संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर... भाग -२

वाटाड्या...'s picture
वाटाड्या... in जनातलं, मनातलं
6 Nov 2008 - 2:39 am

१९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोबत झालं. इंदिरादेवी, शेठ प्रल्हादजी दलसुखराम ह्या धनवान शेठजींच्या कन्या. १९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु. अशी घसघशीत दरबार गायकाची नोकरीसुद्धा देऊ केली. पण ओंकारनाथजींना घरी परतण्याचे वेध लागलेले. कधी एकदा घरी आईच्या पायावर सगळी संपत्ती घालतो असं त्यांना झालेलं. त्यांच ते कित्येक वर्षे जपलेलं स्वप्न होतं. म्हणुन त्यांनी ती नोकरी धुडकावून लावली.
ह्याच सुमारास ओंकारनाथजींना विविध शास्त्रांचा अभ्यास करण्याचा छंद लागला. शिवाय ते एक सच्चे देशभक्तही होते. ओंकारनाथजींनी भडोच काँग्रेस कमिटी व गुजरात काँग्रेस कमिटी वरही काम केले. दैवाचे आभार मानावे तितके थोडेच की ते तिथे अडकले नाहीत. १९३० साली ओंकारनाथजींना परत नेपाळ दौरा घडला. ह्या वेळेस त्यांनी सगळी संपत्ती गुरु पलुस्करांच्या पायावर अर्पण केली. पलुस्करांचा आनंद गगनात मावेना. ह्यानंतर ओंकारनाथजींचे हैद्राबाद, म्हैसुर व बंगालचे दौरे झाले. हैद्राबादमधे त्यांनी मालकंस रागात अशी काही मैफल जमवली की स्वतः गुरुने पं. पलुस्करांनी त्यांना भर बैठ्कीत मिठी मारली व आपल्या आसवांचा आशीर्वाद दिला.
आपल्या पुर्व आयुष्यात ओंकारनाथजींनी जैन मंदिरासाठी काम करत असताना जैन भाषा अवगत करुन घेतली. ह्याशिवाय त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू व नेपाळी भाषांवर प्रभुत्व होतं.
१९३२ साली पं. पलुस्करांचा मृत्यु झाला. त्यानंतर २ वर्षे ओंकारनाथजी दु:खात होते. १९३३ साली जागतिक संगीत संमेलनाचे त्यांना निमंत्रण मिळाले म्हणुन ते इटलीला फ्लॉरेन्समधे गेले. इटलीची त्यांची एक कथा खुप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरळ जाऊन मुसोलिनीच्या व्यक्तिगत सचिवास मुसोलिनीला फक्त ५ मिनीटे गाणं ऐकवण्याची गळ घातली. केवढं ते धैर्य. पण फक्त ५ मिनीटांच्या बोलीवर तो तयार झाला. तशी मुसोलिनीसाठी त्यांनी 'तोडी' गायला. ५ मिनीटांनी ओंकारनाथजी थांबले. तर मुसोलिनीने त्यांना खुणेनेच गात राहायला सांगितले. अर्ध्यातासाने शेवटी सचिवाने गाणं थांबावायची सुचना केली. जाताना मुसोलिनी डोळे पुसत एवढच म्हणाला की ' हे संगीत मी पुन्हा ऐकणार नाही. माझं हृदय असं विरघळलेलं चालणार नाही. मी हुकुमशहा आहे. मला कठोरच रहायला हवं. पुन्हा हे संगीत मला ऐकवू नकोस. तुझी बिदागी सन्मानपुर्वक घे. तुझं संगीत चालू राहु दे पण इथे नाही तुझ्या देशात..'. मंडळी, अशी जादु आहे आपल्या भारतीय अभिजात संगीताची आणि ओंकारनाथजींच्या आवाजाची होती. नंतर ओंकारनाथजींनी संपुर्ण युरोप दौरा केला. त्यांनी शेख अमानुल्ला ह्या अफगाणिस्तानमधल्या राजासमोरही गायन केलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडनमध्ये असताना किंग जॉर्ज (पाच) ह्याच्यासामोर गायला परवानगी मिळावी म्हणुन प्रार्थना कर असं तेव्हा ओंकारनाथजींनी स्वाभिमान ठेऊन ते साफ धुडकावून लावली.
ओंकारनाथजी रशियाकडे जात असताना आपल्या लाड्क्या पत्नीचं बाळंतपणात मृत्यु झाल्याचं कळलं. त्यांना हा जबरदस्त आघात होता. इतका की त्यांनी दौरा अर्धवट सोडलाच पण त्यांना अल्पकाळासाठी स्मृतीभ्रंश झाल्यासारखं झालं. ओंकारनाथजींच्या बोलण्यात नेहेमीच आपल्या एकनिष्ठ, प्रेमळ व वात्सल्यपुर्ण पत्नीबद्दल आदरभाव असे. ते म्हणत की इंदिराजींशिवाय त्यांना इथपर्यंत पोहोचताच आलं नसतं. कलकत्याच्या मोठ्या संगीत सभेत रसिकांनी एकदा त्यांना 'निलांबरी' राग गाण्याची फर्माइश केल्यावर विनयपुर्वक नाही असे सांगितल्यावर कारण काय तर ते म्हणाले की 'इंदिराजींचा हा आवडता राग. जर गायला बसलो तर इंदिराजींच्या आठवणीने गाता येणार नाही.' केवढं हे निस्सीम प्रेम. परत लग्न कर अशी आईने गळ घातली तरी त्यांनी परत लग्न केलं नाही व उत्तरादाखल ते म्हणाले की 'माझ्या रामाच्या वचनाप्रमाणेच मीही एकपत्नीव्रत राहणार'. केवढी ही निष्ठा...
पत्नीच्या मृत्युनंतर जरी ओंकारनाथजींच गाणं सुरु राहिलं तरी त्यात एक प्रकारची करूण छटा असे. पंडितजींनी ह्यानंतर कटु आठवणींमुळे भडोच सोडलं व मुंबईमधे 'संगीत निकेतन' चालु केलं. पं मदनमोहन मालवीय ह्यांची एक इच्छा होती की बनारस हिंदु विश्वविद्यालयात त्यांना पंडितजींच्या देखरेखीखाली संगीत विभाग चालु करायचा होता. पण पं. मालवियांचा मृत्यु झाला. नंतर हे काम पं. गोविंद मालविय यांनी पुरे केलं. तेव्हा ओंकारनाथजींनी (पंडितजींनी) 'डिन' म्हणुन अतिशय चोख काम पार पाडलं. त्यांनी बरेच शिष्य तयार केले जसे डॉ. प्रेमलता शर्मा, यशवंत राय पुरोहीत, बलवंत राय भट, डॉ. राजम, राजबाबू सोनटक्के, फिरोझ दस्तुर, अतुल देसाई, पि. न. बर्वे असे कितीतरी. त्यातील डॉ. राजम ह्या त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत व्हायोलीन साथीदार होत्या. ज्या ज्या वेळेस डॉ.राजम ह्यांना गुरुची आठवण येत असे त्या त्या वेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. त्यांच्या बोलण्यात नेहेमीच गुरुची भक्ती, त्यांचा प्रेमळ स्वभाव, कडक शिस्त येत असे.
पंडितजींना जे जे पुरस्कार मिळाले त्यात

१९५५ साली 'पद्मश्री',

'संगीत प्रभाकर' , - पं मदनमोहन मालवीय,

'संगीत मार्तंड' - कलकत्ता संस्कृत महाविद्यालय - १९४०,

'संगीत महामहोदय' - नेपाळ नरेश - १९४० हे विशेष नमूद करण्यासारखे.

१९५४ साली ओंकारनाथजींना पहिला हृदयविकाराचा पहिला झटका बसला. १९६५ साली त्यांना अर्धांगवायुचा (पॅरॅलिसीस) झटका बसला. त्यानंतर ते फक्त ३ वर्षे होते. तोपर्यंत त्यांचे बंधु, आई, बहिण सगळेच गेलेले त्यामुळे ओंकारनाथजींजवळ कुणीच नसे.

डॉ. राजम लिहीतात की गुरुंकडे ह्या काळात बघवत नसे. ६५ वर्षी गुरु स्वतः घर साफ करत असत. एकदा पुर्णपणे अंथरुणाला खिळल्यानंतर खुपच कमी शिष्यांना त्यांची सेवा करता आली. बलवंत राय भट हे त्यांच्यासोबत शेवटपर्यंत (२९ ऑक्टो. १९६७) होते.

अश्या ह्या प्रखर, प्रेमळ, सात्त्विक, शिस्तप्रिय व संगीत मेरुमणीला शतशः प्रणाम !!!!
=======================================================================
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.

छायाचित्र : जालावरून साभार. ओंकारनाथजींच्या काही चिजा इथे ऐकता येतील.

संगीतमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 8:53 am | विसोबा खेचर

ओंकारनाथ ठाकूरांचं मी जे काही गाणं ऐकलं आहे ते सर्व ध्वनिफितींच्या माध्यमातूनच ऐकलं आहे.

मला त्यांचं गाणं मुळीच आवडलं नाही, मला त्यांच्या गाण्यात काहीही राम दिसला नाही हे माझं व्यक्तिगत मत मी
इथे नोंदवू इच्छितो...

तात्या.

घाटावरचे भट's picture

6 Nov 2008 - 6:37 pm | घाटावरचे भट

क्षणात मंद्रात तर क्षणात तार सप्तकात चालणारं ओंकारनाथांचं गाणं कळायला जड गेलं, पण नंतर त्यांच्या शैलीमधील थोडे कानेकोपरे कळल्यावर ते पटलं. पण तरीही विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, कृष्णराव शंकर पंडित वगैरे (जेवढे ऐकले त्यावरून) मला जास्त जवळचे. अर्थात ओंकारनाथांचा आवाज अत्यंत गोड आणि मुलायम होता हे कोणीही मान्य करेल.

प्रमोद देव's picture

6 Nov 2008 - 10:38 am | प्रमोद देव

मुकुल लेख आवडला. ओंकारनाथांबद्दलची वैयक्तिक माहीती आजवर मला माहीत नव्हती. ती ही तुमच्या लेखाने मिळाली.
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

संगीत आवडायला लागल्यापासून ज्यांच्या गायनाने माझ्यावर सर्वात पहिली मोहिनी घातली त्यातले एक म्हणजे पंडित ओंकारनाथ ठाकूर हे होत.
त्यांचा धीरगंभीर आवाज,विद्युल्लतेसारख्या चपळ ताना आणि आवाजात असलेली विलक्षण आर्तता(जोगी मत जा....एकदा ऐकून पाहा) ह्याचा इतका विलक्षण पगडा माझ्यावर बसला की आपल्याला असं गाणं यायला हवं असे मनात नेहमी यायचे.
सर्वात आधी पंडित ओंकारनाथ ठाकूर,त्यानंतर भारतरत्न , स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे माझे गाण्यातले आदर्श आहेत.
ओंकारनाथांसारखी एक तान जरी गळ्यातून काढता आली तरी मी हा जन्म सार्थकी लागला असे मानेन.

अवांतरः बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे पंडीत ओंकारनाथांचे ध्वनिमुद्रित गाणे ऐकवण्याचा एक कार्यक्रम पंडीत सुहास व्यास ह्यांनी सादर केलेला होता. गाणे ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहात होते. गायन संपल्यावर श्रोत्यांना त्यावर आपले जाहीर मतप्रदर्शन करण्यासाठी थोडा वेळ दिला गेला होता. त्यावेळी संगीताचे एक समीक्षक उठून उभे राहिले आणि त्यांनी "ओंकारनाथ हे मुळी गायकच नव्हेत! नुसती तानांची आतषबाजी करणे म्हणजे गाणं नव्हे !" वगैरे वगैरे अकलेचे तारे त्यांनी तोडलेले होते. त्यांना आपल्या समर्थ शब्दात पंडीत सुहास व्यास ह्यांनी उत्तर दिलेच; पण शेवटी मी माझे मनोगत व्यक्त करताना जे बोललो ते सांगतो.
मी म्हणालो, " असे स्वर्गीय गाणे ऐकवल्याबद्दल संयोजकांचे मी हार्दिक आभार मानतो. गाण्यातलं काहीही न कळणारा मी एक श्रोता आहे.इथल्या विद्वतजनांच्यात काही अधिकारवाणीने बोलण्याइतपत संगीताचे ज्ञान मला नाही. सामान्य श्रोत्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी इथे मतप्रदर्शन करायला उभा आहे. पुलंच्या रावसाहेबासारख्या, ज्याला राग कळत नाहीत पण एखाद्या रागाचा काष्टा सुटल्याचे किंवा रागिणीचा पदर ढळल्याचे चटकन कळते, अशा माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला जो गायक सतत तीन तास आपली तहान भूक विसरायला लावतो त्याच्या गाण्याबद्दल अधिक काही सांगावे असे मला वाटत नाही. जाता जाता त्या समीक्षकांना पुलंच्या भाषेत एकच सांगतो की 'ओंकारनाथांसारखी एक तान घेऊन दाखवा,मुळव्याध होते की नाही ते पाहा.'

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 11:00 am | विसोबा खेचर

नुसती तानांची आतषबाजी करणे म्हणजे गाणं नव्हे !" वगैरे वगैरे अकलेचे तारे त्यांनी तोडलेले होते.

"नुसती तानांची आतषबाजी करणे म्हणजे गाणं नव्हे !" ही गोष्ट खरीच आहे. यात अकलेचे तारे तोडण्याचा प्रश्नच येत नाही!

त्यांना आपल्या समर्थ शब्दात पंडीत सुहास व्यास ह्यांनी उत्तर दिलेच;

सबंध हयातभर बापूरावांची भ्रष्ट नक्कल करणारा सुहास व्यास "पंडित" केव्हा झाला? :)

जाता जाता त्या समीक्षकांना पुलंच्या भाषेत एकच सांगतो की 'ओंकारनाथांसारखी एक तान घेऊन दाखवा,मुळव्याध होते की नाही ते पाहा.

प्रमोदकाका, "गाण्यातलं काहीही न कळणारा मी एक श्रोता आहे.इथल्या विद्वतजनांच्यात काही अधिकारवाणीने बोलण्याइतपत संगीताचे ज्ञान मला नाही."

असं तुम्हीच म्हटलेलं आहे,

अर्थात, गाण्यात काहीही कळत नसलं तरी प्रत्येकाची आवडनिवड असते आणि त्यानुसार एखाद्याचं गाणं आपल्याला आवडू शकतं! आणि त्याबाबत कुणाचीच हरकत असण्याचं काही कारण नाही.

"गाणं कळत नाही, परंतु आवडतं..!" वाल्या मंडळींचा काहीच प्रश्न नाही,

परंतु,

"गाणं कळतं व म्हणून ते आवडत नाही किंवा आवडतं..!" वाल्या मंडळींना,

"ओंकारनाथांच्या रागदारीत आपल्याला नक्की काय कंटेन्ट दिसला हे कळेल का?"

असा प्रश्न विचारयला मला निश्चितच आवडले असते! :)

आपला,
(बडेगुलाम, अमिरखा, केसरबाई, बापूराव, गजाननबुवा, भीमण्णा, किशोरी इत्यादी दिग्गजांचं गाणं ऐकून समृद्ध झालेला!) तात्या.

तात्या,अरे नेमकं काही सांगता येत नाही हीच तर खरी गोची आहे माझ्यासारख्यांची. पण ते गाणं नक्कीच प्रभावशाली आहे ह्याबाबत माझ्या मनात अजिबात संदेह नाही.
मीही बडेगुलाम, अमिरखा, केसरबाई, बापूराव, गजाननबुवा, भीमण्णा, किशोरी इत्यादी दिग्गजांचं गाणं ऐकून समृद्ध झालोय.
ही सर्व मंडळी वंदनीय आहेतच म्हणून ओंकारनाथ हिणकस ठरत नाहीत. कोण मोठा आणि कोण लहान ह्या वादात मी पडत नाही. पण ओंकारनाथांचे गाणे हे मुळी गाणेच नाही अशा म्हणणार्‍यांची मात्र मला कींव करावीशी वाटते.
प्रत्येकाच्या गाण्याचा बाज वेगळा आहे आणि त्यांचे वेगळेपण हेच वैशिष्ठ्य आहे असे मला वाटते.
ह्या आणि अशा इतर थोर कलाकारांच्या गायनाचा माझ्यावर नक्कीच प्रभाव पडलाय. पण तरीही पंडीत ओंकारनाथ आणि पंडीत भीमसेन हे माझे खास जिव्हाळ्याचे विषय आहेत.
ओंकारनाथ आवडत नाहीत असे म्हणणारे जसे मी पाहीलेत तसेच भीमसेन आवडत नाहीत असे म्हणणारेही मी पाहीलेत. पण मला ते दोघेही आवडतात त्यात सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे त्या दोघांचा घनगंभीर आवाज आणि तानबाजी,आवाजातील आर्तता हे गुण.

विजुभाऊ's picture

6 Nov 2008 - 2:06 pm | विजुभाऊ

निलाम्बरी या रागाबद्दल कोणाला माहिती आहे का?
हा मालकंसाच्या अंगाने जाणारा राग होता म्हणे? एवधेच ऐकले आहे. बाकी महित नाही

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

वाटाड्या...'s picture

6 Nov 2008 - 8:54 pm | वाटाड्या...

आपल्या सगळ्यांचे विचार ऐकले/वाचले.... पहिल्याप्रथम सगळ्यांचे मनापासुन आभार...

मला वाटतं की ज्या माणसाला पं. पलुस्करांसारख्या गुरुचं प्रेम व तालीम मिळाली तो माणुस कोणी ऐरा गैरा नसावा. राहता राहीली एखाद्याचं गाणं आवडणं वा न आवडणं ची गोष्ट हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

पण एक गोष्ट मी नक्की नमुद करु इच्छितो..."आपल्या ह्या अभिजात संगीतामधे एक कलाकार दुसर्‍या कलाकाराला कधीच कमी लेखत नाही, कारण प्रत्येकाची आपली आपली एक परंपरा आहे व गायकी आहे. सगळ्यांच एकच मत आहे की ह्या संगीताने प्रेम निर्माण होतं, घृणा नाही." मला वाटत की हीच खरी गोष्ट आहे की ज्यामुळे इतकी सारी विविधता असुन सवाई ला सगळे एकत्र आलेले दिसतात नाहीतर सवाई फक्त कोणा एकाच घराणे गायकीचा गायन समारंभ ठरला असता...

परत एकदा सगळ्यांचे मनापासुन आभार..

धन्यवाद..

आपला..

मुकुल

विसोबा खेचर's picture

6 Nov 2008 - 11:18 pm | विसोबा खेचर

ओंकारनाथांच्या गाण्यातल्या कंटेट विषयी कुणीच काही बोलताना दिसत नाही..! :)

मुकुलरव म्हणतात,

मला वाटत की हीच खरी गोष्ट आहे की ज्यामुळे इतकी सारी विविधता असुन सवाई ला सगळे एकत्र आलेले दिसतात नाहीतर सवाई फक्त कोणा एकाच घराणे गायकीचा गायन समारंभ ठरला असता...

ही गोष्ट मलाही ठाऊक आहे आणि मी विविध घराण्यातल्या विविध कलाकारांच्या कलेचा आनंद घेतला आहे, त्यांच्यावर वेळोवेळी लिहिले देखील आहे...!

परंतु कुठलंही गाणं, कुणाचंही गाणं म्हटलं की मुख्य प्रश्न असतो तो त्या गाण्यातल्या कंटेन्टचा! अभिजात संगीताच्या दुनियेत गायकाचा आवाज हा दुय्यम मानला जातो, अधिक महत्व असतं ते कंटेटला! त्यातून आवाजही फार उत्तम असेल तर दुधात साखर! परंतु ख्यालगायकीमध्ये कंटेन्टला अधिक महत्व आहे असं मी अण्णांकडून शिकलो, अनेकांकडून शिकलो.

आमचे जगन्नाथबुवा म्हणायचे की गाण्यात "मजकूर" हवा!

या सगळ्या पार्श्वभूमीवर मला ओंकारनाथांच्या गाण्यात, त्यांच्या ख्यालगायकीत काहीही कंटेट दिसला नाही! बोलूनचालून मी तर एक सामान्य अभ्यासक आणि श्रोता, परंतु आग्रा घराण्याचे दिग्गज उस्ताद फैय्याजखासाहेबही ओंकारनाथांचं गाणं ऐकून एकदा खाजगीत म्हणाले होते,

"ये कौनसा गाना चल रहा है? ना रंग, ना ढंग, ना अंग!"

हे माझ मत नाही, उस्ताद फैयाजखासाहेबंचं आहे! फैयाजखासाहेबांच्या कॉमेन्टवर विचार करता मलाही त्यांच्या गाण्यात ख्यालगायकीच्या दृष्टीने, कंटेन्टच्या - मजकुराच्या दृष्टीने आवर्जून ऐकावं, दाद द्यावी असं काहीही सापडलं नाही! इतर कुणाला सापडलं असल्यास चांगलंच आहे! :)

असो... प्रतेकाची मतं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी! :)

तात्या.

प्रमोद देव's picture

7 Nov 2008 - 8:57 am | प्रमोद देव

परंतु आग्रा घराण्याचे दिग्गज उस्ताद फैय्याजखासाहेबही ओंकारनाथांचं गाणं ऐकून एकदा खाजगीत म्हणाले होते,

"ये कौनसा गाना चल रहा है? ना रंग, ना ढंग, ना अंग!"


फैयाजखाँ जर असे म्हणाले असतील तर तो नक्कीच अहंकाराचा भाग असावा. कारण त्याकाळात यच्चयावत मुसलमान गायक हिंदु गायकांपैकी केवळ एक म्हणजे भास्करबुवांनाच गायक मानायचे. बाकी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर,त्यांचे शिष्य पंडीत विष्णु दिगंबर पलुस्कर, रामकृष्णबुवा वझे अशा दिग्गजांनाही ते गायक मानत नसत. तेव्हा फैयाजखाँ हे जरी मोठे गवई असले तरी त्यांच्या त्या मताला मी फारशी किंमत देत नाही. कारण शेवटी ही मंडळी आत्मकेंद्री आणि अहंकारी असतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.
खाजगीत ह्याच फैयाजखाँना काही नामवंत गायक 'रेकणारा रेडा' असे म्हटल्याचे मी ऐकलेय. खाजगी मते आणि जाहीर मते ह्याबद्दल पुलंच्या पुणेकर,नागपुरकर आणि मुंबईकर ह्या लेखातील त्यांची टिप्पणी ऐकावी म्हणजे मग माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल.

ओंकारनाथ जर गायक नसतील किंवा जर त्यांच्या गाण्यात काही 'कंटेंट' नसेल तर मग विष्णु दिगंबरांनी त्यांना आपले शिष्योत्तम का म्हणावे? कुणा एखाद्याच्या म्हणण्याप्रमाणे जर ह्या शिष्योत्तमाच्या गाण्यात कंटेंट नसेल तर मग गुरुंचे गाणेही तसेच असले पाहिजे असा निष्कर्ष निघतो.

असो. शेवटी काय ज्याची त्याची आवड आहे हेच खरे. पण अशा तर्‍हेची सरसकट जाहीर विधाने टाळली गेली तर बरे कारण ह्यामुळे नवोदितांची दृष्टी उगीचच पूर्वग्रहदूषित होऊ नये हीच इच्छा!

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 9:54 am | विसोबा खेचर

कुणा एखाद्याच्या म्हणण्याप्रमाणे जर ह्या शिष्योत्तमाच्या गाण्यात कंटेंट नसेल तर मग गुरुंचे गाणेही तसेच असले पाहिजे असा निष्कर्ष निघतो.

असहमत आहे... आणि मी म्हणेन की एक वेळ आमच्या फैयाजखासाहेबांचं किंवा इतरांची मतं सोडा, परंतु ओंकारनाथांच्या गायकीत नक्की काय कंटेन्ट होता हे तुम्ही तरी सांगू शकाल?? नुसता आवाज आणि तानबाजी हे गुणविशेष असले म्हणजे झालं का? घराण्याच्या अंगाने, बंदिशीच्या अंगाने केल्या जाणार्‍या रागविस्ताराचं काय? विष्णू दिगंबरांच्या ग्वाल्हेर परंपरेतलं अष्टांगप्रधान गाणं ओंकारनाथ कितीसं गात होते हे सांगू शकाल??

आपण मिराशीबुवांचं, विनायकबुवांचं गाणं ऐकलं आहे? अंतुबुवांचं गाण ऐकलं आहे? या विष्णू दिगंबरांच्याच शिष्य परिवाराच्या अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अष्टांगप्रधान ग्वाल्हेर गायकीचे कितीसे गुण आपल्याला ओंकारनाथांच्याही गाण्यात दिसतात हे सांगू शकाल?

आणि प्रमोदकाका, मुळात मला एक सांगा की विष्णू दिगंबरांच्या परंपरेतलं गाणं ओंकारनाथांनी किती पुढे नेलं, किती गायलं? काही सांगता येईल?

आपल्याला व्यक्तिश: ओंकारनाथ आवडतात हे अगदी मान्य, आणि ती आपली आवड कुणीच नाकारू शकत नाही हेही कबूल..

असो,

आपला,
(विष्बू दिगंबरांच्या ग्वाल्हेर परंपरेशी परिचित!) तात्या.

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 10:00 am | विसोबा खेचर

एकंदरीत या मुद्द्यावर आपली सहमती होईल असं वाटत नाही, तेव्हा माझ्याकडून ही चर्चा मी इथेच थांबवतो...

उत्तम, घराणेदार, कसदार गाण्याचे माझे जे काही निकष आहेत त्यात ओंकारनाथ कुठेच बसत नाहीत हेच खरं! इतर कुणाच्या मते बसत असतील तर आनंदच आहे!

तात्या.

रामपुरी's picture

7 Nov 2008 - 11:11 am | रामपुरी

अष्टांगप्रधान म्हणजे नक्की काय बुवा? उत्तम, घराणेदार, कसदार गाण्याचे निकष कोण आणि कसे ठरवतात? घराण्याच्या अंगाने आणि बंदिशीच्या अंगाने रागविस्तार न करताही एखाद्या माणसाला एवढी प्रसिद्धी कशी मिळू शकते किंवा एवढ्या मैफिलीतून गाण्याची संधी कशी मिळू शकते?

रामपुरी's picture

7 Nov 2008 - 11:17 am | रामपुरी

कंटेंट म्हणजे नक्की काय हे विचारायचं राहूनच गेलं. काहीच कंटेंट नसताना स्टेजवर वर्षानुवर्षे गाण्याची संधी कशी काय मिळते बुवा???
(अनंत अज्ञानी)
रामपुरी
(मला एवढंच माहीत आहे कि मला काहीच माहीत नाही - सॉक्रेटिस )

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 2:35 pm | विसोबा खेचर

भेटा केव्हातरी सवडीने, मग सांगतो..!

तात्या.