C - R - U - S - H - CRUSH
ज्या काही थोड्याफार भाषा कळतात / समजतात किंवा आवडतात त्यामध्ये इंग्रजी Crush ला समर्पक समानार्थी शब्दच सापडत नाही हो. आमची मराठी मुळातच रांगडी आणि इरसाल. Crush च्या नाजुकपणाला इथे जागा कमीच. संस्कृत ही साक्षात देववाणी. तिथे Crush मधली अगतिकता नाही. हिंदी मध्ये Crush मधला छिछोरपणा नाही. उर्दू Crush सारख्या अर्धवट गोष्टींमध्ये इंटरेस्टच घेत नाही. तिथे म्हणजे एकदम तबाही का मंजर - आग का दर्या है और डूब जाना है वगैरे मयखान्यातला सीन. पंजाबीत "मर जावां गुड खाके" असलं तरी Crush मधलं अव्यक्त राहणं पंजाबीला मंजूर नाही. आपल्या इतर भाषांची परिस्थिते काही फार वेगळी असण्याची अपेक्षा नाही.
थोडक्यात काय... इंग्रजीत जशी "ओवाळणे" ही कन्सेप्टच नाही तशी आपल्याकडे Crush हे प्रकरण नाही. पण आम्हाला इंग्रजी चहा आणि क्रिकेटची सवय लागली तशी ह्या इंग्रजी Crush ची पण बाधा झाली. पण मुळात पिंड पहिलवानीच. तेव्हा आमचे Crush देखील भलतेच. "तीव्र मध्यम", "कोमल रिषभ आसावरी", "बिलासखानी तोडी" वगैरे ऐकल्यावर एखाद्या क्लासिकलवाल्याच्या चेहर्यावर जशी "मीठी टीस सुहानी" उमटतते, तशीच काहीशी वेदना आम्हाला drag flick, slam dunk, inswinging yorker वगैरे आठवल्यावर होते.
Valentine's week च्या निमित्तानं आमच्या काही क्रशेसची ही उजळणी.
आमचा पहिला क्रश म्हणजे साक्षात Poetry in Motion. परिकथेतला राजकुमार.
कितीही महान खेळाडू असो - मुहंमद अली, नादिया कोमानेच, बोल्ट, तेंडुलकर, नदाल, मायकल जॉर्डन, ब्रॅडमन - कोणीही घ्या. त्यांच्या बाबतीत त्यांचं मनुष्यत्व दाखवणारी एखादी तरी गोष्ट असते. पण रॉजर रॉबर्ट फेडरर ह्या विभूतीला कष्ट, अपयश, गरीबी, नैराश्य असल्या गोष्टी शिवत असतील असं वाटतच नाही. "मधुराधिपते अखिलम मधुरम" तसं ह्याचं सगळंच दैवी. जन्म देखील भूलोकीच्या स्वर्गातला - स्वित्झर्लंड मधला. स्विस जर्मन, जर्मन, इंग्लिश, फ्रेंच, इटालियन, स्वीडिश आणि मोडकी-तोडकी का होईना - स्पॅनिश अश्या भाषा ह्याला येतात. मिर्कावहिनींसारखी गोड, साधी, सालस जोडीदार - दोन जुळ्या मुली आणि दोन जुळी मुलं असं दृष्ट लागण्यासारखं षटकोनी कुटुंब. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी. ह्याच्या बाबतीत सुखाचे सगळे चेक बॉक्सेस टिक झाल्यासारखे दिसतात.
पण ह्या सगळ्या "पिक्चर पर्फेक्ट" चित्रातला सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणजे त्याची खेळातली सहजता. टेनिस सारखा वेगवान, ताकदीचा, अॅथलेटिक खेळ सुद्धा ह्याच्यासमोर सोपा होतो की काय अशी शंका येते. इतर लोकं कोर्ट "कव्हर" करतात - हा कोर्टवर विहरत असतो. बाकीचे जीव तोडून धावतात - ह्याचा रथ pre - नरोवा कुंजरोवा धर्मराजासारखा जमिनीच्या वरून दोन अंगुळे फिरत असतो. बाकीचे दात ओठ खाऊन पूर्ण ताकदीनिशी बॉलवर तुटून पडतात - हा चित्रकारानी कॅनव्हासवर ब्रश फिरवावा तसा रॅकेट फिरवतो. इतर खेळाडू यशाच्या उन्मादात, अपयशाच्या नैराश्यात गर्जना करतात, ओरडतात - हा यशात उजवी मूठ दोन वेळा हलवणे आणि अपयशात दोन्ही हात कमरेवर ठेवणे ह्यापलिकडे काही जात नाही.
जमाना हुस्न नजाकत बला जफा शोखी |
सिमटके आ गये सब आपकी अदाओंमें ||
म्हणावंसं वाटावं इतकं आकर्षक टेनिस. आणि त्यात त्याचा तो single handed backhand. C - R - U - S - H - CRUSH.
एक तर आता टेनिस हा इतका आक्रमक आणि ताकदीचा खेळ झालाय की single handed backhand म्हणजे सोज्वळ दिसणार्या सनी लियोन इतकं दुरापास्त झालंय. हा मुळातच अतिशय majestic - राजेशाही फटका. महाभारतात ब्रह्मास्त्र जसं निवडकच योद्ध्यांना अवगत होतं तसं हा फटका भात्यात असणारे वीर खूप कमी. आणि majestic गोष्टीवर फेडररपेक्षा जास्त अधिकार कोणाचा असणार? त्यात फेडररच्या बॅकहॅन्डमधली सहजता, तो मूर्तीमंत डौल, ती ग्रेस, ते राजसि व्यक्तिमत्व, तो ठहराव म्हणजे एखादी कसलेली कथक नृत्यांगना अवधड आवर्तन पूर्ण करून सहजपणे समेवर यावी तसा अपार नेत्रसुख देऊन जातो. असं म्हणतात की simplicity is the ultimate sophistication. त्या बॅकहँडमागच्या वेगाची, ग्रिपचा बदल, रॅकेटचा अँगल, मनगटातली ताकद, फटक्याची दिशा ह्या सार्या गणिती गोष्टींची जाणीवही न होणं आणि तो फटका अतिशय साधा सरळ सोपा वाटणं ह्यातच सगळं आलं. त्या फटक्याची उपयोगिता, परिणामकारकता, सयुक्तिकता, अचूकता वगैरे प्रकार तिथे गौण ठरतात. एकदा का Crush असला की आपण त्याला / तिला भुगोलात किती मार्कं होते विचारतो का? तसंच हे पण. आपण फक्त त्या Crush चा आस्वाद घ्यायचा आणि "क्या बात है" म्हणायचं.
जे.पी.मॉर्गन
प्रतिक्रिया
9 Feb 2021 - 2:10 pm | कंजूस
भारी लिहिलंय या माणसाविषयी.
9 Feb 2021 - 5:24 pm | मुक्त विहारि
आवडले
9 Feb 2021 - 6:30 pm | NAKSHATRA
एक तर आता टेनिस हा इतका आक्रमक आणि ताकदीचा खेळ झालाय की single handed backhand म्हणजे सोज्वळ दिसणार्या सनी लियोन इतकं दुरापास्त झालंय. हा मुळातच अतिशय majestic - राजेशाही फटका. महाभारतात ब्रह्मास्त्र जसं निवडकच योद्ध्यांना अवगत होतं तसं हा फटका भात्यात असणारे वीर खूप कमी. आणि majestic गोष्टीवर फेडररपेक्षा जास्त अधिकार कोणाचा असणार? त्यात फेडररच्या बॅकहॅन्डमधली सहजता, तो मूर्तीमंत डौल, ती ग्रेस, ते राजसि व्यक्तिमत्व, तो ठहराव म्हणजे एखादी कसलेली कथक नृत्यांगना अवधड आवर्तन पूर्ण करून सहजपणे समेवर यावी तसा अपार नेत्रसुख देऊन जातो.
10 Feb 2021 - 9:09 pm | मूकवाचक
मस्तच लिहीलंय. सांख्यिकी आकडेवारी प्रमाणे वेगवेगळे निष्कर्ष निघू शकत असले तरी फेडरर हाच अस्मादिकांच्या मते GOAT - Greatest Of All Time टेनिस प्लेअर आहे. फेडररचा बॅकहँड लाजबाबच आहे. स्टॅन वॉरविंकासारखा 'हातोडा' नसला तरी तो हातोड्यापेक्षाही प्रभावी आहे.
फेडररची आणखी एक खासियत अशी की मानसीक दबाव आणणारी परिस्थिती निर्माण झाली की हमखास बिनतोड सर्व्हिस करून ती झुगारून देणे. फॉलो ऑन टाळण्यासाठी कपिलदेवने इंग्लंडविरूद्ध सलग चार षटकार खेचले होते, तसा प्रकार फेडररने कित्येक वेळा केला आहे.
9 Feb 2021 - 7:07 pm | असा मी असामी
क्या बात है. माझा सुद्धा आवडता खेळाडू. पण टेनिस चे वेड लावले सम्प्रस ने
9 Feb 2021 - 8:24 pm | तुषार काळभोर
आमचा क्रश जे पी मॉर्गन.
मग तेंडुलकरवर लिहिलंय, की ऋषभ पंतवर वर की रॉजर फेडरर वर... काय फरक पडतो.
आपण लेखाचा आस्वाद घ्यायचा!
9 Feb 2021 - 10:32 pm | Bhakti
इंग्रजीत जशी "ओवाळणे" ही कन्सेप्टच नाही तशी आपल्याकडे Crush हे प्रकरण नाही. मस्त!
सुंदरच प्रस्तावना.
पुढील लेखही सहज सुंदर भाषेत मांडलय,एकदम स्ट्राबेरी क्रशसारखा मस्त लिहिलंय.
9 Feb 2021 - 10:41 pm | चौथा कोनाडा
व्वा, भारी लिहिलंय !
+१
आमचा ह्या लेखनावर CRUSH जडला असं म्हणायला हरकत नाही !
10 Feb 2021 - 8:59 pm | गामा पैलवान
जे.पी.मॉर्गन,
तुमचा क्रश माझाही आहे.
फेडररची जादू काही औरंच ! एक जोरदार तडाखा लगावणार असं वाटंत असतांनाच हा पठ्ठ्या अतिशय नाजूक कोमल सव्यपात ( = फोरह्यांड ड्रॉप ) टाकायचा. प्रतिस्पर्ध्यासोबत प्रेक्षकांचाही पोपट व्हायचा !
हा फटका त्याने शोधून काढला व विकसित केला. ताकदवान खेळाच्या जमान्यात हा फटका शोधणं खरोखरंच उच्च दर्जाची कलाकारी आहे.
बाकी, क्रशला मराठीत प्रेमज्वर/प्रीतज्वर कसा वाटतो? ज्याच्यावर क्रश जडला त्याला/तिला प्रीतप्रमोद/प्रीतप्रमोदिनी म्हणायचं. ज्याला/जिला जडला त्याला/तिला प्रीतज्वरी/प्रीतज्वरिणी म्हणायचं.
आ.न.,
-गा.पै.