आधीचे भाग
अवघाचि संसार-हिंदळे
अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र
अवघाचि संसार - अनगाव ते अंबरनाथ
वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे प्रभाकर आणि नारायणापुढे साहजिकच अनेक प्रश्न उभे राहिले. राहत्या घराचा प्रश्न नव्हता पण गोपाळरावांनी अंबरनाथच्या पुढे नारिवली कुशीवली भागात काही जमिनी घेतल्या होत्या.जमिनी कुळांना कसायला दिल्या होत्या पण सगळं तोंडी व्यवहार असल्याने त्याचे कागदपत्र नीट माहित नव्हते. शिवाय आता मूळ मालक आणि कूळ हयात नसल्याने त्यांच्या हक्कासंदर्भात समस्या झाल्या होत्या. त्यात लक्ष घालावे लागणार होते. एक ना दोन. सगळ्या रीती भाती करता करता पहिले १३ दिवस भराभर निघून गेले, आलेले नातेवाईक पांगले आणि जीवनाचे रोजचे चक्र सुरु झाले. प्रभाकरचे लग्न अगोदरच झाले होते, नारायणचे लग्नाचे वय झाले होते,पण नुकत्याच झालेल्या आघातामुळे तो विषय बाजूला पडला होता. इकडे प्रभाकरच्या पत्नीला दिवस गेले होते, आणि ती बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. यथावकाश ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. पहिल्या नातवाच्या आगमनामुळे यमुनाबाईनी झालेले दुःख विसरून पुन्हा एकदा उमेद धरली. सून परत येण्याआधी त्यांची तयारीची लगबग सुरु झाली. समोर राहणाऱ्या कृष्णाबाईना मदतीला घेऊन त्या आठवेल तसतसे सामान भरून ठेवू लागल्या. बाळंतिणीची खोली सजली. सुनबाई बाळाला घेऊन कल्याणला परत आल्यावर तर घरभर अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले. शेजारीपाजारी पेढे वाटण्यात आले. नातवाला खेळवण्यात यमुनाबाईंचा दिवस भर्रकन जाऊ लागला.नातवालाही त्यांचा लळा लागला.
परंतु पुढे काही महिन्यातच सुनबाईला जवळच्याच शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली आणि तिचा अर्ध्याहून जास्त वेळ घराबाहेरच जाऊ लागला. नाही म्हटले तरी यमुनाबाईंचेही वय झाले होते. त्यामुळे स्वयंपाक पाणी,नातवाला सांभाळणे ,घराची इतर कामे हे सगळे त्यांना जरा त्रासदायक वाटू लागले. होता होता सासू सुनेच्या कुरबुरी सुरु झाल्या. घरातले वातावरण जरा गढूळ होऊ लागले. याच दरम्यान प्रभाकरला त्याच्या शिक्षणाच्या जोरावर मालाडच्या एका प्रथितयश कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होण्याची संधी चालून आली. खरे तर प्रभाकरने कल्याण सोडायचा कधी विचार केला नव्हता.पण सध्याची घरची परिस्थिती,कुरबुरी आणि मिळणारी मोठी संधी या सगळ्याचा विचार करून प्रभाकरने आपला निश्चय पक्का केला आणि येत्या शैक्षणिक वर्षांपासून तो त्याच्या कुटुंबासकट अंधेरीला राहायला गेला.
इकडे कल्याणला आता नारायण आणि त्याची आई असे दोघेच राहिले.थोडाफार नातेवाईकांचा गोतावळा होता पण नारायणला जास्त करून त्याचे बालपणीपासूनचे जिवलग मित्र बाळ बर्वे, राजा लेले,चंदू भातखंडे यांचीच साथ होती. यातला चंदू नोकरीवाला होता तर राजाची पारनाक्याला लाकडाची वखार होती.बाळ तुलनेने अशक्त होता,त्यामुळे तो उदबत्त्या,मेणबत्त्या, पापड,कुरडया वगैरे विकणे असे छोटे मोठे उद्योगधंदे करत असे. एक दिवस यमुनाबाई चंदूला म्हणाल्या "अरे चंदू ,नारायणचे लग्न करायचे आहे.पण या सगळ्या गडबडीत ते राहूनच जातेय बघ.आणि त्याच्याकडे विषय काढला तर तो सुद्धा काहीच बोलत नाहीये. तुम्ही सगळ्या मित्रांनी तरी काहीतरी मनावर घ्या आणि त्याला समजावा. माझे आता वय होत चालले. घराला बाईमाणसाचा आधार हवा ना?" चंदू तरी काय बोलणार? तो ही सगळी परिस्थिती जाणून होता. वडील गेलेले,भावाने वेगळा संसार मांडलेला, आईची जबाबदारी , या सगळ्यामुळे नारायण जरासा भांबावून गेला होता.नारिवली/कुशीवलीच्या शेतीचेही काही दस्त मिळत नव्हते.ते काम रखडले होते. आणि घरात पुढाकार घेणारे कोणी उरले नव्हते. या सगळ्यात लग्नाचा विचार कधी करणार? शेवटी चंदूने मनावर घेतले आणि एक दोन ठिकाणी नारायणचे नाव नोंदवून टाकले. शिवाय रामबागेतल्या मामांनी भेटून नारायणला समजावले. अखेर नारायणला ठाण्याची एक मुलगी पसंत पडली आणि अतिशय साध्या पद्धतीने ठाण्यालाच त्यांचे लग्न लागले. लग्नात मुलाच्या बाजूने फारच कमी नातेवाईक होते,तर मुलीच्या बाजूने मात्र बराच गोतावळा होता. नव्याची नवलाई संपायच्या आत लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात नारायणने बायकोला सांगून टाकले "माझा भाऊ आधीच वेगळा झाला आहे. वडील नाहीत,आई एकटी आहे. त्यामुळे मी हे घर आणि कल्याण सोडून कुठेही जाणार नाही." अशा तऱ्हेने नवा संसार सुरु झाला.
नारायणची पत्नी पहिल्यापासूनच नोकरी करणारी आणि स्वतंत्र बाण्याची होती. चूल आणि मूल असे तिचे स्वप्न नव्हते. दोघेही नोकरी करत असल्याने त्यांची एकूण सांपत्तिक स्थिती बरी होती. दोघांचा आठवडा ऑफिसात तर शनिवार रविवार घराची साफसफाई करणे, डागडुजी करणे, नातेवाईकांची लग्नें/ मुंजी यांना उपस्थित राहणे यात निघून जात असे. आतापावेतो इतरही मित्रांची लग्नें झाली असल्याने बरेच वेळा चारी मित्र कुटुंबासहित खाडीवर किंवा दुर्गाडी किल्ल्यावर फिरायला जात.कधी मधी जवळपास कुठेतरी नागाव अलिबाग अशा ठिकाणी जात किंवा एकमेकांच्या घरीच भेटून जेवणाचा कार्यक्रम करीत.
नारायणची नोकरी एकुणात बरी चालू होती, पण त्याच्या डोक्यात धंदा करायचे खूळ आले होते. त्याचे असे झाले की एकदा बाळ ह्या मित्राला बरेच काही सामान खरेदी करायचे असल्याने त्याला घेऊन नारायण मशीद बंदरच्या होलसेल मार्केटमध्ये गेला होता.बाळला पाहिजे ते सर्व तिथे मिळालेच पण तिथे नारायणच्या डोक्यात चक्र चालू झाले. नोकरी करून फावल्या वेळात काही उद्योग धंदा करता येईल का? आणि त्यायोगे आपली धंदा करायची आवड पूर्ण होऊन काही पैसे गाठीशी बांधता येतील का? हा तो विचार होता. त्यामुळे त्याने या मार्गाने चौकशी चालू केली. लवकरच त्याला काही गुजराती होलसेलर भेटले ज्यांना त्यांची दुधाच्या पावडरीची एजन्सी द्यायची होती. त्यावेळी दूध पावडर फारशी कोणाला माहित नव्हती, पण लांबच्या प्रवासाला जाणारे लोक, आईस्क्रीम उत्पादक,डेअरीवाले हे दूधपावडरीचे महत्व जाणून होते.वाया जाणाऱ्या दुधाची पावडर करून ती टिकवणे आणि विकणे किफायतशीर होते.थोडे पैसे आगाऊ रक्कम म्हणून भरून नारायणने ती एजन्सी घेतली. कल्याण आणि डोंबिवलीचे वितरणाचे हक्क त्याने घेतले आणि नारायण च्या आयुष्यात एक नवाच अध्याय सुरु झाला. आठवडाभर नोकरी आणि शनिवार रविवारी दूधपावडरीचा धंदा असा क्रम सुरु झाला. दर महिन्याला छोटे टेम्पो भरून दूध पावडरीची पोती मागवायची आणि हॉटेल्स ,कॅंटीन आणि किरकोळीने विकायची .जसे जसे मार्केटमध्ये ओळखी होऊ लागल्या तसतसा त्याला अंदाज येत चालला. अजून कसली एजन्सी घेता येईल याचा शोध घेता घेता त्याला जॅम,सरबते,चॉकलेट्स बनविणाऱ्या एका कंपनीबद्दल कळले. महाबळेश्वरला फॅक्टरी मध्ये त्यांचे सगळे उत्पादन होत होते आणि कल्याण डोम्बिवलीसाठी त्यांना वितरक हवा होता. नारायण ने हि संधी सुद्धा घेतली आणि त्याचा व्याप अजूनच वाढला. आता त्याला माणसांची आणि वितरणासाठी वाहनांची गरज भासू लागली. एक दोन माणसे कामाला ठेवून त्याने रिक्षा घेतली आणि जोमाने धंदा चालू ठेवला. दरम्यान कल्याणातील सामाजिक सांस्कृतिक घडामोडीमध्ये सुद्धा त्याचा सहभाग असे. कल्याण नागरिक किंवा वार्ता विलास सारख्या स्थानिक पत्रांमध्ये लेखन, सुभेदार वाड्यातील गणेशोत्सव, दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सव, जोमाने वाढणाऱ्या शिवसेनेचे सदस्यत्व असे एक ना दोन. मात्र पुढे पुढे या सगळ्याची दगदग होऊ लागल्याने त्याने नोकरीला रामराम केला आणि सामाजिक कार्यही कमी करून धंद्यावरच लक्ष केंद्रित केले.
आताशा कल्याणात वाडे पडून टोलेजंग इमारती बांधायचे खूळ पसरत चालले होते. जुने वाडेमालक आणि भाडेकरू यांच्यातले संबंध खेळीमेळीचे होते पण त्यांची नवीन पिढी आता तिथे होती ती मात्र हिशोबी होती. महागाई झपाट्याने वाढत चालली होती आणि घरांची भाडी मात्र अजूनही भूतकाळातीलच होती. अर्थातच त्यामुळे जागामालक आणि भाडेकरू यांचे संबंध ताणले गेले होते. वाड्याची पडझड होत होती पण डागडुजी करायला कोणी पुढे येत नव्हते.कारण जमणारी भाड्याची रक्कम आणि दुरुस्तीचा खर्च यांचा मेळ बसत नव्हता.दुसरीकडे कुटुंबे विस्तारत चालली होती आणि जास्त जागेची गरज होती.पण गावातल्या लोकांना सगळ्या सुखसोयी सोडून गावाबाहेर राहायला जाणे नको वाटत असे. वाड्यातील सार्वजनिक संडास ,विहिरीवर कपडे धुणे वगैरे गोष्टीही आता कालबाह्य वाटू लागल्या होत्या आणि त्याच्या ऐवजी घरातील संडास बाथरूमची सोय चांगली वाटू लागली होती.या सगळ्याचा परिणाम म्हणून एक एक कौलारू वाडा पाडला जाऊन त्या जागी ३-४ मजली इमारती उभ्या राहू लागल्या.आसपासची नारळी पोफळीची झाडे,फुलझाडे नाहीशी होऊ लागली. चाळीत आणि वाडा संस्कृती मध्ये दिवसभर घरांची दारे सताड उघडी ठेवून वावरणाऱ्या,पहाटे फिरून आसपासच्या झाडांवरची फुले देवपूजेसाठी गोळा करणाऱ्या लोकांना हळूहळू दारे बंद करून घरात बसायची,फुलपुडीवाल्याकडून फुले घ्यायची, लॅच की घेऊन बाहेर पडायची आणि एकमेकांकडे फोन करून जायची सवय लागली. मुकुंदरावांच्या मुलाने, गजानननेही तीच वाट धरली होती. त्याने आपला भाग दुसऱ्या एका बिल्डरकडून बांधून घेतला होता आणि बदल्यात एक फ्लॅट मिळवला होता.
येणाऱ्या काळाचे भान ठेवून नारायणनेही एका बिल्डरशी करार करून आपले घर पाडून बिल्डिंग बांधून घेतली आणि त्यातले दोन फ्लॅट स्वतःला ठेवून बाकीचे विकायला परवानगी दिली. त्याबदल्यात प्रभाकरने अंबरनाथचे घर आपल्याकडे घेतले आणि सामोपचाराने प्रश्न सोडवला.
नारायणला एक मुलगा आणि बाकी मुली होत्या. आतापावेतो सगळ्या मुली एक एक करून मार्गी लागल्या होत्या. मुलाचे मात्र अजूनही शिक्षण चालू होते. त्यामुळे धंद्यामध्ये त्याची मदत नव्हती. स्वतः फार न शिकल्याने मुलांनी तरी भरपूर शिकावे असे नारायण ला वाटणे साहजिकच होते. त्यामुळे त्याने कधीही मुलावर स्वतःस धंद्यात मदत करायची जबरदस्ती केली नव्हती.उलट "धंदा कुठे पळून जात नाही , तू पहिले शिकून घे" असेच त्याचे म्हणणे असे. मात्र स्पर्धेच्या युगात हळूहळू सगळे ताण वाढायला लागले. एकाला दुसरा स्पर्धक उभा राहू लागला. "तो वितरक ५ लाख गुंतवतो आहे? तर मी दहा लाख गुंतवतो. त्याची रिक्षा आहे? तर माझा मोठा टेम्पो मी देतो ." अशी स्पर्धा सुरु झाली. ज्या एजन्सी दहा पंधरा वर्षांपुरवी कोणाला माहित नसताना , किंवा टी व्ही वर जाहिरात नसताना नारायणने जीवाचे रान करून घेतल्या आणि वाढविल्या होत्या त्या घेण्यासाठी आता इतर लोक व्यापाऱ्यांना आमिषे दाखवून लागले होते. शिवाय मोडेन पण वाकणार नाही अशा वृत्तीमुळे काही काही ठिकाणी धंद्यात खोट बसली होती. नारायण ला एकदा हृदय विकाराचा झटकाही येऊन गेला होता. एकंदरीत काळाचा झपाटा आणि आपली प्रकृती पाहता नारायणने धंदा आवरता घेतला. आणि पूर्ण वेळ सामाजिक/बिगर राजकीय अशा उपक्रमात लक्ष घालायला सुरुवात केली. त्यात रस्ते रुंदीकरणात ज्यांची घरे जात होती त्यांना मार्गदर्शन, बुडालेल्या पतपेढीच्या ठेवीदारांना कायदेशीर सल्ला, असे अनेक उपक्रम असत. त्या निमित्ताने अनेक विद्वान लोकांशी ओळखी पाळखी होत, नवीन कायदे कळत,ज्ञानात भर पडे. एकंदरीत निवृत्तीचा काळ सुखाने चालला होता.(क्रमश:)
प्रतिक्रिया
15 Nov 2021 - 8:04 pm | मुक्त विहारि
कथानक चांगलीच पकड घेत आहे
15 Nov 2021 - 9:11 pm | गवि
येऊ द्या आणखी लवकर. आता अंदाजे सत्तरच्या दशकापर्यंत पोचल्यासारखं वाटतंय.
16 Nov 2021 - 11:52 am | राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद मुविकाका.
येस गवि सर!!कथा १९९० पर्यंत आली आहे. पुढचा भाग शेवटचा असेल.
16 Nov 2021 - 12:29 pm | मुक्त विहारि
आमच्याकडे पण हीच कथा होती
फक्त पात्रे 11 होती
5 पुरूष आणि 7 स्त्रीया
भला मोठा वाडा आणि भाऊबंदकीमुळे झालेल्या कोर्टाच्या फेर्या आणि कवडीमोलाने विकायला लागलेला वाडा ...