दुपारची झोप..

Primary tabs

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
26 Aug 2019 - 5:24 pm

जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात.

फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.

तेवढी अर्धा तास झोप मिळाली की कसे फ्रेश वाटते. मला दुपारच्या वेळी २/२ तास झोपणे पसंत नाही. फक्त अर्धा तास झोप बस झाली. रात्री अकरा पर्यन्त फ्रेश राहायला होते या झोपेमुळे.

एकदा माझी एक "आरोग्यप्रेमी रामदेवबाबा" मैत्रीण दुपारची जेवायला आली. जेवणे झाली. मला रोजच्याप्रमाणे झोप यायला लागली. मी तिच्याशी त्याच पेंग आलेल्या अवस्थेत गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होते. मधूनच अतिशय जोरात डुलकी येऊन असंबद्ध बोलत होते.

"आपण जरा पडूया का?पडल्यापडल्या गप्पा मारूया का?" मी भीड सोडून तिला हताश स्वरात विचारले. त्यावर ती निक्षून म्हणाली. "छे छे. दुपारी अजिबात झोपायचं नाही. वजन वाढतं."
माझ्या वाढलेल्या वजनाकडे बघूनच ती बोलत होती हे उघड होतं. दुपारच्या झोपेने वजन वाढणार असेल तर ते मला "सर आंखोपर" होतं.

मी अपमान गिळून म्हणाले, "म्हणजे डायरेक्ट झोपायचं नाही गं . उगीच जरा पाठ टेकायची. सकाळपासून कामं चालली आहेत न! एक माणूस जेवायला आलं तरी पान सजवावे लागतं."

कसं कुणास ठाऊक तिला पाझर फुटला. म्हणाली,"चल पडूया. पण झोपायचं नाही. दुपारी झोपलं की बुद्धी मंद होते.

मला आता मी "विशेष" चॅलेंज्ड व्यक्ती वाटायला लागले. दुपारच्या साध्या झोपेची एवढी मोठी किम्मत ?

ती पुढे म्हणाली,"इतक्या दिवसानी भेटतोय. मला तर किती गप्पा मारू आणि किती नको असे झालंय. झोपतेस कसली?"

नुसतं पडायच ह्या विचारनेही मी प्रफुल्लित झाले. तिच्याबद्दल प्रेमाचं भरतं आले. तिने अशा वेळी मला नवीन श्वसनप्रकार शिकवायला न घेतल्याबद्दल मी पेंगत्या डोळ्यांनी तिचे मनात आभार मानत म्हटलं,"ओके. नुसतं पडूया तर पडूया. झोपायचं नाही."

आम्ही पडलो. कसल्या गप्पा नि कसले काय? तिसर्‍या मिनिटाला मी झोपून गेले. उठल्यावर बघितले तर मैत्रीणही गाढ झोपली होती. घोरणं हा एकमेव श्वसनप्रकार चालू होता. मला डोळाभर आनंद झाला. कसली वजनवाढ नि कसली मंद बुद्धी.. !!

दुपारची झोप बुडू नये म्हणून मी दुपारी कुणाकडे जात नाही. दुपारचा सिनेमा, दुपारचे नाटक पाहत नाही. एखाद्या लग्नघरात जेवण झाले की लगेच झोपायला स्वताच्या घरी येते. एवढं कशाला, मी नोकरी करत असतांनाही,माझी झोप मॅनेज केली. ओ हो होहो. मी कामावर असताना झोपा काढत होते असा गैरसमज करून घेऊ नका. कसं ते सांगते. दुपारचा डबा खाऊन झाला की, मी माझ्या केबिनच्या दाराला आतून कडी लावून घ्यायची आणि टेबलावर डोके ठेवून दहा मिनिटे झोप काढायची. सुदैवाने वेगळी केबिन असल्यामुळे ते शक्य होतं.
मग लंच अवर संपण्याच्या वेळी केबीनचे दार उघडायची.

आमच्या ऑफिसात वॉशरुमखेरीज खरोखरची "रेस्ट"रूम नव्हती, लेडीज रूम नव्हती. म्हणून हा खटाटोप मला करायला लागायचा. अर्थात ऑफिसात आडवे न होता बसून झोपावे लागायचे ही एक गैरसोय होती. पर चलता है. मी कुठेही ,कशीही, सरळ, उभी ,आडवी, तिरकी झोपू शकते ही तर माझी खासियत आहे. माझी कसलीच अडचण होत नाही. मी प्रेमात पडले तेव्हाही माझी "मुझे नींद न आये "अशी अवस्था झाली नाही. किंवा "डोळ्याला डोळा म्हणून लागला नाही बाई" अशी त्रासिक तक्रार मी कधीच करत नाही. बोरिंग कार्यक्रमांचा ,भाषणांचा, मला त्रास होत नाही. कारण मी त्यावेळी मस्त झोप काढते. आय लव दुपारची झोप. पूर्णब्रह्म असे अन्न पोटात गेल्यानंतर येणारी दुपारची झोप माझी जीवाभावाची सखी आहे.

तळटीप: याखेरीज रात्रीची झोप ही हवीच हं..

जीवनमानविचारलेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

26 Aug 2019 - 7:32 pm | पद्मावति

मस्तं खुसखुशीत लिहिलंय :)
दुपारची अर्धा तास का होईना झोप घ्यायलाच पाहिजे. अगदी अलार्म लावून झोपावं पण पॉवर नॅप आवश्यक आहे. उर्वरित दिवस छान जातो मग.

गवि's picture

26 Aug 2019 - 8:10 pm | गवि

पॉवर नॅप आवश्यक आहे.

विरु सहस्त्रबुद्धे ?

घोरणं हा एकमेव श्वसनप्रकार चालू होता.

:)

ज्योति अळवणी's picture

26 Aug 2019 - 8:38 pm | ज्योति अळवणी

मस्त

खरंय. मलाही दुपारची झोप अति प्रिय आहे. पण दुर्दैवाने ती मिळतेच असं नाही

तसेच पॉवरनॅप बद्दलही सहमत. 30 मिनिटाच्या झोपेने मेंदू फ्रेश होउन पुन्हा तरतरीतपणे कामं करतो हे सिद्ध विज्ञानिक सत्य आहे. भारतातील खाजगी ऑफिसमधे अजून ही सोय व सवय उपलब्ध नाही, कारण तितका कामाचा ताण अस्तित्वात नाही असाच समज आहे.

-(दुपारी चुकूनही डुलकी काढल्यास रात्रभर जागा राहणारा) जॉनविक्क

जालिम लोशन's picture

26 Aug 2019 - 9:13 pm | जालिम लोशन

छान

हे विशेषण भन्नाट आहे. मेलो हसून. :)

पण अनेकदा १०-१५ मिनीटांच्या डुलकीनेही खूप फ्रेश वाटते हे खरे.

हर्मायनी's picture

27 Aug 2019 - 10:16 am | हर्मायनी

अगदी मनातले विचार.. दुपारची झोप म्हणजे अत्यंत प्रिय गोष्ट.. तुम्ही म्हटलात त्यानुसार अर्धा तासच योग्य..

प्रकाश घाटपांडे's picture

27 Aug 2019 - 10:28 am | प्रकाश घाटपांडे

प्रत्यक्ष झोपेपेक्षा जडत्वाचा आनंद काही औरच असतो. खुर्चीत बसल्या बसल्या डुलक्या काढणे, कधी कधी अशा अवस्थेत चक्क लाळही गळते. आजुबाजूला गप्पा चालत असताना अशा जडत्वात आपण काहीही विसंगत उत्तरेही देतो. कधी कधी या जडत्वात स्वप्न व वास्तव याचे एक विचित्र मिश्रण असलेला दृष्यपट डोळ्यासमोर तरळत असतो.कधी कधी आपण डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर ते जाम उघडत नाहीत.

झोप मग ती केव्हाचिही असो आवश्यकच असते.

प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्या प्रमाणे झोपेची गरज बदलत असावी. दिवसाचे आठ तास झोपले पाहिजे हा एक सर्वसामान्य नियम असावा. पण काहींना ६ तास झोप पुरत असेल तर काहिंना १० तासांची झोप आवश्यक असेल.

किरकीरे आणि असंतुष्त लोक उगाच दुसर्‍याच्या झोपण्यावर टिका टिपण्ण्या करत असतात. यांना झोप येत नाही हा जणू काही आमचाच दोश असल्या सारखे.

कंपनीत जाताना आणि येताना दोन्ही वेळा मी बस मधे भरपूर झोपून घेतो. बस लेट झाली म्हणून आनंद होणारा मी कंपनीतला एकमेव प्राणी आहे. बाकीचे लोक जेव्हा पुण्याच्या ट्रॅफिकच्या नावाने बोटे मोडत, उसासे टाकत, चडफडत बसलेली असतात तेव्हा मी बस मधे निवांत झोपलेला असतो. स्टॉप आला की आपोआप जाग येते.

पण एकदा मात्र असे झाले नाही. त्या दिवशी मी कोल्हापुरला जायला एसटीत बसलो आणि क्षणात गाढ झोपलो. इतका की कोल्हापुर आल्यावर कंडक्टरला मला हलवून जागे करावे लागले. संपूर्ण प्रवास मी इतका गाढ झोपलो होतो की कधि सातारा आले आणि कधि कराड येउन गेले ते मला समजलेच नाही. पण अशी बेसावध झोप फार क्वचितच लागते.

दुपारी / दिवसा कितिही झोपलो तरी त्याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर कधिच होत नाही आणि रात्रभर जागा असलो तरी दुसर्‍या दिवशी संपूर्ण दिवस मी इतर दिवशी असतो तितकाच फ्रेश असतो.

(संधी मिळताच झोपणारा) पैजारबुवा,

Namokar's picture

27 Aug 2019 - 12:12 pm | Namokar

मस्तच लिहीलय

साबु's picture

27 Aug 2019 - 12:16 pm | साबु

मी कुठेही ,कशीही, सरळ, उभी ,आडवी, तिरकी झोपू शकते-> नशीबवान आहात..

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2019 - 1:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

जीवाभावाच्या विषयावरचा खुसखुशीत लेख !

कसली वजनवाढ नि कसली मंद बुद्धी.. !!

+१,००,००० उर्फ लाखाची गोष्ट. दुपारची झोप न येणार्‍या आणि/किंवा न घेऊ शकणार्‍या मंडळींनी पसरवलेली अंधश्रद्धा आहे ती !

रात्रीची आणि दुपारची, दोन्हीही झोपा नियमितपणे घेऊनही, कोणीही माझ्यावर वरील आरोप करू शकलेला नाही ! ;)

आदिजोशी's picture

27 Aug 2019 - 4:32 pm | आदिजोशी

अहाहा... शनिवार रविवार माझी सगळी कामं दुपारची झोप ह्याभोवती प्लॅन केलेली असतात. वाट्टेल ते झालं तरी मी दुपारची झोप काही सोडत नाही :)

लय भारी लिहिलंय जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या.
दुपारी ३.३० ते साधारण ४.०० या वेळेत माझ्या टेबलच्या आड एक जुनी गोधडी टाकून मस्त पडतो (झोप नाही लागत पण पाठीला आराम )
माझ्या भल्या मोठ्या टेबलच्या आड जुनाट गोधडी आणि छोटी उशी आणि त्यावर मी झोपलो असेल असे कुणाला स्वप्नात पण वाटणार नाही. ;)

सुबोध खरे's picture

27 Aug 2019 - 7:49 pm | सुबोध खरे

हायला
एकदम आमच्या हृदयाच्या जवळचा विषय आहे.
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप हे एकमेव सुख आहे जे संपूर्ण फुकट मिळतं.
दुसरी म्हणजे मला स्वतःला झोपायला फार आवडतं. यासाठी सकाळ दुपार असा भेदभाव मी करत नाही.
माझा मुलगा सुटीच्या दिवशी/ रविवारी सकाळी झोपलेला असतो तेंव्हा दुपारी १२ वाजता त्याला उठवायला सुद्धा मला फार त्रास होतो.
एक काळी मी किती झोपत असे याचे उदाहरण म्हणजे माझ्या भावाचे नवीन लग्न झालं होतं तेंव्हा मी लष्करातून १ महिना सुटी घेऊन आलो होतो रात्री १० ते दुपारी चार असा सलग झोपलो होतो. ( वाहिनी नवीन असल्याने तिने मला उठवण्याचा संकोच केला आणि आई सकाळीच शाळेत गेली होती (ती मुख्याध्यापिका होती) तिला परत येईपर्यंत दुपारचे चार वाजले होते. अर्थात रात्री परत १० वाजता मी परत झोपलो.
आता वयपरत्वे तेवढी झोप येत नाही परंतु रात्री निदान सात तास आणि दुपारी एक ते दोन तास असा मी झोपतोच. यास्तव मी दुपारी सुद्धा कोणत्याही रुग्णालयात किंवा दवाखान्यात जात नाही.
सुदैवाने लष्करात रुग्णालयाचे कामाचे तास साडे सात ते दीड असेच असल्याने मी रोजच दुपारी आनंदाने झोपत असे हिरानंदानी रुग्णालयात मी सोनोग्राफीच्या बेडवरच १५ ते २० मिनिटे दुपारी झोपत असे.
आणि आताही रोज दुपारी छान वातानुकूलन यंत्र लावून चादर/ गोधडी घेऊन झोपतोच.

चौकस२१२'s picture

30 Jan 2020 - 7:58 am | चौकस२१२

अर्ध्या तासात कशी बुवा आटपायची दुपारची झोप?
दुसरे असे डॉक्टर बाबू कि दुपारच्या झोपेवर जी टीका केली जाते ती वैद्यकीय दृष्ट्या योग्य आहे का?
यावर कै जयवंत दळवी यांची फार मार्मिक लिखाण आहे .. सकाळी दादर ला "ताजा बाजार" आणायला भटकायचं, दुपारचे घरचे मासे भात खायचे आणि ताणून दयायची पण त्यांची ती झोप बहुतेक पॉवर नॅप नसावी तर पॉवरफुल २-३ तास नॅप असावी !

पण हि दुपारची झोप वाईटच, लग्न झालेलले असताना प्रेयसी ठेवावी तशी ... चटक लागते ,.. आणि बराच काही
एकदा घरगुती कार्यक्रमानिमित्त बरेच वर्षांनी नात्व्वईक कोकणातील एक रम्य ठिकाणी घरी जमले होते बुलेट वरून मांड्या दुखत मी मुंबई पुणे सातारा वाई असा करत चिपळूण जवळ पोचलो .. २ दिवस मस्त गेले शहरातून कोकणात छोट्या गावी, बरेच वर्षांनी मस्त हवा + खाणे गप्पा ३र्य दिवशी दुपारी जेवून मस्त कौलारू घरात माडीवर डुलकी घेत होतो आणि अचानक जाग आली आणि लक्षात आल अरे आत्ता परत निघायला हवे उद्या काम मुंबईत ... ओह्ह्हो काय ती झोप... प्रेयसी च्या मिठीतुन / सहवासातून असे निघून जावे लागत होते जणू...

नाखु's picture

28 Aug 2019 - 9:00 am | नाखु

प्रतिसाद पाहता एकच म्हणावे लागेल की

राजास जी न मिळाली सौख्य ती मज मिळाली या "झोप"डीत माझ्या !!!!

दुपारी दोन तासांपेक्षा जास्त झोपले तर रात्रीच्या झोपेचे हमखास खोबरे होणारा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

फुटूवाला's picture

28 Aug 2019 - 9:44 am | फुटूवाला

फायदा झाला आहे. २५ वर्ष वय असताना माझं वजन ४५किलो होत फक्त. योगायोगाने जिथं कामाला लागलो तिथं दुपारी २-४ सुट्टी होती. दुपारच्या जेवणात सुक्या भाजीत चक्का दही खायला लागलो. फक्त वर्षभरात ६०किलोवर पोहोचलो.

आजी's picture

28 Aug 2019 - 1:33 pm | आजी

पद्मावति-बरोब्बर बोललात.

गवि- तुम्ही घेता की नाही पॉवर नँप?

इरामयी- short and meaningful.

ज्योती अळवणी.-का बरं?बिझी?

जॉनविक्क-असंही होतं कधीकधी!

जालिम लोशन-छान!

फार एन्ड- धन्यवाद, पण जपून बेतानं हसा. .

हर्मायनी-कर्रेक्ट!

प्रकाश घाटपांडे-खरंय.

ज्ञानोबाचे पैजार-मीही तुमच्याच वर्गातली!

नमोकार-थँक्यू

साबु- हाःहाः!

सुहास म्हात्रे-तर काय!

आदिजोशी-हाsss पठ्ठे!

उपेक्षित- उपेक्षित नव्हे, तुम्ही तर अपेक्षित बोललात

सुबोध खरे-द्या टाळी!

नाखु-अरेरे!

फुटूवाला-दुःख समजण्यासारखं. जपा हं.

रायनची आई's picture

29 Aug 2019 - 11:22 am | रायनची आई

जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या
मस्तच लिहीलय...Same majhya manatala lihilay tumhi : )

दीपा माने's picture

24 Dec 2019 - 9:08 am | दीपा माने

मेडिकल काॅलेजात असताना आमचे वरीष्ठ दहा मिनिटांची कॅट नॅप थकलेल्या मेंदुसाठी घ्यायला सांगायचे ज्यामुळे मेंदु फ्रेश होऊन तरतरीत वाटायचे त्याची आठवण आली.

नशीबवान आहात. मला दुपारची काय, रात्री सुद्धा प्रगाढ झोप येत नाही. हेच पहा ना, गेले दोन तास झाले, येहुदी मेनुहीन ते भीमसेनजी आणि पाचव्या सिंफनीपासून ते मालकंस, सगळं ऐकून झालंय. तरी मिपा चाळत बसलो आहे. आता तीनेक वाजेपर्यंत झोप लागेल, पण लगेच पाचला जाग येईल. गजर व्हायच्या आधीच मी जागा होतो आणि घड्याळाकडे बघत बसतो, गजर झाल्या-झाल्या बंद करायला म्हणून...! :-D

सुमेरिअन's picture

11 Jan 2020 - 1:19 am | सुमेरिअन

ज्या लोकांना पडल्या पडल्या झोप लागते - मनापासून हेवा वाटतो मला त्यांचा.. खरंच!
दुपारी मी सहसा झोपत नाही. ऑफिस मध्ये झोपणे शक्य पण नाही. पण ते ठीक आहे. दुपारी अशी काही विशेष झोप येत पण नाही मला. गाऱ्हाणं रात्रीच्या झोपेचं आहे. मला रात्री १-२ वाजेपर्यंत झोपच येत नाही. बेड वर पडून राहिलो तरी कूस बदलत राहतो, नाही तर छताकडे पाहत राहतो. TV लावला तर ३-४ वाजेपर्यंत पण झोप येत नाही.
ऑफिस च्या कामामुळे (ऑफशोर कॉल्स) सकाळी ७ -७.३० पर्यंत उठाव लागत. झोप झाली नसल्यामुळे दिवसभर मूड थोडा dull राहतो. जर सकाळी काही काम नसेल तर १० वाजेपर्यंत झोपून राहतो मी. वैतागलोय आता.
झोपेच्या गोळ्या घेऊन वेळेवर झोपलो आणि पूर्ण झोप घेऊन वेळेवर उठलो तर १००% प्रोडूक्टिव्हिटी वाढेल माझी. जीवन खूप सुकर होईल. पण या कारणासाठी मला कोणी झोपेच्या गोळ्या prescribe करेल असा वाटत नाही.
लहानपणापासून रात्री लवकर झोप न येण्याचा प्रॉब्लेम आहे मला. माझ्या कुटुंबामध्ये फक्त मला एकट्यालाच आहे. काही उपाय आहे का कोणाकडे?

सुमेरियन- मलाही अनेकदा रात्री झोप येत नाही. "मुझे नींद न आए"या लेखात मी ते लिहिलंय. पण ते वयपरत्वे होतं. मी जाग्रणही एन्जॉय करते. आश्चर्य म्हणजे जाग्रणाचा माझ्या कार्यक्षमतेवर काडीचाही परिणाम होत नाही. जप करण्यावर तुमचा विश्वास असेल तर करुन बघा. कधीकधी उपयोग होतो.
पॉझिटिव्ह स्वयंसूचना देत राहते मी जपातून. देवाचं नाव वगैरे घेत नाही. खूप सिरीयस नाही ना झालं उत्तर?

ज्या लोकांना अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागते
आणि
कमोडवर बसल्याबसल्या पोट साफ होते.

ते लोक खरे सुखी आहेत

बाकी सर्व मोह माया आहे.

सुदैवाने मी त्यापैकी एक आहे.

चाणक्य's picture

30 Jan 2020 - 1:56 am | चाणक्य

मी पण.
बाकी लेख नेहमीप्रमाणे खुसखुशीत एकदम.

कंजूस's picture

22 Jan 2020 - 8:02 pm | कंजूस

झोप वाटता येते का?

चांदणे संदीप's picture

4 Feb 2020 - 10:59 pm | चांदणे संदीप

झोपेवर फार वर्षांपूर्वी एक कविता लिहिलेली.

पऱ्यांच्या राज्यातले कोणी
पापण्यांवर लावी इवले रोप
येता बहरूनी गर्द विशाल
त्या वृक्षाला म्हणती "झोप!"

लेख त्यावरच्या सर्व प्रतिसादांसह आवडला.

सं - दी - प