स्वप्नांची गोष्ट (गझल)

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
28 Jan 2019 - 5:28 pm

कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची
किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची

किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे
इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची

गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने
कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची

किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते
हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची

भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया
बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची

कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद
आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची

नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी
मग कीव येते मज अशा विकलांग स्वप्नांची

gazalकविता माझीमराठी गझलकवितागझल