अंगावर भयचकिताचा सरसरीत काटा येणे म्हणजे काय ते आज अक्षरश: अनुभवास आले. रोजच्या राजकारण आणि भक्तरुग्ण वादाची झिंग एका झटक्यात उतरली, आणि मन भानावर आलं. असं काही झालं, की आपोआप सहावे इंद्रिय जागे होते, आणि भविष्य जणू भेसूर होऊन वर्तमानाच्या रूपाने विक्राळपणे समोर येते. भविष्याचे भय भेडसावू लागते, आणि कितीही अश्रद्ध, नास्तिक असलो, तरीही, हे असे भविष्य कधीच आकारू नये यासाठी मन नकळत प्रार्थनाही करते...
तो, जो कोणी अज्ञात नियंता-निसर्ग आहे, तो ती प्रार्थना नक्की ऐकेल अशी आशा आपोआप बळावते अन् अंगावर उमटलेला शहार हळुहळू मिटू लागतो...
तरीही भविष्यभयाची चाहूल देणारे भयाण वर्तमान मनाचा कब्जा घेऊन बसलेलेच असते...
ठाण मांडून !!
भविष्यात पाण्यासाठी युद्धे भडकतील असा इशारा काही दशकांपूर्वी कधीतरी पहिल्यांदा कुणीतरी दिला, तेव्हा त्याची नक्कीच खिल्ली उडविली गेली असणार! कारण, या इशाऱ्यानंतरही पाण्याचे मोल जाणण्यात माणूस कमीच पडला. तो निसर्ग आपल्या ठरल्या वेळी भरभरून बरसणार आणि पाण्याच्या झोळ्या पुरेपूर भरूनच परतणार अशा वेडगळ समजुतीत आपण राहिलो.
आता त्याची फळे भोगण्याची वेळ आली आहे.
पाण्यासाठीच्या संघर्षाचे भविष्य उंबरठ्यावर उभे ठाकले आहे.
गेल्या चारसहा महिन्यांपासून भीषण पाणीसंघर्षाच्या शेकडो कथा आपण ऐकत, वाचत आलो.
या मालिकेतील आजच्या कथेने त्या सर्वांवर कडी केली, आणि ते भविष्य खरे ठरणार या भयाची जाणीव मनाचा थरकाप उडवून गेली!
मध्य प्रदेशातील एका जंगलात, पाणी न मिळाल्याने तहानेने तडफडणाऱ्या१५ माकडांचा उष्माघाताने मृत्यू झाला, ही ती भविष्यभयाची जाणीव करून देणारी बातमी... पण याचा गाभा आणखीनच भयाण आहे. हे मृत्यू केवळ तहानेने तडफडल्यामुळे झालेले नाहीत. पाण्यासाठीच्या संघर्षाचे हे पंधरा बळी आहेत. माकडांच्या दुसऱ्या टोळीने पाणवठ्यावर येण्यास मज्जाव केल्याने एका टोळीतील ही तहानलेली माकडे मरण पावली. या वेळी नक्कीच दोन टोळ्यांमध्ये संघर्ष झालाच असणार! या दुसऱ्या टोळीने आसपासच्या पाणवठ्यांवर आपला कब्जा प्रस्थापित केला होता.
पाण्यासाठीचा संघर्ष!! पाण्यावरच्या हक्काचा संघर्ष!!
बहुधा, ‘त्या’ भविष्यवाणीतील हे पहिले युद्ध असू शकते.
अन्य माकडांवर अशी वेळ येऊ नये म्हणून वन खात्याला आता जाग आली आहे. त्यांच्यासाठी पर्यायी जलस्रोत कुठून उभे करायचे यासाठी शोध सुरू झाला आहे.
मनाचा थरकाप उडविणारी, शहारा आणणारी भविष्यभयाची जाणीव ती हीच!
मध्य प्रदेशातील जंगलातले हे वास्तव माणसाला जागे करणार का, हा नवा प्रश्न त्या भयाच्या हातात हात घालून आता समोर थयथयाट करणार!!
ही बातमी वाचत असतानाच माझ्या बहीणीचा फोन आला.
कोकणातून. रत्नागिरीहून.
अजूनही रत्नागिरीत पावसाचे टिपूस पहायला मिळालेले नाही.
अंगणातली विहीर, कोरडीठाक पडलीय.
कोपऱ्यातल्या एका खड्ड्यात दिवसभरानंतर थेंबाथेंबाने साचणाऱ्या ओंजळभर पाण्यात विहिरीतले मासे तग धरण्यापुरती जिवाची शिकस्त करतायत.
ही विहीर बांधल्यावर मोठ्या हौसेने बहिणीने तीत काही मासे आणून सोडले. दिसामासागणिक वाढणारी आणि पाण्यात बागडणारी त्यांची पिलावळ न्याहाळताना तिच्या डोळ्यात आनंदाची कारंजी फुलायची, आणि ती ते फोनवर सांगताना आम्हाला ती जाणवायची...
आज त्याच माशांची केविलवाणी कहाणी ऐकवताना तिला फुटलेला हुंदका थेट मन चिरत घुसला...
त्या माशांना जगवण्यासाठी आता तिने चंग बांधलाय.
दर दिवसाआड, त्या विहिरीत चार बादल्या पाणी ओतायला तिने सुरुवात केली.
पहिल्या दिवशी तिने विहिरीत पाणी ओतले, तेव्हा ते मासे आनंदाने अक्षरश: उसळ्या मारत होते.
आज पाणी आटले आणि पुन्हा ते केविलवाणे झाले!
ज्या विहिरीतून पाणी काढले जायचे, त्याच विहिरीत वरून पाणी ओतायची वेळ आली!
हीदेखील त्या भयाची एक जाणीवच!
ती शोकाकुल माकडीण...
निसर्गाला नक्कीच पाझर फुटेल!
त्यासाठी, नास्तिकतेचा सारा ताठा बाजूला ठेवून विनम्र प्रार्थना!!
https://www.indiatoday.in/india/story/15-monkey-die-heat-stroke-water-sc...
प्रतिक्रिया
10 Jun 2019 - 12:02 pm | जॉनविक्क
स्वभावच आहे माणसाचा, कोणी चटकन जागे होईल अशी अपेक्षा न करणे...
11 Jun 2019 - 12:04 am | ज्योति अळवणी
बापरे!
वास्तव दर्शन...
11 Jun 2019 - 6:40 am | मदनबाण
जुना पाहिलेला व्हिडियो आठवला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi Aankhen | Sanam
11 Jun 2019 - 7:13 am | कंजूस
कोकणात उदा० रत्नागिरी जवळून जाणाऱ्या निवळी -हातखंबा रस्त्यालगत छोट्या टेकड्या आहेत. त्यांंमधल्या घळीत वस्त्या झाल्या कारण तिथल्या विहिरींना पाणी टिकते. आता वस्ती वाढतेय बाहेर वर. कोणी त्या टेकड्यांमध्ये छोटे बंधारे बांधून पाणी अडवायचा विचार केला नाही.
11 Jun 2019 - 10:38 am | उगा काहितरीच
पाणी ही अशी गोष्ट आहे ना की आहे तोपर्यंत त्याची किंमत वाटत नाही. पण जेव्हा नसते तेव्हाच किंमत कळते. फक्त पावसाळ्यातच घर बांधण्याची आठवण येणाऱ्या माकडासारखी आपली (यात थोड्याफार फरकाने तुम्ही, मी सर्वच आले) गत आहे.
11 Jun 2019 - 10:50 am | टर्मीनेटर
भयाण भविष्याची चाहूल!
निसर्गाला नक्कीच पाझर फुटेल! त्यासाठी विनम्र प्रार्थना _/\_
12 Jun 2019 - 3:36 am | सोन्या बागलाणकर
लेख आवडला पण खरं सांगू का ते शेवटचं प्रार्थना प्रकरण झेपलं नाही.
हे आपण तयार केलेले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं आपणच शोधायची आहेत.
निसर्गाला प्रार्थना वगैरे याला काहीच अर्थ नाही. आधी निसर्गावर अत्याचार करायचे आणि मग प्रार्थना करायची? हे म्हणजे एखाद्याला थोबाडीत ठेवून तो रागावला कि त्याची प्रार्थना करण्यासारखं आहे. आपल्याच हव्यासापायी आपण निसर्गाचं आणी पर्यायाने आपलंही नुकसान करून घेतोय हे कधी कळणार आपल्याला?
आता कदाचित एखादं आईस एजच हे सायकल रीसेट करू शकते कारण मानवजातीच्या तारतम्यबुध्दीवरून माझा विश्वास उडालाय.
12 Jun 2019 - 12:38 pm | Rajesh188
मुंबई मध्ये चर्चगेट चा भाग आणि ,मलबार हिल हे दोन ब्रिटिश कालीन भाग बघितले तर एक लक्षात येईल अतिशय दूरवरचा विचार करून त्यांनी नियोजन केले होते फक्त चर्चगेट chya आसपास अतिप्रचंड अशी 4/5 मोकळी मैदाने आहेत .
मलबार हिल ला हँगिंग गार्डन सारखे अतिशय सुंदर गार्डन आहे tyachya बाजूलाच पारशी लोकांची हजारो ऐकर मोकळी जागा आहे तीच जागा पारशी
समाजा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या ही समाजाकडे असती तरी टॉवर बांधून सिमेंट चे जंगल उभे केले असते .
निसर्गाचा योग्य मान ब्रिटिश सरकारने राखला आता सर्व शहरांची फक्त सिमेंट ची जंगल झाली आहेत .
आपण सर्वच निसर्गाची हानी
12 Jun 2019 - 12:48 pm | Rajesh188
आपण सर्वच निसर्गाची हानी करण्यात अग्रेसर आहोत .
आणि त्याची शिक्षा माणसाला मिळालीच पाहिजे फक्त वाईट ह्या गोष्टीचे वाटते आहे निरपराध प्राणी झाडे ह्यांना ह्याचा त्रास सहन करावा लागत आहेत .
पाण्यासाठी युद्ध होतील हे सुद्धा एक नीच swardhi वाक्य आहे .
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी पूर्व तयारी म्हणून ते मीडिया बोलत असते .
निसर्ग कसा वाचवला पाहिजे , जमिनीतील पाण्याची पातळी कशी वाढवली पाहिजे ,जंगल कसे निर्माण केले पाहिजे,पाण्याची नसाडीआणी प्रदूषण कसे थांबले पाहिजे हे सर्व विषय चर्चेत न आणता पाण्यासाठी युद्ध होतील असे वाक्य टाकून सर्वसामान्य लोकांचा पाण्यावरच हक्क कसा davalta येईल हाच दृष्ट विचार मीडिया चा त्या वाक्य पाठीमागे आहे .
अजुन वेळ गेली नाही .
12 Jun 2019 - 12:48 pm | Rajesh188
आपण सर्वच निसर्गाची हानी करण्यात अग्रेसर आहोत .
आणि त्याची शिक्षा माणसाला मिळालीच पाहिजे फक्त वाईट ह्या गोष्टीचे वाटते आहे निरपराध प्राणी झाडे ह्यांना ह्याचा त्रास सहन करावा लागत आहेत .
पाण्यासाठी युद्ध होतील हे सुद्धा एक नीच swardhi वाक्य आहे .
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी पूर्व तयारी म्हणून ते मीडिया बोलत असते .
निसर्ग कसा वाचवला पाहिजे , जमिनीतील पाण्याची पातळी कशी वाढवली पाहिजे ,जंगल कसे निर्माण केले पाहिजे,पाण्याची नसाडीआणी प्रदूषण कसे थांबले पाहिजे हे सर्व विषय चर्चेत न आणता पाण्यासाठी युद्ध होतील असे वाक्य टाकून सर्वसामान्य लोकांचा पाण्यावरच हक्क कसा davalta येईल हाच दृष्ट विचार मीडिया चा त्या वाक्य पाठीमागे आहे .
अजुन वेळ गेली नाही .
12 Jun 2019 - 3:35 pm | Rajesh188
माणूस अजुन सुद्धा सुधारला तर वाचेल .
दुसऱ्या प्लॅनेट वर जावून राहू ही एक जाहिरात आहे .
ते कधीच शक्य नाही .
मनुष्य नष्ट झाला तरी पृथ्वी नष्ट होणार नाही .
आणि मनुष्य नष्ट होण्याचे दुःख करण्याची गरज नाही ती कर्माची फळे आहेत
12 Jun 2019 - 6:34 pm | nanaba
पावसा साठीच्या मंत्राची हाक वाचली.
इन्टेंशन्स फारच चांगले आहेत. मंत्राने पाऊस पडू ही शकेल.. मला त्याबद्दल काहीच म्हणायचे नाहिये.
पण आपल्या देशात दर वर्षी पाऊस पडूनही (अगदी भरपूर पाऊस पडला तरीही) तरीही आपण ह्याच परिस्थितीत असतो असे नाही का वाटत?
कुबेरालाही भीकेला लावू शकू अशा आपल्या सवयी आहेत.. नुसता पाऊस पडून काय होणार? त्यापेक्षा सवयी बदलता येतील का?
आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना पाणी मिळत रहावे ह्यासाठी खालील गोष्टी करू शकतो का?:
१. आपल्या जीवनदायिनी नद्यांची अवस्था बघा. ती आपल्या घरातून गेलेल्या साबण, पेस्ट, फिनेल, टॉयलेट क्लीनर ह्या रसायनांमुळे आहे. ह्याला पर्याय उपलब्ध आहेत, आपण ते निवडाल का?
२. घरातला ओला कचरा, कोर डा कचरा वेगळा करता का? शक्य असल्यास आप ल्याच सोसायटीमधे, घरी ओला कचरा कम्पोस्ट करू शकता का? घरातले प्लॅस्टिक वेगळे काढून रि सायकलिंगला देता का? निर्माल्य पाण्यात सोडणे बंद केले आहे का? दर वर्षी भावनांच्या नावाखाली नवीन गणपती आणणे बंद करू शकता का (रियुज करु शकता का?). ह्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत सजग राहू शकता का?
३. आपण गरज नसताना अजून एक घर शहरात घेतो, तेव्हा ते घर बांधण्यासाठी अनेकदा टेकडी तोडलेली, झाडे तोडलेली असू शकतात. डोंगर, टेकडी आणि झाडं ह्यांचं पाण्याची पातळी वाढवणं, ओढे - नद्यांचं पाणी वाढवणं ह्यासाठीचं मह्त्त्त्व अनन्यसाधारण आहे.
ह्याशिवाय बिल्डिंग बांधताना कुठल्यातरी झर्याचा स्त्रोत पाणी बाहेर टाकून रिकामा केलेला असतो. आजपर्यंत झालं ते झालं, ह्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेणं आपण बंद कराल का?
४. ह्याशिवाय कुठल्यातरी जंगलात, तळ्याकाठी सेकंड होम घेता तेव्हा त्याचे प्रदुषण तर होतेच आणि त्याशिवाय त्याला जिथून पाणी मिळते त्या टेकड्या, तिथली झाडं (जी पाणी मुरवायला मदत करतात) त्यांचीही वाट लागते. सेकंड होम च्या सं दर्भात ह्या बाबीचा विचार कराल का?
तुम्हाला निसर्ग हवा , आवडतो म्हणून त्यावर बलात्कार करणं बरोबर वाटतं का? (ह्यावर खूप मोठी पोस्ट होईल, पण ती पाण्यासंदर्भात नाही, म्हणून लिहित नाही)
५. शेतकरी असाल तर शेतात पाणी सोडून ठेवणे, सोपे पडते म्हणून ऊसासारखीच पीके घेणे , भरमसाठे किटकनाशके आणि खते वापरणे बंद कराल का?
६. केवळ विहिरीला भरपूर पाणी आहे किंवा २४ तास पाणी येतय म्हणू न हवे तसे पाणी वापरणे बंद कराल का?
७. वर दिलेल्या सर्व गो ष्टींचा विचार फक्त उन्हाळ्यात न करता, उद्या उन्हाळा येणार आहे हे लक्षात ठेवून आजच पावसाळा हिवाळा असला तरीही ही सवय म्हणून अंगिकाराल का?
७. प्रशासनावर पाण्याचं योग्य व्यवस्थापन व्हावं, सांडपाण्याचं योग्य रिसायकलिंग व्हावं म्हणून दबाव आ णाल का? किंवा जे गृप असं काम करताहेत, त्यांना जॉईन कराल का? शेवटी तुम्ही मतदाता आहात, जर बहुसंख्यांना नदीकिनारी फक्त कॉन्क्रिटीकरण हवे असेल किंवा काहीच देणं घेणं नसेल तर शासनही तेच देईल, पण ह्या उलट स्वच्छ नदीची मागणी बहुसंख्यांकडून झाली तर ते मिळण्याची शक्यता वाढेल.
८. धुळ्याजवळच्या लामकानी नामक गावात अत्यंत कमी पाऊस पडूनही चर खणून, चराई आणि कुर्हाड बंदी आणून - पाण्याची पातळी वाढवणे, दुष्काळावर मात करणं शक्य होत असेल तर भरपूर पाऊस पडणा र्या ठिकाणच्या लोकांनी रडणं , दैवाला दोष देणं योग्य आहे का?
८. तंत्रज्ञान आणि शास्त्र ह्याचा वापर आयुष्य सोपं करण्याकरता होतोय हे उत्तम आहे, पण आपल्या जगण्यात शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून जलचक्र सजावून घ्याल आणि निसर्गाचा आणि आपला संबंध समजावून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात सजगता आणाल का?
नाहीतर कितीही पाऊस पडला तरी आं धळं दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था होऊन उपाशी (खरतर तहानलेले) रहाण्याची अवस्था येईल आणि येत राहिल.
~ शिरीष
12 Jun 2019 - 6:59 pm | Rajesh188
जो पर्यंत झटका मिळत नाही .आणि पाणी दुर्मिळ होत नाही तोपर्यंत माणसा कडून निसर्ग वाचवण्याची कोणतीच कृती होणार नाही.
हजमोला घेतला की अन्न पचत म्हणून भरमसाठ खाणारे महाभाग ह्या समाजात आहेत .
ते सरळ मार्गी सुधारणार नाहीत
12 Jun 2019 - 7:11 pm | Rajesh188
जो पर्यंत झटका मिळत नाही .आणि पाणी दुर्मिळ होत नाही तोपर्यंत माणसा कडून निसर्ग वाचवण्याची कोणतीच कृती होणार नाही.
हजमोला घेतला की अन्न पचत म्हणून भरमसाठ खाणारे महाभाग ह्या समाजात आहेत .
ते सरळ मार्गी सुधारणार नाहीत
12 Jun 2019 - 7:57 pm | डँबिस००७
पाण्यासाठीच्या संघर्षाचे भविष्य उंबरठ्यावर उभे ठाकले आहे.
महाराष्ट्रा बद्द्ल बोलायचे झाले तर " पाण्यासाठीच्या संघर्षाचे भविष्य उंबरठ्यावर उभे ठाकले आहे " असे न म्हणता उभे ठाकले ले होते , असे म्हणावे लागेल.
गेले कित्येक दशक आवर्षणाचा मार झेलत विदर्भ, मराठवाड्याचा प्रवास चाललेला होता. दर उन्हाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा चाललेला होता. उन्हाळ्यातील पाण्याची समस्या ही लोकांची समस्या नव्हती ती होती सरकारची समस्या. पाणी नसल्याने महाराष्ट्रातल्या ह्या भागातील कित्येक गाव उजाड झालेली ! काम करता येणारे लोक, कुटूंबे गाव सोडुन दुर प्रदेशात जिवन जगण्यासाठी सोडुन गेलेले असा नजारा होता. अश्या उजाड गावात अशीही घरे होती जिथे फक्त म्हातारे च बाकी उरलेले, अश्या उजाड गावात पाणी दुर हुन , किंवा टँकरने पोहोचेल तेंव्हाच ! त्या म्हातार्यांना दोन वेळच्या खाण्याची सुद्धा मारामार, लागणारे पाणी तर दुरच.
अश्या गावाने पाण्यासाठ (पाण्याच्या स्वावलंबनासाठी) स्व:ता काहीतरी करणे गरजेचे होते. सरकार तरी किती व कुठे पर्यंत मदतीला येणार ह्या अश्या गावाच्या ? पाण्याची समस्या का उभी राहीली त्याचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की पावसाच्या पाण्याचे नियोजन नाही, पावसाचे पडलेले पाणी नदी नाल्या मार्फत वाहुन जाते. तर फुकटच्या विजेवर बोअर वेल मधुन हवे तितके पाणी उपसा कोण विचारतोय. तसेही रासायनीक खते दिलेल्या शेताला पाण्याची मात्रा सुद्धा जास्तच लागत.
पाण्याच्या स्वावलंबनाचा उपाय : पावसाच्या पाण्याचे नियोजन , कंझर्वेशन ऑफ रेन वॉटर , ग्राऊड वॉटर रिचार्जींग अश्या दोन मेथडनी गावातल्या लोकांनी स्व:ताच आपल्या गावातील पाण्याचे नियोजन सुरु केल पाहीजे ! नेमके हेच सुरु केले आहे "पाणी फांऊडेशन " ने. प्रत्येक गाव पाणीदार बनवायचा वीडा "पाणी फांऊडेशन " ने उचललेला आहे.
गावातले लोक एकत्र येऊन श्रमदान करुन, आपल गाव " टँकर मुक्त गाव " "पाणीदार" बनवायचा प्रयत्न करत आहे. "पाणी फांऊडेशन " दर वर्षी "वॉटर कप " स्पर्धा घेत आणी त्यात १० लाखाच ईनाम ठेवलेले आहे. हे ईनाम आपल गाव पाणी दार बनवण्यासाठी ठेवलेले आहे. ह्या स्पर्धेचे रुल्स आहेत. २०१९ हे ह्या स्पर्धेचे ३ रे किंवा ४ थे वर्ष आहे. ह्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातली कित्येक गाव पाणीदार बनलेली आहे. उजाड गाव, शेत जमीनी आता कसण्या योग्य झालेल्या आहेत.
कंझर्वेशन ऑफ रेन वॉटर , ग्राऊड वॉटर रिचार्जींग केल्याने आटलेल्या विहीरी, तलाव बोअर वेल्स पुन्हा तुडुंब भरुन वाहु लागलेले आहेत.
काही नद्या ज्या नाहीश्या झालेल्या होत्या त्या परत जिवंत झाल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=09PGpYZlhrw
https://www.youtube.com/watch?v=OTSGF1KQ1UQ
https://www.youtube.com/watch?v=ZaFEIwWhVgA
लोकांनी एकत्र येऊन सहकार्याने श्रमदानाने कंझर्वेशन ऑफ रेन वॉटर , ग्राऊड वॉटर रिचार्जींग चे काम केले तर,
निसर्गाला नक्कीच पाझर फुटेल!
14 Jun 2019 - 6:05 pm | स्वधर्म
उपाय म्हणजे, जे करत अाहोत ते तसेच सुरू ठेऊन, फक्त हानीकारक परिणाम कमी होण्यासाठी काहीतरी करणे. हे जे मानव, सरकारे अाणि राजकारणी करत अाहेत, त्याला ‘विकास’ असे म्हणतात. लोकांना विकासाची स्वप्ने दाखवली जातात, ती दाखवणार्यांना मते दिली जातात अाणि निसर्गाची न भरून येणारी हानी होत राहते. मी चीनकडे मोठ्या अाशेने पहात होतो. कधी ना कधी तरी सार्या मानवजातीला धडा मिळेल, असा महाभयानक विध्वंस तेथे होईल म्हणून. पण कसचे काय! शांघाय मध्ये मास्क लावूनच बाहेर पडावे लागते इतकी हवा खराब झाली अाहे, हायवे वर अनेक आठवड्यांचा वाहतूक खोळांबा होतो, वाहनांमध्ये दुकाने चालू होतात, पण त्यातून चिनी माणूस निसर्गाची हानी करू नये, ही गोष्ट शिकू शकला नाही. अापण काय वेगळे अाहोत? त्यामुळे माणसाच्या मूर्खपणाला अजिबात कमी लेखून चालणार नाही. त्याच्यात खूप खूप मूर्ख बनण्याची क्षमता अाहे. अापण अापल्यापुरते उपाय करण्याने फार काही साध्य होईल असे वाटत नाही. समजा तुंम्ही पुण्याहून मुंबईला जायच्या उद्देशाने गाडीत बसलात. थोड्या वेळाने लक्षात अाले की ही गाडी पुण्याहून कोल्हापूरला जाणारी अाहे. तर अापली चूक दुरूस्त करण्यासाठी तुंम्ही गाडीच्या उलट दिशेने म्हणजे गार्डाच्या डब्याकडे गाडीतच चालत गेलात तर, काहीतरी केल्याचे समाधान मिळेल, पण त्याचा उपयोग नाही. बुलेट ट्रेन, तेल शुध्दीकरण प्रकल्प, मोठ्या गाड्या, रूंद रस्ते, रासायनिक शेती व उत्पादन वाढ, स.रा.ऊ. मधील व सेन्सेक्समधील वाढ, अशा रूपातील विकासाच्या गाडीतून उतरल्याशिवाय इतर सर्व गोष्टी संपूर्णपणे भ्रामक उपाय होत. हे सगळं कागद वाचवण्यासाठी, एटीएम मशीनमधून पावती छापू नका, अशा प्रकारचा मूर्ख पर्यावरण-स्नेह अाहे. अरे अाधी त्या मशीनला २४X७ वीज वापरायची, दिवे, एसी लावायचा, गोळ्या बंदूक तयार करायची, ती घेऊन सुरक्षा रक्षक एका कंटाळवाण्या कामावर नुसता बसवून ठेवायचा, अाणि लोकांना सांगायचं की पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी पावती छापू नका!
14 Jun 2019 - 6:50 pm | Rajesh188
विज्ञान प्रगत झाले माणसाला निसर्ग चक्र समजले,आरोग्य विषयी समस्या आणि त्या वरचे उपाय समजले ,
आरोग्य वर दुष्परिणाम करणारे घटक समजले .
इतके सर्व प्लस पण पॉइंट असताना सुद्धा माणसाने ह्या वसुंधरेला मजबूर केले आहे मानवा चा विनाश करण्यासाठी .
निसर्गाचे हे वाया गेलेले शेंडफळ जास्त दिवस पृथ्वी वर राहण्याच्या लायकीच नाही ह्याच्या वर शिक्कामोर्तब निसर्गाने केले आहे .
विज्ञान चा वापर करून ह्या वसुंधरेच वातावरण अजुन आलाहदायक करता आले असते.
विज्ञान चा वापर करून ह्या वसुंधरे च्या पोटात मुबलक पाणी साठवता आले असत .
विज्ञान चा वापर करून सर्व आरोग्यास घातक अशा घटकांचा विनाश करता आला असता .
विज्ञान चा वापर करून मानवी शरीर 150 वर्ष निरोगी राहिले असते .
पण माणसाने काय केले पैसा हा कागद आहे तो फक्त एक माध्यम म्हणून वापरला पाहिजे होता पण त्याला भरमसाठ महत्व देवून त्याचे महत्त्व विनाकारण वाढवले.
प्रवास करण्यासाठी वाहन तयार करणारा माणूस खोट्या प्रतिष्टा संभाळण्या साठी वाहन तयार करू लागला .
माणसाच्या मूळ गरजेचं महत्व कमी होवून ऐशो आराम (भासमय) करण्यासाठी निसर्ग वर बलात्कार करू लागला पण आपण हत्तीचा बलात्कार करतोय हे विसरला हत्ती शांत उभा असल्या मुळे खोटी ताकत माणूस दाखवू लागला पण तो हत्ती आता खवळला आहे तो माणसाला पायाखाली घेणारच