नका ग चांदण्यांनो
नका येऊ खिडकीत
तिच्या मनाचा ठाव
सांगा येऊन पडवीत
सांगा तिच्या गाण्यात
का, आहे नाव माझे?
माझ्याविन विरहाचे
का, सोसते ती ओझे?
ठावे तिलाही आहे
का, रात्री कवितांचे
येती जथ्थे, जाती
स्वप्न गाऊन उद्याचे?
आतूर प्रीत आत
रोज झुरते उरात
सांगा तिला हे सारे
चमचमत्या सुरात
तिचे चालणे बोलणे
भास होऊन छळते
लय श्वासांची तेव्हा
आठवांशी अडखळते
सारे आठव आठव
युगांच्या जणू फेऱ्या
रेखू पाहती नशीबाला
तळहातावर कोऱ्या
पसा पसा सुखाचा
तिला देईन मोजून
बघा चांदणझुल्याचे
झोके रितेच अजून
जा, जा ग चांदण्यांनो
जा करा काम थोडे
माझ्या साऱ्या कवितांचे
पाडा तिच्यापाशी सडे
- संदीप चांदणे (२४/०२/२०१९)
प्रतिक्रिया
24 Feb 2020 - 12:03 pm | आंबट गोड
किती सुरेख भावना!
24 Feb 2020 - 12:20 pm | श्वेता२४
जा, जा ग चांदण्यांनो
जा करा काम थोडे
माझ्या साऱ्या कवितांचे
पाडा तिच्यापाशी सडे
अप्रतिम शेवट.....
24 Feb 2020 - 12:20 pm | प्रचेतस
क्या बात...!
अतिशय सुंदर
24 Feb 2020 - 3:08 pm | ज्ञानोबाचे पैजार
जिओ
फारच मस्त लिहिली आहे
फकस्त एकच तक्रार आहे... लैच दिवसांनी लिहिलेस.
बघ जरा...
पैजारबुवा,
24 Feb 2020 - 3:11 pm | खिलजि
पैंबू काकांना पूर्ण अनुमोदन .. सँडी भौ पुष्कळ दिवसांनी उगवलेले हैत .......
27 Feb 2020 - 9:31 pm | जव्हेरगंज
जाम आवडली!!
कडक!