मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव
मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव
झणझणीत तर्री अर्धी वाटी
ओता त्यात होईल खाशी
नाकातोंडातून येईल धुर
मग दह्याने बदला नूर
असली मिसळ अन दहा पाव
खाऊन तर पहा राव
मिसळ पाव मिसळ पाव
एकदाच खा अन ढेकर द्या
उगाच नंतर जेवायचे काम नाय
नको ते इडली सांबर
पुन्हा घ्याल का पराठे नंतर?
मिसळीत आहे सारे गुण
एकदा खाल तर व्हाल टुन्न
हातावरचे अन पोटावरचे
एकच झाले मिसळीवरचे
केवळ नाव तुम्ही घ्याल
मिसळ खाल मिसळ खाल
मिसळ पाव मिसळ पाव
- पाषाणभेद
०१/११/२०२०
प्रतिक्रिया
1 Nov 2020 - 11:58 am | प्रचेतस
मस्त
1 Nov 2020 - 12:36 pm | पाषाणभेद
जातीचा मिसळवाला मिसळ, पाव अन तर्री यांच्यामधून स्वर्ग निर्माण करतो.
बाकीचे हाटेलवाल्यांना मिसळीसोबत काकडी, टोमॅटो, पापड, दही, मठ्ठा, फरसाण इत्यादींचे कडबोळे करून जगावे लागते.
अहो, कालपरवा एका हॉटेलात मिसळीबरोबर जिलबी दिली तेव्हा मला, 'तुच कारे तो भुतस्य', असा प्रश्न विचारावा वाटला.
मिसळथाळी हि खरी मिसळ नाहीच.
मिसळ खावी ती हातगाडीवरची अन जिथे जास्त रिक्षावाले थांबून खात असतात तिथली. तिथे उगाचच फिल्टर पाणी, हात पुसायला पेपर नॅपकीन, हॅन्डग्लोव्हज् घातलेले वेटर, स्वतंत्र ग्लास असली सरबराई नसते.
रिक्षावाला जसा भडकू असतो तशीच हातगाडीवाली मिसळ स्फोटक असते.
मिसळ खावी ती नाशकातली. भरपुर मोड आलेली मटकी नावापुरते शेव अन भरपुर रस्सा अन कसलाही अन्य पदार्थ न टाकता केलेली तर्री हे फक्त नाशकातल्या मिसळवाल्याकडेच मिळेल. अर्थात आता आता नाशकातही डेकोरेटिव्ह मिसळचे फॅड येते आहे. ते मुळ मिसळवाल्यांच्या मुळावर आहे.
कोल्हापूर मिसळ म्हणजे नऊवारी शिवलेली साडी घालून रेकॉर्डवर लावणी लाऊन केलेला नाच. अस्सल फडावरच्या लावणीची मजा त्यात नाही.
पुण्यातली मिसळ हि खरी मिसळ नव्हेच. जसे अमृततुल्य नावाच्या चहाने चहाची चव घालवली तशी पुणेरी मिसळने मिसळची इज्जत घालवली.
2 Nov 2020 - 11:54 am | ज्ञानोबाचे पैजार
मैसळीक कवनाने जेवढी मजा आली ती या एका वाक्याने खाडकन उतरली.
बाकी प्रांतातल्या मिसळींचे वर्णन करताना पुण्याला नावे ठेवण्याची गरज नव्हती.
हा म्हणजे माध्यान्नीच्या सूर्यावर थुंकण्याचा प्रकार वाटला,
या जगी जे जे सर्वोत्कृष्ठ आणि सर्वोत्तम आहे ते फक्त आणि फक्त आमच्या पुण्यातच उपलब्ध आहे. हे नेहमी लक्षात ठेवा
प्रायश्र्चित्त म्हणून
हे १००० वेळा लिहून काढा,
आणि भविष्यात या देवभूमीचा चुकूनही अवमान होणार नाही याची काळजी घ्या.
पैजारबुवा,
3 Nov 2020 - 8:04 am | विंजिनेर
नाशिककरांना द्राक्षे आंबट ;-)
3 Nov 2020 - 9:10 am | Ujjwal
+111
3 Nov 2020 - 9:13 am | प्रचेतस
मिसळथाळी असली काय किंवा नुसती मिसळ असली काय, शेवटी चव महत्वाची. ती जर असली मिसळथाळी सुद्धा मिटक्या मारत खाता येते किंवा ती नसली नुसती मिसळही बेचव होऊन जाते.
नाशिक आजोळ असल्याने तिथल्या बहुतेक मिसळी खाऊन झाल्यात. भगवंतराव, श्यामसुंदर, पाथर्डी फाटा, अंबिका. अंबिका काळया मसाल्याची मिसळ तर ओव्हर हाईप वाटते. मात्र केवळ कल्ट असल्याने नाशिकला जाणे झाल्यास अंबिकामातेचे दर्शन घेतल्याशिवाय येणे होत नाही. तशीही नाशिकची मिसळ ही खरी मिसळ नव्हेच :)
हे बाकी खरे. कोल्हापूरच्या मिसळीला अजिबात चव नाही. खासबाग, फडतरे, चोरघे खाऊन झाल्यात, अजिबात मजा नाही. त्यातल्या त्य्ता ओपलची मिसळ चांगली असे म्हणावेसे वाटते.
तुम्ही पुण्यातल्या मिसळी खाल्ल्याच नाहीत असे म्हणावे वाटते. पुण्याइतक्या विविध चवींच्या मिसळी इतर कुठेही मिळणार नाहीत.
वैद्यबुवांची शतकोत्तर परंपरा असलेली आल्याच्या पांढर्या रश्श्याची महाराष्ट्रातली आद्य मिसळ इथलीच.
गोड मिसळी म्हणून हेटाळणी झालेल्या बेडेकर, संजीविनी, श्री, श्रीकृष्ण आदी मिसळी खाऊन बघा. रस्सा अतिशय अप्रतिम चवीचा. शेवेत मिक्स न करताच नुसता ओरपावा. ब्रह्मानंदी टाळी लागते.
रामनाथ, काटाकिर्र मध्ये एकदम झटका मिसळ मिळेल. तर शनवारातल्या रामदास मध्ये मटकीचा अप्र्तिम तिखट रस्सा आणि आणि शेव चिवडा भारीच.
चिंचवडात मिळणाररी नेवाळे मिसळ तर महाराष्ट्रातल्या सर्वाधिक तिखट चवीची मिसळ असावी. ती खाणे येरागबाळ्यांचे काम नव्हेच.
पिंपरीगावातल्या निसर्ग, अतिथी मिसळी खास गावाकडच्या मिसळीचा फिल देणार्या.
चिंचवड स्टेशनामधली मयुर मिसळ तर अहाहाहा.. एकदम क्रिस्पी शेव चिवडा आणि त्यावर भरपूर मोड आलेल्या मटकीचा तर्रीबाज रस्सा.
शेवटी काय, चव असली की सगळेच जुळून यावे.
1 Nov 2020 - 12:41 pm | नीलस्वप्निल
पुण्यातली मिसळ हि खरी मिसळ नव्हेच. जसे अमृततुल्य नावाच्या चहाने चहाची चव घालवली तशी पुणेरी मिसळने मिसळची इज्जत घालवली.
हा... हा... हा.. खर आहे
1 Nov 2020 - 10:50 pm | गवि
मोड आलेले मूग अथवा मटकी यांचे भरपूर प्रमाण असलेली , सौम्य रस्सावाली गोड मिसळ, सोबत ताटात अन्य वाद्यवृंद पाहून सांगावेसे वाटते की बाबारे मिसळ हा पौष्टिक पदार्थ म्हणून नकोय.
नुसती शेव हाही फ्लॉप प्रकार आहे. फरसाण, शेव, चिवडा सगळं हवं.
आणि वाट्या भरुन सेपरेट घटक ताटात मांडून देणे आणि आपापली मिक्स करायला सांगणे हे तर मिसळीच्या मूळ कल्पनेला ठार करणे आहे.
योग्य रितीने प्रमाणात उत्तम मिसळ लावून देणे हाही भाग मिसळीच्या कृतीचा मुख्य भाग आहे.
2 Nov 2020 - 11:58 am | विजुभाऊ
गुण चे यमक टुन्न असा असू शकतो हे या जन्मी वाचायला मिळाले. भरून पावलो
2 Nov 2020 - 12:03 pm | ज्ञानोबाचे पैजार
आम्ही टून होण्यासाठी उगाच शेकडो बाटल्या खर्च केल्या
पैजारबुवा,
3 Nov 2020 - 8:15 pm | पाषाणभेद
आधी सुन्न लिहीले होते. (म्हणजे जास्त, गोडाचे जेवण झाल्यावर जी गुंगी येते ना तसे)
पण त्या वरूनही असाच वाद झाला असता.
3 Nov 2020 - 9:31 am | प्राची अश्विनी
मस्त! :)
3 Nov 2020 - 11:46 am | चलत मुसाफिर
मिसळीत जसे धान्ये, कांदा, शेव, पाव असे परस्परांशी साम्य नसलेले वल्ली एकत्र येऊन कल्ला करत असतात तसेच काहीसे ही कविता वाचून वाटले. यमकयोजना तर अभूतपूर्व आहे! :-)
3 Nov 2020 - 8:13 pm | पाषाणभेद
मिसळ अन वाद यांचे अनोखे नाते असते.
आंतरजालावर ते वारंवार अन थोड्या थोड्या कालावधीने परत परत प्रकट होत असते.
(याची खात्री पटली.)
6 Nov 2020 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा
टिंबर मार्केट आणि मार्केटयार्ड मधली मिसळ खाली तर पुन्हा पुण्याचया मिसळ मिसळ नसतात असे म्हणता येणार नाही. थांबा व्हिडीओ वृत्तांत टाकतो
।
।1 आता
23 Nov 2020 - 3:43 pm | लीलाधर
त्याला मिसळ देणार काय पाभे बरोबर ना...
आता जेव्हा भेटाल तेव्हा मिसळ पायजेल म्हणजे पायजेल कशे.....
मिसळ पाव मिसळ पाव, एकदा तरी खायला घालाच राव...