बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) १: प्रस्तावना

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
13 Oct 2018 - 8:01 pm

बघता मानस होते दंग १: प्रस्तावना

नमस्कार! कोंकणात सायकलीवर फिरणं माझं अनेक वर्षांचं स्वप्न होतं. एकदा त्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालं. सायकलीवर कोंकणात फिरू शकलो- सोलो सायकलिंग करू शकलो. त्यासंदर्भात आता सविस्तर लिहिणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही मोहीम माझ्या नवीन हायब्रिड सायकलवर- मेरीडा स्पीडर 100 वर केलेली पहिली मोहीम आहे. ह्या सायकलीवर दोन शतकही केले होते. पण प्रत्येक वेळी पंक्चर झालं. माझी जुनी एमटीबी सायकल व ही हायब्रिड सायकल ह्यांच्यातला फरक जुन्या काळातील नोकिया शुद्ध फोन- 3315 आणि आत्ताच्या जनरेशनमधला आय फोन सेव्हन सारखा वाटत होता! त्यामुळे ही सायकल अक्षरश: शिकण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये व तिच्यासोबत जुळवून घेण्यात ब-याच अडचणी आल्या. सायकलच असली तरी अतिशय आधुनिक व वेगळ्या प्रकारची सायकल असल्यामुळे अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या- जसं टायर प्रेशर, एक्सेसरीजचा ताळमेळ, रस्त्यावरची ग्रिप इ. हळु हळु हे शिकत गेलो. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये माझे सायकल मित्र आशिष फडणीस अर्थात् आशुचँप ह्यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि सोबत केली! माझ्या सर्व प्रश्नांना व शंकांना त्यांनी खूपच पेशन्स ठेवून निरसन होण्यास मदत केली! मला फार जास्त प्रश्न पडत होते व समस्याही अनेक येत होत्या! अनेकदा तर वाटायचं की इतक्या नाजुक व नखरे करणा-या सायकलीपेक्षा माझी जुनी एमटीबी काय वाईट होती! तिच्या तर प्रत्येक समस्येवर कोणत्याही दुकानात इलाज मिळत होता आणि ह्या सायकलीला जर काहीही झालं तरी थेट शोरूमकडे जावं लागतंय. त्यामुळे मानसिक दृष्टीनेही बरेच सायास पडले व ह्या सायकलीचे बेसिक्स शिकावे लागले. पण हे करताना आशूचँपजींनी खूप मार्गदर्शन दिलं! ही पहिली मोहीम त्यांनाच अर्पण करतो आहे! असं करता करता हळु हळु सायकलीसोबत मैत्री झाली! ह्या सायकलीला 'मेरी' हे नाव दिलं!

मेरी सायकलीवर अनेक छोट्या राईडस केल्या व दोन शतकही केले. जेव्हा सायकलीशी चांगला ताळमेळ जुळला व मैत्री झाली, तेव्हा एका मोहीमेची इच्छा झाली. त्याच काळात जुन्या पद्धतीच्या ओल्ड इज गोल्ड एटलस सायकलीवरसुद्धा एक नितांत रमणीय प्रवास झाला. त्यामुळे ह्या सायकलीच्या मोहीमेसाठी थोडी वाट बघावी लागली. लहानपणापासून मी कोंकणातल्या देवगडला जात राहिलो आहे. आजही आठवतं लहान असताना खेळण्यातली बस घेऊन घरी बसल्या बसल्या परभणी- कोल्हापूर- देवगड असा प्रवास करायचो! घरातच बस चालवून देवगडला जाण्याची कल्पना करायचो. माझ्यासाठी हे स्वप्नवत् स्थान आहे! समुद्र किनारा व निसर्ग सौंदर्याची पखरण असलेलं देवगड! त्यामुळे नवीन सायकलीची पहिली मोहीम इथे करावीशी वाटली. आणि गणपतीच्या दिवसांमध्ये हा योग आला! सायकलीवर पुणे- देवगड जाण्यासाठी तयार झालो. गेल्या वर्षी केलेला सातारा प्रवास व ह्या वर्षीचा एटलस सायकलीवर केलेला योग- प्रसार प्रवास खूप काही शिकवून गेला. त्यामुळे जास्त चिंता नाही आहे. आरामात तयारी झाली. तसेच, हाफ मॅरेथॉन स्तरापर्यंतच्या रनिंगच्या सवयीने स्टॅमिना व उत्साहसुद्धा वाढला आहे. आता पाहिजे तेव्हा २५ किंवा ३० किमी पळू शकतो. त्यामुळे मानसिक तयारीही चांगली झाली आहे. इतकं रनिंग करता येत असल्यामुळे सायकलिंग सोपं होतं. मानसिक दृष्टीनेही अजिबात कठिण वाटत नाही. त्यामुळे काहीच अडचण नाही. ह्यावेळीही नेहमीचाच फॉर्म्युला ठेवेन- रोज सकाळी साडेपाच ते अकरा वाजेपर्यंत पाच- सहा तास सायकल चालवेन व नंतर एखाद्या ठिकाणी थांबून लॅपटॉपवर माझं कामही करेन. तशी ही मोहीम छोटीच असेल- सात आठ दिवसांची. गणपतीच्या दिवसांमध्येच कोंकणात पोचेन!

६ सप्टेंबरला सकाळी चाकणवरून निघालो. आज फक्त धायरी डिएसकेमध्ये भावाकडे ५० किलोमीटर अंतर जायचं आहे. पुढचे टप्पे बघता हा फक्त वॉर्म अपच आहे. छोटा टप्पा असला तरी मानसिक दृष्टीने कोणत्याही मोहीमेचा पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो. शरीर व मन मोहीमेच्या लयीत येत असतात. मोहीमेचा पाया उभा राहतो. अगदी आरामात अडीच तासांमध्ये हा टप्पा पूर्ण केला. वाटेत माझ्या मित्रालाही भेटलो. सायकलिंगचा चांगला सराव असल्याने चांगला वेग मिळाला.

पोहचल्यावर थोडा आराम केला व लॅपटॉपवरचं रूटीन कामही केलं. संध्याकाळी सायकलीवर एक चक्कर मारली, तेव्हा हवा थोडी कमी वाटली. ह्या मोहीमेत मी छोटा पंप घेतला आहे. त्याने हवा भरली, तर नीट भरली जात नाहीय. मला त्याचा तितका चांगला सराव नाहीय. हायब्रिड सायकलीशी मैत्री अजून नवी आहे, इंडक्शनही पूर्ण झालेलं नाहीय. प्रयत्न करत राहिलो. एकदा वाटलं की, इथे मॅकेनिक आहे, त्याच्याकडूनच भरून घेतो. पण थोडा प्रयत्न केला व मग हवा भरता आली. हळु हळु सॉफ्ट हँडसनी हवा भरू शकलो. टायर प्रेशरचं जजमेंट आलं आहे, त्यामुळे तितकी हवा भरून हुश्श केलं! आता उद्याचा पहिला मोठा टप्पा असेल. पुण्यातून साता-याला जाईन आणि माझं ह्या सायकलीवरचं तिसरं शतकही होईल. बघूया कसं होतंय!


आज फक्त वॉर्म अप- ५० किमी

पुढील भाग: बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) २: पुणे ते सातारा (१०५ किमी)

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

13 Oct 2018 - 9:41 pm | Nitin Palkar

प्रस्तावना छान, फोटोज खूप सुंदर. पुभाप्र. पुलेशु.

स्थितप्रज्ञ's picture

16 Oct 2018 - 1:44 am | स्थितप्रज्ञ

तेही नव्या मोहिमेचं वर्णन करत...आता झकास वर्णन येत राहू द्यात.

मार्गी's picture

16 Oct 2018 - 11:04 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! :)

@ स्थितप्रज्ञजी, धन्यवाद! पण ही लेखमाला नुकतीच लिहिली होती ना- https://www.misalpav.com/node/43384

तुमच्या साराख्या सायकलिस्ट कडून प्रेरित होऊन मी सुद्धा सायकल घेतली आणि रोज चालवीत आहे. आता प्रयन्त ५८९ किमी चालवून झाली आहे. लवकरात लवकर तुमच्या सारखी एखादी मोठी मोहीम करण्याचा मानस आहे. तुमच्या लेखातून बऱ्याच गोष्टी समजतात. धन्यवाद

माझे stravaa स्टेटस खाली दिले आहे
Last 4 Weeks
Avg Rides / Week5
Avg Distance / Week57 km
Avg Time / Week5h 5m
2018
Distance589.0 km
Time52h 50m
Elev Gain5,121 m
Rides53
All-Time
Distance589.0 km
Rides53
Biggest Ride39.6 km

मार्गी's picture

16 Oct 2018 - 3:31 pm | मार्गी

अरे वा! जोरदार! तुम्ही जर आठवड्यातून पाच दिवस किंवा महिन्यातून बावीस दिवस (रोज १ तास/ १५- १८ किमी) सायकल चालवत असाल; तर तुम्ही लवकरच मोठी मोहीम नक्कीच करू शकता! शुभेच्छा!

झेन's picture

16 Oct 2018 - 2:33 pm | झेन

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

सिरुसेरि's picture

19 Oct 2018 - 12:10 pm | सिरुसेरि

मस्त वर्णन . प्रवासाला शुभेच्छा .