऍक्टिव्हिटी म्हणजे आठवडाभर कामाची तयारी/प्लॅनिंग करण्यात जाणार,शनिवार /रविवार ऑफिसमध्ये ऍक्टिव्हिटी करण्यात जाणार.त्यात ब्रिजवरचे अर्धे लोक बंगलोर,पुणे,दिल्ली,एमस्टरडॅम,लंडन,ब्रसेल्स इथून तर काही विंनीपेग आणि कॅलगरीहुन जॉईन झालेले. प्रत्येकाची बोलण्याची लकब वेगळी,सांगायची तऱ्हा वेगळी,टेक्नॉलॉजी वेगळी. त्यात डेटासेंटरमधला फुल सविंगमध्ये असलेला ए सी चा घुमणारा आवाज. त्यामुळे समोरचा माणूस काय बोलतोय हे कळायला कानावर जोर द्यावा लागे. एका हातात गरम झालेला लॅपटॉप, डाटासेंटरमधली हाडे गोठवणारी थंडी, कानाला हेडसेट लावलेला, इकडे तिकडे पळणारे इलेक्ट्रिशियन,केबलिंगवाले एक ना दोन. आणि हे सगळे पार पाडून घरी येऊन निवांत झोपावे तर सोमवारी पहाटेपासून मोबाईल वाजायला सुरुवात. हे ऍप्लिकेशन चालत नाही,तिथे ४०४ टाइम आउट एरर येतोय, त्या वेबसाईट वरचा लोगो दिसत नाहीये, या ऍपवर एनवायएसइ चा लाईव्ह फीड दिसत नाहीये, ट्राफिक स्लो झाले आहे, हिट्स कमी झाल्या आहेत एक ना दोन. म्हणजे सोमवार सगळा ते प्रॉब्लेम बघण्यातच जाणार. त्यामुळे सगळेजण या ऍक्टिव्हिटी प्रकरणाला वैतागले होते.

अशात जेव्हा शुक्रवारी दुपारी राजेश आपला डबा घेऊन मला जेवायला बोलवायला आला तेव्हा स्वारी भलतीच खुशीत दिसत होती. मी मजेने म्हटले सुद्धा " क्या रे? लगता है आज बीबीने डब्बेमे कुछ खास दिया है ?" तर म्हणाला "अरे भाई, खाने का छोडो ,वो कुछ प्रॉब्लेम नही है. ख़ुशी इस बात कि है की इस वीकेंडमे कुछ भी ऍक्टिव्हिटी नही है, तो आरामसे सोनेको मिलेगा. दुसरा आज रातको ऑफिसमे पार्टी है तो जमके दारू पिनेको मिलेगी." ओह्ह ,मी विसरलोच होतो की आज ऑफिसात पार्टी होती. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे टेन्शन नव्हते. त्यामुळेच राजेशची स्वारी खुश होती. गप्पा मारता मारता जेवण झाले तोवर बाकीची मंडळीही पार्टी मूड मध्ये आली होती. किती वाजता निघायचे,कोण कोणाला लिफ्ट देणार,फॅमिली ला घेऊन यायचे कि नाही, मागच्यावेळी पिऊन कोण टल्ली झाले होते,कोणी जबरदस्त डान्स केला वगैरे विषय चघळले जात होते.

पार्टीच्या विचारात ६ वाजता घरी पोचलो तेव्हा मात्र घरातील कामांची यादी दिसू लागली.वीकेंडची बरीच कामे तुंबल्याने बायको वैतागली होती, तिला घेऊन दुपारी सुपर स्टोरमध्ये चक्कर मारायला हवी होती. जमल्यास नॉर्थ गेट किंवा साऊथलँड मॉलमध्ये जाऊन मुलांना थंडीसाठी काही कपडे घ्यायचे होते. तसे रजायना काही फार मोठे शहर नव्हते. टोरोंटो किंवा व्हॅन्कुव्हरच्या एखाद्या उपनगराएव्हढे असेल.पण माणसाला जगायला जे काही लागते ते सर्व इथे उपलब्ध होते. अन्न,पाणी,वस्त्र ,निवारा,वीज,इंटरनेट असे सर्व काही. दुसरे म्हणजे शहरी गजबजाटापासून ते दूर होते.९ ते ५ दिसणारी वर्दळ सोडली तर अंधार पडायच्या बेताला रस्त्यावर चालणारा मनुष्य दिसणे कठीण. शिवाय शहरात झाडी मोठ्या प्रमाणावर टिकून होती.विशेषतः वासकाना तळ्याच्या आणि युनिव्हर्सिटीच्या आजूबाजूला तसेच तळ्याच्या मध्यभागी विलो आयलंडवरसुद्धा. फॉल सीझनमध्ये तर तळ्याकाठी फिरताना नारिंगी पिवळ्या पानांचा खच पडलेला असायचा.एकदम मस्त फील यायचा.जुने लोक म्हणायचे त्याप्रमाणे ३०-४० वर्षांपुरवी इथे कोल्हे ,ससे ,हरणे असे प्राणीसुद्धा सहज दिसायचे.मग मात्र इथला विमानतळ बांधायला घेतला तेव्हा खूपच झाडे तोडली गेली होती. आणि त्या आधी शंभरेक वर्षे केनेडीयन पॅसिफिक रेल्वे बांधली गेली आणि तिचा एक मार्ग शहराजवळून गेला होता तेव्हाही. तरीही बर्यापैकी वृक्षराजी टिकून होती. शहरात एक दोन इंडियन स्टोर होती त्यामध्ये ग्लुकोज बिस्किटे,मॅगी,पॅराशूट तेल,उदबत्त्या,मसाले,पापड,लोणची असे खास भारतीय पदार्थ मिळायचे. तिथला मालक टोनी हा टिपिकल पंजाबी,एकदम गोडबोल्या. कॅनडात सेटल झालेला पण भारतात चांगले संबंध ठेवून असलेला. दर आठवड्याला त्याच्याकडे टोरोंटोहून एक ट्र्क येई त्यात मुंबई किंवा पिपावाव किंवा अशाच कुठल्यातरी भारतातील बंदरातून त्याच्या काका मामाने कंटेनरमध्ये भरून पाठवलेला माल असे. थोडे जास्त पैसे मोजावे लागत पण निदान आपल्या ओळखीच्या वस्तू बघून भारतात असल्यासारखे वाटत असे. लोणची पापडाने जेवणात आपली चव येत असे.

शेवटी हो ना करता करता शनिवारी दुपारी सगळी कामे करायला बाहेर पडायच्या बोलीवर बायकोशी तह झाला आणि पार्टीचे नक्की झाले. संध्याकाळी रामदा प्लाझामध्ये ऑफिसची पार्टी होती. कॉरीडोरमध्ये कोणी दिसत नव्हते पण अंदाजाने बेसमेंट लाउंजमध्ये लावलेला बोर्ड बघून दर लोटून आत शिरलो आणि आतला एकंदर माहोल बघून आपलेच लोक असल्याची खात्री पटली. सुरुवातीचे नमस्कार चमत्कार झाले. थोडे कोपऱ्यात एका टेबलावर मित्र मंडळी जमलेली दिसली त्यामुळे मग मी तिकडे मोर्चा वळवला. सगळ्यांचे एक एक ड्रिंक तरी झालेले दिसले. मंडळी हळूहळू हलकी होत होती.रविवारी सास्काचवेन रफ रायडर्सची विरुद्ध संघाशी सॉकर मॅच होती त्याबद्दल जोरदार चर्चा चालू होती. गावातहि सगळीकडे "गो रायडर्स गो" चे फलक आणि झेंडे लागले होतेच. काही वेळाने पेग पुन्हा भरले गेले. विषयांची गाडी हळूहळू भरकटत चालली होती. बोलता बोलता तू मूळचा कुठला वगैरे विषयांवर चर्चा आली. कर्टीस केफर म्हणाला" आम्ही मूळचे डॉर्टमुंडचे. माझे आजोबा डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आजी आजोबा युद्धाच्या धामधुमीला कंटाळून कॅनडाला पळून आले. माझे वडील इथेच जन्मले. आणि मग पुढची पिढीही इथेच जन्मली वाढली. त्यामुळे मी आता कॅनेडियनच म्हणायला पाहिजे. गेन होंफां गरिबीला कंटाळून व्हिएट्नामहून त्याच्या काकांबरोबर लहानपणीच कधीतरी कॅनडात आला होता. आणि इथेच स्थायिक झाला होता. केली वॉल्टर तर मूळचा इथलाच अबोरिजिनल होता. पण आपले मूळ ठिकाण कुठे असावे याबद्दल त्याला ना माहिती होते ना शोधण्याची उत्सुकता. स्कॉट पीपीन अमेरिकन पण फिरस्तीच्या नोकऱ्या करता करता त्याचे वडील कधीतरी कॅनडात आले आणि इथेच स्थायिक झाले होते. क्रिस बिबे इंग्लंडचा तर 'टेरी ओलोंगा आफ्रिकन होता. माझ्याबरोबरचे राजेश आणि हेमा हैदराबादचे रेड्डी तर अजून एक दोन त्रिवेंद्रम, चेन्नई आणि असेच कुठून कुठून कॅनडात नोकरीसाठी आले होते. फिरत फिरत तो प्रश्न माझ्यावर येऊन आदळला तेव्हा मी मुंबईचा आहे सांगून वेळ मारून नेली.

पण त्या प्रश्नाचा भुंगा मात्र घरी आल्यावरही माझी पाठ सोडेना. मी मूळचा कुठला? माझे पूर्वज कुठले होते?कुठून आले? विचारांच्या तंद्रीत मी बेडवरून उठून खोलीत कधी फेऱ्या मारू लागलो मलाच कळले नाही. बायको आणि मुले गाढ झोपली होती त्यामुळे माझ्या मनातील खळबळीचा त्यांना पत्ताच नव्हता. खिडकीवरचे ब्लाइंडस बाजूला करून बघितले तर बाहेर टिपूर चांदणे पडले होते. घरापाठच्या अंगणातील बर्फावर विलोच्या झाडाच्या सावल्या हलताना दिसत होत्या. विचार करकरून माझे डोके भणभणून गेले. तसाच घरात फेऱ्या मारताना मी एका कोपऱ्यातील क्लोझेटमधील देवघरासारख्या कोनाड्यापाशी आलो . भारतातून येताना सामानाबरोबर सगळे देव तर आणता आले नव्हते पण एक मोठी फ्रेम आणली होती ती क्लोझेटमध्ये विराजमान होती. छतावरील एका बारक्या दिव्याचा प्रकाश फोटोतील कालभैरवाच्या मूर्तीच्या तोंडावर पडला होता. जरा जवळ जाऊन पाहिले तर चार हात असलेली एका हाती धनुष्य,दुसऱ्या हाती बाण,तिसऱ्या हाती तलवार आणि चौथा हात आशीर्वादासाठी उचललेला अशी फोटोमधली कालभैरवाची मूर्ती माझ्याकडे पाहून मंद स्मित करत आहे असा आश्वासक भास होत होता.आणि ताबडतोब माझ्या मनातील खळबळ थांबली. तिथेच फोटोसमोर उभा असताना माझ्या हळूहळू डोळ्यासमोरून हरभट,रामचंद्र,गोपाळ,मुकुंद,प्रभाकर,नारायण,गजानन असे सगळे चेहरे एकेक करून तरळून गेले. आणि मी सावकाशीने चालत येत शांत चित्ताने पुन्हा माझ्या बेडवर येऊन पहुडलो. (समाप्त)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Nov 2021 - 12:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला छान झाली, सगळे भाग आवडीने वाचले.
तुम्ही तो काळ आमच्या समोर प्रभावी पणे उभा केला.
फारच छान, आता नवे काय?

पैजारबुवा,

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Nov 2021 - 3:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

आता नवीन ट्रिगर मिळेपर्यंत आराम.

कुमार१'s picture

17 Nov 2021 - 12:34 pm | कुमार१

लेखमाला छान झाली

प्रचेतस's picture

17 Nov 2021 - 12:34 pm | प्रचेतस

आवडली ही मालिका, शेवटचा भाग मात्र खूपच वेगळा. सर्व काही गवसलं तरीही थोडं हरवल्यासारखं वाटलं हा भाग वाचताना.

श्वेता व्यास's picture

17 Nov 2021 - 1:24 pm | श्वेता व्यास

कथामालिका छान झाली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Nov 2021 - 6:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद कुमारसर्,वल्ली,श्वेता

काका, मला वाटलेलं आपला आताचा नायक मुळ शोधत शोधत कोकणात जातोय काय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Nov 2021 - 3:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

बघुया कसे आणि कधी जमते

एकूण संकल्पना छानच आहे. हा भाग आधीच्या मालिकेची लिंक / कालक्रम/ प्रवाह अगदीच मोडून वेगळाच जोडलेला वाटला. शेवटी पूर्वजांच्या नावांचा संबंध जोडून संगती आणली असली तरी एकूण शेवटचा भाग इतर सर्व भागांच्या सलग दिशेत आला असता तर बरं झालं असतं. या आधीच्या भागाचा शेवट आणि हा भाग यांचा सान्धा तुटला आहे.

अगदी हेच मनांत आले होते

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Nov 2021 - 6:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण तसे केले नसते तर मग पुन्हा नारायणचा मृत्यु , मुलाचे शिक्षण, नोकरी, लग्न,स्थलांतर असे सायकल रिपीट झाले असते. त्यामुळे शेवटच्या भागात थोडे स्वातंत्र्य घेउन टाईम लीप घेतली आहे.