बघता मानस होते दंग ७: किना-यावरील रस्त्याने कुणकेश्वर भ्रमण
१२ सप्टेंबरला सायकल चालवता आली नाही. बायको व मुलीला आणायला कोल्हापूरला जावं लागलं. त्यामुळे सायकल प्रवासातला आणखी एक दिवस कमी झाला. आता फक्त एकच दिवस सायकल चालवू शकेन. आत्या व इतर जण आल्यामुळे ह्या शांत घरामध्येही आता उत्साहाचं वातावरण आहे. आता थोडं ठीक वाटतंय. जुन्या आठवणी आहेतच आणि अदू आल्यामुळे नवीन आठवणी तयार होत आहेत. हे फार्म हाऊस समुद्र किना-यापासून नऊ किलोमीटर दूर आहे. पण पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना व मोठ्या पावसात त्याची गर्जना इथपर्यंत ऐकू येते! ह्यावेळी मोठा पाऊस असता तर ती संधीही मिळाली असती! पण त्यासाठी ऐन पावसाळ्यात यायला हवं.
माळरानावरच्या सुनसान जागेत हे घर आहे. अनेकदा इथे रात्री जंगली प्राणी येतात. अनेकदा वाघही आलेला आहे. इथे केअरटेकर म्हणून राहणारे सांगतात की, नेहमीच त्यांना साप व विंचू मारावे लागतात. संध्याकाळी अशा गप्पा सुरू असताना अचानक दिवे गेले. योगायोगाने आम्ही अंगणात होतो. एकदम आकाशातला नजारा जीवंत झाला! नेमकं आकाश निरभ्र असल्यामुळे चांदण्याच चांदण्या दिसत आहेत. अगदी काळ्याकुट्ट वातावरणातून दिसणारं जबरदस्त आकाश! मी आणि आत्येभावाने जुन्या मित्रांची- ता-यांची भेट घेतली. शहरामध्ये प्रकाश प्रदूषणामुळे हे बघणं फार कठिण असतं. आकाशगंगा तर अतिशय अवर्णनीय दिसली! आणि तारे बघत असतानाच अचानक शब्दश: काजवेही चमकले! खूप काजवे आले एकदम. काही तर खिडकीतून घरातही आले! घराच्या जवळ जंगली प्राणी असल्यामुळे सकाळी दरवाजा उघडल्यानंतर पाय खाली ठेवायच्या आधी बघावं लागतं कोणी नाही ना! संध्याकाळ फार मस्त गेली.
१३ सप्टेंबर- गणपतीचा पहिला दिवस. घरी पूजा असली तरी मी उजाडल्या उजाडल्या सायकल घेऊन निघालो. आज काहीच नाही तर किमान किना-यालगतच्या रस्त्याने कुणकेश्वरला तरी जाईनच. आणि कुणकेश्वर- देवगडमधला जुना रस्ताही अतिशय जबरदस्त आहे. आज ह्या भागात सायकल करून ह्या मोहीमेतला सर्वोच्च क्षण अनुभवायचा आहे. फिरत फिरत देवगडला आलो. बस स्टँडपासून कुणकेश्वरचा रस्ता जातो. हा रस्ता नवीनच झाला आहे, इथे पहिल्यांदाच जाईन. इथून एक रस्ता पवनचक्क्यांकडे जाणारा आहे. तिकडे गेल्यावर सुंदर नजारा दिसला! उंचावर फिरणारी पवनचक्की आणि पलीकडे पसरलेला तो अथांग, अथाह! वा! अवाक् केलं ह्या दृश्याने. अगदी ध्यान लागावं अशी जागा. आणि एक जण खरंच ध्यान करताना दिसले! इथून देवगडच्या बीचवर पाय-यांनी उतरून जाता येतं. आहा हा!
जीव जडला चरणी तुझिया!!
बघता मानस होते दंग!!!
थोड्या वेळ थांबून परत येऊन कुणकेश्वरच्या रस्त्याकडे वळालो. कुणकेश्वरकडे जाताना ह्या रस्त्यावर आधी दोन छोटी गावं व बीच लागतील- तारामुंबरी व मिठमुंबरी. आणि खाडीचा एक ब्रिजही लागतो. अतिशय रोमँटीक रस्ता! खरंच ह्या रस्त्यावर सायकल चालवणं हाच ह्या मोहीमेचा क्लायमॅक्स आहे! देवगड परिसरातल्या सायकलिस्टसना मॉर्निंग राईडसाठी इतका सुंदर रस्ता आहे! बीचला लागूनच रस्ता जातोय! हिमालयात जसे देवदार वृक्ष असतात, तसे इथे जागोजागी कांदळ वृक्ष (मँग्रोव्ह) आहेत! पण आज गणपती बसत असल्यामुळे सगळे बीच अगदी निर्जन आहेत. सायकल चालवत नजारे पीत राहिलो. मिठमुंब्रीचा बीच अतिशय सुंदर आणि शांत वाटला. कुणकेश्वरच्या आधी आता थोडा तीव्र चढ आहे. चढ विशेष नाही वाटला, पण इथे समुद्र अगदी बाजूला आहे! जबरदस्त!!!
कुणकेश्वर येईपर्यंत फक्त एक वाहन रस्त्यावर भेटलं. लवकरच इथलं प्रसिद्ध शिव मंदीर दिसलं. लहानपणी जेव्हा मंदीराजवळ वाळूत उभं राहायचो, तेव्हा वाटायचं की मंदीर व किनाराच समुद्राकडे जात आहेत! आता तेच मंदीर उंच रस्त्यावरून बघताना खूपच मस्त वाटतंय! निर्जन आणि अतिशय उत्तम रस्ता! आजसुद्धा सायकल चालवण्याचं सार्थक होतंय. कुणकेश्वर मंदीरात अनेकदा गेलोय, त्यामुळे आत्ता गेलो नाही. मंदीराच्या बाहेर शहीद मेजर कौस्तुभ राणेंचा फोटो लावलेला आहे. त्यांचं अस्थि विसर्जन इथेच केलं होतं. सगळे लोक गणपतीमध्ये बिझी आहेत, पण एक हॉटेल सुरू आहे. इथे फक्त चहा- बिस्कीट मिळाले. पण नाश्त्याची गरज आहे, कारण सुमारे पंधरा किलोमीटर सायकल चालवली आहे व अजून बारा तरी चालवायची आहे. परत जातानाही चढाचा रस्ता आहे कुणकेश्वरच्या बीचबद्दल माझ्या आत्येभावाने सांगितलं होतं की, आता हा बीच छोटा होतोय. समुद्र आत येतोय. आता मंदीरातून उतरून वाळूपर्यंत जातानाही मध्ये थोडं पाणी लागतं. त्याने म्हंटलंच की, काही वर्षांनी हा बीच राहणारही नाही. ह्याच बीचच्या पलीकडच्या बाजूला एक आधुनिक टूरीस्ट सेंटर बनवलं आहे. समुद्रावर अतिक्रमणच केलं गेलं आहे. निश्चितच काळजीचा विषय आहे हा.
कुणकेश्वरवरून जामसंडेकडे येणारा रस्ता नितांत रमणीय आहे. इथे अनेकदा आलोय, तरीही तितकाच रोमहर्षक वाटतोय. जेव्हा ह्या रस्त्यावर मोटर सायकल चालवली होती, तेव्हा जाम फसलो होतो. चढावर मध्येच मोटरसायकल थांबली होती. तेही मागच्या सीटवर बायको असताना. कसं बसं पहिला गेअर + हाफ क्लच टाकून तो चढ पार केला होता. मागच्या वर्षी मी स्वत: इथे गाडी चालवत आलो होतो. तेव्हा कारमध्ये इतकी गर्दी होती की मुलं डिकीत बसली होती. तिथेही असाच भयानक चढ लागला. माझ्या आयुष्यातल्या आजवरच्या सर्वांत भयानक दोन सेकंदांची सूची केली, तर त्यात तो प्रसंग नक्की येईल! अचानक तीव्र चढ लागला व एस्टीलो कार चढतच नव्हती. अक्षरश: श्वास थांबला. विचार ब्लँक झाले जणू. अगदी कसबसं सेकंड गेअरवरच हाफ क्लचमध्ये एक्सलरेटर दाबून अक्षरश: वाचलो होतो. कारच्या बाबतीत मी जेमतेम साधारण दर्जाचा ड्रायव्हरच असेन. तो पुणे देवगड व परतीचा प्रवासही मस्त झाला होता. मी एकटाच चालवणारा होतो. तेव्हा कुणकेश्वरच्या ह्या रस्त्याने इतकं घाबरवलं होतं की, परत कोल्हापूरकडे जाताना लागणा-या गगनबावड्याला खूपच घाबरलो होतो. पण शेवटी गगनबावडा घाट आरामात जमला होता. पण इथला तो तीव्र चढ- ते दोन सेकंद कधीच विसरू शकणार नाही! असो!
कुणकेश्वर ते जामसंड़े अंतर फक्त दहा किलोमीटर आहे. पण अतिशय सुंदर प्रवास आहे. मध्ये मध्ये दाट झाडी लागते, छोटी गावं आणि नजारेच नजारे! मध्ये मध्ये सुनसान भागातून सायकल चालवतानाही जवळच्या गावातून गणपतीची गाणी ऐकू येत आहेत! वा! रस्ता तर अतिशय उत्तम आहे. आणि इतकी सायकल चालवून झाल्यावर चढाचं काहीच वाटलं नाही. अपेक्षेनुसार तीव्र चढाचा पॅचही आरामातच चढलो. अतिशय सुंदर झाली ही राईड! सुमारे अठ्ठावीस किलोमीटर झाले. अतिशय अद्भुत नजारे आणि रोमान्स! ह्या प्रवासाचा हा कळसाध्याय! आता पुढे अजून फिरता नाही आलं तरी कोणतीच खंत नाही.
संध्याकाळी परत एकदा ह्याच रूटवर गाडीने आलो. सायकल नाही, पण बाकी लोकांच्या सोबत नजा-यांचा आनंद घेतला. आत्येभावासोबत खूप गप्पा झाल्या. लहानपणी सुट्टीत मी इथे यायचो, आम्ही खूप क्रिकेट खेळायचो, पुस्तकं वाचायचो व फिरायचो! परवाही मी एकटा होतो एक दिवस तेव्हा इथल्या पुस्तकांचाच आस्वाद घेतला. काही पुस्तकं तर अगदी साठ किंवा सत्तरच्या दशकातली आहेत. माझ्या आवडीच्या विषयांवरची- इतिहास, दुसरं महायुद्ध! आता ती पुस्तकं वाचणं तर शक्य नाही, पण त्यांची पानं उघडून त्यांचा दरवळ तर घेता येऊ शकतो! आणि ह्या पुस्तकांसोबतच असलेली आमची कॉमिक्सची दुनिया! आता त्या कॉमिक्सच्या जगातला एकच साक्षीदार उरला आहे- परमाणूचं स्टीकर! अशा आठवणींमध्येच उद्याचाही दिवस जाईल व परवा निघायचं आहे. फिरणं होईलच, पण सायकलवर नाही. परत जाताना सायकल गाडीत टाकून नेईन. पण आत्तापर्यंतचा काय प्रवास झाला! आज २८ किलोमीटर चालवले व एकूण सुमारे ४६३ किलोमीटर झाले! सायकलीने खूप सुंदर साथ दिली. तिस-या दिवशी मलकापूरजवळ माझी तर हवा उतरली होती, पण सायकलीची हवा अजिबात उतरली नाही, ती चालतच राहिली...
(आत्येभावाने घेतलेले काही फोटोज)
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
3 Nov 2018 - 9:52 am | वन
आणि वर्णन.
पु प्र शु.
5 Nov 2018 - 9:26 am | सुबोध खरे
एक विनंतीवजा सूचना- आपल्या अनेक लेखांत इतर वर्णनात "नजारा" हा शब्द उत्तम पुलावात खडा लागावा तसा टोचतो. या ऐवजी "दृश्य किंवा देखावा" हा मराठी शब्द वापरता आला तर पहा.
7 Nov 2018 - 10:28 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
@ सुबोध खरे सर, आपण वाचलंत, ह्याचा खूप आनंद आहे! ओके. पण मला वाटतं की देखावा शब्द योग्य होत नाही (कारण जे नसतं ते भासवलं जातं तेव्हा आपण देखावा केला म्हणतो) आणि दृश्य शब्द बराच मिळमिळीत वाटतो. आणि खरं तर तिथे फिरताना जो अनुभव येतो, तो शब्दांत सांगताना शब्द पुरतच नाहीत. परत परत तेच ते शब्द वापरावे लागतात नाईलाजाने.