खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे.
१९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ... "या दुर्बल राष्ट्राकडून भलतीच अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे".
----
सेनापती बापट यावेळी शिष्यवृत्तीवर इंग्लंडमध्ये होते. तिथेच सावरकरही होते. सेनापती आपल्या काव्यमय आत्मचरित्रात म्हणतात,
लाला उचलिले झाला हलकल्लोळ गोंधळ ।
विचार करण्या बैसे विचारी जनमंडळ ॥
सूचना मांडिल्या कोणी, कोणी त्या उपसूचना ।
म्हटले मी मला काही यातील पटतेच ना ॥
करा तुम्ही सभा सर्व हिंदींची आंग्लभूगत ।
नसे तिचा विरोधी मी ऐका माझे मनोगत ॥
व्यर्थ भाषाविषी रोषे ओकणे टाकणे भले ।
भाषा सौम्य; म्हणा लाला त्रिमासात करा खुले ॥
जरी खुले न ते झाले खुल्या मंत्रिवरावरी ।
यंत्र माझे चालवीन यशायश हरी-करी ॥
“नको हे” ठरले त्यांचे माझेही ठरले तदा ।
“नको भाषा; मधुपुरी जातो, मज करा विदा'॥
इथे यंत्र म्हणजे बॉम्ब. मधुपूर म्हणजे पॅरिस. सेनापती बापट मग पॅरिसला गेले आणि रशियन क्रांतिकारकांच्याकडून त्यांनी बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया शिकून घेतली. बापट म्हणतात :-
तीन रूसी विश्वसेवा-ध्येयपूजक भेटले ।
वृत्त त्यांचे पाहुनीया आश्चर्य बहु वाटले ॥।
रूसी वीर क्रांतिकारी कशी घडिति मंडळे ।
ते वृत्त कथिले त्यांनी जशी श्रद्धा तशी फळे ॥।
रूसो क्रांतिमंडळाच्या घडणीची कथा मियां ।
टिपिली ती पुढे आली छापुनी निजदेशि या ॥।
रूसी ते वीर अज्ञात प्रकारे तेथ राहती ।
आम्हांसी सांगण्या गोष्टी आपुल्या गृहि बाहती ॥।
एक आचार्य त्यातील संस्कृतज्ञ तया घरी ।
जमू आम्ही विचारार्थ योजुनी योग्य चातुरी ॥।
संहारी रिपुचा वैरी प्रतिसंहारकारक ।
मंडळाचा मुख्य तेथे भेटला सत्त्वधारक ॥।
शिंपी आचार्य तिसरा प्रतिसंहारकाग्रणी ।
रूसी हे तीन बसले खोल जाउनिया मनी ॥।
खोल याहूनिही बसे एक रूसी महामुनी ।
जो सूचिपट्ट आम्हांते प्रेमे भेटवि आणुनी ॥।
ठेंगणा रूंद बांध्याने, दाढी स्वच्छ रुळे उरी ।
वृद्ध तो युवकाऐसा उत्साहे करि चाकरी ॥।
तेणे आम्हांसि दिधली गोलककृति-पुस्तिका ।
रूसी ती हस्तलिखिता सुट्या तद्गत पत्रिका ॥।
सेनापती बापट यांचा पुढचा विचार असा :-
आंग्ललोक सभास्थानी टाकावा रसगोलक ।
वाटे, पटे जरी तुम्हा ! तुम्ही की मुख्य चालक ! ॥।
पण सावरकर म्हणाले :-
“नको जसा तुटे तारा चमके पुढती तम ।
तसे होईल हे कर्म. व्यर्थ हे. हा नको श्रम ।।
जा तुम्ही भारता आता माथे शांत करा अति ।
ठरल्या रीतिने चाला. नको व्यर्थ चमत्कृती ॥।
ज्ञानप्रसार करणे तसा गोलकसंग्रह ।
जागजागी भारताला पुढे येतील सुग्रह ।।
या एक-एक कथा ऐकून त्या काळात हरवायला होतं, आजच्या व्यवहारी जगात परतावं लागतं, त्याला नाईलाज आहे.
प्रतिक्रिया
14 Jun 2021 - 6:19 am | तुषार काळभोर
पूर्ण आत्मचरित्र पद्य आहे?
14 Jun 2021 - 9:37 am | मनो
होय पद्य आहे, परंतु अपूर्ण आहे. त्यांचा परिचय इथं थोडाफार दिलेला आहे.
https://m.facebook.com/1577247042498279/posts/2788355651387406/
मी सेनापती बापट रस्त्यावर अनेक वर्षे नौकरी केली, माझं शिक्षण नगरला झालं, मुळशीचा परिसर बाईकवरून आणि पायी फिरुन झालेला, त्यामुळं या माणसाबद्दल प्रचंड कुतूहूल होतं. त्यातूनच जन्मलेला हा एक लेख.
विजय तेंडुलकरांनी सेनापतींचें आत्मचरित्र वाचून त्यांना शंका विचाराव्यात, की हे घडले ते असेच ना? सेनापतींनी म्हणावे की, हे असेच असेल बुवा, ही मोठमोठी माणसे उगाच खोटे का लिहितील. हे जुने जाऊ द्या, आजचे नवीन काय ते सांगा. तेंडुलकरांनी मग विचारावे, की फ्रेंच तरुणीकडून बॉम्ब सोडून अजून कशाकशाचे शिक्षण घेतलेत? असा तो संवाद !
14 Jun 2021 - 9:12 am | प्रचेतस
भारी आहे हे.
14 Jun 2021 - 9:30 am | Bhakti
वाह!
14 Jun 2021 - 4:52 pm | गॉडजिला
गेले ते दिवस... गेले ते पारतंत्र्य.
14 Jun 2021 - 5:03 pm | चौथा कोनाडा
जबरदस्त !
पुढील भागाची वाट पहात आहे !
15 Jun 2021 - 7:57 am | साहना
टिळक किंवा सावरकर ह्यांचे लेखन आणि ते सुद्धा मराठी भाषेतील लेखन पाहून वाचायला थक्क होते. आणि सध्या ट्विटरवरील मंडळी पाहून थोडे दुःख वाटते. सिंह गेले आणि त्याची जागा भाकड मरतुकड्या कुत्र्यांनी घेतली आहे.