थुंकणार्‍याची मानसिकता

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
13 Dec 2019 - 12:25 pm

अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्‍यात,लॉबीच्या कोपर्‍यात, लिफ्ट मधे कोपर्‍यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्‍या लोकांचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. परदेशातून आलेल्या पाहुणे हे जेव्हा पहातात त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मागासलेला देश अशी होते. अतुल्य भारत च्या प्रबोधन जाहिरातींमधे ते दाखवून अशा थुंकीसम्राटांचे प्रबोधन करण्याचा क्षीण प्रयत्न सरकारी पातळीवर केलाही जातो.त्या जाहीराती अशा लोकांपर्यंत पोहोचतात किती व त्याचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. काही व्यापारी संकुलात जिन्याच्या कोपर्‍यात देवादिकांची चित्रे असलेल्या टाईल्स लावून या थुंकीवीरांवर नैतिक दबाव आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो.त्याचा काही अंशी परिणाम होतो देखील पण तो तेवढ्या पुरताच.थुंकीवीर आपले पिचकारीचे ठिकाण थोडे शिफ्ट करतात. एका टिकाणी मी पिचकारीचे शिंतोडे मारुतीच्या टाईल्सवर उडालेले पाहिले.कदाचित लक्षात आल्यावर थुंकणार्‍याने नंतर आपली जीभ चावली असेल. पुर्वी काही सरकारी कार्यालयाच्या आवारात विटकरी रंगाच्या भितींवर पांढर्‍या रंगाच्या पाटीवर लाल अक्षरात कार्यालयाच्या आवारात तंबाखू सिगारेट थुंकणे वगैरे गोष्टी भारतीय दंडविधान अमुक अमुक अन्वये गुन्हा आहे व तो अमुक शिक्षेस पात्र आहे अशा आशयाचे लिहिलेले दिसायचे.त्यानुसार कारवाई झाल्याचे पहाण्यात नाही.म्हणजे शिक्षेचे भय नाही व प्रबोधनाची तमा नाही. सुसंस्कृत व सुशिक्षित लोक हे सर्व असहाय्यपणे पहात असतात.
थुंकणार्‍याच्या मानसिकतेतुन पाहिले तर" आता मानुस हाये म्हन्ल्यावर थुकनारच ना! जनावर थुकत्यात का? हॅ हॅ! आमी कुट लोकांच्या अंगाव थुकतो. कोपरा पघुन थुकतो, आन द्यवाची तसबीर आसन तर थुकत बी नाई" असे विचार त्यांच्या मनात असतात. त्यांची भावनिक, बौद्धिक वाढ ज्या संस्कारात, ज्या वातावरणात झाली असते त्या दृष्टीने यात काही गैर नसते. जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, खाजवतो, ढेकर देतो, जांभई देतो तितकी ती निसर्गसुलभ व सहज प्रक्रिया आहे. पुलंच्या रावसाहेबांच्या फुल्या फुल्या जितक्या सहजसुलभ असतात तितक्या. ती एक प्रकारची प्रतिक्षिप्त क्रिया असते. जागॄत मेंदु त्याची दखलसुद्धा घेत नाही.
आमच्या जीवन शिक्षण मंदिरात पाचवी ते सातवी देव गुरुजी आम्हाला शिकवायचे. ते रोज पाच ओळी अक्षरसुधारणेसाठी शुद्धलेखन लिहून आणायला सांगायचे. टाक वापरणे आम्हाला सक्तीचे होते. चुकून जरी पेन नुसता दिसला तरी गुरुजी तरवारीच्या आवेशाने तो पेन दगडी भिंतीवर आपटून त्याचा विनाश करीत असत. खेड्यात लोक आपली पोर गुर्जींच्या पायावर घालायची. गुर्जींविषयी घरात तक्रार केली तर घरात डबल मार बसायचा पोरांना. गुर्जींची शिस्त कडक होती त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. गुर्जी अक्षरश: जीव ओतून शिकवायचे. सगळ्या विषयांना एकच गुरुजी असायचे. गावाचा गुर्जींवर पुर्ण विश्वास होता. आदरयुक्त दरारा असायचा गुर्जींचा. तर अशा या गुरुजींना तंबाखू खायच व्यसन होते. शेणाने सारवलेल्या वर्गात गुर्जींना फक्त खुर्ची टेबल असायचे. बाकी आम्ही खालीच बसत असू. आम्हीच सगळे मिळून वर्ग शेणाने सारवत असू. गुरुजी तंबाखू खात शिकवायचे व कधी कधी खिडकीतून बाहेर तर कधी खुर्चीच्या खालीच थुंकायचे. पण यामधे कुणालाच त्याकाळी गैर वाटत नसे. कारण या चित्राचा कॅनवास हा खेड्यातील समाजजीवन हा होता. ज्यामधे थुंकणे हा समाजजीवनाचा अपरिहार्य व अविभाज्य भाग होता. गुरुजींनी तंबाखू सोडण्याचे भरपूर प्रयत्न केले पण ते फसले. आता हे जर मी कॉन्वेंट स्कूल मधे शिकणार्‍या विद्यार्थी व पालकांना सांगितले तर शिक्षक वर्गात थुंकतात हे भयंकर अनाकलनीय वाटेल. एखाद्या चित्राचे आकलन हे ते चित्र कुठल्या कॅनवासवर प्रक्षेपित केले आहे त्यावर अवलंबून असते. चित्राचा कॅनवास बदलला कि आकलन ही बदलते. आपली समाज चित्रे ही अशीच असतात. माध्यम त्याचा वापर चतुराईने करुन घेतात. कधी त्याचा उपयोग समाज घडण्यासाठी होतो तर कधी बिघडण्यासाठी होतो. थुंकणार्‍या लोकांमधेही प्रबोधनामुळे काही बदल घडत असतात. भान सुटलेले कुठेही व कसेही थुंकणारे लोक आता आजुबाजूला कोणी नाही ना? असे पाहून रस्त्याच्या कडेला थुंकतात. स्वच्छ सुंदर चकचकीत अशा कार्यालयांमधे जर हे थुंकीवीर गेले तर त्या वातावरणाचा मनोवैज्ञानिक दबाव त्यांच्यावर पडतो व त्यांची थुंकीची उर्मी नाहीशी होते . पण जर एखाद्या ठिकाणी पिचकारीचे अवशेष दिसले की त्यांची उर्मी उफाळुन येते व प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तिथे अजून एक पिचकारी पडते. आपला देश एकाच वेळी किमान तीन शतकात तरी वावरतो. त्यामुळे देशातून या चित्राचे समूळ उच्चाटन शक्य होईल असे वाटत नाही पण किमान वेगाने घटले तरी दिलासा म्हणावा लागेल.
थुंक थुंकून कधी तू दमशील
थक थक रे थुंकीलाला
थक थक रे थुंकीलाला।

संस्कृतीसमाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

13 Dec 2019 - 12:35 pm | पाषाणभेद

परेड सावधान.
हिलना नही.
घाटपांडे साहेब आलेले आहेत.
कोणी थुंकणार नाही.
कोणी थुंकलेच तर त्याला तेच साफ करावे लागेल.
अटेंशन.
परेड, सलामी देंगे सलामी दो.

कुमार१'s picture

13 Dec 2019 - 2:23 pm | कुमार१

त्यामुळे देशातून या चित्राचे समूळ उच्चाटन शक्य होईल असे वाटत नाही
>>>>+ १२३!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Dec 2019 - 4:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्या स्विकारल्या की झाले...

उदा. इंग्रज लोक नाही का जेवणाच्या टेबलवर बसून टिशु पेपर मधे नाक शिंकरतात. या बद्दल कोणी इंग्रजांचे प्रबोधन करायला लेख लिहिलेला माझा तरी वाचनात आलेला नाही.

पैजारबुवा,

प्रकाश घाटपांडे's picture

14 Dec 2019 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे

असेल ही लिहिलेला तुमच्या माझ्या वाचनात नाही. सामाजिक सुधारणांचा स्वीकार हा अत्यंत सावकाश असतो.

जॉनविक्क's picture

13 Dec 2019 - 4:20 pm | जॉनविक्क

आपणे पेढाच नई खाया अथवा याला, तुने पिच नई असं म्हणावं वाटते

शशिकांत ओक's picture

17 Dec 2019 - 7:44 pm | शशिकांत ओक

काही वर्षांपूर्वी जिव्हा शुद्धी अभियान पचापचा थुंकणे यापासून अर्वाच्य शिवीगाळ सौम्य शिव्या जिभेवरून हद्दपार करायची सामाजिक गरज यावर लेखन केले होते. कदाचित काहींच्या स्मरणात असेल. याची आठवण झाली.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Dec 2019 - 7:33 pm | प्रकाश घाटपांडे

लिन्क द्या ना

शशिकांत ओक's picture

24 Dec 2019 - 10:10 am | शशिकांत ओक

पचापच... थुंकणे आणि शिव्या जिभेवरून हद्दपार करायची सामाजिक गरज यावर लेखन...
http://misalpav.com/node/28911

सुबोध खरे's picture

17 Dec 2019 - 9:11 pm | सुबोध खरे

जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, खाजवतो, ढेकर देतो, जांभई देतो तितकी ती निसर्गसुलभ व सहज प्रक्रिया आहे.

याच्याशी सहमत नाही.

थुंकणे हि अत्यंत किळसवाणी गोष्ट आहे आणि यामुळे अनेक रोग पसरतात ज्यात क्षयरोग हा एक फार मोठा घटक आहे.

जांभई, ढेकर किंवा शिंक या नैसर्गिक क्रिया आहेत पण त्याचे सामाजिक प्रदर्शन हे अनैसर्गिक आहे.

जांभई, ढेकर किंवा शिंक आली तरी मोठ्याने आवाज करणे हे अतिशय ओंगळवाणे असते आणि याची आजू बाजूच्या लोकांना घाण वाटू शकते किंवा किळस येऊ शकते. असे करणारे अनेक अतिशहाणे वरिष्ठ नागरिक (विशेषतः मोठ्या आवाजात ढेकर देणे) माझ्या दवाखान्यत येतात आणि त्यांना नाक मुरडणारे इतर रुग्ण बाजूला बसलेले असतात. त्याची त्यांना खंत व खेदही नसतो.

जसे घाम येणे हे नैसर्गिक आहे पण घामाचा वास अंगाला मारणे हे अजिबात नैसर्गिक नाही तर आजू बाजूच्या लोकांना किळसवाणेच असते

त्याउलट थुंकणे हि अजिबात नैसर्गिक क्रिया नाही.

आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो हे खिजगणतीत नसणे हा भारतीयांचा स्थायीभाव आहे.
यात मोठ्याने डीजे लावून आवाज प्रदूषण करणे, रस्त्यात नको तिथे गाडी लावून वाहतुकीचा खोळंबा करणे, बेशिस्तपणे पार्किंग करणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, मोटारसायकलचा सायलेन्सर काढून ठणाणा आवाज करत रात्रीच्या शांत वेळेस लोकांची झोप उडवणे आणि सर्वात बाईट म्हणजे अशा गोष्टीबद्दल शेखी मिरवणे अशा अनेक गोष्टी येतील.

बाकी सर्व गोष्टींचे समर्थन करता येत नाही तसेच सर्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे अजिबात समर्थन करता येत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Dec 2019 - 7:37 pm | प्रकाश घाटपांडे

मी हे थुन्कणार्‍याच्या मानसिकतेतुन लिहिले. त्यान्च्या दृ श्टीने ती सहज प्रक्रिया.प्रतिक्षिप्त क्रिया.

माहितगार's picture

18 Dec 2019 - 10:55 pm | माहितगार

थुंकणे हि अत्यंत किळसवाणी गोष्ट आहे आणि यामुळे अनेक रोग पसरतात ज्यात क्षयरोग हा एक फार मोठा घटक आहे.

मला वाटते सामाजिक प्रबोधनात डॉ. खर्‍यांच्या या मुद्दावर भर द्यावयास हवा. तंबाखु खाल्ल्यांनंतर थुंकण्याचे एक कारण मला वाटते या लोकांना तंबाखु गिळण्याच्या परिणामांची दहशत असेल तर तसाच परिणाम ते आपल्या आप्त स्वकींयांसोबत क्षररोग शेअर करुन करत आहेत याची जाणीव देणे रास्त असावे.

कदाचित इतर व्यसनांच्या मानाने दगडांपेक्षा वीट मऊ या नात्याने तंबाखुच्या व्यसनाचा स्विकार होतो का की त तो स्वस्त पर्याय आहे म्हणून होतो?

शासनयेंत्रणेला व्यसनहीन पण सामाजिक अशांतता पसरवणार्‍यापेक्षा व्यसनात गुरफटलेले चार परवडतात. हे खरे असले तरी व्यसनांवर सुयोग्य नियंत्रणाची गरज नाकारुन चालत नाही.

तंबाखुचे दर टॅक्स लावून सावकाश वाढवत नेणे

अल्कोहोलीक अ‍ॅनॉनीमस सारखे तंबाखु अ‍ॅनॉनीमस चे व्यसनमुक्ती ग्रूप चालवता येतील का ते पहाणे

अजून काय पर्याय असू शकतील?

जॉनविक्क's picture

19 Dec 2019 - 12:31 am | जॉनविक्क

जसे आपण श्वास घेतो, शिंकतो, खाजवतो, ढेकर देतो, जांभई देतो तितकी ती निसर्गसुलभ व सहज प्रक्रिया आहे

याच्याशी अर्धा सहमत आहे, बरेचदा पान तंबाखू सुपारी मुळे तोंडाला अतिरिक्त पाणी सुटते ते गिळणे म्हजें विष पिणे होय त्यामुळे थुंकणे आवश्यक आहे..

प्रकाश घाटपांडे's picture

19 Dec 2019 - 9:35 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या गुरुजींना मधे मधे तंबाखु सोडायचा झटका यायचा. मग तंबाखू ऐवजी गुंजेचा पाला किंवा तत्सम अजून एखादा पाला चोळून तो तोंडात ठेवायचा असा प्रयोग करुन पाहिला. पण थोड्या दिवसांनी गाडी परत पुर्वपदावर यायची. कारण ’ती’ तल्लफ काही पाल्याने भागायची नाही.

सुबोध खरे's picture

19 Dec 2019 - 9:36 am | सुबोध खरे

तंबाखू मधील निकोटीन हे तोंडाच्या रक्तवाहिन्यांतून शोषले जाते आणि मेंदूकडे पोहोचते. या ऐवजी आपण तंबाखू गिळला तरी तोच परिणाम होईल पण ती "किक" मिळायला वेळ लागेल. तोंडातच ठेवल्यामुळे निकोटीन पटकन शोषले जाते. (याच कारणासाठी सॉर्बिट्रेट हे औषध हृदयविकारात जिभेखाली ठेवायला सांगतात).
चुना आणि तम्बाखू तोंडात ठेवल्यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता किती तरी पटींनी वाढते पाश्चात्य देशात जेथे तंबाखू खाणे हे नगण्य आहे तेथे तोंडाचे कर्करोग तुरळक प्रमाणात आढळतात. सिगारेट किंवा विडी प्यायल्याने हेच निकोटीन फुप्फुसातून शरीरात पटकन मिसळते किंवा तपकिरीतील निकोटीन नाकाच्या त्वचेतून शिशलं जाते आणि "किक" देते. भाजलेल्या तंबाखूची मशेरी लावण्यामागे हाच हेतू असतो.
गुटखा हा तंबाखूचा अधिक भयानक प्रकार आहे. "किक' चांगली येण्यासाठी त्यात मॅग्नेशियम कार्बोनेट इ अनेक रसायने मिसळलेली असतात यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण कितीतरी पटीने जास्त होतात.शिवाय नुसती पुडी उघडून तोंडात टाकण्याच्या सुविधेमुळे त्याच्या सेवनाचे प्रमाण फार जास्त होते. यास्तव गुटखाबंदी आहे अतिशय योग्य पाऊल आहे यात शंका नाही. तोंडाच्या कर्करोगाने दर तासाला भारतात १० व्यक्ती मरण पावतात आणि यातील बहुसंख्य हे ४०-ते ६० वयोगटातील (कर्ते) पुरुष आहेत
थुंकल्यामुळे त्याचे परिणाम कमी होतील असे म्हणण्यास कोणताही शास्त्राधार नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Dec 2019 - 11:25 am | प्रकाश घाटपांडे

तंबाखू खायची नाही, बिडी सिगारेट ओढायची नाही, गुटखा खायचा नाही दारु प्यायची नाही. ये भी कोई जिंदगी है| अरे जिंदिगी का मजा लो. कभी ना कभी तो उपर जाना ही है! हे असल पुळचट जगण्यापेक्षा शानसे जगाव वाघासारखं माणसानं! बुलावा आल्यावर वरती जावं! असा विचार माझा एक तंबाखू खाणारा मित्र मांडत असे. गाढव तंबाखू खात का? असा प्रश्न विचारायला त्याला जाम आवडायचं!

त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

प्रकाश घाटपांडे's picture

19 Dec 2019 - 12:38 pm | प्रकाश घाटपांडे

त्यावेळी मित्राच्या बेफीकीर पणाचे कौतुक वाटायचे. आता या गोष्टी पटत नाहीत. सर्वदृष्टीने घातक असलेल्या व्यसनांच उदात्तीकरण नको असेच मत आहे.

गवि's picture

19 Dec 2019 - 12:41 pm | गवि

सहमत आहे.

पण सांगायचे राहून गेले ;)

जॉनविक्क's picture

19 Dec 2019 - 3:57 pm | जॉनविक्क

तंबाखू मधील निकोटीन हे तोंडाच्या रक्तवाहिन्यांतून शोषले जाते आणि मेंदूकडे पोहोचते. या ऐवजी आपण तंबाखू गिळला तरी तोच परिणाम होईल पण ती "किक" मिळायला वेळ लागेल.

आणि इतर अवयवांचे काय ?

आजाणकार मित्रहो खरे डॉक्टर आहेत खरे पण या धाग्यावर ते गम्मत करत असावेत, तेंव्हा त्यांचा सल्ला मानून कृपया तंबाखू गिळू नये अन्यथा तोंडातून थुंकी न्हवे ओकारी बाहेर येईल.
-जनहितार्थ जारी

सुबोध खरे's picture

19 Dec 2019 - 7:54 pm | सुबोध खरे

तंबाखू गिळू नये अन्यथा तोंडातून थुंकी न्हवे ओकारी बाहेर येईल.

असं काहीही होणार नाही.

जॉनविक्क's picture

20 Dec 2019 - 1:54 am | जॉनविक्क

सुबोध खरे's picture

21 Dec 2019 - 11:57 am | सुबोध खरे

एक सिगारेट मध्ये असतो तेवढाच तंबाखू खाल्ला तर सिगरेटचा जेवढा त्रास होईल तेवढाच होईल.

कोरा सारख्या साईट वर लोकांचे स्वतःचे अनुभव आहेत शास्त्रीय सत्य नव्हे.

https://www.quora.com/Do-you-believe-in-ghost-or-have-you-seen-ghost
हे पहा

जॉनविक्क's picture

21 Dec 2019 - 1:42 pm | जॉनविक्क

म्हणूनच डेमो देतो केंव्हा भेटणार विचारले होते. कशाला कोराच्या नादि लागायचे म्हणतो मी ? जेव्हडी तंबाखू मळून पानात अथवा तोंडात ठेवली जाते व त्याचे व्यक्तिनिहाय प्रमाण वेगवेगळे असते तितकीच तंबाखू त्या त्या व्यक्तीने गिळत राहिल्यास उलट्या होणे त्याची भावना होणे हे व इतर त्रास हमखास होतात

किमान एका सिगारेटमध्ये असतो तेव्हढा तंबाखू
चला ही ओळ नव्याने ऍड करून विषय मर्यादित केलात ते बरे झाले. त्याचे असे आहे की प्रमाण हा शब्द ऍड झाला ना की विषही औषध म्हणून काम करते असो.

सुबोध खरे's picture

23 Dec 2019 - 7:25 pm | सुबोध खरे

ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये तंबाखू याबद्दल एक शास्त्रीय लेख होता.

त्यात एक ओळ अशी होती कि तंबाखू हे एक असे द्रव्य (औषध म्हणत नाही- ड्रग असा मूळ शब्द आहे इंग्रजीत) आहे कि ज्याचे सेवन उत्पादकाच्या शिफारशीनुसार केले तरीही त्याचा अपायच होतो.

TOBACCO IS A DRUG WHICH CAUSES ONLY HARM EVEN IF TAKEN ACCORDING TO MANUFACTURER,S RECOMMENDATION.

कर्करोग केंद्रात ९ वर्षे काम केल्यावर इतके तरुण आणि मध्यमवयीन लोक उमेदीच्या वर्षात तंबाखू सेवनामुळे कर्करोग होऊन गेलेले पाहिले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत होताना पाहिली आहे कि कुणीही तंबाखू कोणत्याही स्वरूपात सेवन करताना किंवा त्याची भलामण करताना पाहिली कि काळजात कळ उठते.