खासियत खेळियाची - श्रीमंत थोरले वॉ साहेब

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
30 May 2020 - 7:53 pm

बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं.

आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा. कुठल्याच चित्रपटात दोन जुळे एकसारख्या स्वभावाचे कधीच कसे दाखवत नाहीत? किंबहुना जुळे म्हटलं की दोघांचं वागणं दोन टोकांचंचअसायला हवं का? एक भोळा भाबडा असेल तर दुसरा बारा**चा असलाच पाहिजे का? दोघीही जुळ्या बहिणी छान, म्रुदुभाषी, सुस्वभावी, सुलक्षणी इत्यादी दाखवायला कायद्यानी बंदी आहे का?

पण मग विचार केला की कदाचित सृष्टीच्या ह्या नियमाला धरूनच २ जून १९६५ रोजी बेव्हर्ली वॉ ह्या माऊलीने जुळ्यांना जन्म दिला. आणि ह्या नियमाला अनुसरूनच एक जुळा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात भरायचा आणि दुसरा डोक्यात जायचा. पण दोघांनीही क्रिकेटवर आपली न पुसली जाणारी मोहोर उमटवली. गेल्या लेखात आपण मनात भरलेल्या मार्क बद्दल बोललो तर आता आपल्या डोक्यात जाणारे "थोरले"!

SW1

स्टीवन रॉजर वॉ हे नाव घेतलं की मला १९९९ च्या वर्ल्डकपचा ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका उपांत्य सामना आठवतो. आफ्रिका ९ बाद २०५. शेवटच्या षटकात ९ धावांची गरज आणि एकच विकेट हातात. पण "मॅन ऑफ द सीरीज" लान्स क्लूसनर खेळतोय. ते ही १२ चेंडूंत २३ धावा काढून. फ्लेमिंगचे पहिले २ चेंडू त्याने सीमेपार धाडले! संपलाच की खेळ ४ चेंडू आणि एकच धाव जिंकायला. आता नक्की लॉर्डसवर पाकिस्तान आणि आफ्रिका झुंजणार! आणि थोरले वॉ साहेब फक्त आपल्या लोकांना दोन्ही हातांनी "आत या" अशी खूण करतात. त्यांचा चेहरा नेहेमीसारखाच निर्विकार. आत चालू असलेल्या वादळाची पुसटशी कल्पना देखील येऊ नये कोणाला इतका. ९ क्षेत्ररक्षक ती १ धाव अडवण्यासाठी वाघासारखे टपलेले. फ्लेमिंगचा पुढचा चेंडू डॉट पडतो. ३ चेंडू १ धाव - तरीही आवाक्यातच. पण क्लूसनर पुढचा चेंडू मिडऑफला मार्क वॉ कडे मारून पळत सुटतो. डोनाल्ड हालत नाही. फ्लेमिंग गिलख्रिस्टकडे चेंडू टाकतो आणि डोनाल्ड धावबाद होऊन क्रिकेटची एक नवी कंपनी जन्माला येते "ऑस्ट्रेलियन क्रिकेट इन्कॉर्पोरेटेड" ! सीईओ - स्टीवन रॉजर वॉ !

WC

थोरल्या वॉ साहेबांच्या डोक्यातच एक रेफ्रिजरेटर होता. आणि हीच त्यांची खासियत. . मार्क टेलरकडून वारसाहक्काने मिळालेला ऑझी संघ खर्‍या अर्थाने जगज्जेता बनवला स्टीवने. मॅट हेडन, मायकेल स्लेटर, पाँटिंग, डेमियन मार्टिन, स्टीव वॉ, मार्क वॉ, गिलख्रिस्ट, वॉर्न, गिलेस्पी, मॅक्ग्रा आणि विकेटप्रमाणे स्ट्युअर्ट मॅक्गिल किंवा कास्प्रोविक्झ. काय बिशाद कोणाची ह्या संघाला हरवायची. पण हेडन, गिलख्रिस्ट, मॅक्ग्रा आणि वॉर्न जर ह्या संघाचे हात-पाय असतील तर ह्या संघाचं सिंहाचं काळीज होता स्टीव वॉ. टीव वॉ च्या नेतृत्त्वाने एका अत्युकृष्ट संघाला एक महान संघ बनवलं ! १९९७ मध्ये एकदिवसीय आणि १९९९ मध्ये कसोटी संघाचं नेतृत्त्व हाती आल्यावर स्टीव वॉने क्रिकेटची अनेक समीकरणं बदलली. सातत्य, अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी सतत करणे, क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलणे, सर्वोत्तमतेचा ध्यास घेणे, पुनःपुन्हा स्वतःचेच विक्रम मोडणे असे अनेक आयाम स्टीव वॉनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दिले.२-४ नाही तर सलग १६ कसोटींत ह्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. वॉ खेळलेल्या १६८ कसोटींतल्या ५७ मध्ये तो कर्णधार होता. त्यांपैकी ४१ सामन्यांत त्याने विजय मिळवला. आणि केवळ ९ सामन्यांत पराभवाचा सामना केला.

स्टीव वॉच्या थंडपणा आणि कठोरपणाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे त्याचा cow corner ला मारला जाणारा slog. बोलर डोईजड होत असेल किंवा परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर थोरले वॉ साहेब हमखास हा फटका मारायचे. अगदी तणावाच्या परिस्थितीत, थंड डोक्याने जागा हेरून लाँगऑन आणि मिडविकेटच्या गॅप मधून मारलेला चौकार / षटकार मारणं..... Shrewd हा शब्द ह्याच्याचसाठी बनवला गेला असावा! त्याचा हा फटका इतका लोकप्रिय होता की स्टीवच्या शेवटच्या सामन्यात भारतीय विकेटकीपर पार्थिव पटेलनी फर्माइश केली.

We play to win matches, not to win friends ही मानसिकता ह्याच्या नसानसांत भिनलेला. पहिल्या टेस्ट मध्ये मिळालेली "बॅगी ग्रीन" शेवटपर्यंत अभिमानाने वापरणारा, खिशात लाल रुमाल ठेवणारा, कधीही हार न मानणारा, पराकोटीच्या दबावात देखील थंडपणे विचार करणारा आणि कठोरपणे निर्णय घेणारा चिवट आणि झुंजार संघाचा चिवट आणि झुंजार कर्णधार - स्टीव वॉ !

SW2

असे हे दोघे अचाट जुळे. धाकला मार्क जर कलाकार असेल तर थोरला स्टीव हा योद्धा होता. मार्कच्या हाती चित्रकाराच्या कुंचल्यासारखी वाटणारी बॅट स्टीवच्या हातात ग्लॅडिएटरच्या तलवारीसारखी वाटायची. कॉलर वर करून गॉगल घालून ऑफस्पिन टाकणारा मार्क Rockstar तर कॉलर वर करून मीडियम पेस टाकणारा स्टीव Workhorse. मार्कची शांतता म्हणजे तळ्याचं पाणी तर स्टीवची शांतता म्हणजे खदखदणारा ज्वालामुखी. जुळे असूनही म्हणा किंवा जुळे असल्यामुळे म्हणा - chalk and cheese सारखे वेगळॅ.

पण दोघांच्यात साम्य देखील होतंच की. दोघांनीही क्रिकेटरसिकांना भरभरून आनंद दिला, अविस्मरणीय क्षण दिले, कडू - गोड आठवणी दिल्या. एकानी आमरसाचा गोडवा दिला तर एकानी मटण-रश्श्याचा झणका. पण दोघांनीही मझा आणला! अश्या रॉजरकाका आणि बेव्हर्लीकाकुंच्या पोरांना २ जूनच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

SMW

जे.पी. मॉर्गन

क्रीडामौजमजाप्रकटनसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

30 May 2020 - 8:00 pm | सौंदाळा

लेख छान,
पण स्टीव्ह एक भारतीय म्हणून कधीच आवडला नाही.
अजूनही लक्ख लक्षात आहे की स्टीव्हची शेवटची कसोटी आपल्याविरुद्ध होती. ती तशी पण अनिर्णित राहणार होती पण आपल्याला कंगारुना फॉलो ऑन द्यायचा चान्स आला होता पण दादाने तो दिला नाही, का नाही हे मला कधीच समजलं नाही. स्टीव्हला आयुष्यभर मिरच्या झोंबल्या असत्या.

सौंदाळा's picture

30 May 2020 - 8:06 pm | सौंदाळा

https://m.cricbuzz.com/live-cricket-scorecard/5203/aus-vs-ind-4th-test-i...
हाच त्या कसोटीचा धावफलक. तेंडल्या दोनशे चाळीस, लक्षा पावणे दोनशे, कुंबळे 8 बळी, मज्जा झाली होती

गणेशा's picture

30 May 2020 - 8:03 pm | गणेशा

अप्रतिम ...

ती मॅच तर मी विसरत नाहीच.. मी अफ्रिका ह्या संघा बरोबर होतो स्पर्धा सुरु झाल्या पासुन आणि माझा मित्र ऑस्ट्रेलिया..

स्टीव्ह आपल्याला आवडायचा खुप.. भारी.. त्या नंतर ऑस्ट्रेलियाचा आता पर्यंत एकच खेळाडु मला आवडला आहे - स्टीव्ह स्मिथ

फारएन्ड's picture

30 May 2020 - 11:39 pm | फारएन्ड

आवडला! १९९५ ची अ‍ॅम्ब्रोस, वॉल्श समोरची डबल सेन्चुरी हा त्याच्या करीयर मधला मोठा टर्निंग पॉईण्ट होता.

चांदणे संदीप's picture

31 May 2020 - 8:35 am | चांदणे संदीप

वा वॉ. लेख आवडला.

भावांच्या ज्या जोड्या क्रिकेटमध्ये आहेत त्यांपैकी कदाचित ही सर्वात यशस्वी जोडी आहे.

स्टीव्ह वॉचा मैदानावरचा प्रेझेन्स भारदस्त वाटायचा. अगदी सम्राटासारखा. त्याच्या नेतृत्वाखाली जो ऑस्ट्रेलियन संघ खेळत होता तो इतक्या जबरदस्त खेळाडूंनी भरला होता की ऑस्ट्रेलिया कधी हरूच शकत नाही असंच वाटायचं आणि त्यांच्याविरूद्धची कुठलीही मॅच बघताना बीपी कायम हाय असायचा.

सं - दी - प

सुमीत's picture

2 Jun 2020 - 11:53 am | सुमीत

मस्तच, पण आम्हाला कळले हो "एक भोळा भाबडा असेल तर दुसरा बारा**चा असलाच पाहिजे का?" ह्या वाक्यात ** काय पण आम्ही बारा गाव असे वाचू :) :)
डोक्यात रेफ्रिजरेटर हा शब्द अलंकार संझगिरि यांचा, तसे पण वॉ बंधू साठि त्यांनी लिहिले आहे की मार्क हा नखरेल प्रेयसी सारखा तर स्टिव्ह म्हणजे साक्षात भारतीय ग्रुहिणी. संकट दिसताच पदर खोचून टिमचा डोलारा संभाळायचा.

बेकार तरुण's picture

2 Jun 2020 - 1:04 pm | बेकार तरुण

स्टीव वॉ कधीच आवडला नाही तरी (हाही) लेख आवडला....

सोत्रि's picture

3 Jun 2020 - 5:06 am | सोत्रि

झक्कास!

- (क्रिकेटप्रेमी) सोकाजी

रुपी's picture

3 Jun 2020 - 11:40 am | रुपी

छान लेख. आवडला :)

सिरुसेरि's picture

8 Jun 2020 - 3:34 pm | सिरुसेरि

छान माहिती . विश्वचषकाच्या एका सामन्यात हर्षल गिब्सने स्तीव वॉचा कॅच सोडल्यावर , स्टीव वॉने त्याला "You’ve just dropped the World Cup, mate " असा टोमणा मारला अशी दंतकथा आहे .

फार जिव्हाळ्याचा खेळाडू निवडलात साहेब. तुमच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. :-)

स्टीव वॉ हा मला आवडणार्‍या खेळाडूंत खूप वरच्या क्रमांकावर आहे. त्याची बॅटींग, बॉलिंग, फिल्डींग कधी नजाकतदार आणि बघत रहावी अशी वाटली नाही. पण त्याच्यातली ती विजिगिषु वृत्ती भयंकर आवडायची. जसा आपला धोनी तसा ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ. कूल आणि तारणहार. ऑस्ट्रेलिया संकटात सापडलेली असली की हा येऊन एक खडूस भिंत म्हणून उभा रहायचा आणि बघता बघता मॅच हातातून गेलेली असायची.
किंबहुना, ऑस्ट्रेलिया कोणत्याही परिस्थितीतून जिंकू शकते ही भिती समोरच्या पक्षाला सतत वाटत राहण्याची सुरुवातच याच्यामुळं झाली, असं म्हटलं तर फार वावगं ठरणार नाही. अगदी शेवटच्या टेस्ट मॅच-टेस्ट इनिंगमध्येही ह्यानं तेच केलेलं. ती सिडनीची मॅच आपण जिंकण्याचा चांगला चान्स असतांना यानं ठोकलेला तंबू, पार डोकं फिरवून गेला होता. अर्थात् त्यामुळेच तो एक फिटींग फेअरवेल ठरला म्हणा!

पण स्टीव वॉ म्हणजे एक मिरचीचा कडक चटका होता. खडूसपणाच्या बाबतीत त्याच्या आसपास फार कमी लोक्स पोचतात. आणि हा माणूस तरीही आवडायचा. स्लेजिंगचा बादशहा म्हणता येईल असा. याचे निवडक क्वोट्स बघितले स्लेजिंगचे, तर कधी कमरेखालचे सापडत नाहीत! पण समोरच्याला अक्षरशः घायाळ करणारे असायचे. तीक्ष्ण विनोदबुद्धीचं ते द्योतक आहे.

गिब्ज ला दिलेला क्वोट तर प्रसिद्धच आहे म्हणा. पार्थिव पटेल ला दिलेला क्वोट पण असाच -“Show a bit of respect, you were in nappies when I played my first Test match”
हे असे शब्द यायला हलकटपणा अंगांगात मुरायला हवा. तो त्याच्यात अगदी पुरेपूर होता!!

आह् .. नॉस्टॅल्जिक व्हायला झालं एकदम.. खूप खूप धन्यवाद!