बघता मानस होते दंग ६: देवगड बीच आणि किल्ला
देवगडला पोहचल्यामुळे खूप उत्तेजित वाटतंय! माळरानावरच्या सुनसान घरामध्ये उरलेला दिवस गेला. पाच दिवसांमध्ये ४१३ पेक्षा जास्त किलोमीटर सायकल चालवली! सायकलीला खूप धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत! हे माळरानावरचं घर मुख्य रस्त्यापासून पाऊण किलोमीटर आत आहे आणि आत येणारा रस्ता अगदी कच्चा व खडकाळच आहे. येताना सुरुवातीला तर वाटलं की सायकल हातात धरूनच आणावी. पण इतक्या दिवसांच्या सायकलीच्या सोबतीमुळे विश्वास वाढला होता, म्हणून हळु हळु चालवतच घरी पोहचलो होतो. माझे नातेवाईक उद्या येतील, त्यामुळे घरातही शांतता आहे. इथे राहणं म्हणजे एका अर्थाने बाहेरच्या जगापासून आयसोलेट झाल्यासारखं आहे. टिव्ही नाही आणि इंटरनेटही संथ व कधीही बंद पडेल असं. पण रिलॅक्स होण्यासाठी अतिशय सुंदर वातावरण! तसाही आता ह्या प्रवासाचा मुख्य टप्पा झाला आहे, त्यामुळे मनाने तर रिलॅक्स वाटतंच आहे. चांगला आराम झाल्यानंतर आता ११ सप्टेंबरला किल्ला व बीच बघायला जाईन.
आजचा टप्पा अतिशय छोटा असल्यामुळे आरामात निघालो. अगदी चालण्याच्या वेगात तो ट्रेलसारखा कच्चा रस्ता पार केला. इथून देवगड व बीच नऊ किलोमीटरवर आहे. आता ही राईड ऑन द रोड़च्या बरोबर राईड डाउन द मेमरी लेनही सुरू झाली आहे! लहानपणीच्या इथल्या कित्येक आठवणी! देवगडकडे निघाल्यावर समुद्र कधी दिसेल ह्याची वाट बघतोय. पूर्वी दूरवरूनच निळी पट्टी दिसायची! पण आता वस्ती व घरं वाढली आहेत. त्यामुळे दिसत नाहीय. पण देवगडच्या पवन चक्क्या लवकरच दिसल्या! जामसंडे! आणि लवकरच आला समुद्र! आणि ह्या वेळी सायकलवरून जात असल्यामुळे मला देवगडही शहरासारखं नाही तर एका गाव रूपात जाणवतंय. कारण कोंकणात आत्तापर्यंत बघितलेल्या गावांसारखंच- कौलारू घरं, चढ- उतारावरची वस्ती, लाल माती, कच्च्या वाटा, नारळाची झाडं व दाट झाडी! तेच इथेही आहे. वाढलेल्या वस्तीमध्ये गांव हरवलंय खरं, पण ह्या वेळी सायकलवर बघत बघत जात असल्याने ते गावही दिसू शकलं!
प्रथम तुला वंदितो!
देवगड बीच! इथेही ब-याच गोष्टी बदलल्या आहेत, टूरीस्ट कल्चर आलेलं आहे. पण समुद्र तर तोच आहे! अथाह, अनंत! वाळूपर्यंत सायकल आत नेली. सकाळची वेळ असल्याने बीचवर फार थोडे लोक आहेत. समुद्रात बहुतेक ओहोटी सुरू असावी, पाणी बरंच आत गेलंय. थोड्या वेळ बीचच्या नजा-याचा आनंद घेतला व मग जवळच्याच देवगड किल्ल्याकडे वळालो. इथे किंचित चढाचा रस्ता आहे. कदाचित देवगड गावातली सर्वांत जुनी वस्ती किल्ल्यावरच असावी. आजवर बीचवर अनेकदा आलोय, पण किल्ल्यावर बहुतेक फक्त तिस-यांदाच जातोय. देवगड किल्ल्याचं इतिहासात बरंच महत्त्व होतं. मराठा शासनाच्या काळात समुद्रातल्या अनेक जल दुर्गांपैकी हाही एक. इथे लाईट हाऊस आहे व बंदरही आहे. देवगड बंदराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे समुद्राला तीन बाजूंनी जमिनीने वेढलं आहे ( C प्रमाणे). त्यामुळे जेव्हा समुद्री वादळ येतं, तेव्हा दूरवरचे जहाज इथे आश्रयाला येतात. अगदी वर्षभरापूर्वीच समुद्रात मोठं वादळ आलं होतं, तेव्हा अगदी दूरवरचे जहाज इथे थांबले होते. बातमी होती की, अगदी दहा- पंधरा हजारांच्या ह्या गावात तितक्याच संख्येने समुद्री खलाशीही आल्यामुळे रेशन व सामग्रीची मोठीच अडचण झाली होती! असो.
देवगड किल्ल्यावरून समुद्र फार मस्त दिसतो. पण बाकी किल्ला अगदी सुनसान जणू खण्डहर असल्यासारखा आहे. इथून देवगड बंदराचंही दृश्य दिसतं. थोड्या वेळात तिथून निघालो. आत्ता नाही, पण रात्री इथे नक्की मजा येत असणार. परत येताना नाश्त्यासाठी हॉटेल बघत बघत पुढे आलो. देवगड संपल्यावर जामसंडे येता येता एक छोटा चहा स्टॉल लागला. हासुद्धा स्थानिक माणूस नाहीय! इथे थोडा नाश्ता करून निघालो. सलग पाच दिवस सायकल चालवल्यानंतर आज फक्त १९ किमी झाले.
देवगडच्या माळरानावरच्या घरात खूप विचित्र वाटतंय. अजून आत्या व इतर जण आले नाही आहेत. मागे एकदा इथे आलो होतो तेव्हा ते नसताना इथे थांबणं जड गेलं होतं. त्यामुळे ह्या वेळी जेव्हा योजना बनवली तेव्हा गणपतीत ते असतानाच यायचं ठरवलं. कारण ओळखीचा परिसर असला तरी ओळखीचे चेहरेही पाहिजेतच ना. ते संध्याकाळी येतील. आणि उद्या माझी बायको व मुलगी अदूही येणार आहेत! त्यामुळे ह्या प्रवासाची रंगत आणखी वाढणार. पण त्याबरोबरच सायकल चालवायला वेळही कमी मिळणार. आधीच चार ऐवजी मला पोहचायला पाच दिवस लागले, तिथे एक दिवस गेला. आणि उद्या काही कारणामुळे मला बायको व मुलीला घ्यायला कोल्हापूरला जावं लागणार आहे. त्यामुळे तोही दिवस गेला. त्यामुळे आता आणखी दूरवर सायकलवर कदाचित फिरता येणार नाही. पण ह्या निर्जन माळरानावर आणि आठवणींच्या जगात फिरणंही तितकंच आकर्षक आहे! आणि अदू आल्यावर राहिलेली कसर भरून काढेलच. त्यांच्यासोबतही फिरणं होईल.
(माझ्या आत्येभावाने घेतलेला फोटो)
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
1 Nov 2018 - 10:02 am | सुबोध खरे
इतके सायकल चालवणे झेपणारे नाहीच.
त्याबद्दल पास पण आपले वर्णन आणि प्रकाशचित्रे फारच सुंदर असतात त्यामुळे एक वेगळीच अनुभूती मिळते.
बाकी--कोकण मोटार सायकलवर करायचा विचार फार वर्षांपासून करतो आहे. पण आळस आणि बायकोचा सक्त विरोध यात तो केंव्हा प्रत्यक्षात उतरेल माहिती नाही.
1 Nov 2018 - 1:55 pm | MipaPremiYogesh
Margiji,
Tumhala khup divas zale follow kartay ekdam chan pravasavarnan ani likhan pan khup chan. Photo pan paratim.
1 Nov 2018 - 5:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
एक एक करुन सगळे भाग वाचत होतो पण प्रतिक्रिया द्यायला आज लॉगिन केलेय.
अतिशय रोमांचक ट्रिप आणि प्रवासवर्णन आहे. अशी ट्रिप करणे म्हणजे खुप आधीपासुन तयारी, नकाशा माहित असणे वगैरे आलेच.
पण एकट्याने एव्ह्ढे अंतर काटणे जरा धोक्याचे नाही का? म्हणजे कुठे अडचण आली, सायकल पंक्चर झाली किवा ईतर काही तर एकाला २-३ जण असलेले बरे नाही का?
असो. अशाच सफरी करत रहा आणि आम्हाला वाचायला द्या.
1 Nov 2018 - 5:43 pm | सविता००१
फार सुरेख मालिका आहे हो
फोटो तर अप्रतिम
2 Nov 2018 - 11:27 am | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!
@ राजेंद्र मेहंदळे जी, इतकं कठीण किंवा धोक्याचं नाही. आणि तसं तर गर्दी असलेला रस्ता ओलांडणंही कठीण व धोक्याचं ठरतंच ना कधी कधी. मानसिक दृष्टीने सवय होत गेली व सोलो फिरण्याचा आनंद येत गेला. पंक्चरसोबतही खूप मैत्री केली आहे. त्यामुळे त्याचंही दडपण येत नाही. शिवाय ते कसं टाळता येऊ शकतं, हेही शिकलो आहे. आणि काही गरज पडलीच तर लोक असतातच ना रस्त्यावर. मदत मिळू शकते. :) धन्यवाद!
2 Nov 2018 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या सायकल प्रवासाचा पंखा झालोय मी ! असं काही वेड डोक्यात असलं तरच जीवनाला काही अर्थ असतो.
मोठ्या बाकी सायकल भ्रमंतींसाठी लागणारी ताकद, चिकाटी आणि आवड तुमच्यात ठासून भरली आहे ! त्यासाठी सलाम !
2 Nov 2018 - 12:36 pm | सिरुसेरि
खुप छान सरळमार्गी लेखन आणी फोटो .
2 Nov 2018 - 12:49 pm | नया है वह
फोटो अप्रतिम
Which Camera is it?
6 Nov 2018 - 9:57 pm | Nitin Palkar
पहिल्या भागापासून अखेरच्या भागापर्यंत संपूर्ण लेखमाला एका बैठकीत वाचून काढली. जाणीवपूर्वक कोणतेही प्रतिसाद वाचले नाहीत. खूप आवडली. आता सवडीने प्रतिसाद वाचेन. असेच खूप सायकलिंग करत रहा, विविध नजारे आम्हाला दाखवत रहा. पुलेशु.