मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन पहिली चड्डी फाटली की तो खेळ बंद.
पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* चालत ट्रेक करण्याचा घाट घातला. ते भाद्रपदातले दिवस होते. शाळेला गणपतीची सुट्टी नुकतीच लागली होती. ह्या दिवसात कोकणात पाउस जरा खळावतो* आणि थोडी ताप* पडते. त्यामुळे जनावरं* बिळातून बाहेर येतात. तापलेल्या खडकांवर, डांबरी सडकेवर पहूडून उष्णता मिळवत रहातात. त्यांच्या बिळांमध्ये तेव्हा पाणी गेलेलं असतं. मातीत ओलावा असतो. त्याचप्रमाणे हा त्यांचा मेटींग सिझन असतो.
आम्ही फार काही अवघड वाटेवरुन जाणार नव्हतो. आमच्या कॉलनीपासून मुंबइ- गोवा हायवे वर साधारण एक किलोमीटर अंतरावर तो व्हाळ ( त्याचं नाव अव्हेरयाचा व्हाळ) हायवेला छेदून जायचा. तिथे हायवेवर पूल आहे. तिथून खाली उतरुन अव्हेरयाच्या पात्रातून, तासभर नदीकडे चालत गेलो की डाव्या अंगाला वर व्हायचं. तिथून पुन्हा अर्धा तास चाललो की आमच्या कॉलनीच्या पाठीमागच्या गेटातून घरी. असा साधारण कार्यक्रम आम्ही आखला.
पाउस थोडासा थांबला असल्याने व्हाळात पाणी कमी असतं. पात्रातले शेवाळ धरलेले दगड आता वरती आलेले असतात. अव्हेरयाच्या व्हाळाचं पात्र चांगलं रुंद. त्याच्या प्रवाहाने घळइ निर्माण केली आहे. दोन्ही काठ चांगले उंच आहेत. त्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे दगडांना वेगवेगळे आकार प्राप्त झाले आहेत.
आमचा एकंदरीत प्लान एकून शेवटी आम्ही तिघेच उरलो. आणि आता उद्याच जायचं ठरवलं.
त्यादिवशी घरातून साडेतीन- चारला निघालो. तसं वरती बघितलं तर आभाळ भरुन आलं नव्हतं पण संध्याकाळपर्यंन्त पाउस पडेल असं वातावरण होतं .
त्याप्रमाणे अव्हेरयावरच्या पुलाखाली उतरलो. जिथून उतरलो तिथे वरती डाव्या हाताला, गावात जे हिंदू लोक पुरुन(दफन) अंत्यविधी करतात त्यांचं स्मशान आहे. खाली उतरताना सहज वर बघितलं तर खड्डा खोदायला काही माणसं जमली होती. आधीच आम्ही घरी न सांगता हा बेत आखला होता. आता त्या मंडळींपैकी आपल्याला कोणी बघू नये असं एकमेकांत म्हणतोय न म्हणतोय तोपर्यन्त कानावर कुकारा* आलाच
“रे गजा, रे जातावायस खंय अव्हेरयात?” मित्राचं बाजारपेठेत दुकान होतं त्यामुळे त्याला ओळखणारे बरेच.
“ नाही, असंच जरा फिरायला.”
“ हो अवेरो फिरोची जागा हा की? फाटी फिरा बघू, नायत घराकडे सांगतो..”
“ नाही, जरा इथेच पुढे जातो, जास्त लांब नाही जात.”
“भीती हा हंय अव्हेरयात, मागल्या म्हैन्यातच गाडी उलाटली होती पुलावरसून, दोगे गेले हुते तुमी खाली उतारलात थंयच. ही काय आज भिक्याची आवस गेली, तिका घेवन इलो हाव्तं आमी..”
“ नाही तू काळजी नको करु, आम्ही सांगितलंय घरी, लगेच येतो परत.”
असं सांगून आम्ही त्यांना गुंगारा दिला आणी पुढे सुटलो. आधी कधीच आलो नव्हतो अव्हेरयात. साधारण तासाभरात आपण योग्य जागी पोचून मग वरती जाउ डावीकडे असा विचार होता. आम्ही उन्हाळ्यात आमच्या घराकडून करवंद काढायला येत असू तेव्हा अव्हेरयात उतरायचो. पण तेव्हा पाणी नसायचं पात्रात . त्यामुळे घरापासून अव्हेरा ही वाट सरावाची होती. हायवेवरचा पूल ते अव्हेरयाच्या पात्रातून चालत त्याजागेपर्यंत जाणे ही एक त्या वयानुरुप एक्साइटमेंट होती. ती जागा आली की वरती व्हायचं हे ठरलेलं. ती जागा पुलाकडून चालत आलो तर साधारण तासाभराने लागेल असा आमचा अंदाज होता.
अर्धा – पाउण तास झाला .आता वरती आभाळ भरुन येउ लागलं होतं, त्यात त्या स्मशानातल्या भाउने मनात भीती निर्माण करुन ठेवलेली. आम्ही तसे लहानच अजून. नववी- दहावीतले. आता आम्हालाही थोडीफार भीती वाटू लागली. पण आता आलोच आहोत तर पूर्ण करायचं म्हणून चालू लागलो. अजूनही आमच्या ठरलेल्या जागेचा पत्ता नव्हता.
शेवाळाने बुळबुळीत झालेल्या दगडावरुन सांभाळून चालावं लागतं होतं. एक- दोनदा तर आम्ही सरकून पड्लो देखील. पण एकदम थ्रील वाटत होतं आता बाकिच्या मित्रांना काय काय सांगायचं याच प्लानिंग सुरु झालं होतं. पण आता पाय दुखू लागले होते.
चांगल्या दीड तासांच्या पायपीटीनंतर एकदा आमची नेहमीची जागा दिसू लागली. म्हणजे आमचा अंदाज अगदीच काही चुकला नव्हता.
त्यामुळे आता डावीकडे चढून गेल्यावर अर्ध्या तास पायपीटीनंतर घरी पोचू शाश्वती होती. त्यामुळे आता एक भली थोरली धोंड * बघून त्यावर आम्ही तिघे पाय पासरुन बसलो. पाण्यात अर्धवट बुडालेल्या दगडांना मुळे* चिकटले होते. पाणी आवाज करत वाहत होतं. आम्ही पात्रात मध्यभागी बसून छान दॄष्य बघत होतो. आजूबाजूला माजलेल्या रानाचा, पावसाळी झुड्पांचा संमिश्र उग्र गंध वातावरणात पसरला होता.
आत्तापर्यन्त पायपीट करताना भुरंबुळे* काढले होतेच. त्या विस्तीर्ण धोंडीवर बसून आम्ही ते धुउन सोलून खाल्ले. थोडावेळ शांत बसून आता जाउया म्हणून उठलो तोच…
उजव्या हाताला वरती खस फस आवाज येत होता.. म्हणून धोंडीवरुन उतरुन व्हाळ ओलांडून पलीकडे गेलो. थोडी चढण चढून गेल्यावर पुढे जरा सपाटी होती. आणि चढण परत सुरु होत होती. त्या सपाटीवरुनच हा आवाज येत होता. कुणीतरी गवतात बेभान होउन लोळताना येइल तसा हा आवाज येत होता.
जाउया की नको वरती, काय असेल......?