भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

सागर's picture
सागर in जनातलं, मनातलं
21 Dec 2007 - 7:59 pm

पुष्कर यांच्या आर्य चाणक्य यांच्यावरील विष्णुगुप्त या कथेमुळे मला माझ्या एका जुन्या कथेची आठवण झाली. ती संपूर्ण येथे देत आहे... (संपूर्ण)

- o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o -

भाग १:
चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की, "हिंदुकुश पर्वताला ग्रीक लोक 'हिंदी काकेशस' असे म्हणत. हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोंगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप धडपड केली. पण ह्यांपैकी कोणालाही जे साधले नाही ते बावीसशे वर्षांपूर्वी एका हिंदू राजाने साधले. तो म्हणजे मौर्यकुलभूषण चंद्रगुप्त "
तर आपण चंद्रगुप्ताच्या जन्मापासून सुरुवात करुया...

चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहेत आणि खात्रीलायक माहितीही उपलब्ध नाहीये. अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत. दंतकथांना आपले संशोधक पुरावा म्हणून मानत नाहीत. पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेलाच असतो. तेव्हाच तर त्या तयार होतात. यावर माझा विश्वास असल्याने, मला जो तर्क पटला तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला पटेलच असे मी नाही म्हणणार. पण हा एक संभाव्य तर्क आहे यात काही शंका नाही. तर सम्राट चंद्रगुप्ताचा जन्म नंद कुळातच झाला असावा असा माझा तर्क आहे... अरे असे अवाक् का झालात? काय म्हणता? ज्या कुळात तो जन्मला त्याच कुळाचा नाश त्याने स्वतःच्या हातांनी कसा केला? तीच तर खरी गंमत (खरे तर शोकांतिका) आहे. आश्चर्याच्या गोष्टी विसरुन आता आपण मूळ विषयाकडे वळूयात.

मगधनरेश धनानंद राजाला चैनी-विलासी जीवनाची आवड होती. धनानंदाच्या सेवेत 'मुरा' नावाची एक दासी होती. मुरा दिसायला सुंदर होती. विलासी धनानंदाच्या दृष्टीस मुरेचे लावण्य पडताच त्याने तिला स्वतःची खास दासी म्हणून नियुक्त केले. मुरा एक सामान्य दासी असून धनानंदाने तिला आपल्या अंतःपुरातील दासी बनवले. दासीच्या भावनेला त्या काळात किंमत शून्य होती. निदान धनानंदासारखा विषयासक्त मगधसम्राट असल्यावर तो म्हणेल तीच पूर्वदिशा होती.

काही काळानंतर मुरेला धनानंदापासून दिवस गेले. धनानंदाने तिची योग्य ती काळजीदेखील घेतली होती. ती प्रसूत झाल्यावर तिला जो मुलगा झाला तो चक्रवर्ति होईल असे राज-ज्योतिषिंनी राजाला भविष्य सांगितले. ते ऐकून राजाला भय पडले. दासीपुत्र चक्रवर्ति होऊ नये म्हणून त्याने मुरेसकट त्या निष्पाप बालकाला स्वर्गाची वाट दाखवायचा निर्णय घेतला. कसा कोणास ठाऊक पण मुरेला धनानंदाचा बेत कळला. अजिबात वेळ न घालवता मुरेने बाल चंद्रगुप्तासह पलायन केले. मगधाबाहेर गेल्यावर मुरेला एका गुराख्याने आसरा दिला.

एवढ्या अवधीत तक्षशीलेचे जगद्विख्यात आचार्य चाणक्य मगधाची राजधानी 'पाटलिपुत्र' मधे आले. धनानंदाचा मुद्राराक्षस म्हणून एक फार हुशार महा-अमात्य होता. तो अतिशय एकनिष्ठ होता. फक्त तो राष्ट्रनिष्ठ असण्याऐवजी राजनिष्ठ होता. त्याच्यामुळेच मगध साम्राज्याचा गाडा योग्य रितीने हाकला जात होता. त्याच्यावर राज्यकारभार सोपवून धनानंद विलासात दंग झाला. आचार्य चाणक्य दरबारात धनानंदाला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव करुन द्यायला आले होते. पण धनानंदाकडे अखंड भारताच्या हिताची दृष्टी नसल्याने त्याने आर्य चाणक्यांची निंदा करुन दरबारातून बाहेर काढले. या अपमानाने क्रोधित होऊन आर्य चाणक्यांनी भर दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली व प्रतिज्ञा केली की, "जोपर्यंत मगधाच्या गादीवर असलेल्या नंद कुळाचा नाश करीत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही.... " झालं... आर्य चाणक्यांची ही भीषण प्रतिज्ञा ऐकून धनानंदाने चाणक्याची टर उडवायला सुरुवात केली. मग काय आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. आधीच भडकलेला आचार्यांचा क्रोधाग्नि आणखीनच भडकला. आचार्य तेथे क्षणभरही न थांबता निघाले. दरबारातून बाहेर पडल्यावर आचार्यांनी थेट तक्षशीलेकडे प्रयाण केले.

भाग २:

कर्मधर्मसंयोगानं म्हणा किंवा धनानंदाचा व नंदवंशाचा काळ जवळ आला होता म्हणा, चाणक्याची व शूर चंद्रगुप्ताची गाठ पडली. चंद्रगुप्त तेव्हा साधारण आठ-दहा वर्षांचा असेल. चाणक्य तक्षशीलेकडे निघाला असताना एके ठिकाणी गुराख्याची काही मुले त्याला दिसली. एक मुलगा ऐटीत एका उंच दगडावर बसला होता. त्यच्या मधुर वाणीने ती गुराखी मुलेच काय पण आचार्यदेखील मोहित झाले. दोन मुलांच्या आपापसातील भांडणाचा न्याय-निवाडा तो गुराखी मुलगा एका जातीवंत राजाप्रमाणे करत होता. चाणक्यांनी लगेच बालचंद्रगुप्ताच्या - होय तो मुलगा चंद्रगुप्तच होता - आईची भेट घेतली. एवढा तीक्ष्ण बुद्धीचा आणि योग्य न्यायबुद्धी असणारा चंद्रगुप्त आचार्यांना हवा होता. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला मुरेकडे मागितले.. आचार्यांनी आपली योजना मुरेला सांगितली. मुलाचे भविष्य सुरक्षित किंबहुना त्याहुन अधिक सक्षम हातांनी घडविले जाणार होते म्हणून आणि मुरेलाही धनानंदाचा सूड घ्यायचा होता म्हणून तिने काळजावर दगड ठेवून बालचंद्रगुप्ताला चाणक्यांच्या हवाली केले.

चाणक्याने मुरेचा निरोप घेतला. मुरेनेही धनानंदाने केलेला अत्याचार बालचंद्रगुप्ताला सांगून त्याच्या हृदयात प्रतिशोध (सूड म्हणू हवं तर) घ्यायची भावना भडकवली . सूडाच्या भावनेने पेटलेला चंद्रगुप्त आपले ध्येय गाठण्याच्या हेगेला.आर्य चाणक्यांबरोबर तक्षशिलेला गेला.
तक्षशिलेला पोहोचताच आर्य चाणक्यांनी मुळीच वेळ वाया न घालवला नाही. चंद्रगुप्ताच्या शिक्षणासाठी चाणक्यांनी पुन्हा तक्षशिला विद्यापीठाचे आचार्यपद स्वीकारले. आचार्यांनी चंद्रगुप्ताला विशेष करुन राजनीती, शस्त्रविद्या, युद्धाचे डावपेच, यांमध्ये निष्णात केले. बाकीच्या विषयांमधेसुद्धा चंद्रगुप्त आपल्या बुद्धीची प्रगल्भता दाखवत होता. जसजसा चंद्रगुप्त आर्य चाणक्यांच्या हाताखाली शिकत होता तसतसा तो आपली बुद्धीमत्ता प्रकट करत होता. मनोमन चाणक्य सुखावले होते. कारण चंद्रगुप्त त्यांच्या अपेक्षेहून अधिक हुशार, चाणाक्ष आणि समंजस होता.

तक्षशिलेत चंद्रगुप्ताने किती काळ शिक्षण घेतले हे अज्ञात आहे. पण साधारण वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे शिक्षण पूर्ण झाले असावे. शस्त्रविद्येत तर चंद्रगुप्त भलताच तरबेज झाला होता. आता त्याला ध्यास होता तो धनानंदाने त्याच्या आईवर केलेल्या अत्याचारांचा सूड घ्यायचा. त्याच्या तलवारीला धनानंदाच्या रक्ताची तहान लागली होती. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताची ही अवस्था आधीच ओळखली होती. आणि त्यानुसार सर्व सिद्धताही केली होती. पण मगधस्वारीत एकच गोष्ट आड येत होती. ती म्हणजे सिकंदराची स्वारी.

अलेक्झांडर सिकंदर हा अतिशय महत्त्वाकांक्षी तरुण योद्धा होता. त्याच्या शिस्तबद्ध सैन्याची माहिती करुन घेण्यासाठी आचार्यांनी चंद्रगुप्ताला त्याच्या काही मित्रांसमवेत सिकंदराच्या गोटात पाठवले. सिकंदरापुढे तक्षशिलेच्या राजाने युद्ध न करताच शरणागती पत्करली होती. अनेक मांडलिक राजांनी सिकंदराला आपले सैन्य दिले होते त्यामुळे सिकंदराच्या सैन्यात आता भारतीय सैनिकही होते. त्यामुळे चंद्रगुप्ताला सिकंदराच्या सैन्यात प्रवेश मिळवळे सोपे गेले. चंद्रगुप्ताची व सिकंदराची भेट झाली होती असे म्हटले जाते. पण या गोष्टीला पुरावा नाही. तरी या दोघांची भेट ही अशक्यदेखील नव्हती. चंद्रगुप्ताने सिकंदराच्या सैन्याची शिस्त, त्यांची युद्धपद्धति, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा बारकाईने अभ्यास करुन ते ज्ञान आत्मसात केले. या गोष्टीचा चंद्रगुप्ताला मगधाधिपती होण्यासाठी व नंतरही पुढे फार उपयोग झाला.

सिकंदराच्या सैन्याने पुढे जाणे आता नाकारले होते. सतत सात वर्षे मायदेशापासून दूर राहून सैनिक कंटाळले होते. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यात भर म्हणून यौधेय गणाच्या सामर्थ्याची माहिती सिकंदराच्या सैनिकांना मिळाली होती. अगोदरच थकलेल्या सैन्याची ही बातमी ऐकून अतिशय वाईट अवस्था झाली. सैन्याने पुढे जाणे तर नाकारलेच पण जर सिकंदराने पुढे जायचे ठरवले तर बंड करुन सिकंदराला ठार मारण्याचा कटदेखील काही लोकांनी केला होता. यौधेय हे अतिशय बलशाली, वीरांचे गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते. प्रसंगी स्त्रियादेखील युद्धभूमिवर शस्त्रे घेऊन युद्ध करीत. या यौधेय गणराज्याला घाबरुन सिकंदराच्या सैन्याने युद्धाला नकार दिला. परिणामी सिकंदराला आपली जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडावी लागली व तो मायदेशी परत जाण्यास निघाला.

भाग ३:

सिकंदराने माघार घेताच चंद्रगुप्त व चाणक्य यांनी सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. सैन्य जमताच आचार्यांनी चंद्रगुप्ताच्या साहाय्याने सैन्याला आधुनिक युद्धकलेचे शिक्षण दिले. आपल्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल खात्री होताच गुरु-शिष्यांनी पाटलिपुत्राकडे प्रयाण केले. शक्य तेवढ्या लवकर पाटलिपुत्र गाठायचा चाणक्याचा विचार होता. चंद्रगुप्तदेखील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आतुर झाला होता. चंद्रगुप्ताच्या सैन्याने लवकरच मगध साम्राज्यात प्रवेश केला. पाटलिपुत्र नगरीपर्यंत चंद्रगुप्ताचे सैन्य सहजपणे पोहोचले. त्यांना प्रतिकार झालाच नाही. होणार तरी कसा? चाणक्याने आपल्या भेदनीतीचा वापर करुन गुप्तहेरांच्या सहाय्याने मगधसेनापतीस केव्हाच आपल्याकडे वळवून घेतले होते. चाणक्याच्या या हुशारीमुळे चंद्रगुप्ताच्या सैन्यावर युद्धाचा प्रसंग आलाच नाही. फक्त पाटलिपुत्र नगरीत धनानंदाच्या राजनिष्ठ सैन्याशी युद्ध करावे लागले. थेट पाटलिपुत्रावर आक्रमण केलेल्या चंद्रगुप्ताच्या सैन्यापुढे मनोबल खच्ची झालेल्या आणि स्तिमित झालेल्या धनानंदाचे सैन्य कसे टिकणार? शेवटी चंद्रगुप्ताने पाटलिपुत्रात प्रवेश मिळविला. ही देखील आचार्यांच्या भेदनीतीचीच कृपा होती. अन्यथा चाणाक्ष अमात्य राक्षस असताना पाटलिपुत्रात प्रवेश मिळणे महाकठीण होते...

पाटलिपुत्रात प्रवेश करताच चंद्रगुप्त व चाणक्य या गुरु-शिष्यांनी थेट धनानंदाच्या महालाकडे धाव घेतली. धनानंदाचा चतुर, मुत्सद्दी अमात्य मुद्राराक्षस हा गुप्तमार्गाने निसटून जाण्यात यशस्वी झाला होता. पण विलासात दंग असलेला धनानंद मात्र चंद्रगुप्ताच्या हातात सापडला होता. चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाला धरुन ठेवले होते. धनानंद खाली मान घालून उभा होता. आचार्यांनी धनानंदाला आपल्या भर दरबारात केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करुन दिली. घाबरल्यामुळे व अपमानामुळे त्याची नजर वर उठत नव्हती. मग आचार्यांच्या भेदक नजरेला नजर देणं तर दूरच. आचार्यांनी चंद्रगुप्तास खूण केली. आपल्या तलवारीची तहान भागवण्यासाठी चंद्रगुप्त तयारच होता. आपली तलवार घेऊन चंद्रगुप्ताने धनानंदाच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली. धनानंदाला स्वत:चा अंत समोर दिसताच तो प्राणदान द्यावे म्हणून आचार्यांकडे गयावया करु लागला. पण आचार्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. इतक्यात चंद्रगुप्त धनानंदाजवळ पोहोचला आणि....... एकाच घावात चंद्रगुप्तानं धनानंदाचं मस्तक धडावेगळं केलं ...

अशा रितीने चाणक्यानं आपली प्रतिज्ञा चंद्रगुप्ताला हाताशी धरुन तडीस नेली. पण इथंच आपली कथा संपत नाही. चंद्रगुप्त आता मगधसम्राट झाला होता. युक्त्या-प्रयुक्त्या योजून चाणक्याने एकदाचे अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताचा महा-अमात्य होण्यास भाग पाडले. चाणक्य आता निश्चिंत झाला होता. चंद्रगुप्ताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून चाणक्याने चंद्रगुप्तासाठी व त्याच्या पुढील पिढ्यांसाठी 'कौटीलिय अर्थशास्त्र' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. चाणक्य हा आयुष्यभर चंद्रगुप्तासोबत होता की मगध साम्राज्याची योग्य घडी बसवून अन्यत्र निघून गेला हे कळण्यास मार्ग नाही. पण अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळविण्यास जे अथक प्रयास चाणक्याने केले, ते पाहता चाणक्याने प्रतिज्ञापूर्तीनंतर पुन्हा तक्षशीलेकडे प्रयाण केले असावे असे वाटते.

भाग ४:

साधारण इसवी सनापूर्वी ३०३ या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने - सेल्युकस निकेटरने -चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली. पण चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराजय झाला. व त्याला चंद्रगुप्ताशी तह करावा लागला. या तहामुळे सेल्युकसला काबूल, कंदहार व हिरात ही शहरे ज्या प्रांतांच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोडावे लागले. अशा तर्‍हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन भिडवले. या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला. त्याबदल्यात चंद्रगुप्ताने सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले. यावरुन हा तह करण्यामधे चंद्रगुप्ताची मुत्सद्देगिरी दिसून येते. सेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करुन जास्त भूभाग मिळवणार्‍या सरदारांपैकी एक होता. तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता. सिकंदराचा मृत्यू इ.स.पूर्व ३२३ च्या जून महिन्यात झाला. ऑगस्टमधे ही बातमी हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे सैन्य उभारुन ग्रीकांनी बळकावलेले प्रदेश मुक्त केले. इ.स.पूर्व ३२२ च्या आरंभीच सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त केले. चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम २५-२६ वर्षांचा असेल. इ.स.पूर्व ३०५ च्या सुमारास सेल्युकस निकेटरने सिंधू नदी उतरुन आर्यावर्तावर स्वारी केली.
चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करुन हाकून लावले. व झालेल्या तहामुळे सेल्युकसने आपली मुलगी हेलन हिचा चंद्रगुप्ताशी विवाह करुन दिला व त्याच्याशी सख्यत्व केले.

अशा रितीने चंद्रगुप्ताने मगध साम्राज्याचा विस्तार केला व राष्ट्र एकसंध करण्याची आर्य चाणक्यांची कल्पना वास्तवात आणली. सेल्युकसशी सख्यत्व केल्यावर सेल्युकसने मॅगॅस्थिनिस हा आपला वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी ठेवला. सुमारे पाच वर्ष तो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता. फावल्या वेळात त्याने तत्कालीन माहिती लिहिली. त्याच्या वर्णनांमुळेच आपल्याला त्या काळाची योग्य माहीती मिळण्यास मदत होते.

चंद्रगुप्त मौर्याने आपल्या पराक्रमाने मगध साम्राज्याचा अशा रितीने विस्तार केला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार मगधाच्या गादीवर आला. चंद्रगुप्ताचे थोडेफार राहिलेले साम्राज्यविस्ताराचे काम त्याच्या पराक्रमी पुत्राने व सम्राट अशोकाने पूर्ण केले पण तो वेगळ्या लेखांचा विषय आहे. शेवटी चंद्रगुप्ताने राज्यकारभार बिंदुसाराच्या हाती सोपवला व त्याने जैन धर्माचा स्वीकार केला.
अशी होती 'भारतभूषण सम्राट चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा .... (संपूर्ण)

(चंद्रगुप्त आणि चाणक्य या जोडगोळीचा भक्त) सागर

कथाइतिहासलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2007 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चंद्रगुप्त मौर्याबद्दल अधिक वाचायला आवडेल. हा भाग मस्त झालाय.
पुढील भागाची वाट पाहतोय.

धन्यवाद डॉक्टरसाहेब,
आजच दुसरा भाग किंवा संपूर्ण कथा पूर्ण करण्याचा मानस आहे...
पाहू कसे जमते ते...
सागर

विकेड बनी's picture

21 Dec 2007 - 9:46 pm | विकेड बनी

हा लेख कोणत्या अंगाने वाटतो? ही तर कथा झाली चंद्रगुप्ताची. तीही सांगोवांगीची. ती सत्य आहे हे कोणत्या पुराव्याने सांगता येईल?

कथा वाचनीय आहे. पुढचा भाग लवकर टाका.

सागर's picture

24 Dec 2007 - 5:26 pm | सागर

तेज,

तुमचे म्हणणे बरोबर आहे... खरे तर मी कथा म्हणूनच लिहिली होती...
पण अधे मधे माझी मतेही दिली आहेत तेव्हा ही कथा न वाटता लेख वाटेल अशी अटकळ होती....
म्हणून लेख या स्वरुपात लिहिले... असो... लवकरच पूर्ण करेन...

पुराव्यासकट कथा लिहिणे हा हेतू लेखनाचा नव्हता... या कथेला मूळ आधार आहे तो दंतकथांचा आणि त्यांतून जे सत्य मनास पटले याचा... पुराव्यांसकट लेखन हा खूप संशोधनाचा विषय आहे...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, असेच सांगत रहा...
सागर

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Dec 2007 - 1:31 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आहे. मला लहानपणी अमर चित्रकथा मुळे चंद्रगुप्ताचा आणि चाणक्याचा परिचय झाला होता. नंतर दूरदर्शन वर 'चाणक्य' मालिका आली, ती सुद्धा न चुकवता पाहिली होती. पुढच्या भागांची उत्कंठा लागली आहे... लवकर लिहा.

बिपिन.

धन्यवाद बिपिन,

प्रतिसाद पाहून आजच पूर्ण करण्याचा मानस आहे... पाहू काय होते ते...
लवकरात लवकर पूर्ण करेन ...

सागर

मित्रांनो,

मला आज आनंद वाटतो की आज मी ही संपूर्ण कथा देऊ शकलो आहे

सागर

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Dec 2007 - 12:03 am | बिपिन कार्यकर्ते

सिकंदराची भारता वर स्वारी चंद्रगुप्त मगध सम्राट झाल्यावर झाली असे वाटते. बहुतेक इतिहासात असेच वाचले आहे आणि 'चाणक्य' मालिकेतही तसेच दाखवले आहे. कृपया कोणी अधिक माहिती देऊ शकेल का? सागर...?

बिपिन.

प्रियाली's picture

25 Dec 2007 - 1:51 am | प्रियाली

सिकंदराची स्वारी चंद्रगुप्त सम्राट होण्यापूर्वी झाली आणि सिकंदराच्या सैन्यात चंद्रगुप्त सैनिक म्हणून लढल्याची शक्यता बळकट आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Dec 2007 - 1:20 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद प्रियाली, मी प्रतिसाद टाकल्या नंतर परत काही संदर्भ बघितले, मलाही तसेच वाटते आहे आता.

बिपिन.

बिपीन (प्रश्न उपस्थित केल्याबद्दल) आणि प्रियाली (प्रश्नाचे नेमक्या शब्दांत उत्तर दिल्याबद्दल) दोघांनाही धन्यवाद

प्रियाली तुमच्याकडच्या माहितीच्या साठ्याचे खरोखरच कौतुक वाटते.
अगदी नेमकी माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते... :)

धन्यवाद
सागर

आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे. सिकंदराने आक्रमण केले ते धनानंदाच्या करकीर्दीत. त्याच्या सामर्थ्यामुळे व इतर काही कारणामुळे सिकंदराने तेव्हा आक्रमण केले नाही. नंतर दोन स्वा-यांत सेल्यूकस़कडून चंद्रगुप्त मौर्याचा पराभव झाला. त्या पराभवांची मीमांसा करून दोष काढून टाकून तिस-या स्वारीत चंद्रगुप्ताचा विजय झाला. इतिहास हा माझा विषय नव्हे. म्हणून मी टिपणे काढलेली नाहीत. तरी माझ्या आठवणीप्रमाणे इसपू ३२३ मध्ये चंद्रगुप्त राजा झाला असावा. इअसपू ३२५ मध्ये चंद्रगुप्ताने विजय मिळविला. इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या. परंतु बाळशास्त्री यांनी बरेच संदर्भ दिलेले आहेत व ते इतिहासकाराला साजेसे व विश्वासार्ह वाटले. या पुस्तकांतील सुची अंतर्गत (बिब्लीओग्राफी)ग्रंथ मी वाचलेले नाहीत.

प्रियाली's picture

25 Dec 2007 - 7:45 pm | प्रियाली

>> इसपू ३२६ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला. तरी स्मरणशक्ती ५५ व्या वर्षी त्रास देत असल्यामुळे चू भू द्या घ्या.

अवश्य! सनावळ्या लक्षात ठेवणे तशी कठिण गोष्ट.

अलेक्झांडरचा मृत्यू इ. स्.पूर्व ११ जून ३२३ च्या दुपारी झाला. चंद्रगुप्त राजा झाला इ.स्.पू. ३२२ मध्ये. इ.स.पू. ३१६मध्ये त्याने पंजाब जिंकला.

सागर's picture

26 Dec 2007 - 12:30 pm | सागर

प्रियाली,

नेमकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
खरे तर इतिहास म्हटले की सनावळ्यांमध्ये घोळ हा होतोच. त्यातून अनेक इतिहाससंशोधकांमध्येही त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल वाद असतात.
असो... येथे मी एक स्पष्ट करु इच्छितो की , मी अनेक संदर्भग्रंथांचा आधार हा लेख लिहिताना घेतला होता.
पण सनावळ्या आणि मुख्यपात्रे सोडून इतर पात्रांचा (जसे पर्वतक, अंभीराज, शकटदास, इ...) नामोल्लेख हेतुतः टाळला होता.
कारण चंद्रगुप्त मौर्याचे कथानक याच विषयावर मला रोख ठेवायचा होता..

धन्यवाद
सागर

सुधीर कांदळकर's picture

28 Dec 2007 - 8:55 pm | सुधीर कांदळकर

माहितीबद्दल धन्यवाद. माझी गफलत एवढी आहे की इसपू असल्यामुळे सनावळ्यांचा मी दिलेला क्रम उलटा आहे हे देखील माझ्या लक्षांत आले नाही.

सागर's picture

26 Dec 2007 - 12:35 pm | सागर

आर्य चाणक्यांचे नाव कौटल्य आहे. कौटिल्य नव्हे. असे बाळशास्त्रींचे म्हणणे आहे.

धन्यवाद सुधीरराव...
बाळशास्त्री हरदास यांचे हे मत मी वाचले आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते विशद करुन सांगितले आहे ते पाहता हा तर्क पटावा असा आहेच. पण कौटल्य चे काळाच्या ओघात कौटिल्य हे नामकरण झाले असावे असे मला वाटते. कालौघात शब्दांत बदल होणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे मी मानतो....

या माहीतीबद्दल पुनश्च धन्यवाद
सागर

प्राजु's picture

26 Dec 2007 - 7:42 pm | प्राजु

अतिशय माहितीपूर्ण लेख. लहानपणी चंद्रगुप्त मौर्याची कथा वाचली होती. आणि आर्य चाणक्य सिरियलहि पहात होते. इतिहासाच्या पुस्तकातूनही थोडी माहिती मिळाली होती. पण आज आपल्या लेखाने पुन्हा सगळी उजळणी झाली. खूप आवडला लेख. पुढचे भाग लवकरच येऊदेत.
- प्राजु.

सागर's picture

26 Dec 2007 - 7:55 pm | सागर

धन्यवाद प्राजु.. पण तुम्हाला पुढचे लेख असे म्हणायचे होते का? कारण चंद्रगुप्त मौर्याची कथा एवढाच या लेखाचा उद्देश होता. आणि हे कथानक पूर्ण झालेले आहे. तेव्हा याचे पुढील भाग नसतील.
- सागर

सम्राट 'चंद्रगुप्त मौर्या'ची शौर्यगाथा आवडली.

Bhakti's picture

4 Dec 2021 - 7:15 am | Bhakti

गोष्ट छान आहे.
इंडियन हिस्टोरी नावाच्या app मध्ये मी अनेकदा मौर्य साम्राज्याचा इतिहास सनावळीसह वाचत असे.