दररोज भेटणारी माणसं आणि प्ले लिस्टमधली गाणी यांच्यात मला कमालीचं साम्य वाटतं. नव्या माणसाला भेटण्याचा अनुभव एखादं नवं गाणं ऐकण्यासारखाच असतो की. कधी ते माणूस/गाणं इतकं भावतं की आपल्या प्ले लिस्ट मध्ये त्यांच एक हक्काचं स्थान तयार होतं. काही गाणी मात्र आपण आयुष्यात एकदाच ऐकतो आणि काही व्यक्तींशी आपला संबंध येतो तो ही आयुष्यात एकदाच. ती गाणी ऐकण्याची किंवा त्या व्यक्तीला भेटण्याची परत इच्छा होत नाही. याचा अर्थ त्या गाण्यात/माणसात काही कमी होतं असा मुळीच नाही. फारफारतर त्यांची आणि आपली 'ट्युनिंग' जमली नाही इतकंच. कधीतरी नव्या गाण्याचे बोल ऐकून मन त्यावर डोलणार की ते संगीतच बंद होतं; कधी टी.व्ही.चा चॅनल बदलला जातो तर कधी ते गाणं वाजवणारी अनोळखी व्यक्ती निसटून जाते. ते गाणं कोणतं याचा थांग काही लागत नाही. ओठांनी व्यक्त करता नाही आली तरी त्याची धून आठवण येईल तेव्हा मनात वाजतेच. काही चांगली माणसं कधीकधी अशीच निसटून जातात. अगदी अलगद, चक्क आपल्या समोरुन.. ती चांगली होती याव्यतिरिक्त त्यांच्या ओळखीचा एकही पुरावा आपल्याकडे नसतो. त्यांचा चांगुलपणा हीच काय ती त्यांची ओळख. पुन्हा भेट नाहीच!
आज खूप वर्षांनी मोबाईलच्या प्ले लिस्टला हात घातला. त्यातली गाणी उचकतांना जणू गेल्या काही वर्षांतल्या जगण्याचा ताळेबंद तपासतोय असं वाटलं. कधीकाळी पुन्हा पुन्हा ऐकलेल्या काही गाण्यांची आज पहिली ओळही सहन नाही झाली. पूर्ण न ऐकताच 'डिलीट' केली ती. इतर काही गाणी आजही आवडतात पण ना ती पुन्हा ऐकण्याचं मन होतं ना 'डिलीट' करण्याचं. वाटतं असु द्यावीत सोबत. आणि राहिलेली काही मोजकीच गाणी मात्र अगदी आजही ते गाणं पहिल्यांदा ऐकत असल्याची अनुभूती देतात. सूर्याच्या तेजासारखी त्यांची प्रसन्नता शाश्वत आहे. माणसांचही असंच करतो ना आपण? काहींशी आयुष्यभराची नाळ जोडली जाते तर काहींशी कित्येकदा संबंध येऊनही आपुलकी निर्माण नाहीच होत. पुन्हा गोष्ट तीच: 'ट्युनिंग'. दोघांपैकी कुणीतरी आपली 'फ्रीक्वेंसी चेंज' करत राहतं आणि यात 'ट्युनिंग' बिघडतं ते कायमचंच. आपली 'फ्रीक्वेंसी मॅच' करणारी कुणी एखादी व्यक्ती आणि गाणं सोबतीला असलं की जीवनाचा 'ऑर्केस्ट्रा' कसा निनादत राहतो. प्ले लिस्ट हवी तेव्हा, हवी तशी 'अपडेट' करावी, कडक वाजणारी जुनी गाणी तेवढी विसरू नयेत बस्स!
प्रतिक्रिया
1 Jun 2020 - 1:29 pm | अनिंद्य
छान लिहिलय.
ट्यूनिंगबद्दल अगदीच सहमत :-)
पहिल्या २०-३० सेकंदातच गाणी- माणसं आपल्याला जमतील किंवा नाही जमणार हे लक्षात येतं, सहसा चूक होत नाही.
4 Jun 2020 - 5:35 pm | चौथा कोनाडा
मस्त लिहिलंय ! दुसरा परिच्छेद आवडला !
लिस्ट हवी तेव्हा, हवी तशी 'अपडेट' करावी, कडक वाजणारी जुनी गाणी तेवढी विसरू नयेत बस्स!
हे तर खासच !
4 Jun 2020 - 6:49 pm | गणेशा
भारी लिहिले आहे.. आवडले