निरभ्र

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
25 Nov 2008 - 12:52 pm

झाकोळल्या सावल्यांनी
हुंकार असा का द्यावा
डोळ्यांतला तुझा तो
मज मारवा स्मरावा

कागदावर झरझर अक्षरं उमटत जातात...
दिवसही एखादा असा येतो की आठवणी दाटून येतातच. सकाळच्या वेळी तर हमखास. दाटून येतात त्याही संध्याकाळच्याच आठवणी...
'काय करते आहेस?' आधी 'तू नभातले तारे...'ची गुंजारव. त्याच्या कॉलसाठी आपण लावून ठेवलेली. आणि त्यापाठोपाठ त्याचा प्रश्न. नेहमीचाच. वेळही नेहमीचीच. पश्चिमेला गुलाबी छटा येतात तीच. एक छोटासा संवाद आणि नदीकाठी पुलावरची भेट. नदीही साथ देणारीच. पूर्व-पश्चिम. त्यामुळे पुलाचे दोन्ही कठडे त्या दिशांना. आपण बसायचो तो पश्चिमेचाच. त्या लालीकडे पहातच.
संवाद असा नाहीच. नजरा क्षीतिजाकडं. अगदीच बोलणं झालं काही तर आधीच्या भेटीनंतरच्या काळात त्याला सुचलेली एखादी चित्रप्रतिमा. कॅनव्हासवर ती झरझर कशी उमटत गेली त्याचं वर्णन. मग त्यानं त्या चित्राची काढलेली एक छोटी प्रतिकृती खिशातून बाहेर यायची. कधी एखादं झाड. कधी एखादा निरागस चेहरा. कधी केवळ रंगनृत्य.
'अप्रतिम...' आपल्या तोंडून उद्गार निघायचा. चित्रं तशीच असायची, असतातही.
त्यावर त्याचं नेहमीचंच, 'इतकं का अॅबस्ट्रॅक्ट आहे?' हा अगदी खास त्याच्या शैलीतला. 'अप्रतिम'वर मारलेला फटका. मग आपला एक धपाटा त्याच्या पाठीत.
एकदा त्यानं रहस्य उलगडलं, 'या धपाट्यासाठीच तर मी असा एखादा फटका मारतो...' तेव्हा पहिल्यांदा कळलं होतं की आपल्या त्या कृतक कोपाची हार आहे ही.
हा प्रवास...
दाटून येत दिशा या
घनगर्द आठवांनी
चित्रांमधून तुझीया
धरती मनांत पिंगा

पुलावर दिशांचं भान हरपत जायचंच. क्वचित मागून जाणाऱ्या कोणाचे शब्द कानी पडत. पण ते तेवढेच.
'काय लिहिते आहेस सध्या?' त्याचा प्रश्न असाच यायचा, त्या शब्दांसारखा.
'मी?' आपला प्रश्न.
'लक्ष कुठं आहे तुझं? तुलाच विचारलं ना मी!'
'तुझ्याच चित्रांत गुंतलंय.'
'नक्की ना?' पुन्हा त्याचा तो खोडकरपणा. डोळ्यांतल्या मारव्याची जागा आता एखाद्या खट्याळ गाण्यानं घेतलेली असायची.
पुन्हा एक धपाटा. पुन्हा तीच जाणीव.
'का छळतोस असा?'
'तू खूप सुंदर दिसतेस. तशीच दिसत रहावीस म्हणून.'
केव्हा तरी एकदा, पूर्वी, म्हणाला होता, 'तुझ्या या सुंदर चेहऱ्यामागं एक उदासी दडलेली आहे. खरं की नाही?'
आपण मौनात. त्याच्या भाषेत सांगायचं तर आत्ममग्न. या आत्ममग्नतेपोटीच ती उदासी चेहऱ्यावर येत असावी.
'बोल काही तरी...'
मौन कायमच. दोघांच्या स्वभावात हे असं जमीन-आस्मानाचं अंतर. त्याच्या बोलकेपणाला सीमाच नाही. आपल्या अंतर्मुखतेचा थांग नाही. मग त्याचा तो हट्ट.
'एकदा ना एकदा या उदासीचा छडा लागेल. लावेनच.'
खरे केले ते शब्द त्यानं. त्याच्या चित्रांची आवड निर्माण झाली त्यानंतर. ग्रूपमध्ये सहजच एकदा एक छोटं चित्र घेऊन आला. आर्टपेपरच्या पोस्टकार्ड आकाराच्या तुकड्यावरचं. सागरकिनारा. लाटांचं नृत्य. केवळ कृष्ण-धवल. पण वरच्या बाजूला आभाळात फक्त एक गुलाबी छटा. एखाद्या स्वच्छ दिवशी सूर्य अस्ताला गेल्यानंतरची.
भावविश्वात गुंतण्याचा तो आरंभ होता का? हो, एवढं एकच उत्तर नेहमी आठवांच्या या प्रवासात येतं.
'संध्याकाळच्या अशावेळी हमखास आकाशात पक्ष्यांची एक माळ असतेच.'
'ओह. रिअली? या चित्रात नसलेले पक्षी दाखवतीयेस की, ते पक्षी तुला या चित्रात दिसताहेत?' त्याच्या या प्रश्नानंतरच आपण काय बोललो होतो ते लक्षात येतं. म्हटलं तर चित्रातली उणीव, म्हटलं तर ज्या स्पिरिटनं त्यानं ते घेतलं ते पाहता चित्राला दाद. तोच तो क्षण असावा. गुंतून जाण्याचा.
पापणीच्या या कडेशी
झरतो थेंब एकाकी
गवसेल का किनारा
सोबतीच्या शब्दांना

हे शब्द... नेहमी ऐनवेळी दगा का देतात आपल्याला?
या शब्दांत नव्हतं तेव्हा मांडता आलं काही.
हातून काही तरी निसटून गेल्याचं शल्य कायमच मनाच्या तळाशी राहिलं होतं. अगदी लहानपणापासूनच. एकाकी जगण्यातून निर्माण झालेलं. आसमंताच्या प्रवासाला दूर निघून चाललेल्या पक्ष्यांकडं पाहिल्यानंतर जाणवतं तसं. इथं चित्रात तेही नव्हते. तेच बहुदा त्यावेळी व्यक्त झालं असावं.
त्याची बोलकी नजर. बोलकी म्हणजे खरोखर बोलकी. सगळ्या भावना व्यक्त करणारी. त्यातून समजायचं, हे तो का विचारत असावा. पण त्या कारणाच्या तळाशी जाण्याची आपली थोडीच तयारी होती.
आपण राहतो त्या आश्रमाच्या पटांगणातच एके दिवशी तो म्हणाला, 'हल्ली तुझं लेखन अगदीच बंद झालेलं दिसतंय. कारण काय?'
'तुला काय ठाऊक की लेखन थांबलंय...'
'काही ऐकवलं नाहीस बऱ्याच दिवसांत.'
आपण त्याला कधीच तसं ऐकवलं नव्हतं. जे ऐकलं असेल ते सारं ग्रूपमध्येच. अगदी क्वचित एक-दोनदा त्यानं काही ऐकलं असावं फक्त तो आणि आपण असताना.
'मी कुठं नेहमी काय ऐकवते?'
'तेच, क्वचित होणारंही काही घडलं नाही तर लगेच लक्षात येतं.'
आता प्रश्न होता. म्हटलं तर काहीही बोलून वेळ मारून नेता आली असती, पण जमली नसती.
'बरं. थांबलंय असं नाही, पण नवं सांगण्यासारखं काही नाहीये.'
'अच्छा...'
'तुझ्याच भाषेत सांगायचं तर आत्ममग्नतेतून बाहेर येण्याचा हा प्रयत्न आहे माझा.'
एक छोटंसं हास्य ओठांवर. बास्स. बाकी प्रतिक्रिया नाही. आपलाच चेहरा पुन्हा प्रश्नार्थक.
'सारेच आत्ममग्न असतात. मनातून जन्माला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत 'आत्म' असतोच. माझ्या चित्रांमध्ये असतो, तुझ्या कवितांमध्ये असतो, कोणाच्या सुरात असतोच. तुम्ही स्वतः त्यात असताच. त्याविषयी व्यक्त होताना कोणी प्रथम पुरूषी होतो, कोणी नाही इतकंच. पाठीशी अनुभव नसतील तर ते व्यक्त होणं कृत्रिम ठरत जातं. ती एखादी रचलेली गोष्ट ठरेल...' त्याचं उत्तर.
उदासी, खिन्नता जात नाही म्हणून ही स्थिती येतीये हे त्याला सांगणार तरी कसं?
या प्रश्नातून आपली सुटका होणार नाहीच.
'मी आता स्वतःला अधिक दुखवायचं नाही असं ठरवलंय.' अखेर आपण बोलून मोकळे होतो.
'लिहिल्यानं अधिक दुःखी व्हायला होतं?' नेमका प्रश्न. अपेक्षितही म्हणावा. तरीही आपल्याकडं उत्तर नसतं.
'सबबी देतानाही त्यामागं काही तरी पक्कं असावं...' आता तो जाळ्यात येतोय असं वाटावं आपल्याला. कारण कुठं तरी 'व्यक्त होण्या'च्यापलीकडं जाऊन 'पक्कं असावं' इथंपर्यंत गाडी आलेली आहे.
'तेच जमत नाही. ठरवून काही करता येत नाहीच ना अखेर? आणि ठरवू तसंच दान पडेल असं थोडंच असतं...' आपण.
पुन्हा तेच हास्य. आपण पळवाट काढतो तेव्हा हमखास चेहऱ्यावर येणारं. हसतो तेव्हा त्याचा संपूर्ण चेहरा बोलतो हे मात्र नक्की.
''स्वतःला अधिक दुखवायचं नाही' इतकंच ठरवता येतं का माणसाला?' या त्याच्या प्रश्नाला उत्तर नसतंच. पळवाटा किंवा सबबी शेवटापर्यंत साथ देऊ शकत नाहीत हेच खरं.
'असो.' आपलं पांढरं निशाण.
'खिन्नता घालवण्यासाठी, काही हरवलंय या भावनेवर मात करण्यासाठी व्यक्त होण्यासारखा उपाय नाही.' त्याचा सल्ला.
थरथरत्या शब्दांना
आधार भावनांचा
.....................
.....................

कितीही म्हटलं तरी पुढं शब्द सुचत नाहीत. म्हणजे मनात येत राहतात. मांडणीसाठी ते नसतात योग्य. थरथरते शब्द. त्यामुळं लयीत न बसणारे. तरीही कागदावर उमटत जातात. म्हणजे आपणच उमटवत जातो. लक्षात येतं की त्या थरथरीमुळं लय जातेय, मग आपण ते खोडून टाकतो. पण...
कागदावर उमटलेल्या आणि आता विझलेल्या या शब्दांनी मनाच्या तळातून काही तरी बाहेर आलेलं असतंच. खरं तर, 'काही तरी' नव्हे; तर बरंच काही. तो एकाकीपणा, ती खिन्नता, ती उदासी, ती बोचत राहणारी उणीव. सारं, सारं काही बाहेर येऊ पाहात असावं बऱ्याच काळापासून, असं वाटू लागतं.
पुन्हा एकदा डोळ्यांसमोर काही चित्रप्रतिमा उभ्या राहतात. दूरवरून येणारा थवा. उगवतीचा सूर्य. खळाळता झरा.
असं चित्र त्यानं कधी काढलंय का?
आपल्या आठवांच्या प्रवासात तर असं काही गवसत नसतं. त्याची भेट झाल्यापासून खोल मनाच्या तळापर्यंत बुडी मारली तरी काही गवसत नाही.
त्याचा मोबाईल फिरवला की आधी ती जीवघेणी आर्तता अनुभवावी लागते म्हणून आपण बऱ्याचदा ते टाळत असतो. तीच आर्तता, किशोरीच्या आवाजातली, 'सहेला रे...'
पण आता मनात भुंगा सुरू झाल्यानं एकदा तो जीवघेणा अनुभव सोसावा लागेलच.
मनात उमटलेल्या प्रतिमांच वर्णन करून आपण विचारतो 'असं चित्र काढलंस का कधी?'
'मुश्कील. चित्र म्हणजे साधारणपणे भैरवी. विरहाचेच सूर. मीलनाचे क्वचितच. तुझ्या या प्रतिमेला ते हवेत... रंग, रेषा, आकार यांचं मीलन घडेल एकवेळ; पण आशयाचं? मुश्कील...'
त्या प्रतिमेला नव्हेत, तर आपल्यालाच ते हवेत, हे शब्द पुन्हा थरथरत मनातच राहतात.
'पण एक कल्पना डोकावतेय मनात माझ्या...' आपल्या मनात आशेचा तेवढाच किरण. '...तुझी डायरी घेऊन बसू एकदा. एकेका रचनेवर एकेक प्रतिमा. पाहू, कसा होतो हा प्रयोग!'
पलीकडून त्याची अधीरता आता श्वासांतून व्यक्त होत असते. अधीरता आपल्या होकारासाठी. आपण बहुदा एखाद-दोन क्षणच विचारांत असू. तीही शांतता त्याला न सोसावी.
'का गं? नको का?'
शब्दांची एकच गर्दी आपल्या ओठांवर होते. हेच ते, हेच, मनातून आक्रंदन सुरू होतं.
'नाही. नाही... मी विचार करतेय...'
तो मध्येच तोडतो, 'कसला?'
त्यानं तोडल्याचा कधी नव्हे ते आपल्याला आनंद होत असतो. कारण मनातला विचार स्पष्ट सांगण्याचं धाडस थोडंच असतं. एरवी त्यानं तोडलं नसतं तर आपल्याला '...विचार करतेय'च्या पुढं बोलावं लागलं असतं. आता वळण देता येतंय.
'नाही. काही नाही. करूया.' कसेबसे हे शब्द आपल्या तोंडून येतात.
'उद्या दुपारी बारा. आश्रमाच्या प्रांगणातच. आपल्या कट्ट्यावर...' त्याचा निर्णायक सूर.
काही वेळातच मोबाईल बंद होतो.
आपण पुन्हा विचारात असतो, हे जमेल का? आपली डायरी, किंवा वहीदेखील. त्यातल्या पानोपानच्या कविता वाचून दाखवल्या असतीलही. पण न वाचलेल्या कवितांचं काय? मनाच्या खोलवरून आलेल्या कविता. एकेक धून, मनाच्या अवकाशात पसरलेल्या मेघांची. बरसणारी.
'नको...' नेहमीप्रमाणेच मनाचं आंदोलन सुरू होतं. कधी इकडं, कधी तिकडं.
पुन्हा एक कल्लोळ. हा काही पिच्छा सोडत नाही. तो आला की हमखास येतं ते एकाकीपण. एक रितेपण.
'नाही, नकोच...' एका क्षणी झालेला हा निर्णय असतो आणि आपण पुन्हा मोबाईल फिरवतो...
'सहेला रे...' ओह्ह. एक कळ छातीत येते. आपण हे विसरलेलोच असतो. हा फोन केल्यानं ही आर्तता सोसावी लागणार आहे ते.
तो मोबाईल उचलत नाहीये आणि किशोरीचा सूर घुसतोय आतमध्ये... '...आ मिल गाये... सप्त सुरोंके भेद सुनाये...'
अरे...
विचारांची शृंखला क्षणात थांबते. अंधाऱ्या संध्याकाळी एखादी वीज चमकून गेल्यानंतर जी स्तब्धता असते तशी मनात निर्माण होते. तो अजून मोबाईल घेत नाहीये.
गाणं पुढं सरकतंय... '... अबके मिले तो बिछुडा न जाये...'
आंदोलन, कल्लोळ सुरूच.
'सहेला'वरच्या करामतीने बहुदा आपण पुन्हा स्थिर होतो.
पुढच्याच क्षणी आपण आधीच्या निर्णयावर येतोय... उद्या दुपारी बारा. रचना आणि आकृती... आपल्याच मनातील प्रतिमा...
मोबाईल आपणच बंद करतो. त्याचा येईलच काही वेळात याची खात्री असते, यामुळं नव्हे तर आता आपल्याच मनाची खात्री झालेली असते म्हणून. किंवा त्याचा फोन आता नाही आला तरी चालेल या अपेक्षेनंच.
सारं काही निरभ्र असतं आता आतमध्ये. शब्दांची थरथर थांबतेय हे आपल्या लक्षात येतं...
थरथरत्या शब्दांना
आधार भावनांचा
सूर, सूर, सांजउरी
मनाच्या तळाशी या...

कथावाङ्मयप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

25 Nov 2008 - 12:57 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मस्तचं !!

***
बाकी एक अगाऊ सुचना !
व्याकरणाची काळजी घेत लिहणे सोडा... मनमोकळेपणा दिसत नाही आहे लेखनात... एकदम छापील वाचत आहे असे वाटते कधी कधी .. !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

स्वाती दिनेश's picture

25 Nov 2008 - 1:10 pm | स्वाती दिनेश

खूप तरल लिहिले आहेत, आवडले.
स्वाती

टायगर's picture

25 Nov 2008 - 2:29 pm | टायगर

लिखाण खूपच बांधीव वाटते. विषय हळवा असूनही त्यात ओलावा वाटत नाही. लिखाणातील शुष्कपणा जाणवतो. संदर्भही तपासा. "सहेला' रे आणि भैरवीचा काहीही संबंध नाही. तसंच चित्र म्हणजे साधारणपणे भैरवी. विरहाचेच सूर. हे वाक्‍य खूपच खटकते. संगीत माहीत किंवा येत असेल, तरच त्याचा वापर केलेला बरा. कुठेतरी काहीतरी वाचलं म्हणून त्याची कॉपी नको. अडॉप्टेशन करतानाही अभ्यास करावा लागतो.

श्रावण मोडक's picture

25 Nov 2008 - 2:46 pm | श्रावण मोडक

आपल्या प्रतिसादाबद्दल.
"सहेला' रे आणि भैरवीचा काहीही संबंध नाही.
सहेला रे म्हणजे भैरवी नव्हेच. तसं कुठंही म्हटलेलं नाही. तुम्हाला तसं दिसत असल्यास वेगळं. सहेला रे माझ्या (अल्प)माहितीनुसार (माहिती बरं, ज्ञान नव्हे) भूप रागात आहे. एक लेखक म्हणून संगीताचा मी ज्ञानी आहे असं कुठंही म्हटलेलं नाही. तसं तुम्हाला दिसत असल्यास भाग वेगळा. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तसंच चित्र म्हणजे साधारणपणे भैरवी. विरहाचेच सूर. हे वाक्‍य खूपच खटकते.
खटकण्यास माझी काहीही हरकत नाही. पाहणाऱ्याच्या दृष्टिकोणावर (की दृष्टिकोनावर) अवलंबून. माझे सारेच पटावे असा आग्रह किंवा हट्ट नाहीच.
कुठेतरी काहीतरी वाचलं म्हणून त्याची कॉपी नको.
हाहाहाहा. तुमच्याच शब्दांत सांगायचं तर "अभ्यास करावा लागतो." हे खरंच. बाकी अभ्यासाअभावी मी फारसं बोलू शकत नाही.

टायगर's picture

25 Nov 2008 - 3:09 pm | टायगर

स्वत:वर फारच फिदा दिसताय. बराय चालू द्या. असंच "लित' रावा!

नंदन's picture

25 Nov 2008 - 4:08 pm | नंदन

आवडला. शब्दांच्या पलीकडचे काही शब्दांत किंवा रेषांत पकडण्याचा प्रयत्न, त्यातली तगमग सुरेख 'रेखाटली ' आहे. 'सहेला रे'चे योजनही अगदी चपखल. अशा वेळी सार्‍या कलांना संगीत बनायचे असते, ह्या विधानातला खरेपणा पटतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट's picture

25 Nov 2008 - 10:39 pm | सर्किट (not verified)

नंदनशी सहमत आहे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

भाग्यश्री's picture

25 Nov 2008 - 11:50 pm | भाग्यश्री

नंदनशी सहमत.. असेच वाटले वाचताना!
खूप आवडला लेख! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

25 Nov 2008 - 11:56 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. लेख आवडला.

घाटावरचे भट's picture

25 Nov 2008 - 11:58 pm | घाटावरचे भट

'सहेला रे' मधली भावना आर्त वगैरे आहे काय? मला नाही वाटत. मुळात भूप तितका आर्जवी प्रकृतीचा राग आहे काय? ते डिपार्टमेंट शुद्ध कल्याणाचे नव्हे काय?
बाकी मुक्तक छान आहे.

विसोबा खेचर's picture

26 Nov 2008 - 12:09 am | विसोबा खेचर

'सहेला रे' मधली भावना आर्त वगैरे आहे काय? मला नाही वाटत.

मल सहेला रे मधली भावना निश्चितच आर्त वाटते. सहेला रे आर्त तर आहेच, परंतु त्याहूनही खूप काही सांगणारं आहे असं मला वाटतं..

मुळात भूप तितका आर्जवी प्रकृतीचा राग आहे काय? ते डिपार्टमेंट शुद्ध कल्याणाचे नव्हे काय?

असंच काही नाही, भूपातही खूप काही आहे.. आणि मुळात आर्जव हा शब्द सापेक्ष आहे... भूपासारख्या रागात एखाद्याला आर्जवही दिसू शकतं/दिसत असेल... शुद्ध कल्याणची गोडी वेगळी, भूपाची वेगळी..स्वरात पुष्कळसं साधर्म्य असलेल्या रागांनाही स्वत:चं असं एक वेगळं अस्तित्व असतं असं मला वाटतं..

ढोबळ मानाने म्हणायचं झालं तर ठराविक भाव-भावना ठराविक रागात दिसतात. परंतु एखादा राग म्हणजे एखाद्या भावनेचं डिपार्टमेन्ट आहे असंच काही म्हणता येणार नाही..

आपला,
(भूप, शुद्धकल्याण आणि देशकार या तीनही रागांचा प्रेमी) तात्या.

विसोबा खेचर's picture

26 Nov 2008 - 12:16 am | विसोबा खेचर

स्वरात पुष्कळसं साधर्म्य असलेल्या रागांनाही स्वत:चं असं एक वेगळं अस्तित्व असतं असं मला वाटतं..

आणि मु़ळात वर म्हटल्याप्रमाणे भूपात आणि शुद्धकल्यणात बरचंसं साधर्म्य असलं तरी शुद्धकल्याणात अवरोही यमन आहे त्यामुळे भूपाचा अणि शुद्धकल्याणाचा स्वभाव वेगळा आहे...

आमच्या किराण्याच्या शुद्धकल्याणाची गोडी काही औरच हे निश्चित, परंतु ग्वाल्हेरचा भूप देखील तेवढाच सुंदर आहे!

असो..

आपला,
(किराणा-ग्वाल्हेर प्रेमी) तात्या.

घाटावरचे भट's picture

26 Nov 2008 - 12:26 am | घाटावरचे भट

>>सहेला रे आर्त तर आहेच, परंतु त्याहूनही खूप काही सांगणारं आहे असं मला वाटतं..
मला 'सहेला रे' चा हा पैलू जास्त ठळक जाणवतो, त्यातल्या आर्ततेपेक्षाही.

>>स्वरात पुष्कळसं साधर्म्य असलेल्या रागांनाही स्वत:चं असं एक वेगळं अस्तित्व असतं असं मला वाटतं..
सहमत. परंतु एखाद्या रागाच्या प्रकृतीशी न जुळणारे बोल असलेली बंदिश एखाद्या रागात तितक्या परिणामकारकपणे कॅरी होऊ शकते काय?
(हा जनरल प्रश्न आहे. 'सहेला रे'चा संबंध नाही).

यशोधरा's picture

25 Nov 2008 - 11:57 pm | यशोधरा

खूप आवडलं लिखाण. शब्दांच्या पलिकडली तगमग किती तरलपणे शब्दांत पकडली आहे!

विसोबा खेचर's picture

26 Nov 2008 - 12:12 am | विसोबा खेचर

श्रावणराव,

छानच लेख..!

आपला,
(किशोरीताईंचा आणि त्यान्च्या 'सहेला रे..' चा निस्सिम चाहता) तात्या.

प्राजु's picture

26 Nov 2008 - 2:05 am | प्राजु

फारच सुरेख मुक्तक.
सहेला रे... चा अगदी योग्य वापर केला आहे.
सुरेख रेखाटन भावनांच्या चित्राचं शब्दांमध्ये..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

26 Nov 2008 - 12:18 pm | राघव

छानच लिहिलंय!!
कालच बघीतले होते पण वेळ नव्हता म्हणून आज पुन्हा नीट वाचून काढले.
मला स्वतःला रागांतले काही समजत नाही, त्यामुळे त्यावर बोलणे अयोग्य! अर्थात् गाण्यातला भाव समजतो, त्यातही मी आनंदी आहे!! :)
एक तरल, अलवार हुरहुर दिसते; कवितेचा प्रवास दिसतो, अन् वेदनेतून आनंदाकडे जाणारी वाटही दिसते!
खूप छान लेखन!! शुभेच्छा.
मुमुक्षु

श्रावण मोडक's picture

26 Nov 2008 - 7:33 pm | श्रावण मोडक

सर्वांनाच धन्यवाद.
राजे : मी व्याकरणात पडतच नाही. तशा काही चुका दिसतीलही, याच नव्हे तर इतर लेखनातही. आपसूक काही 'शुद्ध' लेखन झाले असेल तर तो डोक्यात आणि हातात बसलेल्या 'शिस्ती'चा परिणाम आहे. त्याला आता इलाज नाही. अर्थात, त्यामुळे लेखन शुष्क, कोरडे होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. तशा जागा दाखवल्यात तर नेमके समजून घेता येईल.
विसोबा आणि घाटावरचे भट : 'सहेला' मला आर्त वाटत आलं आहे. आणि लेखकाच्या भूमिकेतून तेच इथं उमटलं. पण आणखी एक भाग असा की, ही व्यक्तिरेखा मुळात जी आहे, तिची तीच धारणा आहे.
अगदी काही म्हटलं तरी, आर्तता आणि आर्जव हे भाव तसे जवळचेच. त्यामुळं एक निश्चित, की इथं त्या विशिष्ट आविष्कारात 'सहेला' अस्वस्थ (आणि अंतर्मुखही) करतं.
आणखी एक निश्चित की, एखाद्या कलाविष्कारातून ग्रहणकर्त्याच्या मनात निर्माण होणारे भाव वेगवेगळे असू शकतील. कारण हे सारे अखेर व्यक्तिसापेक्ष असते आणि शिवाय, त्या-त्या कलाविष्काराच्या प्रत्येक ग्रहणाची अनुभूती वेगळी असूही शकेल. त्यात पहिल्या खेपेस घेतलेला अनुभव आणि त्यानंतरच्या आवृत्त्यांमध्ये येणारा अनुभव छटेमध्ये वेगळा असू शकेलही.
बाकी रागांविषयी मी अज्ञच.
हे स्पष्टीकरण नव्हे; पण थोडीशी आटोपशीर, मुद्देसूद चर्चा झालेली असल्याने माझी भर.
बाकी, हा तुकडा मी कथा म्हणून प्रकाशित केला. याला लेख म्हणावे की काय असा प्रश्न आता पडला आहे. प्राजू यांनी मुक्तक हा चांगला शब्द टाकला (माझ्यासारख्या संभ्रमित लेखकांसाठी ती एक सुरेख पळवाटच असते).