बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
26 Oct 2018 - 7:27 pm

बघता मानस होते दंग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)

९ सप्टेंबरची पहाट. काल रात्री चांगला आराम झाल्यामुळे अगदी फ्रेश वाटतंय. आज रविवार आहे, त्यामुळे किंचित उशीरा निघायचं आहे. पण पहाटे जाग आली, म्हणून लवकर उठून बाहेर चक्कर मारली तर बाहेर सर्व शांतता आहे. चहाचं हॉटेलही बंद आहे. मग आवरून आरामात सातला बाहेर पडलो. आता हॉटेल सुरू झाली आहेत. नाश्ता करताना माझ्या सायकलीला बघून अनेक बस ड्रायव्हर आणि कंडक्टर्सनी माझी विचारपूस केली! जवळच मलकापूर बस स्टँड आहे. थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलून पावणे आठला मलकापूरमधून निघालो. गेले चार दिवस काय बघायला मिळालं आहे! आणि आजचा टप्पाही अतिशय जबरदस्त असणार. आज फक्त ९२ किलोमीटरच जायचं आहे, पण रस्ता सतत चढ- उताराचा आहे. ह्या वाटेवर एकदा आठ वर्षांपूर्वी आलो होतो, ती आठवण मनात आहे. शिवरायांच्या विशाळगडाजवळून हा रस्ता जातो! मलकापूरवरून निघाल्याबरोबर नजा-यांची मालिका सुरू झाली!

पावसाचं वातावरण अजिबात नाही आहे व चांगलं ऊन पडलंय. पण ह्यामुळे रस्त्यावर दाट झाडीतून जाताना सावलीमुळे मध्ये मध्ये खड्डे दिसत नाही आहेत. काल दिसलेल्या पवन चक्क्याही सोबतीला आहेत. लवकरच आंबा गावात पोहचलो. इथून एक रस्ता विशाळगडाकडे जातो! वा! हळु हळु आधी सगळीकडे दिसत असलेले डोंगर फक्त समोर उरले आणि हळु हळु तेही हटत आहेत! आता पंधरा किलोमीटरचा आंबा घाट लागेल! पण मला तो उतरायचा आहे. अर्थात् असे घाट उतरतानाही तितकीच काळजी घ्यावी लागते व ते तितकंच अवघडही असतं. हळु हळु रस्ता खाली उतरतोय आणि दूरवर कोंकणाची जमीन दिसतेय! उतरताना हळु जाणारे ट्रक्स व ट्रेलर्स मध्ये येत आहेत. मध्ये एका जागी माकडांची टोळीही आहे! पण नजारे, अहा हा! इतक्या मोठ्या डोंगरातून असा रस्ता आहे, हेच एक आश्चर्य आहे. थोडं थोडं थांबत व फोटो घेत घाट उतरत राहिलो. मध्ये एक दोन वेळेस अचानक ढग दाटून आल्यामुळे किंचित अंधार झाला व तेव्हा हाच घाट किंचित घाबरवून गेला! पण लवकरच आंबा घाट ओलांडून हापूसच्या राज्यात प्रवेश केला- रत्नागिरी जिल्हा! आता सर्व आसमंत बदलत जातोय. इथे आता साखरपा गावात माझ्या एका सायकल मित्रांना- महेश गवळेंना भेटेन. सायकल नेटवर्कमध्ये असल्यामुळे त्यांच्यासोबत संपर्क झाला. त्यांनी इथल्या रस्त्यांबद्दल मला खूप मार्गदर्शनही केलं आहे. त्यांच्यासोबत साखरप्यामध्ये नाश्ता केला. इथपर्यंत ३५ किलोमीटर झाले आहेत, त्यामुळे एकदा स्वत:ला रिचार्ज करून घेतलं. मस्त गप्पा झाल्या. महेशजीही सायकल चालवतात. ते माझ्यासोबत पुढे दहा किलोमीटरपर्यंत येतील. साखरप्याहून निघाल्यावर कोंकण पदोपदी जाणवतं आहे! सतत चढणारा- उतरणारा रस्ता, लाल माती, छोटी कौलारू घरं आणि रमणीय दृश्ये! रत्नागिरी जिल्हा! थोडा वेळ सोबत येऊन राजापूरचा चांगला रस्ता दाखवून महेशजी परत फिरले. छोटी पण मस्त भेट झाली!

आता पुढचा टप्पा मुंबई- गोवा हायवेवरचं लांजा आहे. पण त्याआधी रस्ता खूपच निर्जन भागातून जातोय आणि वातावरणही बदलत जातंय. आधी तर अर्ध्याहून अधिक आकाश मोकळं होतं. अचानक ढगांचं आक्रमण झालं आणि समोर काळे दाट ढग व पाऊस दिसला आणि येऊन आदळला लवकरह! ह्या प्रवासाचं ठरवत असताना मला देवगडच्या नातेवाईकांनी वारंवार सांगितलं होतं की, पावसाळ्यात कोंकणात सायकलीवर येऊ नकोस, इतका मोठा पाऊस पडतो की, हाल होतील. ती भिती मनात आहे. एकदम मोठा पाऊस सुरू झाला. पण सायकल न थांबवता जात राहिलो. पावसातल्या नजा-यांचा आनंद घेतला. आणि थोड्या वेळाने पाऊस मंदावला, फक्त रिमझिम सर राहिली आणि मग थांबलाच. आता परत फोटो घेता येत आहेत. पाऊस थांबला, पण नजारे बरसतच आहेत! इतके जबरदस्त नजारे की, आपोआप मनात गाणी सुरू व्हावीत- "होशवालों को ख़बर क्या बेखुदी क्या चीज़ है, साईकिल चलाईए, फिर समझिए जिन्दगी क्या चीज़ हैं!” किंवा- "नजारे अपनी मस्तियाँ दिखा दिखा के सो गए, सितारें अपनी रोशनी लूटा लूटा के सो गए, खिज़ा का रंग आ चला है मोसम ए बहार में...”

हळु हळु लांजा जवळ येतंय. पण रस्ता इतक्या कमी वस्तीच्या भागातून जातोय की, मधून मधून विचारावं लागलं. लांजा गावात पोहचलो तेव्हा छान वाटलं. आता इथून राजापूरपर्यंत सरळ हायवे! काल दुपारी जेव्हा तब्येत थोडी नरम होती व एक दिवस थांबायची इच्छा होत होती, तेव्हा "दूर बनाई‌ थी मन्जिल पर रस्ते में ही शाम हुई" गाणं आठवत होतं. आणि आता मुंबई- गोवा हायवेवर आल्यावर हे आठवतंय- "हम है नए, अन्दाज़ क्यों हो पुराना!” सायकल चालवताना मध्ये मध्ये विचार थांबवण्यासाठी व मनाला एंगेज ठेवण्यासाठी नेहमीच मनातल्या मनात गाणी ऐकतो. कधी कधी तर एखादं गाणं आपोआपही सुरू होतं. आत्ता इतकं मस्त वाटतंय, रोमांचक वातावरण आहे आणि तरीही "दूर बनाई थी मन्जिल पर रस्ते में ही शाम हुई" गाणं आपोआप सुरूच आहे! त्या गाण्यातली बासरी मनात वाजतेय सारखी! त्यामुळे हसूही येतंय!


मुंबई- गोवा हायवे

लांजामध्ये बस स्टँडच्या पुढे एका छोट्या चहा स्टॉलवर थांबलो. इथे गरम वडेही आहेत. हा स्टॉलवाला चालवणारा माणूस भन्नाट आहे! त्याने आधी माझी मुलाखत घेतली. त्याला खूपच आवडलं मी असा आलोय ते. तसंच कोंकणात गणेशोत्सवाच्या तयारीचं वातावरण सुरू आहे, त्याचा उत्साह आहेच. त्यातच मी असा सायकलीवर आलो. तो म्हणाला नंतर की, माझ्याकडून पैसे घेणार नाही, कारण मी एक प्रकारचा यात्री आहे आणि जेव्हा कोणी असा यात्री (तीर्थयात्रा टाईप, पायी चालत किंवा विद्यार्थ्यांचा दौरा अशा प्रकारचे यात्री) येतो, तेव्हा तो कोणाकडूनच पैसे घेत नाही. आणि तो खरंच खूप आपुलकीने सांगतोय. मी पैसे दिलेह, पण त्याने मला एक्स्ट्रा वडा व जास्तीचा चहाही दिला. आत्तापर्यंत नैसर्गिक कोंकणासोबत भेटत होतो, आता साध्या- सरळ माणसांच्या कोंकणाची भेटही सुरू झाली! येवा कोंकण आपलाच आसा! आजच्या प्रवासातली दुसरी मस्त भेट! लांजाच्या पुढे परत पाऊस आला. पहिल्यांदाच मुंबई- गोवा हायवेवर सायकल चालवतोय! मध्ये मध्ये हा 'हायवे' अशा डोंगरातून जातोय, चढ- उतारांबरोबर छोटे घाटही लागत आहेत, त्यामुळे जाणवतंच नाहीय की हा काही हायवे आहे! अद्भुत नजारे सुरूच आहेत!


राजापूरची अर्जुना नदी

सतत चढता- उतरता रस्ता! थेट हिमालयाचीच याद येता! हिमालय व कोंकणात असंख्य फरक आहेतच, पण मला काही सारखेपणाही वाटतोय. हिमालयात आपण जसे अनेक डोंगर चढतो- उतरतो, तसंच इथेही चार पावलं चाललं तरी त्यात चढ- उतार लागतोय. आणि आपण हिमालय उतरून जेव्हा सर्व डोंगर पार करतो, तेव्हा आपल्याला उत्तर भारतीय मैदान लागतं, तसंच इथेही जेव्हा सर्व चढ- उतार संपतील, तेव्हा समुद्र सपाटी लागते! आज मी राजापूरलाच थांबण्याचं जे ठरवलं, ते योग्यच ठरलं. कारण राजापूरला पोहचता पोहचताच दुपारचे तीन वाजले आहेत. इथून देवगड फक्त ५१ किमी दूर आहे, पण रस्ता सतत चढणारा- उतरणारा आहे. त्यामुळे ५१ किमीसाठी वेळ जास्त लागेल. खरं तर चांगला हायवेसारखा रस्ता असेल तर चढ- उतार आपोआप एकमेकांना बॅलन्स करतात (पुणे- सातारामध्ये झालं तसं). पण इथे रस्ता सतत वळत असतो व कोणत्याच चढ किंवा उतारावर विश्वास ठेवता येत नाही. उतार बघून हाय गेअरमध्ये सायकल चालवली तर लगेचच चढ समोर येतो. शिवाय उतार असला तरी अनेक दगड किंवा खड्डे असल्यामुळे उतार पूर्ण कॅश करता येत नाही. त्यामुळे आजसुद्धा ९४ किलोमीटरसाठी जवळ जवळ कालच्या इतकाच वेळ म्हणजे साडेसहा तास लागले. काल त्याहून थोड्या जास्त वेळात ११४ किमी झाले होते. आज फक्त ९४ झाले. कारण चढ खूप जास्त आहे. आंबा घाटात १५ किलोमीटर उतार नक्की होता, पण तिथेही हळुच उतरावं लागलं. आणि नंतर तर चढ- उतार सुरूच होते. राजापूरमध्ये पोहचेपर्यंत १४५३ मीटर हाईट गेन झाला आहे.


आजचा लेखाजोखा


लाल माती!

आज जरी ९४ किलोमीटर सायकल चालवली असली, तरी सपाट प्रदेशातल्या १२५ किमीपेक्षाही ते अवघड होतं. त्यामुळे जणू तीन दिवसांमध्ये माझं तिसरं शतकच झालंय, असं वाटतंय! वा! माझ्या देवगडच्या नातेवाईकांचे एक स्नेही राजापूरला राहतात, त्यांच्याकडे मुक्काम केला. राजापूर तालुक्याचं गाव आहे, पण अगदी डोंगर चढावावर वसलेलं गाव! अशा छोट्या गावात कोंकणी घरात राहण्याचा दुर्मिळ योग आज मिळाला! आज जास्त थकलो नाही, फक्त वेळ जास्त लागला. एका बाजूने अजूनही विश्वास वाटत नाहीय की, मी देवगडच्या इतका जवळ आलोय, इथून देवगड फक्त ५१ किमी! मनाने तर आत्ताच पोहचलो आहे, कारण इतकी सायकल चालवल्यावर राहिलेले ५१ किमी अजिबात कठीण नाहीत. खरंच अद्भुत दिवस सुरू आहे, अद्भुत प्रवास सुरू आहे!

पुढील भाग: बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ५: राजापूर- देवगड़ (५२ किमी)

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2018 - 10:36 pm | चौथा कोनाडा

थरारक भन्नाट वर्णन आणि सुपर भन्नाट फोटोज !
मार्गी +१,१११/-

मेघनाद's picture

28 Oct 2018 - 8:08 am | मेघनाद

मार्गी साहेब,

मस्त चाल्लाय प्रवास, राजापूरच्या पुढच्या प्रवासात हातिवले - डोंगर तिठा/अणसुरे - कात्रादेवी - आंबेरी पूल - पडेल तिठा अशी नाव येतील असं वाटतंय. माझं आजोळ आहे जवळच मिठगवाणे गावात. आणि माझं मूळ घर गिर्ये गावात. देवगडच्या रस्त्यावर असताना दिसणाऱ्या पवनचक्या गिर्ये गावात आहेत. (विजयदुर्गाच्या बाजूला)

हा सर्व परिसरच फार रम्य आहे... एक वेगळीच अनुभूती मिळते ह्या भागात आल्यावर.

पुढचं वर्णन जरा डिट्टेल मध्ये येऊ द्या... मजा येते वाचायला.

प्रचेतस's picture

29 Oct 2018 - 8:26 am | प्रचेतस

मस्त लिहिताय.

मार्गी's picture

29 Oct 2018 - 11:25 am | मार्गी

अनेक धन्यवाद! :)

@ मेघनाद जी, हो, अर्थातच! लिहेन सविस्तर.

नया है वह's picture

29 Oct 2018 - 4:22 pm | नया है वह

वर्णन आणि फोटोज +१११

सिरुसेरि's picture

30 Oct 2018 - 6:27 pm | सिरुसेरि

छान वर्णन