आणीबाणीची चाहूल- भाग ६

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in काथ्याकूट
6 Jun 2021 - 8:40 am
गाभा: 

यापूर्वीचे लेखन

आणीबाणीची चाहूल- भाग १
आणीबाणीची चाहूल- भाग २
आणीबाणीची चाहूल- भाग ३
आणीबाणीची चाहूल- भाग ४
आणीबाणीची चाहूल- भाग ५

इंदिरा गांधींची साक्ष

१८ मार्च १९७५ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी साक्ष देण्यासाठी न्यायालयात आल्या. न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा एकदम वक्तशीर होते. सकाळी १० ला दोन मिनिटे कमी असताना ते न्यायालयात हजर झाले. इंदिरा गांधींना इतर साक्षीदारांप्रमाणेच वागविले जावे आणि त्या पंतप्रधान असल्या तरी त्या येतील तेव्हा कोणी उभे राहू नये, कोणी घोषणा देऊ नयेत, कोणी टाळ्या वाजवू नयेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थितांना परत एकदा दिले.

इंदिरा गांधींची साक्ष तीन मुद्द्यांभोवती फिरणार होती. पहिला मुद्दा म्हणजे त्या उमेदवार नक्की कधी झाल्या, दुसरा मुद्दा म्हणजे यशपाल कपूर यांनी राजीनामा कधी दिला आणि तो राजीनामा संमत कधी झाला तर तिसरा मुद्दा म्हणजे यशपाल कपूर यांनी इंदिरा गांधींसाठी नक्की कधीपासून प्रचाराचे काम करायला सुरवात केली. पहिल्यांदा इंदिरा गांधींचे वकील एस.सी.खरे यांनी प्रश्न विचारले.

खरे: २९ डिसेंबर १९७० च्या पत्रकार परिषदेत तुम्ही नक्की काय बोललात?
इंदिरा: कोणीतरी प्रश्न विचारला की विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आताच म्हटले आहे की पंतप्रधान इंदिरा गांधी आपला मतदारसंघ बदलून रायबरेलीऐवजी गुरगावमधून निवडणुक लढवणार आहेत. त्यावर मी म्हटले की माझा गुरगावमधून निवडणुक लढायचा कोणताही इरादा नाही.

खरे: तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही 'नाही तसे नाही' (No. I am not) असे दिलेत का?
इंदिरा: त्या पत्रकार परिषदेला बरेच दिवस झाले आहेत त्यामुळे मी नक्की काय उत्तर दिले हे याक्षणी माझ्या लक्षात नाही. पण मी 'नाही तसे नाही' (No. I am not) असे म्हटले असायची शक्यता आहे. माझा म्हणण्याचा अर्थ इतकाच होता की मी गुरगावमधून निवडणुक लढणार नाही. मी मतदारसंघ बदलणार नाही असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता.

खरे: तुम्ही यशपाल कपूर यांना १ फेब्रुवारी पूर्वी रायबरेलीत प्रचाराचे काम करायला सांगितलेत का?
इंदिरा: नाही. मी रायबरेलीहून निवडणुक लढविणार हे १ फेब्रुवारीलाच ठरले. त्यामुळे त्यापूर्वी यशपाल कपूरांना प्रचाराचे काम करायला सांगायचा संबंधच येत नाही.

खरे: यशपाल कपूर यांनी नक्की कधी राजीनामा दिला?
इंदिरा: कपूर १३ जानेवारीला मला भेटले आणि त्यांनी आपला राजीनामा द्यायचा निर्णय पक्का असल्याचे सांगितले. त्याविषयी आमचे पूर्वीही बोलणे झाले होते मात्र त्याविषयी नक्की विचार करून निर्णय घ्या असे मी त्यांना सांगितले. कपूरांचा राजीनामा द्यायचा निर्णय पक्का आहे हे समजल्यावर मी त्यांना सचिव परमेश्वर नारायण हक्सर यांच्याकडे राजीनामा द्यायला सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान कार्यालयातील सचिव या नात्याने हक्सर यांना राजीनामा मंजूर करायचा अधिकार होता.

खरे: रायबरेलीला प्रचारासाठी जाताना हवाईदलाच्या विमानांनी आपल्याला घेऊन जावे असा आदेश तुम्ही हवाईदलाला दिला होता का?
इंदिरा: नाही.

खरे: रायबरेलीत प्रचारसभांमध्ये व्यासपीठ उभारणे आणि बॅरिकेड्स लावणे यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकार्‍यांना तुम्ही आदेश दिला होता का?
इंदिरा: नाही.

त्यानंतर राजनारायण यांचे वकील शांतीभूषण इंदिरांना प्रश्न विचारायला उभे राहिले. सुरवातीला यशपाल कपूर नक्की कोणते काम पंतप्रधान कार्यालयात करायचे अशा स्वरूपाचे प्रश्न विचारून झाल्यावर मागील भागात उल्लेख असलेले हिमाचल प्रदेशचे उपराज्यपाल भदरीचे माजी संस्थानिक बजरंग बहादूर सिंग यांनी १९५९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष इंदिरा गांधींना लिहिलेले पत्र त्यांना दाखवत शांतीभूषण यांनी विचारले- "१९५९ च्या महासू पोटनिवडणुकीसाठी तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करावी असे हिमाचल प्रदेशच्या उपराज्यपालांना सांगितले होतेत का? कारण या पत्रात उपराज्यपालांनी या पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या विजयानंतर 'मी सगळ्यात कठीण परीक्षा उत्तीर्ण झालो आहे' असे लिहिले होते". या प्रश्नावर इंदिरांचे वकील एस.सी.खरे यांनी ताबडतोब आक्षेप घेतला. न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हांनी हा आक्षेप मान्य केला आणि म्हटले की- १९५९ मध्ये इंदिरा गांधींनी काय केले याचा या खटल्याशी संबंध दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्न विचारता येणार नाही. बहुदा शांतीभूषण यांना असा आक्षेप येणार याची कल्पना असावी. म्हणून त्यांनी ताबडतोब एव्हिडेन्स अ‍ॅक्टमधील संबंधित कलम वाचून दाखवले. त्या कलमात लिहिले होते की उलटतपासणीच्या वेळेस वकील संबंधित खटल्याशी प्रत्यक्ष संबंध नसलेले पण साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल अशी शक्यता असलेले प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर न्या.सिन्हांनी हा प्रश्न विचारायला शांतीभूषणना परवानगी दिली.

इंदिरा: मी उपराज्यपालांना पक्षासाठी कोणतेही काम करायला सांगितले नव्हते. परीक्षेत उपराज्यपाल उत्तीर्ण झाले याचा अर्थ मी त्यांना पक्षासाठी काही काम करायला सांगितले होते असे नाही. परीक्षा अनेक प्रकारच्या असू शकतात. मतदानाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था राखणे ही पण एक परीक्षाच होती. त्याची जबाबदारी अर्थातच उपराज्यपालांवर होती.

शांतीभूषण: यशपाल कपूरांनी १९६७ च्या निवडणुकांपूर्वी तुमच्या प्रचारासाठी काम करायला म्हणून पंतप्रधान कार्यालयातील सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता का?
इंदिरा: नाही. यशपाल कपूरांनी १९६७ च्या निवडणुकांपूर्वी राजीनामा दिला होता ही खरी गोष्ट आहे. मात्र त्यांनी त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षासाठी काम केले होते. फक्त माझ्या प्रचारासाठी नाही.

शांतीभूषणः १९६७ च्या निवडणुका झाल्यानंतर यशपाल कपूरांना पंतप्रधान कार्यालयात तुम्ही परत बोलावून घेतलेत का?
इंदिरा: हो

शांतीभूषणः त्यांनी त्यासाठी अर्ज केला होता का?
इंदिरा: नाही. मात्र निवडणुकांपूर्वीच ते दुसरे काम बघत होते हे मला माहित होते. तेव्हा पंतप्रधान कार्यालयातच त्यांना दुसरे काम देता येऊ शकेल असे मला वाटले म्हणून मीच त्यांना बोलावून घेतले.

असे प्रश्न विचारण्यामागचा उद्देश नक्की काय हा प्रश्न पडू शकेल. पण हे प्रश्न विचारून यशपाल कपूर हे इंदिरा गांधींच्या मर्जीतले होते हे दाखवून द्यायचा शांतीभूषण यांचा प्रयत्न होता असे दिसते.

शांतीभूषणः यशपाल कपूर यांनी जानेवारी १९७१ मध्ये तुमचा रायबरेलीत प्रचार करण्यासाठी म्हणून सरकारी नोकरीचा राजीनामा दिला ही गोष्ट खरी आहे का?
इंदिरा: नाही. त्यावेळी मी रायबरेलीतून निवडणुक लढवणार हे पण मला माहित नव्हते.

शांतीभूषण: यशपाल कपूर यांनी १३ जानेवारीला राजीनामा दिला हे दर्शविणारा कोणता अधिकृत दस्तऐवज तुम्हाला दाखवला गेला होता का?
इंदिरा: नाही. यशपाल कपूर १३ तारखेला पंतप्रधान कार्यालयात शेवटचे आले. त्यानंतर ते १४ तारखेपासून येणे बंद झाले.तसेच त्यांना पगारही १३ तारखेपर्यंतच देण्यात आला होता. परमेश्वर नारायण हक्सर यांनी मला सांगितले की कपूरांनी १३ तारखेला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे गॅझेट नोटिफिकेशन मी स्वतः बघितले होते.

शांतीभूषणः १८ फेबुवारी १९७५ म्हणजे आजपासून बरोबर एक महिन्यापूर्वी काय झाले हे तुम्ही सांगू शकाल का?
इंदिरा: माझ्या लक्षात नाही.
हा प्रश्न शांतीभूषण यांनी का विचारला असावा? ते पुढच्या भागात कळेल.

शांतीभूषणः यशपाल कपूरांचा राजीनामा तुम्ही अधिकृतपणे स्विकारला होता का?
इंदिरा: नाही.

शांतीभूषणः एखाद्या अधिकार्‍याची लेखी पत्रावर सहीशिक्क्यानिशी नियुक्तीपत्र न देता तोंडी आदेशाद्वारे नियुक्ती केल्याचे एखादे उदाहरण तुम्हाला माहित आहे का? (शांतीभूषण यांनी हा प्रश्न विचारला याचे कारण परमेश्वर नारायण हक्सर यांनी आपली नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून इंदिरांनी तोंडी आदेशाद्वारे नियुक्ती केली होती असे आपल्या साक्षीत सांगितले होते).
इंदिरा: नाही

शांतीभूषणः पंतप्रधान कार्यालयातील मुख्य सचिवांना पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करायचे अधिकार असल्याचा एखादा नियम तुम्हाला माहित आहे का?
इंदिरा: असा कोणताही नियम मला माहित नाही. मात्र मुख्य सचिवांना असे करता येणार नाही असाही नियम मला माहित नाही. माझे सचिव असे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत या गृहितकावरच पंतप्रधान कार्यालयाचे सगळे काम चालत होते.

शांतीभूषणः तुम्ही रायबरेलीतून निवडणुक लढायचा निर्णय कधी घेतलात?
इंदिरा: मी उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष कमलापती त्रिपाठी आणि इतर नेत्यांशी चर्चा करून मी रायबरेलीतून निवडणुक लढायचा निर्णय घेतला. हे १ फेब्रुवारी रोजीच झाले.

शांतीभूषणः पण १५ जानेवारी १९७१ च्या वर्तमानपत्रात लिहिले आहे की काँग्रेस संसदीय मंडळाने लोकसभेचे विद्यमान खासदार त्यांच्याच मतदारसंघातून लढतील असा निर्णय घेतला होता. तुम्ही पण चौथ्या लोकसभेच्या खासदार असल्याने हा निर्णय तुम्हाला पण लागू होत होता त्यामुळे निदान १५ जानेवारीपासून तरी तुम्ही स्वतःला रायबरेलीच्या उमेदवार असे समजायला सुरवात केली असे म्हणायला हरकत नसावी.
इंदिरा: असा कोणता निर्णय काँग्रेस संसदीय मंडळाने घेतल्याचे मला तरी माहित नाही. आणि असा निर्णय झाला असला तरी पंतप्रधान आणि पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांसाठी हा निर्णय लागू होणार नव्हताच. ते त्यांना पाहिजे त्या मतदारसंघातून निवडणुक लढू शकत होते.

शांतीभूषण: तुमच्या दौर्‍याच्या कार्यक्रमात २८ जानेवारीला सकाळी साडेअकराला तुम्ही रायबरेलीत आपला निवडणुक अर्ज भरणार असा उल्लेख आहे. हा कार्यक्रम तुमच्या संमतीने प्रसिध्द केला होता?
इंदिरा: हा कार्यक्रम माझ्या संमतीने प्रसिध्द केला होता. मात्र २८ तारखेला मी निवडणुक अर्ज भरणार होते हे बरोबर नाही. हा कार्यक्रम तात्पुरता होता आणि समजा मी रायबरेलीतून निवडणुक लढवायचे तेव्हाच ठरविले असते तर २८ तारखेला माझा निवडणुक अर्ज भरला असता. आणि एकदा निवडणुक अर्ज भरल्यावर तो परत कधीही घेता आला असताच.

प्रत्यक्ष साक्षीमध्ये अनेक प्रश्न विचारले गेले होते. मात्र सगळी प्रश्नोत्तरे लिहिली तर ते वाचकांसाठी कंटाळवाणे होईल म्हणून सगळे न लिहिता ठळक मुद्द्यांचाच समावेश या भागात केला आहे. इथपर्यंत प्रश्न विचारून झाल्यानंतर १८ मार्चची संध्याकाळ उजाडली आणि त्या दिवशीचे न्यायालयाचे काम संपले.

पहिल्या दिवशी इंदिरा गांधींनी आत्मविश्वासाने सगळे प्रश्न हाताळले आणि आपण कुठेही अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली. १८ मार्चच्या संध्याकाळी दिल्लीहून इंदिरा गांधींची साक्ष बघायला आलेले विरोधी नेते (मधू लिमये आणि इतर) राजनारायणांसह शांतीभूषण यांना भेटले. तेव्हा सगळ्यांचे मत झाले की इंदिरा गांधींनी पहिला दिवशी विचारलेले प्रश्न खूपच व्यवस्थित हाताळले. खासदार पिलू मोदी यांनी शांतीभूषणना विचारले की तुम्ही इंदिरांना इतके सौम्यपणे प्रश्न का विचारत आहात. त्यावर शांतीभूषण म्हणाले की आजच्या दिवशी मी त्यांच्यापुढे जाळे फेकले आहे. आपण सगळे प्रश्न व्यवस्थित हाताळत आहोत हा आत्मविश्वास इंदिरांना आला आहे. त्यामुळे त्या जाळ्यात त्या उद्या आपोआप अडकतील. उत्तर प्रदेशचे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल आणि इंदिरांच्या काँग्रेस पक्षाला जवळचे असलेले पंडित कन्हैय्यालाल मिश्रा यांनी इंदिरांना १८ मार्चच्या संध्याकाळी कळवले- "न्यायालयात आजचा दिवस चांगला होता हे समजले. मात्र तुम्ही तिथे साक्ष द्यायला जायला नको होते हे माझे मत पूर्वीही होते आणि आजही तेच मत आहे".

आतापर्यंत इंदिरा गांधी सतत म्हणत होत्या की त्यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणुक लढवायचे १ फेब्रुवारी १९७१ रोजी ठरविले. १९ मार्चला न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यावर नेमक्या याच मुद्द्यावर इंदिरांना पेचात पकडायचे शांतीभूषण यांनी ठरविले.

शांतीभूषणः तुमच्या मतदारसंघाविषयी पक्षाने निर्णय घेतला होता का?
इंदिरा: नाही. मी कोणत्या मतदारसंघातून निवडणुक लढवावी हे पक्षाने माझ्यावर सोडले होते.

शांतीभूषणः अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव के.एन.जोशी यांनी २९ जानेवारीला तुमच्या मतदारसंघाविषयी घोषणा केली होती का?
इंदिरा: माझ्या माहितीप्रमाणे नाही.

इथे इंदिरांना पेचात पकडायची संधी शांतीभूषण यांना मिळाली. याच खटल्यासंदर्भात इंदिरा गांधींच्या वतीने वकील एस.सी.खरे यांनी एक लिखित वक्तव्य न्यायालयात ऑगस्ट १९७२ मध्येच सादर केले होते त्यात के.एन.जोशी यांनी इंदिरांच्या मतदारसंघाविषयी २९ जानेवारी १९७१ रोजी घोषणा केली होती असे म्हटले होते. शांतीभूषण यांनी हा मुद्दा आणल्यावर साक्ष द्यायला सुरवात केल्यानंतर पहिल्यांदाच इंदिरा गडबडल्या.

शांतीभूषणः ऑगस्ट १९७२ मध्ये सादर केलेल्या लिखित वक्तव्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? त्यावर तुमची सही पण आहे.
इंदिरा: हो मी ते वक्तव्य वाचूनच त्यावर सही केली होती. पण ते कायदेशीर भाषेत असल्याने मला ते पूर्ण समजले नव्हते.

याक्षणी इंदिरा गोंधळलेल्या दिसल्या आणि आतापर्यंत सगळी साक्ष त्यांच्याबाजूने चालली होती आणि त्यामुळे त्यांना आलेला आत्मविश्वास डळमळीत झालेला दिसला. त्यानंतर इंदिरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करायला शांतीभूषण यांनी संजय गांधीच्या मारूती कंपनीवर काही प्रश्न विचारले. त्यापैकी काही न्यायमूर्तींनी विचारायला मान्यता दिली तर काहींना मान्यता दिली नाही. ते प्रश्न इथे लिहित नाही.

या खटल्यासंदर्भात इंदिरा गांधी शेवटच्या साक्षीदार होत्या. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आपापले दावे न्यायालयापुढे सादर करायला २१ एप्रिलपासून सुरवात केली. चौथ्या भागात म्हटल्याप्रमाणे काही दस्तऐवज हे सरकारचा विशेषाधिकार असल्याचा दावा करून उत्तर प्रदेश सरकारने ते न्यायालयात सादर करायला नकार दिला होता आणि ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. जानेवारी १९७५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या दस्तऐवजांना अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर केले जावे हा आदेश दिला आणि ते विशेषाधिकार आहेत की नाही याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घ्यावा. त्याप्रमाणे ते दस्तऐवज न्यायालयात सादर केले गेले आणि २ एप्रिल १९७५ रोजी त्यापैकी काही दस्तऐवजांवर विशेषाधिकारांचा दावा न्या.सिन्हांनी अमान्य केला तर काहींवरचा दावा मान्य केला.

इंदिरा गांधींच्या साक्षीतून त्यांच्याकडून दोन गोष्टी वदवून घ्यायचा शांतीभूषण यांचा डाव होता.

मागे म्हटल्याप्रमाणे या खटल्याचे कामकाज सुरू असताना जनप्रतिनिधी कायदा-१९५१ प्रमाणे उमेदवार हा स्वतःला उमेदवार समजायला लागतो तेव्हापासून उमेदवार बनतो. २९ डिसेंबर १९७० च्या पत्रकार परिषदेत त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला होता की विरोधी पक्षांच्या नेत्यांनी वक्तव्य दिले होते की पंतप्रधान इंदिरा गांधी रायबरेली सोडून गुरगावमधून निवडणुक लढविणार आहेत. त्यावर इंदिरांनी उत्तर दिले होते- नाही. तसे नाही (No. I am not.) या वाक्याचा अर्थ नक्की काय होतो? या वाक्याचा अर्थ इंदिरा रायबरेलीतूनच निवडणुक लढविणार आहेत असाच होत नाही? या वाक्याचा नक्की अर्थ काय होतो यावर इंदिरा गांधींच्या साक्षीपूर्वी न्यायालयात बराच युक्तीवाद झाला होता. शांतीभूषण यांनी जनसंघाचे नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस(ओ) चे नेते एस.निजलिंगप्पा आणि इतर काही नेत्यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलावले होते आणि या 'No. I am not.' चा अर्थ काय होतो असे तुम्हाला वाटते हा प्रश्न विचारला होता. सगळ्यांनी इंदिरा त्या वाक्याचा अर्थ इंदिरा गुरगावमधून निवडणुक न लढता रायबरेलीतूनच निवडणुक लढणार आहेत असा होतो असे सांगितले. तसेच दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये 'इंदिरा रायबरेलीतूनच निवडणुक लढविणार' अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या ती वर्तमानपत्रे शांतीभूषण यांनी न्यायालयात आणली होती. तसेच या पत्रकार परिषदेचे ध्वनीमुद्रणही न्यायालयात ऐकवले होते. या उत्तरातून इंदिरा स्वतःला २९ डिसेंबर १९७० पासूनच रायबरेलीच्या उमेदवार समजायला लागल्या होत्या हे दाखवून द्यायचा शांतीभूषण यांचा उद्देश होता. नेमका हाच प्रश्न एस.सी.खरे यांनी सुरवातीला विचारला आणि त्याच्या उत्तरात 'माझ्या म्हणण्याचा उद्देश मी गुरगावमधून निवडणुक लढवणार नाही' असा होता 'रायबरेलीतूनच निवडणुक लढवेन असा नव्हता' असे इंदिरा गांधींनी सांगून थोडीफार सावरासावर करायचा प्रयत्न केला. पूर्ण वेळ इंदिरा आपण १ फेब्रुवारीलाच रायबरेलीतून निवडणुक लढवायचे नक्की केले असे म्हणत होत्या. पण ऑगस्ट १९७२ मध्ये त्यांनीच न्यायालयात सादर केलेल्या लिखित वक्तव्यात (written statement- हे प्रतिज्ञापत्र नाही) वेगळेच लिहिले होते ही विसंगती आहे या मुद्द्यावर शांतीभूषण यांनी त्यांना पेचात पकडले. इंदिरांनी २९ डिसेंबर १९७० च्या पत्रकार परिषदेत दिलेले 'No. I am not.' हे उत्तर किती महत्वाचे होते हे आता लक्षात येईल म्हणूनच अगदी पहिल्या भागातच हे उत्तर लक्षात ठेवायची विनंती केली होती.

शांतीभूषण यांना दुसरी गोष्ट इंदिरांकडून वदवून घ्यायची होती यशपाल कपूरांच्या राजीनाम्याविषयी. पी.एन.हक्सर आणि स्वतः यशपाल कपूर यांच्या साक्षीत त्यांनी हा राजीनामा १४ जानेवारी १९७१ रोजी तोंडी स्विकारला गेला होता असे त्यांनी सांगितले होते हे आपण यापूर्वी बघितलेच. इंदिरांनीही साधारण त्याच दिशेने निर्देश केला. यशपाल कपूरांच्या साक्षीत शांतीभूषण यांनी त्यांना प्रचाराचे काम १ फेब्रुवारीपूर्वीच सुरू केले होते यावरून पेचात पकडले होतेच. आणि २२ जानेवारीला ते इंदिरांच्या प्रचारासाठी यशपाल कपूर गाड्यांचा ताफा घेऊन रायबरेलीत दाखल झाले हा फोटो स्थानिक वर्तमानपत्रात होता. नुसती बातमी असती तर वार्ताहाराने लढविलेल्या कल्पना म्हणून एकवेळ मान्य करता येईल. पण फोटो असेल तर असे कसे म्हणणार? या प्रश्नावरूनही यशपाल कपूर अडचणीत आले होते हे आपण मागच्या भागात बघितले. आपल्या देशात तीनचारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजांच्या राज्यकारभाराची कागदपत्रे उपलब्ध आहेत. इतिहास संशोधनात तो एक महत्वाचा आधार असतो. असे असताना तोंडी राजीनामा संमत केला हा दावा न्यायालयात टिकणे अशक्य होते. गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे २५ जानेवारीला यशपाल कपूरांचा राजीनामा पूर्वलक्षी प्रभावाने १४ जानेवारीपासून स्विकारला गेला हे पण आपण मागच्या भागात बघितले होते. शांतीभूषण यांना आता एवढेच दाखवून द्यायचे होते की राजीनामा असा पूर्वलक्षी प्रभावाने स्विकारणे अवैध आहे.

म्हणजेच काय तर इंदिरा २९ डिसेंबर १९७० पासूनच स्वतःला रायबरेलीतून उमेदवार समजायला लागल्या होत्या आणि यशपाल कपूरांनी त्यांचा राजीनामा संमत होण्यापूर्वीच इंदिरांच्या प्रचाराचे काम सुरू केले होते. त्यातील बर्‍याच गोष्टी हक्सर, यशपाल कपूर आणि स्वतः इंदिरा गांधींच्या साक्षीतून बर्‍यापैकी स्पष्ट होत होत्या. सगळ्या साक्षी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या प्रकीयेप्रमाणे दोन्ही बाजूंना आपला शेवटचा युक्तीवाद करता येतो आणि त्यानंतर फिर्यादीपक्षाला बचावपक्षाच्या युक्तीवादाला प्रत्युत्तर देता येते. त्यात शांतीभूषण यांना तेवढेच दाखवून द्यायचे होते. त्यानंतर शांतीभूषण यांचा दावा अभेद्य होणार्‍यातला होता.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2021 - 8:53 am | श्रीरंग_जोशी

न्यायालयीन साक्षीदरम्यानच्या निवडक पण महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांचे उत्तम वर्णन या भागात केले आहे.
पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

6 Jun 2021 - 10:33 am | तुषार काळभोर

सार्वजनिक जीवनात प्रत्येक व्यक्तीने एक एक शब्द किती जबाबदारीने, विचारपूर्वक उच्चारला पाहिजे, याचं उत्तम उदाहरण. जितकं पद उच्च, तितका जास्त विचार प्रत्येक शब्दामागे हवा.

तुम्ही रायबरेली ऐवजी गुरगाव येथून निवडणूक लढवणार आहेत का?
>> नाही, मी तसे करणार नाही.
>> मी गुरगाव येथून निवडणूक लढवणार नाही.
>> मी माझ्या मतदार संघाविषयी अजून निर्णय घेतलेला नाही.
>> नाही, अजून तसे काही ठरलेले नाही.

मला वाटते पहिल्या उत्तराऐवजी पर्यायी वाक्यरचना वा शब्द निवड केली असती, तर कदाचित इंदिरा गांधींना संशयाचा फायदा मिळाला असता.

पण चालू पत्रकार परिषदेत (आणि चालू साक्षीमध्ये) इतका विचार करायला वेळ मिळत नसावा.

अजून एक, चालता चालता बऱ्याचदा पत्रकार प्रश्न विचारायचा प्रयत्न करतात, तेव्हा ' नो कॉमेंट्स' असं म्हटलं जातं, ते किती महत्त्वाचं असतं, ते ही दिसतं.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Jun 2021 - 11:31 am | चंद्रसूर्यकुमार

मला वाटते पहिल्या उत्तराऐवजी पर्यायी वाक्यरचना वा शब्द निवड केली असती, तर कदाचित इंदिरा गांधींना संशयाचा फायदा मिळाला असता.

नक्कीच. त्यातूनही २९ डिसेंबर १९७० च्या त्या पत्रकार परिषदेनंतर रायबरेलीऐवजी अन्य कोणत्या मतदारसंघातून निवडणुक लढवणार अशा स्वरूपाचा एखादा जरी उल्लेख इंदिरांच्या बोलण्यात कुठेही आला असता तरी मग त्या आपला मतदारसंघ बदलायचा विचार करत असल्याने त्या २९ डिसेंबर १९७० पासूनच रायबरेलीतून स्वतःला उमेदवार समजू लागल्या होत्या हा मुद्दा रद्द झाला असता. तसे काही इंदिरा कुठे बोलल्याच नाहीत त्यामुळे बचावपक्षाला ते दाखवून देता यायचा प्रश्नच नव्हता. इतकेच नव्हे तर शांतीभूषण यांच्या शेवटच्या युक्तीवादात आणखी एक मुद्दा मांडला होता आणि तो अगदीच बिनतोड होता. आपल्या युक्तीवादात त्या मुद्द्याला उत्तर म्हणून एस.सी.खरेंनी काहीतरी सांगून ती बाजू सावरायचा प्रयत्न केला पण त्याला विशेष अर्थ नव्हता. शांतीभूषण यांच्या शेवटच्या युक्तीवादाविषयी पुढच्या भागात लिहिणार आहे.

पण चालू पत्रकार परिषदेत (आणि चालू साक्षीमध्ये) इतका विचार करायला वेळ मिळत नसावा.

मुद्दा तोच आहे. अशावेळी तयारी करून बोलायला वेळ नसल्याने बोलताना खरे ते बाहेर पडते. नेमके तिथेच विरूध्द बाजूच्या साक्षीदाराला शब्दात पकडणे हे वकीलाचे कसब असते.

मराठी_माणूस's picture

6 Jun 2021 - 12:04 pm | मराठी_माणूस

"....मात्र तुम्ही तिथे साक्ष द्यायला जायला नको होते हे माझे मत पूर्वीही होते आणि आजही तेच मत आहे"

न्यायालयात साक्षिला बोलावल्यास, तिथे जाणे टाळता येउ शकते का ?

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Jun 2021 - 12:17 pm | चंद्रसूर्यकुमार

न्यायालयात साक्षिला बोलावल्यास, तिथे जाणे टाळता येउ शकते का ?

नाही. पण इंंदिरा गांधींना साक्षीदार म्हणून त्यांच्याच वकीलांनी बोलावले होते. तसे करण्यापूर्वी त्यांच्याशी सल्लामसलत केली असणार हे उघड आहे. कन्हैय्यालाल मिश्रांचे म्हणणे होते की मुळात इंदिरांना साक्षीदार म्हणून बोलवा हा अर्जच न्यायालयापुढे करायला नको होता. पण एकदा न्यायालयाचे समन्स आले तर मात्र तिथे जावेच लागते.

माझ्या अंदाजाने स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येत नाही. म्हणजे विरुद्ध बाजूच्या वकिलाला आरोपीला साक्षीसाठी पाचारण करता येत नाही. उलटतपासणी मात्र घेता येते. अर्थात माझे कायद्याचे ज्ञान "तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतिजो पे पहुंची है" पासून मिळणाऱ्या ज्ञानापर्यंत मर्यादीत आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Jun 2021 - 1:07 pm | चंद्रसूर्यकुमार

माझ्या अंदाजाने स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती करता येत नाही.

हो. हा भारतीय नागरिकांना राज्यघटनेने दिलेला एक मूलभूत अधिकार आहे.

शाम भागवत's picture

6 Jun 2021 - 3:29 pm | शाम भागवत

लिहीत रहा. आम्ही वाचत जाऊ.
मुख्य म्हणजे पुढेमागे उपयोगी पडेल म्हणून जी माहीती तुम्ही साठवून ठेवली आहे ती वाचायला आम्हाला आवडेल.

श्रीगुरुजी's picture

6 Jun 2021 - 5:25 pm | श्रीगुरुजी

हा भाग सुद्धा उत्तम.

अभिजीत अवलिया's picture

6 Jun 2021 - 10:46 pm | अभिजीत अवलिया

उत्तम चाललीय लेखमाला.

उगा काहितरीच's picture

7 Jun 2021 - 10:29 pm | उगा काहितरीच

आवडला हा भाग. अगदी कोर्ट रुम drama प्रत्यक्ष अनुभवत आहे असं वाटत होतं वाचताना.
निवांतपणे वेळ काढून वाचतो आहे. उत्कृष्ट होत आहे मालिका.

कुमार१'s picture

8 Jun 2021 - 11:29 am | कुमार१

उत्तम चाललीय लेखमाला.