अवघाचि संसार- हिंदळे-२

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
13 Oct 2021 - 6:42 pm

यथावकाश सरस्वतीचे बाळंतपण होऊन तिला एक गोड मुलगा झाला आणि कावेरीचेही सणवार आटोपून ती हरकूळला परतली. सड्यावरच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने थोडके पैसे मिळाले त्यामुळे सर्व यथासांग पार पडले. बघता बघता वर्ष संपत आले. यावर्षी पीकपाणी ठीकठाक झाले होते.वरुण राजाने कृपा केली होती त्यामुळे सगळीकडे अगदी आबादी आबाद नव्हे पण समाधानकारक परिस्थिती होती. हरभटांची शेती गावातल्याच कुळांना खण्डाने कसायला दिली होती .त्याचे ४-५ पोती भात दसऱ्याला घरपोच आले असल्याने वर्षभराची बेगमी झाली होती. कोकणी माणसाला असे लागतेच काय? दोन वेळच्या जेवणात भात ,कधीतरी भाकरी. तोंडी लावायला कधी रानात मिळणाऱ्या कोकमाचे सार तर कधी बागेतल्या नारळाची सोलकढी. कधी पुढील दारातल्या फणसाची भाजी तर कधी मागील दारी असणाऱ्या केळीच्या केळफुलाची भाजी. इतर वेळी भागीरथी बाईंनी हौसेने परसदारी लावलेले कारल्याचे ,भेंडीचे ,काकडीचे, तोंडलीचे , भोपळ्याचे ,दुधीचे, घेवड्याचे,घोसाळ्याचे वेल काही ना काही देतच असत. क्वचित कधीतरी हरभट तालुक्याला जात तेव्हा तिकडच्या भाज्या घरी आणत. उन्हाळ्यात जेव्हा अगदीच काही मिळेनासे होई तेव्हा मग ताकाला फोडणी देऊन कढी किंवा नुसताच ताक भातही लिंबू किंवा आंब्याच्या लोणच्या बरोबर नाहीतर जवसाच्या ,लसणीच्या चटणी बरोबर खाल्ला जाई. घरची गाईगुरे असल्याने दूधातूपाला कमी नव्हती. शिवाय भागीरथीबाई उन्हाळ्याच्या दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत कामात गुंतलेल्या असायच्या. त्यात वर्षभराची पापड,लोणची,कुरडया,चिकवड्या,उपासाचे पदार्थ,मुरंबे असे काय काय असायचे. अडी अडचणीला,उपासाला ,आजारात, शेजाऱ्या पाजार्यांना द्यायला ते कामी येई.असे एक ना अनेक.

रामला जांभूळपाड्याला जाऊन वर्ष होत आले होते.हरभटांना त्याला भेटण्याची ,बघण्याची उत्सुकता लागली होती. त्याहून जास्त ती भागीरथीबाईंना होती, पण या सगळ्या पसाऱ्यातून त्यांचा पाय निघणे कठीण होते. त्यामुळे त्या हरभटांच्या मागे टुमणे लावून होत्या की एकदा समक्ष जाऊन मुलाला भेटून या.हरभटांची त्याला हरकत नव्हती,शेतीची कामे,सणवार झाले होते. फक्त जाऊन यायला आठवडा -दहा दिवस लागणार तेव्हा इकडच्या प्रपंचाची सोय लावून जाणे भाग होते. नारळाची बाग होती, नांदता गोठा होता, रोजची पूजा अर्चा होती असे एक ना दोन. हळूहळू एक एक करत हरभटांनी सगळी रुजवात केली आणि ते जांभूळपाड्याला जायची तयारी करू लागले. जांभूळपाड्याला जायचे म्हणजे पहिले बोटीने अलिबागला जायचे आणि तेथून पुढे बैलगाडी किंवा मिळेल त्या वाहनाने पेण,पाली असे करत जांभूळपाड्याला पोचायचे. यातच दोन दिवस जाणार. ते लक्षात घेऊन त्यांनी बोडस गुरुजींना पत्र टाकले. तसे बोडस गुरुजी त्यांचे, पक्षी बायकोचे लांबचे नातेवाईकच लागत असल्याने राहायची सोय होण्याचा प्रश्न नव्हता. पण:

हा पण म्हणजे हरभटांचा चुलत भाऊ गोविंदा किंवा गोंद्या. हा गोंद्या त्यांच्या राशीला आलेला शनीच होता म्हणाना. शाळा त्याने कधीच सोडली होती.लहानपणापासून गावभर उंडारणे, कोणाच्या ना कोणाच्या बागेत ,शेतात घुसून आंबे ,फणस पळवणे, गाई म्हशीना त्रास देणे,पोरे जमवून कालभैरवाच्या शेजारील पटांगणात खेळ असे त्याचे उद्योग असायचे. तब्येतीने दांडगा असल्याने कमजोर पोरांना पकडून धोपटणे किंवा किमान घाबरवणे हा त्याचा आवडता उद्योग असे, आणि हरभट पहिल्यापासूनच जरा नाजूक तब्येतीचे असल्याने त्यांनी गोंद्याचा त्रास भरपूर सहन केला होता.पण ही झाली लहानपणीची गोष्ट. पुढे थोडाफार व्यायाम जोर बैठका वगैरे मारून तब्येतीतला फरक भरून निघाला होता. मात्र मूळ मवाळ स्वभाव कसा जाणार ? आता जरी गोंद्या अंगाशी येत नसला तरी त्याचे त्रास देण्याचे उद्योग काही ना काही मार्गाने चालूच असायचे. कधी रातोरात हरभटांच्या बागेतील नारळ चोर, तर कधी आंबे फणस ढाप, आणि आता तर त्याने खुशाल अर्ध्या बागेवर आणि घरावर हक्क सांगितलं होता. कारण काय? तर पुरवी एक प्रपंच असताना त्याच्या बापाने ,म्हणजे लखोबाने सामायिक बागेत एक गोठा किंवा तत्सम खोपटे बांधले होते. वर्षानुवर्षे ते ओस पडले होते, त्यामुळे हरभटाने ते पाडून ती जमीन लागती केली आणि तिथे चार सहा नारळ सुपाऱ्या लावल्या. ती जागा आता त्याला पाहिजे होती.पंचायत भरली आणि त्यांनी एक मुखाने हरभटाची बाजू घेऊन त्याला समजवायचा प्रयत्न केला. पण ऐकेल तो गोंद्या कसला? त्याने सरळ जिल्ह्याला जाऊन एक वकील गाठला आणि कोर्टात केस केली. आधीच त्रासलेल्या हरभटाच्या मागे हे नवीन शुक्ल काष्ठ लागले. आता कोर्टाचे समन्स आले म्हणजे वकील करणे, तारखेला कोर्टात हजर राहणे ,साक्षी पुरावे देणे हे सगळे आलेच. स्वभावाने गरीब असले तरी हरभटांनी यावेळी मात्र कंबर कसली,प्रत्येक वेळी पड खाऊन कसे चालेल? अशावेळी पड खाल्ली तर राहते घर आणि बाग हातची जायची. त्यांनीही एक हुशार वकील गाठला आणि केस लढवायला सुरुवात केली. खरेतर हेही एक कारण होते की त्यांनी राम ला शिकायला लांब पाठवले होते. त्याला या सगळ्याची झळ लागू नये आणि आपल्या बरोबरच ही सगळी कोर्ट कचेरीची झेंगटे संपून जावीत असा त्यांचा हेतू होता. तो कितपत साध्य होणार होता ते एका कालभैरवालाच माहित. शेवटी एकदाची कोर्टाची तारीख होऊन, वकिलाला भेटून आपण नसल्याची कल्पना देऊन, तसेच घराच्या आणि बागेच्या राखणीची सोया लावून हरभट मुलाकडे जायला प्रस्थान ठेवते झाले. (क्रमश:)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

जेपी's picture

13 Oct 2021 - 10:08 pm | जेपी

हा भाग पण मस्त . पुभाप्र

पाषाणभेद's picture

13 Oct 2021 - 10:30 pm | पाषाणभेद

वाचतोय.
१९५० चे दशकातली कथा वाटते आहे अगदी.

प्रत्ययकारी वर्णन, सर्व घटना डोळ्यांसमोर येत आहेत.
पुभाप्र

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

14 Oct 2021 - 10:04 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान लिहिताय.

मस्त चित्रदर्शी लिहिताय राजेंद्र साहेब... न पाहिलेला काळ डोळ्यांपुढे उभा रहातोय
कृपया भाग थोडे मोठे लिहावेत, वाचायला घेतले कि लगेच संपल्या सारखे वाटतात. अर्थात ही आपण काहीतरी चांगले वाचत असल्याची निशाणी आहे 👍
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Oct 2021 - 11:05 am | राजेंद्र मेहेंदळे

मोठे भाग टंकायचा प्रयत्न करतो आहे. पण डोक्यातल्या विचारां एव्हढे हात भरभर चालत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे सलग लिहायला वेळ मिळत नाहिये.
तरीही बघतो काहितरी सोय.

सौंदाळा's picture

14 Oct 2021 - 11:10 am | सौंदाळा

हा भाग पण आवडला
वाचतोय

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2021 - 1:04 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

22 Oct 2021 - 1:04 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

22 Oct 2021 - 1:05 pm | चौथा कोनाडा

हा ही भाग सुंदर !

हौसेने परसदारी लावलेले कारल्याचे ,भेंडीचे ,काकडीचे, तोंडलीचे , भोपळ्याचे ,दुधीचे, घेवड्याचे,घोसाळ्याचे वेल काही ना काही देतच असत.

वेलींनी नटलेल्या सुंदर घराचे चित्र तंतोतंत डोळ्यापुढे उभे राहिले !

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

26 Oct 2021 - 8:10 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मला आवडतेच आहे. मुलांना सुद्धा वाचायला लावतो.

अतिशय उत्तम वातावरणनिर्मिती आणि सहज-सुंदर लेखन.
कुतुहल म्हणून अलिबागहून जांभूळपाड्याला जाण्याचा मार्ग गूगली सर्चिता पेण पासून जांभूळपाडा उत्तरेकडे, तर पाली दक्षिणेकडे असल्याचे दिसून आले. लेखातील उल्लेख मात्र असा आहे:

जांभूळपाड्याला जायचे म्हणजे पहिले बोटीने अलिबागला जायचे आणि तेथून पुढे बैलगाडी किंवा मिळेल त्या वाहनाने पेण,पाली असे करत जांभूळपाड्याला पोचायचे.

त्याकाळी असा मार्ग असायचा का ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Nov 2021 - 11:46 am | राजेंद्र मेहेंदळे

माफ करा. लिखाणात ढोबळ चूक झाली आहे, तिथे मार्गाच्या उल्लेखातुन पाली काढावे अशी संमं ना विनंती करतो.

@ राजेन्द्र मेहेंदळे: अनेक आभार. तुमची लेखमाला वाचताना ज्या ज्या स्थळांचा उल्लेख येत जाईल, ती गूगलमधे बघणे हा आणखी एक रोचक विरंगुळा आहे.
पहिल्या भागातील हरभट-गोदावरीबाईंचा नेमका काळ कोणता ? स्वातंत्र्यपूर्व काळापैकी आहे का ?

साधारण १८५० पासुन कथा चालु झालीये. ती २०१५ पर्यंत जाईल.

माझा वरील प्रतिसाद प्रकाशित केल्यावर लगेचच पहिल्या भागाच्या प्रतिसादातील वरचा उल्लेख वाचला.
आता बाकीचे भाग वाचायला घेतो आहे. अनेक आभार.