मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही.
पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "काय भोसले आज वाटाण्याच्या उसळीत फक्त २५ वाटाणे होते, तिसरया घासाला पोळी संपली” असं खुलेआम चिडवलं तरी त्याची क्वांटीटी काही वाढायची नाही. डब्याचे पैसे मात्र वेळेवर घ्यायला यायचा. पुढच्या आठवड्याचे ऍडव्हान्स द्याल? अशी ओशाळी विनंती सुद्धा तो करत असे. घोडयांच्या रेसचा त्याला भारी नाद. त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती. पण त्याचा डबा बंद करुन लवकरच,मी आमच्या मेसच्या बीडकर काकूंकडून डबा घेउन जाण्यास सुरुवात केली. अगदी घरगुती पद्धतीच्या डब्यामुळे दुपारी जेवण्याची छान सोय झाली होती.
तेव्हा, माझ्या पहिल्याच जॉबमध्ये( म्हणजे ऍडॉर सामिया) लंच ब्रेकला डबा खाणे, म्हणजे एक माहोल असायचा. एका मोठया टेबलावर आम्ही दहा-पंधरा जण जमत असू. त्यामुळे विविध पद्धतीने केलेल्या भाज्या, उपलब्ध असत. फ़्रान्सिसला त्याने आणलेली अप्पम किंवा इडली मिळायची नाही आणि यादवभय्याला त्याच्या डब्यातील करेला.मिलिंद आणि आनंदच्या डब्यातील, साखरांबा-तूप बघून, आपल्या डब्यात कधी येणार असा विचार येउन जायचा. बरेच कलीग्स बॅचलर होते, त्यामुळे जसे दिवस जाउ लागले तसे डबा, बनवणारी व्यक्ती बदलत गेली. एखाद्याचं लग्न झाल्यावर, तो डबा कसा आणतो ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे बायकोच्या हातचा डबा आणि, आईच्या हातचा डबा ह्यातील फरक बरयाच जणांना समजू लागला. आपल्याला मिळणारा “नवीन” डबा, आता त्या “जुन्या” उंचीला कधी जाउन पोचणार , हा विचार त्या “ डबा-डिमोटेड” मित्रांच्या मनात येत असेल. पण मेस किंवा डबेवाल्याकडून , बायकोच्या हातचा डबा मिळू लागलेल्या नवविवाहितांसाठी मात्र ते “प्रमोशन” असायचं.
पण दिवसभराचं स्ट्रॆस घालवण्याचं ठिकाण ,म्हणजे लंच टाइम असे. जेवताना क्रिकेट, राजकारण, ऑफिस गॉसिप, लोकल घडामोडी, बॉलिवूड, असे नानाविध विषय जेवणाबरोबर तेवढ्याच चवीने चघळले जात. एखाद्याला एखाद्या दिवशी टार्गेट करुन, त्याची यथेच्छ खेचली जायची. तो अर्धा तास म्हणजे आमची रिचार्जींग बे होती. उरलेला वेळ काम करण्याची मानसिक क्षमता, तो अर्धा तास देउन जायचा.
ऍडॉर सामियामध्ये एक सेल्स इंजिनिअर होती. ती अगदी टीपीकल सेल्स इंजिनिअर होती. म्हणजे तिचे व्यक्तीमत्व जेव्हढे आकर्षक होते, त्याला साजेसा तिच्याकडे ड्रेसिंग सेन्स होता.त्यामुळे तिची प्रेझेंटेशन्स “बघणेबल” असायची. कंपनीचा सेल्स मॅनेजर तिच्याबरोबर सेल्सप्लॅन्स करत असायचा आणि ऑपरेशन्स मॅनेजरला सेल्सप्लॅन्स बरोबर एक्झेक्यूशन प्लॅन फाइन-ट्यून करण्यासाठी तिचीच गरज भासायची. आता डब्याच्या विषयात हे इतकं विस्ताराने सांगायचा उद्देश म्हणजे, ती रोज मला तिच्या डब्यात, न चुकता, काहीतरी स्वीट आणायचीच. ते मलाच देण्यासाठी, टेबलावर ती आधी आल्यास, ती माझ्यासाठी तिच्याशेजारची खुर्ची धरुन ठेवायची. मी आधी आलो तर, मी ही तसेच करत असे. पुढे-पुढे ही गोष्ट बाकी सगळ्यांच्या लक्षात आल्यावर, मोठया मनाने(!) कुणी माझ्या किंवा तिच्या शेजारी बसत नसे. पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे.
काही वर्षांनी, आमचा ऍडॉर सामियामधील डब्बा ग्रूप पंधरावरुन पाच वर आला , तेव्हा मी तो जॉब सोडून, थर्मॅक्स मध्ये गेलो. …..
क्रमश:
माझा ब्लॉग अवश्य वाचा
http://kalekapil.blogspot.com/
प्रतिक्रिया
2 Nov 2008 - 12:11 am | चन्द्रशेखर गोखले
छान वाटतय वाचायला द्या लवकर पुढचा भाग..!
2 Nov 2008 - 12:20 am | शितल
मस्त लिहिले आहे.
लंच टाईमला खुप मस्त मजा येते आणि कामाचा ताण हलका होतो :)
2 Nov 2008 - 5:52 am | पक्या
छान लिहीले आहे. अजून वाचायला आवडेल.
2 Nov 2008 - 11:52 am | यशोधरा
>>पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे.
:D किती ती स्वतःची स्तुती!!
(हलकेच घ्या बरं!)
2 Nov 2008 - 9:00 pm | कपिल काळे
अहो तसंच आहे हो.( हलकेच घेतलंय!)
पण अशी एखादी प्रतिक्रिया आली, की चूक कळते आपली. सुधारतो पुढे.
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
2 Nov 2008 - 11:53 pm | विसोबा खेचर
अहो मालक, पुढचा भाग कुठे दिसला नाही!
तात्या.
3 Nov 2008 - 9:47 am | कपिल काळे
अहो पुढचा भाग, अजून मनासारखा नाही उतरलाय. उद्या - परवा नक्की टाकतो.
3 Nov 2008 - 8:36 am | अभिरत भिरभि-या
पुढचा भाग येऊ द्या लौकर मालक
3 Nov 2008 - 8:47 am | प्रभाकर पेठकर
छान आहे भाग पहिला. अभिनंदन.
त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती.
हे बाकी काही नीट कळले नाही.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
3 Nov 2008 - 9:49 am | कपिल काळे
नवरा रेसवर उधळणार. म्हणून ती यायची हो.
3 Nov 2008 - 9:24 am | अनिल हटेला
मस्त आहे डबापूराण !!
येउ द्यात पूढचा भाग लवकर !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
3 Nov 2008 - 12:41 pm | स्वाती दिनेश
छान झाला आहे हा भाग,पुढचा भाग लवकर येऊ देत,
स्वाती