रिक्षाचालकांचा इलाज
प्रवाशांचे हक्क आणि रिक्षाचालकांचे कर्तव्य
आपल्या देशात काही व्यवसाय करण्यासाठी सर्वांना मुक्त परवानगी आहे. परंतू इतर काही व्यवसाय करण्यास परवाना पद्धती लागू करण्यात आली आहे. हे व्यवसाय सर्वांनाच करता येत नाहीत. त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येते जेणेकरून त्यांच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण न होता त्यांना नियमित उत्पन्न मिळावे. रिक्षावाहतूकीचा व्यवसाय हा देखील त्यापैकीच एक आहे. त्याचप्रमाणे टॆक्सीवाहतूकीचाही. या व्यवसायातील लोक काळ्या-पिवळ्या रंगातील वाहनांचा उपयोग करतात. हे रंग ते सार्वजनिक सेवा करतात असे दर्शवतात. त्यामूळे या लोकांच्या व्यवसायाला एक स्पर्धामुक्त वातावरणाचे संरक्षण लाभले आहे. उदाहरणार्थ :- वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय करणारे इतर लोकही असतात की जे आपल्या वाहनावर लाल रंगात T हे इंग्रजी अक्षर रंगवून घेतात. यांच्या वाहनाला पिवळ्या रंगाचा क्रमांकफ़लक असतो. परंतू या व्यवसायासाठी लागणारा परवाना सर्वांनाच मिळू शकतो. यांच्या संख्येवर कुठलीही मर्यादा नाही. त्यामूळे त्यांच्यात स्पर्धा असते. म्हणजेच एखादा आपली इंडिका रु.६/- प्रति कि.मी. भाड्याने देईल तर दुसरा रु.५/- प्रति कि.मी. भाड्याने देईल.
परंतू रिक्षा / टॆक्सी व्यवसायात अशी स्पर्धा नाही. त्यांना एका ठराविक दरानेच व्यवसाय करावा लागतो. एका दृष्टीने हा त्यांचाही फ़ायदा आहे कारण त्यामूळे त्यांच्यात चढाओढ लागत नाही आणि त्यांच्या व्यवसायाला संरक्षण मिळते. त्याप्रमाणे हा त्यांच्या प्रवाशांसाठीही फ़ायदा आहे. अशाच पद्धतीचे इतरही काही नियम या व्यवसायासाठी बनविले आहेत की जे प्रवासी व व्यावसायिक या दोघांसाठी फ़ायद्याचे तसेच बंधनकारकही आहेत.
१. कायम टेरिफ़ कार्ड व मीटरचा उपयोग करणे
२. स्टॆंडवर येणारे कुठलेही भाडे न नाकारणे.
३. भाडे घेतल्यानंतर वाहनात आपल्या तर्फ़े इतर प्रवासी / नातेवाईक यांना न बसविणे.
४. सार्वजनिक बस वाहतूकीच्या थांब्यावर प्रवासी न भरणे.
५. अधिकृत रिक्षा थांब्याव्यतिरिक्त प्रवासी भरण्याकरिता इतरत्र रिक्षा उभी न करणे.
हे व इतर अनेक नियम किती तरी प्रवाशांना ठाऊकच नाहीत.
पिंपरी-चिंचवड मधील रिक्षावाले
मला माझ्या कामानिमित्त अनेकदा निगडीहून पुणे शहरात यावे लागते तेव्हा मी माझ्या घरापासून सकाळी निगडी बसस्टॊप पर्यंत येतो आणि तिथून पीएमटीने पुणे शहरात येतो. पुणे शहरात बहुतेक ठिकाणी पीएमटीची सेवा बरी आहे. माझे काम होऊन जाते. परंतू पुन्हा संध्याकाळी निगडीला आल्यावर परत माझ्या घरापर्यंत जायला बसची नियमित सोय नाही.
रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे घ्यायचे मान्य नाही. ते प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट भाडे वसूल करतात. प्रवाशांनाही त्यात काही चूक आहे असे वाटत नाही. प्रवासी रिक्षात बसण्या आधी चालकाला इच्छित स्थळी जाण्याचे भाडे विचारतात त्यानंतर थोडीफ़ार घासाघीस करतात. पटले तर बसतात नाहीतर सरळ चालत जातात.
मी यावर उपाय केला तो असा :-
मी एका रिक्षात बसलो आणि त्याला माझ्या घराचा पत्ता सांगितला तो म्हणाला १५ रुपये होतील. मी म्हंटले चालेल. नंतर आम्ही आमच्या घरापर्यंत आलो तेव्हा मी त्याच्या हातात दहा रुपये दिले तर तो भांडायला लागला. नंतर त्याचा आरडाओरडा ऐकून माझे कुटुंबीय आणि इतर लोक ही जमा झाले. त्याने सर्व हकीगत सांगितल्यावर माझे कुटूंबीय व इतरांनीही त्या रिक्षाचालकाचीच बाजु घेतली. सर्वांचे म्हणणे असे पडले की जर तुमचे पंधरा रुपये अगोदरच ठरले होते तर आता ते जास्त वाटले तरी दिलेच पाहिजे.
त्यावर मी काही गोष्टी रिक्षावाल्याला तसेच इतरांनाही समजावून सांगितल्या.
१. रिक्षा वाल्याने मी रिक्षात बसल्यावर लगेच मीटर चालु करून रिक्षा इच्छित स्थळी न्यायला हवी.
२. मला तोंडी भाडे सांगणे हे पुर्णत: बेकायदेशीर आहे. त्यामुळे ते भाडे त्याने मला अगोदर सांगितले असले तरी माझ्यावर बंधनकारक ठरत नाही.
३. मी रिक्षाने केलेला प्रवास १.६ कि.मी. असुन जर मीटर चालु केले असते तर त्यावर दहा रुपये भाडे दाखवले गेले असते. (त्या काळातील दराप्रमाणे). तेव्हा मी दिलेले भाडे बरोबरच आहे.
४. या सर्व गोष्टी पटत नसतील रिक्षावाल्याने पुन्हा एकदा मीटर टाकून तोच प्रवास करुन खात्री करुन घ्यावी तसेच इतर नियमांचीही शहानिशा पोलीस ठाण्यात जाऊन करून घ्यावी.
रिक्षावाला या कुठल्याच गोष्टीसाठी तयार झाला नाही. तो मला म्हणाला,"आता मला १५ रुपये द्या. मग माझा नंबर लिहुन घ्या आणि हवी तर माझी तक्रार पोलिसात करा." त्यावर मी त्याला म्हणालो,"तुम्ही काय मला पावती देणार आहात काय? मग तुम्हीच दहा रुपये घ्या आणि पाहिजे तर तुम्हीच माझी तक्रार करा."
ठाम
त्यावर त्याने बरीच वादावादी केली परंतू मी माझ्या निर्णयावर ठाम असल्यामूळे तो शेवटी दहा रुपये घेऊन गेला.
असाच प्रयोग मी त्यानंतरही चार वेळा केला. प्रत्येक वेळी थोडा फ़ार संघर्ष करावा लागला पण मी ठाम राहिलो.
शेवटच्या वेळी तर कहरच झाला. रात्रीचे दोन वाजले होते. मी मुंबईहून आलो होतो. निगडी ला उतरलो. रिक्षा धरली. रिक्षावाला म्हणाला, "वीस रुपये". मी म्हणालो,"ठीक आहे." नंतर आम्ही शंभर मीटरच पुढे गेलो असू तर त्याने एकाला रिक्षात घेतले आणि माझ्याशेजारी बसवले. तो त्याचा मित्रच होता आणि केवळ वेळ घालवण्याकरिता आमच्या बरोबर येत होता.
माझ्या घरापाशी आल्यावर उतरताना मी त्याला दहा रुपये दिले. तो आरडा ओरडा करु लागला. मी त्याला म्हंटले,"हे बघ मीटर ने दहा रुपये होतात. रात्री बारानंतर म्हणजे दीडपट म्हणुन पंधरा रुपये होतात. पण तु अजुन एक प्रवासी घेतला. मग भाडे विभागले जाऊन होते रुपये साडेसात. तर आता तू मला अडीच रुपये परत दे." हे ऐकून तो अजुनच चवताळला. आजुबाजुचे लोक जागे झाले. त्यातल्या एकाने पाचाची नोट काढली आणि रिक्षावाल्याला देऊ लागला. त्यावर मी त्या रिक्षावाल्याला ठणकावुन सांगितले,"हे बघ त्या नोटेला हात लावलास तर मी मारामारीला सुरुवात करीन आणि पहिल्यांदा तुला नाही तर तुझ्या या मित्राला चोपून काढीन. कारण मी इथे माझे घर आहे म्हणुन आलो तर तु रिक्षाचालक म्हणुन मला घेऊन आलास पण तुझा हा मित्र इथे का आला याचे पटण्यासारखे काहीच उत्तर त्याच्याकडे नाही त्यामुळे मी त्याला मारले तरी तो पोलिसांना माझी तक्रार करु शकणार नाही." एवढे बोलून मी त्या मित्रापाशी सरकलो. तर तो घाबरुन पळून गेला आणि त्याच्यामागोमाग तो रिक्षावालाही. (कारण रिक्षा शेअर करण्यासाठी प्रथम बसलेल्या प्रवाशाची परवानगी आवश्यक असते जी या रिक्षाचालकाने घेतली नव्हती.)
अशा प्रकारे मी ठाम भुमिका घेऊन माझ्यापुरते तरी या नाठाळ रिक्षाचालकांना नमविले. परंतू आमच्या शेजारच्या नागरिकांच्या बचावात्मक पवित्र्यामुळे मी आता असले प्रकार सोडून दिले आहेत. आता मी माझ्या घरातून माझी दुचाकी घेऊन निघतो आणि ती निगडीच्या वाहन तळावर पाच रुपये देऊन उभी करतो. पिंपरी-चिंचवड शहरात आता मी रिक्षातुन प्रवास करीतच नाही.
इतर प्रकारांनीही त्रास
अर्थात रिक्षातून प्रवास केला नाही म्हणजे रिक्षावाल्यांचा त्रास संपला असे नाही. त्यांचे त्रास देण्याचे इतरही प्रकार असतात.
१. आपण बसथांब्यावर उभे असतो आणि बस आपल्या समोर थांबते तेव्हा ते आपल्या आणि बसच्या मध्ये अशा प्रकारे येऊन थांबतात की आपल्या बसमध्ये चढता येऊ नये.
२. चुकीच्या दिशेने रिक्षा आपल्या दुचाकी वर घालणे.
३. चौकात सिग्नल हिरवा असतानाही थांबून प्रवासी भरणे व मागच्या वाहनांची गैरसोय करणे.
४. स्वत:ला डावीकडे वळायचे नसुनही वळणावर डावीकडे थांबून प्रवासी भरणे व डावीकडे वळणा-या वाहनचालकांची गैरसोय करणे.
५. अधिकृत रिक्षाथांब्यांशिवाय इतरत्र रिक्शा उभी करुन रस्त्यावर अतिक्रमण करणे आणि इतर नागरिकांची गैरसोय करणे.
याचा बंदोबस्त कसा करावा याच विचारात सध्या मी आहे.
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 8:05 pm | कपिल काळे
आपल्या भावना चांगल्या आहेत. योग्य विचार आहेत. पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ......
बरं ते जाउ दे. तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो?
http://kalekapil.blogspot.com/
26 Nov 2008 - 9:25 pm | चेतन सुभाष गुगळे
"पण तुम्ही मारामारीची धमकी दिलीत. ......"
- त्या वेळची ची तशी गरज होती.
तुम्ही "डोंबिवली फास्ट" बघितलाय का हो?
- नाही, पण त्याचे कथासूत्र माहीत आहे. अर्थात माझे हे रिक्षा प्रकरण त्या पूर्वीचे आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
27 Nov 2008 - 12:43 am | टारझन
तसाही आम्ही रिक्षाप्रवास तिन मित्र असलो तरीही चार वेळा विचार करूनच केलेला, आणि कधी आठाणे जास्त दिले नाहीत. पुणे मध्यवर्ती भागात रिक्षावाले मिटर प्रमाणे पैसे घेतात, पिं-ची मधे असा प्रकार नसावा.
बाकी एकदा आमच्या पायावरून एकाने रिक्षा घातलेली तेंव्हा त्याची रिक्षा रोडमधेच पलटी केल्याचं आठवतंय .. :)
- टारझन
27 Nov 2008 - 12:47 am | चतुरंग
अरे तुझ्या पायावरुन गेल्यावर रिक्षाचे चाक तसेही मोडलेच असेल रे पलटी कशाला केलीस उगीच? ;)
चतुरंग
27 Nov 2008 - 1:00 am | टारझन
आहो .. झाला तो प्रकार हार्डली ५ ते १० सेकंदांत झाला होता हो .. आणि जिमवरूनच येत होतो ना तेंव्हा अंगात 'माज' पण होता
- (स्कॉट वीर ) बिल्डर टारझन
26 Nov 2008 - 8:24 pm | गणा मास्तर
लै भारी रे चेतन . साले आपल्या निगडीचे रिक्षावाले असेच हरामखोर आहेत. बिग इंडियापासुन आकुर्डी रेल्वे स्टेशनचे २० रुपये घेतात.
तु निगडीत कुठे रहातोस?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक) सेक्टर २६ प्लॉट १४९
26 Nov 2008 - 9:22 pm | चेतन सुभाष गुगळे
भूखंड क्र. ८६, पेठ क्र. २५,
पिंपरी-चिंचवड नवनगर,
निगडी, पुणे - ४११ ०४४.
ज्ञानप्रबोधिनी शाळे जवळ
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
27 Nov 2008 - 12:47 am | नेत्रेश
चेतन भाऊ,
असा फोन नंबर आणी पत्ता जालावर देणे बरे नव्हे.
मि पा चे सभासद जरी सभ्य असले तरी बाकी कुणी कसे असेल सांगता येत नाही.
तुम्ही बर्याच बदमाश रिक्षाचालकांशी पंगा घेतला आहे म्हणुन - जरा काळजी घ्या.
- नेत्रेश
26 Nov 2008 - 10:14 pm | नन्या
पिम्प्रि आणी निगडि चे रिक्शाचालक खुपच भाडे घेतात. काही तरि केले पाहीजे. वीशायन्तर होते तरी वीचारतो, मीपा चा कटा पिम्प्रि मधे करावा का?
26 Nov 2008 - 10:54 pm | चेतन सुभाष गुगळे
"मीपा चा कटा पिम्प्रि मधे करावा का? "
- नक्कीच. सहमत आहे.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
26 Nov 2008 - 10:21 pm | लिखाळ
रिक्षावाल्यांशी आपण जे केलेत ते चांगलेच.
एक प्रसंग : मी एकदा माझ्या आई बरोबर रात्री दहाच्या सुमारास घरी परतलो. रिक्षावाल्याने होणार्या भाड्याच्या साधारण दिडपट रक्कम सांगीतली. मी त्याला सांगीतले की जाताना अमुक एक रक्कम झाली होती, त्यावेळी रस्त्यात गर्दी आणि सिग्नल होते. आता त्यापौकी काहिच नसताना भाडे तेवढेच वा कमी झाले पाहिजे. आणि मी जाताना जेवढे भाडे झाले होते तवढेच त्याच्या हातावर ठेवले. बराच वाद झाला आणि त्याने ते पैसे माझ्या हातात कोंबले म्हणाला मला पूर्ण भाडे द्या.. मी म्हटले की तुम्ही मी दिलेले पैसे स्विकारत नसाल तर मी चाललो.. फुकट आणून सोडल्याबद्दल आभारी आहे :).. मग त्याने तणतणत पैसे घेतले आणि गेला.
खरेतर आसपासच्या लोकांनी अश्या वेळेला ठामपणे आपली बाजू घ्यायला पाहिजे. पण वाद नकोत, आरडाओरडा नको म्हणून लोक सामोपचाराची भूमिका घेतात. (आणि अनेकदा प्रश्न पाचदहा रुपयांचा असल्याने भांडण नको म्हणून आपणही सोडुन देतो.)
-- लिखाळ.
26 Nov 2008 - 11:13 pm | संजय अभ्यंकर
पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत.
वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही.
ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का?
तामीळ्नाडूतही (विशेषतः चेन्नई मध्येही ) पिं.चिं. सारखेच रिक्षाचालकांचे चीड आणणारे अनुभव येतात.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
26 Nov 2008 - 11:28 pm | झकासराव
पिंपरी चिंचवडचे रिक्षाचालक भयंकर त्रासदायक आहेत.
वादावादीशिवाय एकही प्रवास पूर्ण होत नाही.
ह्यावर पोलिसांचे काहिच नियंत्रण नाही का?
>>>>>>>
माझा अनुभव देखील फारसा चांगला नाही.
मीटर आणि टेरिफ कार्ड हा प्रकार रिक्शावाले वापरतच नाहीत.
आकुर्डी ते भेळ चौक ह्या साठी एका रिक्शावाल्याने माझ्याकडुन ३५ कि ४० रु घेतले होते.
कारण काय तर म्हणे की मी रिक्षा स्टॉप पासुन तुमच्या कॉलनीत येणार त्याचेच १५ होतील आणि इथुन भेळ चौक २५.
त्यावेळी पत्नीला दवाखान्यात ऍडमीट करण्यासाठी जायच होत म्हणून वाद घालुच शकत नव्हतो.
चेतन तुमचा उपाय ठिक आहे. पण निगडीच्या वाहनतळावरुन काहि वाहन मध्ये चोरीला गेली होती. त्यामुळे देवाच्या भरोश्यावर वाहन तिथे लावु नका (दुचाकी असेल तर)
जर पे आणि पार्क असेल तर मग चिन्ता नाही. पण तिथे पे आणि पार्क सुरु झाली आहे??
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
27 Nov 2008 - 11:56 am | ऍडीजोशी (not verified)
रिक्षा वाल्यांना चोपणे आणि रस्त्यामधे रिक्षा लाऊन उभे असतील तर त्यांना बाईक मागून ठोकणे हा आमच्या कट्ट्यावरच्या मुलांचा आवडता छंद आहे. आमच्या ग्रुप मधे २ बुलेट आहेत. त्यांचा उपयोग आम्ही रिक्षांवर घालायचा रणगाडा म्हणून करतो.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यग्रुहाबाहेर रोज रात्री शेवटचं नाटक सुटलं की रिक्षावाल्यांची मग्रुरी अनुभवायला मिळत असे. म्हातारी माणसं, स्त्रीया, मुलं असा भेदभाव न करता जवळच्या भाड्याला सरळ नकार देणे असे उद्योग सुरु असायचे. कुणी आवाज चढवला तर ४-५ रिक्षावाले एकत्र येऊन उलट दमदाटी करायचे. आमचाच कट्टा असल्याने आम्ही त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. रोज ठरवून रात्री ११:१५ ते ११:४५ आम्ही ११-१२ जणं कट्ट्यावर असायचो. जवळ जवळ महिनाभर रोज एकातरी रिक्षावाल्याला कानफटवायचो. एकानी खाल्ली की बाकिचे सुतासारखे सरळ व्हायचे. स्ट्रॅटेजी अशी होती की जो पहिल्यांदा नाही म्हणेल त्याच्याशी वाद न घालता सरळ एक पेटवायची. मगच पुढे बोलायचं. अगदीच म्हातारी माणसं असतील तर आमच्यातले दोन जण गुपचूप रि़क्षामागे बाईक घेऊन जात. मधेच उतरवलं अथवा तिथे जाऊन दमदाटी व्हायला नको म्हणून.
बराच फायदा झाला त्याचा. पुढे पुढे आम्हाला काही करायची गरज पडत नसे. आमच्यातले २-३ जण जरी तिकडे असले तरी शांतता असे.
27 Nov 2008 - 3:23 pm | विकि
http://www.trafficpolicemumbai.org/ या संकेतस्थळावरून तक्रार करू शकतो
27 Nov 2008 - 6:25 pm | शिंगाड्या
मानल राव तुम्हाला..
मस्त उपाय आहे..
बाकी ऍडीचापण अभिमान वाटला
28 Nov 2008 - 3:19 am | रेवती
साहेब जेंव्हा त्यांच्या मित्राला रिक्षात घेतात तेंव्हा मी लगेच रिक्षा थांबवून खाली उतरते.
कोणी सांगावे कोणत्या मिषाने कोण रिक्षात येऊन बसतो?
रेवती
28 Nov 2008 - 5:37 am | शितल
>>>>>साहेब जेंव्हा त्यांच्या मित्राला रिक्षात घेतात तेंव्हा मी लगेच रिक्षा थांबवून खाली उतरते.
कोणी सांगावे कोणत्या मिषाने कोण रिक्षात येऊन बसतो?
रेवती खरे आहे तु़झे,
मी ही एकदा मुंबंई हुन पुण्याला आले होते, आणि स्वारगेट वरून रिक्षा केली मी आणि मा़झा लेक दोघेच होतो, वेळ रात्रीचे ८.३० ते ९.०० च्या दरम्यान, स्वारगेट वरून जराच पुढे गेल्यावर रिक्षावाल्याचा एक मित्र रिक्षात रिक्षावाल्याच्या शेजारी बसायला लागला , तेव्हा मी त्या रिक्षा वाल्याला सांगितले हे जर बसणार असतील तर मी रिक्षातुन उतरणार , त्यावर ते दोघे रिक्षावाले मा़झ्याशी वाद घालु लागले, तो दुसरा बसणारा रिक्षावाला बोलु लागला मी ही येथील रिक्षावाला आहे, तुम्ही घाबरू नका, पण मी ठाम होते, मी माझा राग पाहुन त्या रिक्षावाल्याने दुसर्याला घेतले नाही, आणी मी घराच्या जरा अलीकडेच रिक्षा थांबवुन, रिक्षावाला त्या रोड वरून दुर गेल्याची खातर जमा करून घेतली आणि मग घरी गेले. :)
28 Nov 2008 - 8:22 am | अनिल हटेला
अहो साहेब पिंपरी च्या रीक्षावाल्यांकडे टेरीफ कार्ड वगैरे तर सोडा,
ड्रायव्हींग लायसंस आहे का ह्याचा शोध घ्या आधी ...
शिवाय वहातूकीचे नियम ह्यांच्या साठी नसतातच मुळी...
निगडी -प्राधीकरण तर ठीकाये ,पण इकडे काळेवाडी,थेरगाव वगिरे भागात अक्षरशः आंधळा कारभार आहे..
आणी रीक्षा म्हणजे विमान आहे असा ह्या लोकाचा समज असतो..
तुम्ही केलेला उपाय आम्ही ऑलरेडी ब-याचदा केलाये... ;) ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
28 Nov 2008 - 10:15 pm | आवडाबाई
रिक्शा ने प्रवास करणार्या प्रवाशांची एक संघटना करायची वेळ आली आहे वाटते !!) (जशी पीएमपीएल प्रवाशांची एक आहे तशी )
माझा एक अनुभव - आधी जेव्हा कमीत कमी भाडे ८ होते तेव्हाचा - स्थान - शिवाजीनगर
मीटर मध्ये १ च झाला होता, म्हणजे रू ८ भाडं झालं होतं. मी दहाची नोट दिली तर म्हणे दहाच झाले, आम्ही "लोकल" (म्हणजे कमीत कमी भाडे) चे १० च घेतो. मी परत रिक्षात बसले त्याला म्हटले, १० होईपर्यंत रिक्शा चालवत रहा म्हणजे तोपर्यंत पुढचा चौक येइल आणि पोलिस पण भेटतील !! मग २ रु परत दिले आणि वर जाताना म्हणे, पैसे नसतात तर रिक्शात बसता कशाला ??? !!!