हागिया सोफियाचे निमीत्त

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
1 Aug 2020 - 12:53 pm

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्या निमीत्ताने बर्‍याच जुन्या गोष्टी उगाळणे होईल. त्यात एक तुलना तुर्कस्थानातील ताज्या हागिया सोफिया धर्मस्थळ घडामोडीशी करण्याचा मोह अनेकांना आवरणार नाही आहे.

काय आहे हे हागिया सोफिया प्रकरण ?

एका वाक्यात सांगायचे झाले तर, एक मूळचे प्राचिन ख्रिश्चन धार्मिक स्थळ ज्याचे एका मध्ययुगीन तुर्कस्थानी आक्रमक सत्तेने उघड हडेलहप्पीने मस्जिदीकरण केले, जे सेक्युलर दबावाखाली मागची ८६ वर्षे संग्रहालय स्वरुपात होते ते मस्जिदी ऊपयोगास पुन्हा नुकतेच खुले केले गेले, जे अंशतः आंतरराष्ट्रीय चर्चेचे कारण बनले. हे एका वाक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्या मागच्या मनोभूमीका तपासण्यास पार्श्वभूमीची जरा दीर्घ माहिती गरजेची असावी.

पार्श्वभूमी

शालेय ईतिहासात कान्स्टंटीनोपल ऊर्फ इस्तंबूल ह्या सुमारे २७०० वर्षे जुन्या शहराचे नाव येऊन गेलेले असते. युरोप आणि आशिया खंडाचा जमिनी व्यापारीमार्गावरील मोक्याचा दुवा ही ह्या कान्स्टंटीनोपल ऊर्फ इस्तंबूल ची खासीयत त्या शहराला मुख्यत्वे ग्रीक आणि तुर्की आणि कधी पडद्या आडून कधी समोरुन आंतरराष्ट्रीय संघर्षाचे केंद्रबींदू ठरत आली. जेव्हा ग्रीक ख्रिश्चन असतात आणि तुर्कस्थानी मुसलमान असतात तेव्हा त्याला एक धार्मिक फोडणी सुद्धा असते.

ग्रीक म्हणजे ते ज्यांच्या शूर अलेक्झांडेरने त्याच्या साम्राज्याच्या सिमा ईस्विसनपुर्व ३२६ मध्ये भारतीय उपमहाद्विपापर्यंत आणून पोहोचवल्या. आणि तुर्की म्हणजे ते ज्यांच्या खलिफाचा धार्मीक आणि सेक्युलर अनुनयाची उर्वरीत मुस्लीम जगता सोबत भारतीय उपमहाद्वीपातही मोठी परंपरा मागच्या शतकाभरापर्यंत होती.

ग्रीक आणि तुर्की वांशिक संघर्ष बहुधा ख्रिश्चन आणि इस्लामच्या पाऊल खुणा उमटण्यापुर्वी पासूनचे असावेत त्यास काळाच्या ओघात धार्मीक फोडणी मिळाली. ईस्वी १४५३ मध्ये तुर्की सुल्तान मेहेमेत-२ ने कान्स्टंटीनोपल जिंके पर्यंत कान्स्टंटीनोपल ग्रीक व्यापार आणि ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन संस्कृतीचे मोठे केंद्र होते जिथे हागिया सोफिया नावाच्या संताच्या नावाने ईस्वीसन 537 मध्ये बांधलेला प्रशस्त चर्च ज्याची शान होता. ईस्वी १४५३ मध्ये आक्रमक तुर्की सुल्तान मेहेमेत-२ ने कान्स्टंटीनोपल जिंकताच हागिया सोफिया चर्चचे मस्जिदीकरण केले. आणि काळाच्या ओघात ख्रिश्चन कान्स्टंटीनोपलचे ईस्लामी इस्तंबूलात रुपांतरण झाले. तुर्की साम्राज्याची एकीकडे ओट्टोमन साम्राज्य नावाने दिन दोगूनी रात चौगूनी प्रगती झाली. दुसरीकडे कान्स्टंटीनोपलची व्यापारी नाकेबंदी झालेल्या युरोपीयांनी आशियायी खासकरून भारतासोबतच्या व्यापारासाठी सागरी मार्ग शोधून काढतानाच वसाहती व्यापार तंत्रज्ञान आणि युद्धात अधिक प्राविण्य मिळवत ओटोमन साम्राज्य आणि त्यांचे धार्मीक महत्व १९२२ पर्यंत संपवले.

ओट्टोमन साम्राज्यसंपतानाच तुर्कस्थानचे तुकडे पाडण्याचीही व्यवस्था झालेली होती पण ओट्टोमनांच्याच एका केमाल अतातूर्क नावाच्या शूर सेनापतीने सत्ता काबीजकरत स्वतःची हुकुमशाही राबवत बाकी साम्राज्य गेले तरी तुर्कस्थान वाचवला. पण योगायोगाने हा केमाल अतातूर्क फ्रेंच पद्धतीचा सेक्युलर निधर्मवादी होता ज्याने मुस्लिम खलिफा परंपरा दूर करत, सत्ता आणि सार्वजनिक जिवन यातून धर्म हद्दपार करण्याचा चंग बांधला. यातच १९३४ च्या आसपास दुसर्‍या महायुद्धाचे वारे घोंघावयास लागले होते जर्मनीच्या गटातील इटली पासून वाचण्यासाठी ग्रीक आणि तुर्कस्थानानने आपापसात तात्पुरती राजकीय सोयरीक केली या राजकीय सोयरीकीच्या मोबदल्यात ईस्वी १४५३मध्ये मस्जिदीकरण केलेले हागिया सोफीया पुन्हा एकदा चर्चला बहाल करावे अशी अपेक्षा ग्रीकांनी व्यक्त केली, केमाल अतातुर्काने ग्रीकांची अपेक्षा पूर्ण मान्य केली नाही तरी हागिया सोफीयाचा धार्मीक मस्जिदी उपयोग थांबवत १९३४ मध्ये रुपांतरण ऐतिहासिक संग्रहालयात केले ते मागच्या आठवड्यापर्यंत टिकले.

सर्वसामान्य जनता धार्मीक मुस्लीम राहीली तरी आहे तेवढे राज्य वाचवणे आणि युरोपीयनांशी स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने सेक्युलॅरीझम गेली शंभरेक वर्षे मुकाट झेलत होती. ज्यांना आक्रमण आणि आक्रमण कालीन अन्याय झेलावे लागतात ते दुखावले तरी आक्रमण यशस्वी झालेल्यांना यशाचा अगदी ऐतिहासिक यशाचाही अभिमान असतो, खासकरून जेव्हा खच्चीकरणाची भावना येते तिला दूरसारण्यासाठी ऐतिहासिक यशाचाही अभिमान ऊपयूक्त असतो. भारतीयांना अलेक्झांडर असो वा ब्रिटीश असोत कुणाशीही हारणे आवडलेले नसते. पण साम्राज्य हरवलेले ग्रीक असोत पोर्तुगीज असोत की अलिकडील सोव्हीएत साम्राज्य हरवलेले रशियन असोत इतिहासात यश संपादन केले पण आता ते नाही साम्राज्य हरवल्याची मनात एक सल असते ती जुन्या आठवणींच्या बळावर भागवली जात असते.

एकवेळ कांन्स्तंतिनोपल जिंकून ते यश साजरे करणे वेगळे, यश साजरे करण्यासाठी एखाद्या धार्मीक स्थळाची हडेलहप्पीकरणे वेगळे, युद्ध जिंकल्यानंतर केलेल्या उघड उघड केलेल्या हडेलहप्पीत अभिमानासारखे काय आहे ? पण कोहीनूर अजूनही आपल्याच संग्रहालयात ठेवण्याचे समर्थन ब्रिटन करत रहातो. आधी रावणाने जिंकले नंतर रामाने जिंकले तरी पुष्पक विमान मूळ कुणाचे ? आज इंद्रवंशीय ठिकाण आणि पुष्पक विमान अस्तीत्वात असते तर त्यांच्या त्यात भावना गुंतलेल्या नसत्या का? रामाने ते अजून वेगळी कडूनच मिळवले पण शूर रामाची आठवण ठेवण्यासाठी रामभक्तांनी पुष्पक विमान इंद्रवंशीयांना वापस केले असते का? जेत्यांच्याही भावना अडकलेल्या असतात त्या अशा. तशाच त्या तुर्कस्थानी लोकांच्याही भावना म्हणे त्या हडपलेल्या हागिया सोफीया मध्ये गेली ८६ वर्षे अडकलेल्या होत्या आणि कधी एकदा जाऊन तेथे प्रार्थना करु असे झाले होते. ती इच्छा तब्बल ८६ वर्षांनी गेल्या आठवड्यात म्हणजे जुलै २०२० मध्ये तुर्कस्तानचे अध्यक्ष तय्यब एर्दोगन यांनी पूर्ण केली, तेही न्यायालयाच्या माध्य्मातून. आता उघड उघड हडेल हप्पी केलेल धार्मीक स्थळ तुर्कस्थानच्या न्यायालयाने कोणत्या तत्वावर मस्जीदी उपयोगास वापस दिले असा प्रश्न बर्‍याच जणांच्या मनात उमटेल. या केस मध्ये हागिया सोफीयाची कागदपत्रे बहुधा सुल्तानाने मस्जिदीच्या नावे केल्याचे दाखवण्यात यश आले असावे (चुभूदेघे). मालमत्त्ता विषयक न्याय देण्यासाठी न्यायालयांनी नेमका किती काळ मागे जावे ? आणि किती काळ मागे जाणे टाळावे? असो. एकुण काय तर तुर्कस्थान तांत्रिकदृष्ट्या का होईना सेक्युलर रहावे आणि मुख्य म्हणजे दुसर्‍या महायुद्धा नंतरच्या शीतयुद्ध काळात कम्युनीस्ट सोव्हीएत रशियाच्या कह्यात न जाता आपल्या सोबत रहावे म्हणून तुर्कस्थानला युरोमेरीकी नाटो कराराचा भाग करून घेतले गेले - ज्या करारान्वये कोणत्याही एका नाटोराष्ट्रावर नाटो नसलेल्या राष्ट्राकडून हमला झाला तर सगळ्यांनी मिळून लढायचे. तो सर्व इतिहास वेगळ्या मोठ्या चर्चेचा भाग असावा, सद्य विषयाशी संबंध एवढाच की मध्यंतरात तुर्कस्थानात अती डावे अथवा अती उजव्यांनी राजकीय डोके वर काढून सत्ता संपादन केली तर लष्करी उठावाने मोडीत काढण्याची व्यवस्था तुर्कस्थानच्या राज्यघटनेतच करुन ठेवली होती तसे डोकेवर काढणे आणि लष्करी उठावांनी दाबणे मागच्या शतकात होऊन गेलेले होते. भारतीयांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणात तुर्कस्थान सेक्युलर असूनही केव्हाही सेक्युलर नसल्यातच जमा होते कारण तुर्कस्थानची आतली गाठ सेक्युलर नव्हतीच युरोमेरीकेला आणि तुर्कस्थानी सेक्युलरांना तुर्कस्थान सेक्युलर भासवण्याचे व्यवस्थापन करण्यात वरवरचे यश मिळालेले होते; मागच्या दोन दशकात तय्यब एर्दोगन नावाच्या इस्तंबूलच्या माजी महापौराने सेक्युलॅरीझमच्या सिमारेषेवर असल्याचे भासवत प्रत्यक्षात धार्मीक कर्मठ राजकीय भूमिका वठवत तुर्कस्थानचे राजकारण ताब्यात घेतलेच झालेला लष्करी उठाव आणि सेक्युलरीझम समर्थकांना सहज मोडीत काढले. त्यासाठी हागिया सोफीयाचे मस्जिद पुर्नरुज्जीवनाचे आश्वासन दिले आणि पुरते केले. सेक्युलरांना काय राजकीय टिका करायची असेल ती ते करोत पण धार्मीक राजकारणावरील राजकीय टिका अथवा अर्थशास्त्राच्या गप्पाकरून सेक्युलॅरीझम लादणे म्हणजे जनतेच्या विचारधारेतला बदलाव नव्हे. विचारधारेतील बदलाव सुडोसेक्युलॅरीझमच्या बळावर शक्य नसतो. मस्जिद जी मुलतः चर्च होती ती चर्चला वापस जावयास हवी होती, आणि ते शक्ती अथवा कायद्याच्या बळावर नव्हे जनतेला चर्चची जागा चर्चा ला न देणे अन्याय असल्याचे पटवून दिले जावयास हवे होते ते न करता जनतेला गृहीत धरण्याच्या भरात सेक्युलर व्हॅल्यूचा आधी सुडोसेक्युलर र्‍हास करतात आणि सेक्युलॅरीझमचा र्‍हास स्वतःच्या हाताने ओढावून घेतात. आणि मग तथाकथित सेक्युलरांच्या हातात धार्मीक राजकारणाच्या नावे बोटेमोडेणे आणि पोक्ळ दुषणे देणे या शिवाय काही शिल्लक रहात नाही. हे जे जगात सर्वत्र होते तेच तुर्कस्थानात होते.

पुढील परिच्छेदातून या निमीत्ताने चालू असलेल्या काही चर्चांचे सूर अभ्यासू

यात निरीश्वरवाद्यांनी नोंद घेण्यासारखे काही असावे. कोरोनाच्यासाथीसमोर धार्मीकता आणि धार्मीकस्थळे उपयोगीपडत नाहीत हे सिद्ध झाल्याने निरीश्वरवाद्यांचा उत्साह नाही म्हटले तरी साधारपणे दुणावला होता पण हागिया सोफीयाचे धर्मकारण चालू पहाता अशा साथी वगैरेंचा धर्मकारणावर आणि धार्मीक विश्वासांवर फार मोठा परिणाम होत नाही हे वास्तव त्यांना या निमीत्ताने लक्षात घेता यावे. वस्तुतः यात अंधश्रद्धेचा भाग अर्धा असतो अर्धा भाग धार्मीक लोकांच्या आदर्शांचा असतो, ते आदर्श योग्य आहेत अथवा नाहीत हा भाग वेगळ्या चर्चेचा भाग असतो. तुर्क्स्थानचा सुल्तान ग्रीकांच्या दृष्टीने आक्रमक असो पण तुर्कींच्या आदर्श आणि अभिमानाचा भाग असतो आणि असे आदर्श जोपासले जाताना गैरसोईस्कर बाबींकडे मानवी स्वभाव दुर्लक्ष करण्यास सरावलेला असतो किंवा सारवासारवीच्या भूमिकांना सोईस्करपणे आपलेसे करत असतो. हे धर्मभोळ्यांच्याच नव्हे तर निरिश्वरवाद भोळ्यांच्याबाबतही तेवढेच होत असते.

तुर्कस्थानी निर्णयाची भलावण करणारे कर्मठ तुर्कस्थानी आणि पाकीस्तानी सूर रोचक आहेत, उघड हडेल हप्पीचे कशाच्या बळावर समर्थन केले जाते हा एक भाग झाला. तुर्कस्थानी केमाल अतातूर्कला अरब संस्कृती म्हणजे तुर्कस्थान नव्हे आणि अरबांची सांस्कृतिक गुलामी करण्याचे कारण नाही याचे व्यवस्थीत भान होते, पण सर्वसाधारणपणे असे भान विरळपणेच आढळते. पाकीस्तानसारख्यांबाबतीत आक्रमक हा आक्रमक होता ही भावना जाऊन स्वदेशावर आक्रमण करणार्‍यांची पुजा करण्याची भावना कशी प्रबळ होते कुणास ठाऊक. मलावाटते आक्रमकांचेही अंशतः उदात्तीकरण होते आणि अशा उदात्तीकरणांना बळपडलेल्यांना आक्रमण आक्रमण होते हे कळेनासे होत असावे. कोरोना काळात भारतात रामायण सिरीयल टिव्हीवर चालवली जाताना एरत्रुगल नावाच्या तुर्कस्थानी योध्याचे उदात्तीकरण करणारी सिरीयल पाकीस्तानात दाखवण्याची व्यवस्था पाकीस्तानी पंतप्रधान इम्रानखानाने केलेली होती. तुर्कस्थानचा इतिहास साम्राज्य बाळगण्याचा असूनही गेले मागचे काही शतके युरोप आणि नंतर सौदी री ओढण्यात गेला याचे मनात कुठे ना कुठे शल्य असते, पुन्हा एकदा जागतिक मुस्लीम राजकारणाचा खलीफा बनून बघावे अशी एक सुप्त इच्छा तुर्कस्थानी मनात असते आणि त्यामुळे केवळ तुर्कस्थानी जनतेच्या समाधानासाठी म्हणून नव्हे तर तुर्कस्थानच्या नेतृत्वात ईस्लामी राजवटींना पुन्हा स्थान निर्माण करता येईल असा आशावाद पसरवत तुर्कस्थानसाठी जागतिक इस्लामी राजकारणात जागा निर्माणकरण्याचा पदरही या मागे असतो.

मग समर्थनार्थ पाकीस्तानी लोक मुस्लिमांवरील अन्यायाचे पाढे वाचणे, आपण दुसर्‍यांची धार्मीकस्थळ हडपूनही त्यांनी वापस घेतली त्या वापस घेण्याकडे अन्याय म्हणून बघणे, सुल्तानाने चर्चचे मस्जिदीकरण करण्यासाठी किंमत मोजली होती सारख्या पुड्या पाकीस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रसिद्धी माध्यमातून पसरवणे, तर जो पर्यंत एखादा सुल्तान जिंकलेला असतो तो पर्यंत जेत्याने काय करावे हा जेत्याचा अधिकार असल्याचे सरळ सरळ प्रतिपादन करणे ते तुर्कस्थानच्या आत काय करायचे ते तुर्कस्थानच्या सार्वभौमत्वाचा भाग असल्याची भूमिका रेटणे. हे सर्व काही करून पाहीले जाते. तुर्कस्थानला जागतिक मुस्लिम देशांचे नेतृत्व मिळणे फारफारतर अंशतः होईलही पण त्यातही बर्‍याच अडचणी आहेत, आणि असे काही नेतृत्व मिळाले तरी तुर्कस्थानच्या विकासाची घडी नीट घालण्यात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात दखल घ्यावी असे स्ट्रॅटेजिक सामर्थ्य निर्माण करण्यात फारसा उपयोग होईलसे तुर्तास तरी दिसत नाही.

बर्‍याच भारतीयांना अशी घडामोड झाली कि आक्रमकांनी चर्चचे मस्जिदीकरण केले गेले हे सिद्ध झाले म्हणजे आयोध्येतील आक्रमण काढून राम मंदिर बांधणे सयुक्तीक असल्याचे देशी विदेशी स्विकारू लागतील अशी भाबडी पण पोकळ आशा, तथाकथित सेक्युलरांच्या वैचारीक कोलांट उड्यांनी पहाता पहाता निराशेत बदलताना दिसून येईल. त्यातील बरेच अन्यायाचा खोटा बनाव करणारे तुर्की एर्दोगन आणि खरोखर अन्याय झालेल्या राम मंदिराचे राजकारण करणारा भाजपा दोघांच्याही राजकारण धार्मीक म्हणून एकाच पागडीतले व चुकीचे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. आणि देशोदेशीचे काही तथाकथित सेक्युलर महानुभाव भाजपा कसा चुकीचा आणि तुर्की एर्दोगन कसा बरोबर हे ही रंगवून सांगतील.

सरते शेवटी कोणत्याही धार्मीक राजकारणाचा विजय तथाकथित सेक्युलरांच्या दुटप्पी दांभिकतेने आणि तथाकथितपणामुळे धार्मीक राजकीय भूमिकांचे वजन अधिकच वाढून होतो असे म्हणावेसे वाटते. असो.

* अनुषंगिका व्यतरीक्तची अवांतरे, अशीष्ट भाषा, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.

धर्मसमाजराजकारणमाध्यमवेध

प्रतिक्रिया

माहितगार's picture

1 Aug 2020 - 1:01 pm | माहितगार

* उपरोक्त धागा लेखात ऐतिहासिक संदर्भ नमुदकरताना खुपसे संदर्भ वापरलेले नाहीत त्यामुळे त्रुटी असू शकतात.

* अधिक वाचनासाठी काही संदर्भ

** आखातातील वर्चस्वाची नवी समीकरणे दैनिक सामना
** तुर्की सरकारने हागिया सोफिया म्यूझियमचे मशिदीत केले रुपांतर! महानगर
** बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज
** Hagia Sophia इंग्रजी विकिपीडिया लेख
** https://en.wikipedia.org/wiki/Istanbul
** https://en.wikipedia.org/wiki/Constantinople

विजुभाऊ's picture

1 Aug 2020 - 1:12 pm | विजुभाऊ

केमाल पाशा चे सगळे प्रयत्न तुर्कस्थान ने पुसून टाकायचे ठरवले आहे

ईश्वरदास's picture

1 Aug 2020 - 2:07 pm | ईश्वरदास

सध्या कुराण वाचीत आहे. मुहम्मद मुळचा टोळी व्यवस्थेचं आपत्य. विविध इष्ट देवतेची पुजा करणाऱ्या टोळ्या एकत्र करण्यासाठी मुहम्मदनं बरेचशे आदेश त्याच्या अनुयायांना दिले होते (जे मुर्ती पुजे विरोधी होते) तसेच बरेच आदेश इसाई व ज्यु लोकांविरुद्ध सुद्धा दिले होते. कुराण वाचत असताना काही गोष्टी मला समजत आहेत त्या पुढील प्रमाणे.
१. कुराण मुसलमान सोडून इतर लोकांना मुलभूत मानवी स्वातंत्र्य सुद्धा देत नाही.
२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत
३. कुराण किंवा कुराणचे अनुयायी सहिष्णू नाहीत.
४. कुराण च अंतिम ध्येय येन केन प्रकारे सगळे मार्ग नष्ट करून एकच मार्ग कायम ठेवणं हे आहे.
५. कुराण सरळ शब्दात धार्मिक दहशत पसरवतं

टिप. माझे वैयक्तिक विचार सेक्युलॅर आहेत. वर दिलेल्या गोष्टी मी कुराण वाचत असताना मला समजल्या त्या दिलेल्या आहेत.
मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही. वरील उतारा जर धार्मिक भावनेला चिथावत असेल तर त्यामधे माझा दोश नाही.

संपादक मंडळ- अक्षेपार्ह असेल तर वर लिहिले काढून टाकले तरी चालेल

मुस्लिमांमधील समस्या मुलतः वैचारीक नवजागरण आणि उत्क्रांतीत कमी पडत असण्याची आहे. बाकी धर्मीय धर्मग्रंथातही समस्या आणि अडचणीच्या जागा आहेत पण व्यक्तीपुजा आणि ग्रंथ महात्म्याला काळाच्या ओघात सुयोग्य जागी मुरड घातली गेली, तशी मुरड घालण्यात मुस्लीम समाज प्रगती करणारच नाही असे नाही पण तो खूपच सावकाश आहे.

अर्थात ज्यांना त्यांच्यात सामाजिक उत्क्रांती घडून हवी आहे त्यांना हा वैचारीक लढा विचारांनी द्यावा लागणार आहे, मुस्लिमांवर सेक्युलॅरीझम अथवा इतर धर्मीय सत्ता केवळ कृत्रिमपणे लादून होणार नाही. कारण असे कृत्रिमपणे लादण्याचे प्रयोग रशिया ते इतर अनेक उदाहरणातून खुपसे यशस्वी नसल्याचे दिसून आले आहे. समाजाच्या वैचारीक प्रबोधनाची जागा इतर उपायांनी पूर्णतः घेतली जाऊ शकत नाही.

प्रतिसादाशी सहमत आहे. हाया सोफ्या या चर्चचे मशिदीत रूपांतर करणे आणि नंतर पुन्हा संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करणे ह्या दोन्ही गोष्टी धर्मांधता दर्शवितात. जगभरातच अतिउजव्या किंवा धर्मवेड्या सत्ताधाऱ्यांची संख्या आणि त्यांचे बळ वाढत चालले आहे आणि या गोष्टीचा थेट तोटा हा कल्याणकारी लोकशाही, पर्यावरण, गरिबी निर्मूलन व निधर्मवाद ह्या मानवी मूल्यांचा ऱ्हास होण्याच्या रूपाने समोर येत आहे.

इस्लामला तर्कसंगत चिकित्सा मान्य नाही. इस्लामला इतर धर्मियांचे साधे अस्तित्त्वदेखील मान्य नाही. नरहर कुरुंदकरांची याबाबतीतील मते ही इस्लामप्रेमी आणि इस्लामद्वेष्टे या दोन्हींनी अभ्यासून पहावीत अशीच आहेत.

सवांतर - पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक समाजाने आज बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते व हे ह्या उपक्रमाचे दहावे वर्ष होते. त्यांचे अभिनंदन आणि हमीद दलवाई यांच्या स्मृतीस मानवंदना.

सुनील's picture

2 Aug 2020 - 7:09 am | सुनील

२. कुराण इसाई, ज्यु, शिख, बौद्ध, हिंदू व अन्य सर्व धर्मांचे उपासना अधिकार नाकारत

कुराणात बौद्ध आणि हिंदू या धर्मांचे उल्लेख आहेत हे वाचून मन भरून आले!
आणि शिख धर्माचाही उल्लेख आहे हे वाचून तर डोळे पाण्याने डबडबले शिवाय कंठही दाटून आला!!

असेच विविध धर्मग्रंथ वाचीन चला आणि आम्हाला बोधामृत पाजीत चला, ही विनंती!

Gk's picture

2 Aug 2020 - 7:33 am | Gk

हा हा हा

सूडोसेक्युलरांचा गौरव करणारा सर्वोत्तम सेक्युलर ग्रंथ आहे तो, नाही का?

जावळीचे वंशज भोसलेंच्या वारसांना आमची जिंकलेली इस्टेट परत करा असे म्हणतील

मनुष्यभावना आणि जनभावना ह्या व्यक्तिगत लाभाच्या आणि समुह लाभाच्या मालमत्तेतही गुंतलेल्या असतात नाही असे नाही. पण त्यापेक्षा ही अधिक त्या सांस्कृतिक वारस्यात अधिक गुंतलेल्या असतात. त्यात त्यांच्या सांस्कृतिक स्वत्वाची भावना निगडीत असण्याची बर्‍यापैकी शक्यता असते. ईस्ट इंडिया कंपनी काळात केलेली मालमत्ता लूटीचे डिटेल्स बर्‍यापैकी कागदोपत्री असले तरी त्याबद्दलचा दावा तेवढ्या आग्रहाने केला जात नाही जेवढ्या आग्रहाने छ. शिवाजी महाराजांच्या तलवार अथवा चित्र विषयक दावा केला जाईल.

नेमके याच बाबतीत सेक्युलर मंडळी सांस्कृतिक वारस्याचे मुल्य सर्वसाधारण मालमत्तेप्रमाणे करण्यास जातात आणि मानवी जनभावना समजण्यास कमी पडतात. परिणामी जनतेच्या नजरेतून उतरून सेक्युलॅरीझमचा खातमा होण्यास स्वतःच मदत करतात असे होत नाही का?

Gk,

जावळीची इस्टेट हे प्रार्थनास्थळ आहे का? नाही म्हणायला अफझुल्याचं थडगं परत घेऊन तिथला अनधिकृत दर्गा पाडला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

1 Aug 2020 - 8:00 pm | Gk

फक्त प्रार्थना स्थळच का ?
दुसरे काहीही असू शकेल की

गामा पैलवान's picture

1 Aug 2020 - 3:19 pm | गामा पैलवान

अवांतर :

ते हगाया सफाया असं नसून हया सुफिया आहे ना?

-गा.पै.

कंजूस's picture

1 Aug 2020 - 7:44 pm | कंजूस

देव कल्पना उभी करण्यात मध्यस्थांचाच फायदा होत असतो.

इतिहासातील पाडापाडी प्रत्येक वेळेला लाभदायकच ठरेल असे नाही.

स्टॅलिनने महायुद्धाच्या वेळी इतका प्रांत जिंकला की त्या उन्मादात त्याने तैमुरलनग चे थडगे उकरून कवटी घेऊन गेला, त्यानंतर त्याची प्रचंड हार झाली , मग कुणीतरी बोलले , गप ते थडगे आहे तसे बांध म्हणून.

http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-ch...

बाबरही त्याच खानदानातील.....

तुमचं कधी बांधून ठेवताय सांगा..

उकरायला येतो.

Gk's picture

2 Aug 2020 - 8:06 am | Gk

जागा शोधत आहे

Gk's picture

2 Aug 2020 - 8:09 am | Gk

शाहण्याने आपले थडगे खणावे
आणि खणताना गाणे म्हणावे

असे गाणे आहे https://youtu.be/cUz7fWGdDkI

दुसर्याचे खणले की पनवती लागते

आनन्दा's picture

2 Aug 2020 - 8:35 am | आनन्दा

म्हणूनच मी उकरणारे.