.....सोडी सोन्याचा पिंजरा

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जनातलं, मनातलं
3 May 2020 - 12:29 pm

नेहमीप्रमाणे अकरावी सायन्सवर बायोलाॅजीचं लेक्चर. प्राणीविश्वावर आधारित Kingdom Animalia हा धडा निव्वळ पुस्तकी अंगाने न शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मुळात आवडीचा. त्यामुळे अर्धी बाजी जणू मारलेलीच. प्राण्यांचे वर्गीकरण करताना एक सूत्र महत्त्वाचं. जसजसे आपण वर्गीकरण करत पुढे जातो तसतसे नंतरच्या गटातील प्राणी आधीच्या गटातील प्राण्यांपेक्षा शरीररचना,अवयव कार्यपद्धतीच्या दृष्टीने अधिक विकसित झालेले आढळतात. त्यामुळे पालकत्त्व आणि अपत्यसंगोपन (parental care) हा गुणधर्मदेखील काही अपवाद वगळता पक्षीवर्गात आणि सस्तन प्राण्यांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने विकसित वर्गात आढळून येतो.खरंतर सुरक्षित पालकत्त्वाच्या कोषात वाढलेल्या या मुलांना याची उदाहरणे देण्याची आवश्यकता नव्हती. पण म्हटलं आता थोडा कहानी में ट्विस्ट आणू या.
अटलांटिक महासागराजवळच्या दुर्गम प्रदेशात राहणारे हार्प सील जन्माला आल्यावर साधारण फक्त दोन आठवडे मादी त्याची काळजी घेते मग मात्र त्या वैराण बर्फाळ प्रदेशात त्याला तसंच एकट्याला सोडून देते. यथावकाश ते अशक्त होऊ लागतं. वजनही वेगानं घटू लागतं. पण त्या मादीला माहिती असतं त्याच्या शरीरातील चरबीवर ते पुढचे चारपाच आठवडे तग धरु शकणार असतं. मात्र याच दिवसात त्याला त्याचं भक्ष्य शोधता येणं जमवायलाच हवं.
गरुडाची पिल्लं मोठी झाल्यावर गरुड त्याच्या घरट्यातील मऊ गवत,पिसं काढून टाकतो आणि ते घरटे काट्याकुट्यांनी भरतो त्यामुळे घरटे सोडून उडण्यासाठी आता पिलांना सज्ज व्हावंच लागतं.
किंवा मग जन्म घेतानाच आठ फूट उंचीवरुन जमिनीवर आदळणाऱ्या जिराफाच्या पिल्लाला जिराफाची मादी जोरानं लाथ मारते आणि तोवर मारतच राहते जोवर ते स्वतः उठून उभं राहत नाही. मग मात्र ती त्याचे पाय चाटू लागते कारण आता हिंस्त्र श्वापदांपासून स्वतःचं संरक्षण करण्यास ते सक्षम बनेल याची तिला खात्री झालेली असते. अशा अनपेक्षित उदाहरणांनी एव्हाना सर्व मुलं बुचकळ्यात. कारण comfort zone सोडायला लावून आव्हानं पेलण्यासाठी सक्षम बनवणे हेही पालकत्त्व निभावणेच आहे हे त्यांना माहितच नव्हते. अर्थात यात दोष त्यांचा नाही. मुलाला जसं सायकल चालवायला शिकवताना एका टप्प्यावर हात सोडून द्यावाच लागतो, पुढे जाऊन ते कदाचित डगमगेल, तोल जाऊन पडेल हे माहिती असूनही. तेच करायचंय पालक बनताना.
राजकुळात जन्माला येऊनही राम आणि कृष्ण असो किंवा शिवाजी आणि संभाजी असो,कोवळ्या वयातही संघर्ष चुकला नाही. मंथनातून निघालेलं विष पचवायची ताकद असल्याशिवाय अमृत कसं मिळेल ?तुटून कोसळल्याशिवाय फिनिक्स कसं बनता येईल ? अब्जाधीश बिल गेट्सची मायक्रोसाॅफ्ट कंपनी नावारुपाला येण्याआधी त्याची आधीची कंपनी पार बुडाली होती हे किती जणांना माहिती आहे ? मायकल जाॅर्डन हा प्रसिद्ध बास्केटबाॅलपटू हायस्कूलच्या टीममध्येदेखील निवड होण्यास पात्र ठरला नव्हता .हिंदी चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन हे आॅल इंडिया रेडिओवर नोकरीसाठी घेतल्या गेलेल्या मुलाखतीत चक्क आवाजामुळे नाकारले गेले होते. यादी तर न संपणारी आहे.
स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची धडपड करणं ही जैविक प्रेरणा आहे. असं असताना कुठलासा एक सिनेमा येतो आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरु होतं ;पण त्याच सिनेमातील इतर अनेक चांगल्या गोष्टी या मुलांमध्ये का झिरपल्या नाहीत? जीवनाची ओढ नाही म्हणुन मृत्यूचं भय नाही. ही जीवनाची ओढ एखाद्या इन्स्टंट प्राॅडक्टसारखी दोन मिनिटांत किंवा हवे ते लगेच पुरवणाऱ्या एका क्लिकवर नाही निर्माण करता येत.
फळं हवी असतील तर मुळांवर मेहनत घ्यावी लागते. झाडांचं हिरवेपण हे मुळांच्या खुशालीवर आणि कणखरतेवर अवलंबून असतं.
प्रकृती (Nature),संस्कृती (Culture) आणि संस्कार (Nurture) अशा त्रिसूत्री समीकरणातून घडते व्यक्तिमत्त्वाची खासीयत (Signature).त्यासाठी घरात संवाद असायला हवा, दर्जेदार साहित्यकृती,नाटक,चित्रपट किंवा प्रवास,खेळ,सामाजिक बांधिलकी अशा शक्य तितक्या विविध अनुभवांनी मुलांचं जीवन समृद्ध बनवायला हवं. संगीत,नृत्य,चित्र,शिल्प अशा एखाद्या कलेचे अधिष्ठान असायला हवे कारण पुस्तकी शिक्षण तुम्हाला जगवेल तर या गोष्टी का जगायचं ते शिकवतील.
अपयशाने खचलेलं मूल आणि निवडुंगावर पडलेलं फूल सारखंच. ते काढायला राकट हात नकोत,तिथे नाजुक हातच हवेत. पण म्हणुन भविष्यात ते फूल पुन्हा कधीच निवडुंगावर पडू नये म्हणुन निवडुंगाची प्रजातीच समूळ नष्ट करणे हा उपाय अविचारीच ठरेल. मुलांच्या भविष्यातील सारा संघर्ष आततायी प्रेमाने पालकांनीच संपवून टाकणं यासारखं दुर्दैव ते कोणतं? शंभर सुखाच्या धाग्यांना एका दुःखाच्या धाग्याचा भार पेलता येईनासा झाला आणि माणसाच्या आयुष्याच्या या जरतारी वस्त्राचा पोत बिघडला. ते शोभिवंत झाले पण टिकाऊ नाही.
त्यासाठी यश असो वा अपयश ते पचवण्यासाठी आत्मभान निर्माण व्हायला हवे. सामर्थ्य आणि मर्यादा दोन्हीची जाणीव असायला हवी. दोन्हीच्या विकासावर मेहनत घेण्याची तयारी हवी. असे सजग पालकत्त्व आता व्यक्तिने नाही तर समष्टीने निभावले पाहिजे. तरच आकाशाची साद मुलांच्या पंखांना ऐकू येईल. नविन क्षितिजं त्यांना खुणावू लागतील मात्र त्यासाठी हा सोन्याचा पिंजरा सोडायलाच हवा.
बाधाएँ आती हैं,आए
घिरें प्रलय की घोर घटाएँ
पावों के नीचे अंगारे
सिर पर बरसें यदि ज्वालाएँ
निज हाथों से हँसते हँसते
आग लगाकर चलना होगा
कदम मिलाकर चलना होगा।
चरैवेति। चरैवेति ॥

मुक्तकजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विज्ञानातून तत्त्वज्ञानाकडे अलगद नेणारा लेख फार आवडला.

प्रकाश घाटपांडे's picture

3 May 2020 - 2:52 pm | प्रकाश घाटपांडे

मुलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न हा मुलांना कटू वाटतो व मुल डूख धरतील की काय अशी भीती पालकांना वाटते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 May 2020 - 3:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. विद्यार्थ्यांना योग्य मार्दर्शन करुन योग्य आत्मभान आणि जिद्द उभी करणारे उदाहरणे आवडली. वेगवेगळ्या धाटनीचे उत्तम लेखन.

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

3 May 2020 - 7:25 pm | अनिंद्य

@ मी-दिपाली,

छान लिहिले आहे तुम्ही.

Helicopter parenting च्या या जमान्यात मुलांना त्यांची लढाई स्वत: लढू देण्याचे धाडस आधी पालकांनी दाखवायला हवे आहे :-)

बाय द वे, लेखाशेवटची कविता कोणाची आहे ? छान आहे.

लेखाशेवटची कविता कोणाची आहे ? छान आहे.

स्वर्गीय अटलजींची कविता आहे ही.

प्रतिसादकर्त्यांचे अन अज्ञात वाचकांचेही आभार.

सुमो's picture

4 May 2020 - 7:25 am | सुमो

लिहिलंय..

आवडलं.

शेखरमोघे's picture

4 May 2020 - 8:34 am | शेखरमोघे

लेख आवडला.