पेठकरकाकांनी यज्ञकर्म नावाचे रेस्तरॉं सुरू केल्याचे मि.पा. वर वाचले आणि कधी एकदा इथे भेट देऊन येतो असे झाले. शेवटी काल, सोमवारी सायंकाळी एकदाचा योग आला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सहकुटुंब "यज्ञकर्म' ला गेलो.
प्रथमभेटीतच नजरेत भरावी अशी यज्ञकर्मची रचना आहे. छानसे टेबलक्लॉथ अंथरलेली टेबलं, त्याला जुळणारी रंगसंगती असलेल्या खुर्च्या. टेबलवर काचेचे ग्लास, उंची क्रॉकरीच्या डिशेश, हातरुमाल व्यवस्थित मांडून ठेवलेले होते. बाजूला सुरेख मंद दिवे तेवत होते. विशेष म्हणजे नजरेत भरण्याजोगी अशी इथली स्वच्छता आहे.
टेबलवर बसल्याबसल्या वेटरने सुबक मेन्यू कार्ड आणून दिले. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज अशा सर्व प्रकारच्या विविध डिशेश इथे आहेत. "व्हेज' च्या जोडीला, "नॉन-व्हेज' पदार्थांची लज्जतही इथे चाखायला मिळते. चिकन, मटन, अंडी यांचे असंख्य पदार्थ इथे आहेतच शिवाय मत्स्यप्रेमींसाठी खास समुद्री अन्नपदार्थांच्या विशेष डिशेश इथे आहेत.
मी पूर्ण शाकाहारी आहे. बायको मात्र अंडी खाते. मेन्यू कार्ड बघत असताना "व्हेज कोथिंबीरी' हा नवाच पदार्थ दिसला. तो चाखून बघूया म्हणून तो "ऑर्डर' केला. त्यानंतर बायकोसाठी "मसाला एग्ज' ही डिश ऑर्डर केली. भाताऐवजी खिचडीची आर्डर दिली.
सर्वच पदार्थ अतिशय चविष्ट होते. मसाला एग्जची डिश बघून माझ्याही तोंडाला पाणी सुटले. मग कुणी पहात नाही हे बघून मीही हळूच त्यातील ग्रेव्ही पानात घेतली. त्याची चव घेतल्यावर ब्रम्हानंदी टाळी लागल्याचा आनंद मिळाला.
आमची जेवणे होत आहेत तोपर्यंत आधी फोनवर बोलणे झाल्यानुसार पेठकरकाका आणि काकू आम्हाला भेटायला आल्या. मग थोडावेळ यज्ञकर्मबद्दल त्यांच्याशी गप्पा झाल्या. पेठकरकाकांनी स्वत:च्या देखरेखीखाली इथल्या पदार्थांच्या चवी आणि पद्धत ठरवली आहे. यज्ञकर्म मध्ये लवकरच मालवणी पदार्थ आणि स्नॅक्स सुरू करण्यात येणार असल्याचे पेठकरकाकांनी सांगितले. स्नॅक्समध्ये आठ - दहा पदार्थ असतील.
पेठकरकाकांशी बोलताना मि.पाबद्दलही चर्चा झाली. त्यांची व आमची ही पहिलीच भेट अन् तीही मि.पा. मुळे घडलेली. मि. पा आणि यज्ञकर्मची लाजबाव चव या दोन्हींनाही धन्यवाद देत भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने आम्ही पेठकरकाका-काकूंचा निरोप घेतला. उरलेल्या पदार्थांची चव चाखण्यासाठी लवकरच पुन्हा यज्ञकर्मला भेट देणार आहोत.
From mipa
From mipa
प्रतिक्रिया
26 Nov 2008 - 3:50 pm | सुनील
वर्णन छान केलेत पण अजून थोडे चालले असते.
पुढील पुणे भेटीत यज्ञकर्मी खाद्यपूजा ठरलीच!
वेज कोथिंबेरीचा फोटो दिसत नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Nov 2008 - 3:57 pm | धमाल मुलगा
आम्हीही 'यज्ञकर्मात' गेल्या रविवारी तुडुंब जेऊन आलो.
हे रेस्तराँ (च्यायला, ह्या पुणेरी मिसळ्पाव्शेठसारखं बोलायचं म्हणलं तर एकदम फ्रेंच असल्यासारखं वाटलं बॉ! :) ), तिथली सजावट, खाद्यपदार्थांचा दर्जा हे सगळं एकदम पेठकरकाका छापाचंच आहे....अगदी आपुलकीचं आणि भन्नाट :)
बाकी, तिथे गेल्यावर शाकाहारी मंडळींनी 'व्हेज नवाबी' आणि मांसाहारी मंडळींनी 'चिकन हॉट पॅन' हे नक्की चाखुन पहा...
आणि हो...खेकड्याचं सुपही अप्रतिम बरंका!
(च्यायला, सार्वजनिक जागी होतो म्हणुन लोकलज्जेस्तव गप बसलो नायतर सुप असलेला बाऊल चाटुन पुसुन साफ करायचाच इरादा होता...इतकं झक्कास सुप आहे ;) )
आपला,
- (यज्ञकर्मी) ध मा ल.
26 Nov 2008 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
आम्हाला पत्ता सांगा कि म्हणजे आम्हि पण आनंद घेउ ;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
आमचे राज्य
26 Nov 2008 - 4:24 pm | धमाल मुलगा
प्रसादराव,
हा घ्या पत्ता
(अवांतरः प्रसादराव, आपल्या सहीच्या शेवटी "<" "/strong" " >"हे अक्षर ठळक करणार्या सुविधेच्या कोडचे 'कोड संपल्याचे दर्शविणारे' टॅग्ज आहेत का ह्याची कृपया खातरजमा कराल काय? आपल्या प्रतिसादानंतर इतरांचे प्रतिसाद ठळक येताहेत.)
26 Nov 2008 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार
नको तिथे आम्हि आमचे ज्ञान पाजळल्यामुळे आपणा सर्वांस जो त्रास झाला त्या बद्दल क्षमस्व ! आता त्यात आम्हि बदल केला आहे, तो बदल अजुन काहि उपद्व्याप करणार नाहि, अशी आशा करुयात !
पत्त्या बद्दल धन्याचे वाद.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
आमचे राज्य
26 Nov 2008 - 4:26 pm | पुणेरी मिसळ्पाव
'यज्ञकर्म उपहारगृहा'चा पत्ता:
सहवास कॉर्नर, कर्वेनगर, पुणे ४११ ०३८.
१) सिहगड रस्त्यावरून राजाराम पुलावरून येताना येताना: समोर 'मातोश्री' वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमाची हद्द संपल्यावर डाव्या हाताला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आल्यावर डाव्या हाताला 'विठ्ठल मंदिर' लागते, त्याच रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या हाताला
'स्पेन्सर्स डेली' नांवाचे सुपरमार्केट लागते, तसेच पुढे आल्यावर पुढच्याच चौकात उजव्या हाताला 'गुलाबराव ताठे मित्र मंडळा'चा गणपती आहे. त्या गणपतीला टेकूनचह 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
२) कर्वे रस्त्याने येताना कोथरूड बस स्टँड नंतर डाव्या हाताला (सिग्नलपाशी) 'कोकण एक्स्प्रेस' उपहारगृह आहे, तिथून तसेच पुढे आले की डाव्या हाताला 'कामत उपहारगृह' आहे, तसेच पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी नंतर डाव्या हाताला 'पृथ्वी उपहारगृह' आहे. 'पृथ्वी उपहारगृहा' नंतर डाव्या हाताला एक लहानसा रस्ता खाली उतरतो. काहीशा झोपडपट्टीतून (पण रस्ता चांगला आणि सुरक्षित आहे) 'भुजबळ बंगल्या'वरून सरळ पुढे आल्यावर एका रिक्षा स्टँडच्या छोट्याशा चौकात आपण येतो तिथे रस्ता जसा वळतो तसे उजव्या हातास वळल्यावर सरळ जात राहायचे त्या रस्त्याच्या शेवटास 'क्षिप्रा सहनिवास' नांवाची सोसायटी आहे. पुन्हा रस्त्याबरोबरच उजव्या हातास वळल्यावर किंचीत पुढे उजव्या हातास 'होंडा' सर्व्हिस स्टेशन आहे, तसेच सरळ जात राहिले शेवटी 'T' जंक्शन येते त्या जंक्षनवरच आपले 'यज्ञकर्म उपहारगृह आहे. (शेजारीच 'कोंबडी-वडे' नांवाचे उपहारगृह आहे, पण आपल्याला तिथे जायचे नाहीए.)
३) खुद्द कर्वेनगरात 'प्रतिज्ञा हॉल' हा प्रसिद्ध स्पॉट आहे. 'प्रतिज्ञा हॉल' समोरील रस्त्याच्या एका बाजूस 'अलंकार पोलीस चौकी' आहे तर विरूद्ध बाजूस 'T' जंक्शनवर 'सोलकढी' नांवाचे उपहारगृह आहे. (हा रस्ता राजाराम पुलाकडून येतो) त्या जंक्शन वर उजव्या हातास वळल्यावर दुसर्या चौकात 'गुलाबराव ताठे मित्रमंडळाचा' गणपती आणि त्याला लागूनच 'यज्ञकर्म उपहारगृह' आहे.
26 Nov 2008 - 7:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लवकरच यज्ञ केला पाहिजे असं दिसतंय!
26 Nov 2008 - 8:12 pm | पुणेरी मिसळ्पाव
फोटो चिकटविणे जमले नाही. शेवटी पिकासाचा दुवा दिला आहे.
29 Nov 2008 - 4:24 pm | विसोबा खेचर
आता पुण्यात आलो की नक्की येणार! :)
30 Nov 2008 - 9:00 am | प्राजु
भारतात जेव्हा येईन.. तेव्हा पुण्यातलं पहिल्म जेवण माझ यज्ञकर्म मध्ये असेल्..पेठकर काकांना भेटूनच पुढचा दौरा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Dec 2008 - 12:15 am | प्रभाकर पेठकर
श्री. पुणेरी मिसळपाव,
आपण आवर्जून आपले चविष्ट अनुभव मिपाच्या सर्व सदस्यांबरोबर वाटून 'यज्ञकर्म्'ला धन्य केलेत. माझे अगदी 'मन भरून आले' आहे.
सुनील, धमाल मुलगा, परिकथेतील राजकुमार, १३_१३ व्यस्त अदिती, विसोबा खेचर आणि प्राजु मनःपूर्वक धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी अजून भेट दिलेली नाही त्यांनी जरूर जरूर यावे. ज्यांनी भेट दिलेली आहे ते पुन्हा पुन्हा येत राहतीलच ह्याची खात्री आहे.
3 Dec 2008 - 2:13 am | योगी९००
पुण्यात आलो की मी सुद्धा नक्की येणार!
खादाडमाऊ
(जिभल्या चाटत बसलेला)
3 Dec 2008 - 2:56 am | टुकुल
लवकरच मि पण भेट देइन..