दुपारची उन्हं जरा कलत नाहीत, तो सगळ्या गोपिका नटून थटून पुन्हा यशोदेकडे हजर. जणू यांची घरची सगळी कामं कृष्णाला बघण्याच्या ओढीनंच लवकर आटपायची. घरात कोणीही असो, त्या कोणतंही काम करत असोत, मनाचा एक भाग कृष्णाचं चिंतन करतच राही. घरच्यांचंही काही फार वेगळं होतं असं नाही. सगळ्या गोकुळाचंच त्याच्याकडे सतत लक्ष लागलेलं असायचं. एका अद्वितीय अशा प्रेमाच्या रेशीमधाग्यानं ते सर्व जणू बांधल्या गेलेले होतेत. त्यांच्या लेखी कृष्ण म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे कृष्ण!
पण आज कृष्णाचं काहीतरी बिनसलं होतं खास. अगदी वेळ झाली तरी हा आपला तयार झालेलाच नव्हता. यशोदेनं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला तयार करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण हा आज काही ऐकायला तयारच नव्हता. शेवटी तिनं अगदी हात टेकले त्याच्यापुढे. तेवढ्यात या गोपिकांचा आवाज ऐकून ती कृष्णाला म्हणाली, "आल्या बघ सगळ्या. तू आपला अजून तयार नाही झालास. अरे सगळे जण कधीच तयार होऊन बसलेत. आज झालंय काय तुला?"
"..."
"तो राम दादा देखील बघ किती शहाण्यासारखा तयार झालाय. आणि तू पहा."
"..."
"अरे तात रागावतील हां तुला आता."
"..."
"तू असा ऐकायचा नाहीस. थांब, मी याच सगळ्या जणींना सांगते तुला तयार करायला. मग काय करशील?"
"..."
"छे.. तू ना कॄष्णा, अगदी हट्टी झालायेस. अजिबात ऐकत नाहीस आजकाल."
असं म्हणून ती सगळ्या गोपिकांना काय चाललंय ते सांगायला निघून गेली. कृष्ण काहीच बोलला नव्हता. पण त्याच्या डोळ्यांत एक मिस्किल झाक होती. काही तरी खासच वेगळं होतं आज!
"काय? हा अजून तयार झाला नाही? गोवर्धन पूजेची वेळ झाली ना गं."
"थांब. आम्हीच जातो त्याला आता तयार करायला."
"मग काय, आत्ता जातो आणि काही पळांत घेऊन येतो त्याला तयार करून."
यशोदेला पुढे काहीही न बोलू देता तो घोळका आत शिरला. वाड्याच्या चौकात तुळशीजवळ कृष्ण त्यांना, अगदी हरवून गेल्या सारखा, एकटक तुळशीकडे बघत मंद हसतांना दिसला. त्यांचा आवाज ऐकून त्यानं हलकेच मान वळवली आणि.. एक अलौकिक अशी शिरशिरी सगळ्यांच्या अंगावरून उठली. त्या नजरेत अपार प्रेम होतं, गोडवा होता, हास्य होतं.. अक्षरशः निखळ आनंद होता.
काही क्षण असे भानरहीत गेल्यावर कृष्णानंच त्यांना त्या भावसमाधीतून बाहेर काढलं,
"काय गं गौराई, कुठे हरवलीस?"
"अं.. अरे.. आपलं.. कुठे काय?"
"आं..?"
"अरे हो, तुला तयार करायला आलो आम्ही आणि इथेच काय उभ्या.. अगं घ्या गं त्याला जरा तयार करायला..!"
"अरे काय? मला येतं की तयार व्हायला.."
"हो का? तरीच तू हात-पाय धुतलेले दिसताहेत! मग आत्ता पावेतो स्वारी काय करत होती?"
"अगं जाणारच होतो मी तयार व्हायला आत्ता.."
"काही नको, तुला काहीच समजत नाही. आम्हीच तयार करतो आता तुला. आधीच केवढा उशीर झालाय. सगळे खोळंबले असतील आता."
कृष्णाला पुढे एक शब्द बोलू न देता, सरळ त्याला घेऊन तो घोळका यशोदेच्या मंदिरात शिरला. लहानपणापासून कित्येकदा, यशोदेनं न्हाऊ-माखू घातल्यावर, यांनीच त्याला तयार केलेलं. सगळं माहितच होतं कुठे काय आहे ते. मग काय विचारता, कुणी त्याचे केस विंचरताहेत, कुणी कपाळाला चंदनाचा लेप लावतंय, कुणी वस्त्र नेसवताहेत, कुणी अलंकार चढवताहेत, कुणी डोळ्यांत काजळ घालतंय.. कसला गोंधळ तो.. काही विचारायला नको. आणि कृष्ण जराही कुरकुर न करता सगळं त्यांना मनासारखं करू देतोय, चेहेर्यावर तेच निर्मळ हसू.. आणि हे सगळं कौतुकानं बघत, यशोदा दारात उभी..! ती इतकी त्या दृष्यात हरवून गेली की, या सगळ्यांना कुठे आवरावं हे सांगण्याचं भानच तिला राह्यलं नाही!
थोड्यावेळानं जेव्हा कुणीतरी तिला हाक मारली तेव्हा ती भानावर आली. हाक मागून आलेली, तरी तिनं लगेच ओळखलं.. राधा!
"अगं आलीस होय तू? आज का गं इतका उशीर?"
"हो ना.. सकाळपासून इतकी कामं लागून राहिलीत, वेळच मिळाला नाही."
"तरीच.. आणि याचं आज इतकं नाटकी काम चाललंय ना.. खूप हट्टी झालाय हा आजकाल!"
"का? काय झालं आज नवीन?", राधेनं हसत हसत विचारलं. मग यशोदेनं सगळी रामकहाणी सांगीतली तिला.
"अगं आज सकाळी उठायला उशीर केला यानं. उठवून निघणार मी, तर धरून बसला मला. माझ्याच मांडीवर डोकं ठेवून, आज स्वारीला परत झोपून घ्यायचं होतं. मग बराच वेळ लाडावून झाल्यावर, कसा बसा त्याला न्हायला पाठवला. तर हा यमुनेवर जाऊन आंघोळ करत बसला!!"
हे ऐकून काही राधेला हसू आवरेना. तिच्याकडे लटक्या रागानं बघत यशोदा पुढे म्हणाली,
"अगं रामनं शोधून सांगीतलं कुठे गेलाय ते. मग त्याला घ्यायला मी तिकडे गेले. घरीच का नाही न्हायलास असं विचारलं तर म्हणे, 'तू स्नान कुठे करायचं ते थोडंच सांगीतलं होतंस.'..... हसू नकोस गंं!", मोठ्ठे डोळे करून यशोदा राधेला सांगतेय आणि राधा आपली खळाळून हसतेय...
"परत आल्यावर जेवायला नखरे. आज काय बिनसलंय ना याचं कोण जाणे. जेवणानंतर या सगळ्याजणी त्याला कुठेतरी न्यायला आलेल्या, तर त्यांना देखील स्वच्छ उडवून लावलं यानं, 'येत नाही' म्हणून. त्यानंतर काय तर म्हणे, 'आज मीच लोणी तयार करणार.' ते करायला घेतलं.. चांगलं केलं बरं!" यशोदा स्वतःशीच हसत म्हणाली,
"पण मी चुकून म्हटलं की 'अरे इतकं लोणी आज आहे घरात, कशाला करायचं उगाच'.. तर झालं, बिनसलं पुन्हा. मग अर्धा घटिका त्याची समजूत काढायला लागली! नंतर मग स्वतः केलेलं लोणी घेऊन, सगळ्यांना स्वत:च्या हातांनी खाऊ घालून आली स्वारी. त्यात सगळ्यांशी गप्पा होतंच होत्या. आता संध्याकाळ व्हायच्या आत तयार हो म्हणतेय मी, तर काही बोलायलाच तयार नाही. आत्ता या सगळ्या जणी आल्या आणि त्यांनीच त्याला तयार करायला घेतलंय. आता मारे कौतुकानं करून घेतोय."
एवढ्या वेळानंतर दोघींना आत बघायचं सुचलं. बघतात तो काय, कृष्ण ओळखूच येईना!!!
सगळ्या गोपिका मोठ्या कौतुकानं आपापल्या कामगिरीकडे बघताहेत आणि यशोदा अन् राधा खळखळून हसताहेत, अशा पारलौकिक अवस्थेत काही क्षण गेले. या दोघींना हसतांना ऐकून सगळ्या गोपिका भानावर आल्या आणि मग त्यांना काय झालंय खरं, ते दिसलं!
चंदनाचा लेप कृष्णाच्या कपाळावर न राहता सगळ्या चेहेर्यावर पसरला होता... त्यात काजळ ओलेपणानं आणिकच ओघळून गालावर आलं होतं! केस विंचरून त्यांच्या जटा झालेल्या होत्या!!! अधरीय आणि उत्तरीयाची अदलाबदल झालेली होती! पायातला तोडा कुणीतरी हातात कड्याच्या जागी घातला होता.... बरेच अलंकार आजुबाजुला तसेच पडलेले होते... कानांतली कुंडलं तेवढी नीट दिसत होती!
"अरे कृष्णा, अरे हे काय झालंय रे.."
"काय झालंय?"
"अरे हा काय तुझा अवतार झालाय"
"म्हणजे?"
"अरे सांगायचंस तरी की आम्ही काही तरी चूक करतोय ते"
"मी कशाला सांगायचं? तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या. तुम्हाला कळतंच की"
"अरे पण सगळ्यांना जर कळलं ना की आम्ही तुला असं तयार केलंय ते, तर तू तर बाहेर जाशील रे पण आम्हाला काही घराबाहेर पडता यायचं नाही"
"अरे काय बोलताय तुम्ही सगळ्या जणी, चांगलंच झालं असणार सगळं."
असं म्हणून कृष्ण पाण्याच्या घंगाळ्यात प्रतिबिंब बघायला वाकला. आणि ते पाहून तो स्वतःच जे हसायला लागला, की बाकीच्या सगळ्या गोपिका अगदी रडवेल्या झाल्या.
"कॄष्णा अरे आम्ही काय केलंय हे. कसं झालंय ते समजतच नाही बघ"
"मी चंदन लावत होते ना तर ते लावतांना इतकं सुंदर दिसत होतं तुझं रूप की काय सांगू"
"काजळ तर मी चांगलंच लावलं होतं रे, पण मला वाटलं विशाल आकाशासारखं काहीतरी मी बघतेय, आणि..."
"ते अधरीय नेसवतांना म्हणूनच मला कमी पडत होतं पण, मला सगळी गाईंची कुरणंच दिसायला लागली रे मग"
"..."
"..."
सगळ्या जणींना काही ना काही वेगळाच अनुभव आलेला होता. मग मात्र यशोदेला ते लगेच उमजलं. तिनं चटकन कृष्णाला जवळ घेतलं आणि राधेला सांगीतलं,
"हे बघ. इथलं सगळं आवरून घे. यांना जरा बाहेर जावून मोकळ्या हवेत बसव आणि थोडं पाणी पाज. मी तोवर याला न्हाऊ घालून आणते. मग ये आणि त्याला तयार करण्यात मला मदत कर." असं म्हणून ती कृष्णाला घेऊन बाहेर पडली. त्याला न्हाणीघरात नेऊन मोठ्या प्रेमानं न्हाऊ घालू लागली. आता तिला हसू मात्र येत नव्हतं!
"आई, काय झालं गं?"
"मला अनेकदा येते तशी अनुभूती त्यांना आज दिलीस ना रे. म्हणून एवढे नखरे चालले होतेत होय तुझे तयार व्हायला?"
"अगं प्रेमाचं भरतं येतं तेव्हा त्यात माणूस रंगून जातो. त्यात डुंबणं म्हणजे काय गोष्ट ते डुंबल्या शिवाय नाही कळायचं. भान हरपून व्यक्त झालेलं प्रेम हे निर्व्याज प्रेम. त्याच्या केवळ ऋणात राहता येतं. त्याची परतफेड होत नसते, करायची नसते."
"कुठून समजतं रे तुला हे सगळं? कोण आहेस तू?"
"मी? तूच सांग, मी कोण ते."
"मला खरंच कळत नाही. पण मी तुझी आई आहे, हे खरं."
कृष्णाला तिनं केव्हा हृदयाशी कवटाळून घेतलं ते तिचं तिलाच कळलं नाही.
जरा वेळानं भानावर येऊन तिनं त्याला समोरच्या पाटावर बसवलं.
त्याचा चेहेरा धुवून घेतला, अंगावरून पाणी घातलं. केस सोडवून मोकळे केले.
डोक्यावरून पाणी घालतांना संतत धार धरल्यावर, एकदम तिला जणू असं वाटलं की ती जणू अभिषेकच करतेय.
गवाक्षांतून येणारी उन्हाची सांजेची किरणं त्याच्या चेहेर्यावर पडत होतीत. त्याचा निळासावळा रंग त्या सोनेरी प्रकाशात अद्भुत उजळला होता.
त्या विशाल भाळावरून ओघळणारं पाणी, त्याचे अर्धोन्मिलित नेत्र, त्याची चकाकणारी सोनेरी कुंडलं.. कितीतरी वेळ ती ते दृष्य बघतच संततधार घालत होती.
तिच्या मनांत ॐकाराचा धीरगंभीर नाद उमटू लागला. त्यात तिचं मन अतिशय शांत होत गेलं. तिथं तिला केवळ आनंद जाणवत होता.
आता ती कृष्णाच्या पायांवर पाणी घालत होती. जणू परातत्वाचीच तिची एकत्वानं पूजा चाललेली.
त्याचे तळवे किती नितळ आणि गुलाबी दिसत होतेत. तिला त्याच्या लहानपणची आठवण झाली. अगदी लहान लहान त्याची पावलं ती हलकेच तेलानं चोळत होती तेव्हाची. असं वाटायचं त्या गुलाबी पावलांचा रंग त्या तेलाला लागतोय की काय! आज मोठी होऊनही त्या पावलांतली नितळता तशीच होती. ती पावलं हृदयाशी कवटाळून घ्यावीत असं तिला वाटलं. त्याच क्षणी कृष्ण स्वतःच तिच्या कवेत शिरला. कितीतरी वेळ ती त्याला तशीच जवळ घेऊन बसली होती.
बराच वेळानं तिला भान आलं. परत राधेचा आवाज येत होता.
"आई, बाहेर जायचंय ना? सगळे वाट बघताहेत!"
"होय की रे, आज काय चाललंय माझं कुणास ठाऊक!", भानावर येत यशोदा म्हणाली.
बाहेर जावून तयार झाल्यावर जेव्हा कृष्ण वाड्याच्या अंगणात आला, तेव्हा सगळं गोकुळ तिथं जमलं होतं. गप्पा रंगल्या होत्या. पण कृष्णाला बघताच सर्व त्याच्या कडे बघतच राहिलेत. आज त्याचं काहीतरी वेगळंच रूप होतं. जणू एक शीतल प्रभा त्याच्यातून बाहेर पडत सगळ्यांना आनंद देत होती. हलकेच मंद स्मित करत, हळूच त्यानं कमरेची वेणू ओठी घेतली आणि एक अतुलनीय स्वरसाम्राज्ञ उभं झालं. सगळे भान हरपून ते ऐकत होते. पशू पक्षी त्याच्याशी निगडीत होऊन गेले. गोठ्यातली गाई वासरं हळूच चालत जवळ येऊन बसली. झाडं झुडुपं त्या स्वरांनी तरारून उठली. मावळतीचा सूर्य जणू थांबला. बाहेरच्या जंगलातले अनेक प्राणी ते स्वर ऐकून त्यात निमग्न होऊन गेले.
राधेला अचानक जाणवलं, हे सगळं तिच्याच साठी आहे. अशी अलौकिक स्वरवाणी तिनं यापूर्वी, कृष्णाचीही, कधी ऐकलेली तिला आठवेना. ते स्वरच वेगळे होते. कृष्णाचं प्रेम, स्वर होऊन सगळ्यांच्या हृदयांतिल तारा छेडत होतं. हेच त्या सर्व पशू-पक्षी, झाडं-झुडूपांनी सुद्धा यातून रंगून जाण्याचं कारण. मी आणि तुम्ही, अशी कोणी वेगळी उरलीच नाहीत. राधेला दिसू लागलं की सर्वत्र कृष्णच आहे. सर्व आहेत पण तिथं कृष्णच आहे! तिला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत होता!!
तिनं स्वतःकडे पाहिलं. तिचे हात वेणूत गुंतले होते. तिच्या ओठी ती वेणू हलकेच टेकलेली होती.
तिच्या हृदयातून, मनातून, तिच्या संपूर्ण अस्तित्वातून, सगळ्यांबद्दलचं प्रेम त्या नितळ स्वरांवाटे बाहेर पडत होतं!!!
सगळ्यांचं लक्ष तिच्या कडेच लागलेलं! तिला कळेचना की ती नक्की कुठे आहे. कृष्णाकडे बघायचं सोडून सगळे तिच्याकडे का बघताहेत?
हळूच तिनं वेणू खाली घेतली. तिच्या लक्षात आलं की कृष्ण जिथे आधी उभा होता, तिथंच राधा उभी होती. कृष्णाची वेणू तिच्या हाती होती. मग कृष्ण कुठे गेला? ती कावरीबावरी होऊन इकडे तिकडे बघू लागली. सगळेच जण भानावर येऊन कृष्णाला शोधू लागले. तर कृष्ण मागे तुळशी जवळ उभा!!
"अरे काय चाललंय तुमचं? काय करताय काय इतका वेळ? किती वेळचा हाका मारतोय मी? चला आता, सूर्य मावळला देखील. म्हणे माझ्यामुळे उशीर होतोय पूजेला." असं म्हणत कृष्ण सगळ्यांत आधी वाड्याबाहेर पडला देखील. आ वासून बसलेले सगळे, ते बघून भराभरा उठले आणि बाहेर पडले.
यशोदा राधेला घेऊन बाहेर पडली, तेव्हा राधेच्या मनांत एकच गोष्ट होती.
कृष्णाच्या मागे वाड्याच्या अंगणात न येता, मागं तुळशीजवळ उभं राहून तिनं कृष्णाचीच प्रार्थना केली होती, "सगळ्यांना तुझ्या प्रेमाचा लाभ होऊ देत!"
त्या स्वराविष्कारानंतर भानावर आल्यावर, कृष्ण त्या तुळशीजवळच तिला दिसला होता आणि कृष्णाच्या जागी ती उभी होती.
प्रेमाचा मूर्तरूप आविष्कार, कृष्णानं तिच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून, तिच्या अस्तित्वातून दिला होता!!!
इत्यलम्
प्रतिक्रिया
19 Jul 2020 - 8:31 am | प्राची अश्विनी
चित्रमय... आवडलं.
19 Jul 2020 - 10:04 am | कुमार१
आवडलं.
20 Jul 2020 - 11:21 am | राघव
धन्यवाद प्राची आणि कुमार. :-)
20 Jul 2020 - 11:47 am | प्रचेतस
अतिशय सुरेख.
20 Jul 2020 - 10:16 pm | राघव
धन्यवाद. :-)