च वै तु हि

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
15 Oct 2018 - 3:24 pm

सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत्वाने वापरतात की त्यांचे वैशिष्ट्य कमी होऊन ते सामान्य होऊन जातात.

आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'... किंवा 'अमुक अमुक असं जेव्हा घडतं तेव्हा कुठेतरी सांगावंसं वाटतं की....' किंवा '.... असं आपल्या मनाला जेव्हा कुठेतरी जाणवतं तेव्हा....'. कधी कधी एखादा कवी देखील लिहून जातो की 'हृदयात कुठेतरी हलल्यासारखं वाटतं'. ह्या मंडळींना कदाचित वाटत असावं की ह्या 'कुठेतरी' शिवाय पाहिजे ते गांभीर्य वाक्याला येणार नाही.

कुठेतरी मध्ये ठिकाणाबद्दल एक अनिश्चितता आहे, तर काही जणांना ठिकाणाची निश्चितता मांडायला आवडतं. जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने 'या ठिकाणीच' घडत असतात. 'आज या ठिकाणी आपल्याला भाऊसाहेब अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत... त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे ...' किंवा बोलण्याच्या भरात ह्या वक्त्यांना अचानक संतवचनांची किंवा कवितांची आठवण होते तेव्हा '... याठिकाणी संत तुकारामांनी सुध्दा म्हणून ठेवलेलं आहे...' वगैरे वगैरे.

न्युज चॅनलवर कधी कधी एखादा राजकीय पुढारी चर्चेत भाग घेतो. चर्चा अगदी जोरात चालू असते. मग मध्येच कधीतरी ह्या पुढाऱ्याला त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याची संधी दिली जाते. तेव्हा अगदी हटकून सगळे पुढारी 'निश्चितपणे' शब्द वापरतात. आठवून पहा.. 'आज तुमच्या माध्यमातून मी हे निश्चितपणे सांगू इच्छितो की आमचा पक्ष निश्चितपणे सामान्यांच्या पाठीशी उभा राहील... जंतेचे प्रश्न आम्ही निश्चितपणे मांडू....'.

असाच एक माझा आवडता शब्द म्हणजे 'वगैरे'. खरं तर एकापेक्षा जास्त गोष्टी किंवा कृती असतील तर वगैरे शब्द वापरावा असं व्याकरण सांगतं. पण मी हा शब्द फारच मुक्तपणे वापरतो. 'आज मी खेळायला वगैरे गेलो होतो' इथपर्यंत ठीक आहे.. पण 'आज काय वाढदिवस वगैरे आहे की काय!' हे जरा फारच झालं. वैभव जोशी यांची तर 'वगैरे' शब्दावरून एक संपूर्ण कविताच आहे. आपल्यापैकी अनेकांनी सचिन खेडेकरांनी केलेलं हे सादरीकरण वगैरे पाहिलंच असेल.

मागे मी बेंगलोरला राहत असताना कर्नाटकी हिंदीची अशीच मजा आली होती. (काही अज्ञ लोकांसाठी सूचना - बेंगलोरमध्ये हिंदी बोलतात बर का.) वेटर येऊन विचारायचा - 'सार (म्हणजे sir), क्या होना?' यावर 'मेरे पापा कहते है की मै बडा होकर इंजिनियर बनुंगा' हे उत्तर अपेक्षित नसून 'टी या कापी' हे अपेक्षित असतं. 'छुट्टा होना तो इधर नही, कोई दुसरा दुकानमे पुचना' असं कोणी दुकानदार खेकसायचा. कानडी लोकांबरोबर कधी जनगणमन म्हणलं आहे का? शेवटच्या ओळीत ते 'जनगण मंगळदायक जय हे' असं म्हणतात. 'ळ'चा अभिमान ही तर दक्षिणेतल्या भाषांची स्पेशालिटी! कर्नाटकी हिंदीवर एक आख्खा लेख होऊ शकेल, तो नंतर केव्हा तरी. पण तो 'क्या होना' अजूनही डोक्यातून जात नाही.

इंग्रजी बोलताना अडखळणे टाळण्यासाठी तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर like, की, actually आणि means या शब्दांचा अनवधानाने वापर केला जातो. 'I was telling you... की she is my .... like ... not so favorite singer... means.. actually she is not that bad ... but like ... you know'.

संस्कृत काव्यामध्ये याच प्रकारे वै, , हि आणि तु हे चार एकाक्षरी शब्द वापरले गेलेले आहेत. 'भोजनान्ते च किं पेयं, जयन्त: कस्य वै सुत:' यासारख्या वाक्यांमध्ये च, वै वगैरे शब्द केवळ ते वाक्य छंदात (मीटरमध्ये) बसवायला मदत करतात. पुढे पुढे हे प्रकार इतके वाढले की केरळ मधल्या 'तोल' नावाच्या संस्कृत कवीने ह्या गोष्टीची खालिल श्लोकात खिल्ली उडवली आहे. -

उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेन्द्र मुखं प्रक्षालयस्व टः।
एष आह्वयते कुक्कु च वै तु हि च वै तु हि॥

पहिल्या वाक्यात राजाला उठून तोंड धुवायला सांगताना 'मुखं प्रक्षालयस्व' पर्यंत अर्थ पूर्ण लागतो, मग तो पुढचा 'टः' काय आहे? या वाक्यात (या ठिकाणी) मुखं प्रक्षालयस्व पर्यंत ७ अक्षरे आल्यामुळे वृत्तात एक अक्षर कमी पडतं. दुसऱ्या वाक्यात कोंबडा आरवतो आहे हे सांगताना 'एष आह्वयते कुक्कुट:' असं पाहिजे पण इथे एक अक्षर जास्त आहे. तेव्हा ह्या कवीने दुसऱ्या ओळीतला 'ट:' काढून सरळ पहिल्या ओळीत टाकला. आणि त्यावर कडी म्हणजे 'कोंबडा आरवतो आहे' हे अर्ध्या ओळीत सांगून झाल्यावर पुढे काही सांगावंसं राहिलं नाही, मग उरलेली ओळ कशी पूर्ण करायची? तर ह्या करामती कवीने सरळ 'च वै तु हि च वै तु हि' टाकून दिलं. टीका करावी तर अशी!

असेच आणखी काही विशेष शब्द कुठेतरी विशेषत्वाने वगैरे वापरलेले तुम्हाला माहिती असल्यास या ठिकाणी निश्चितपणे सांगा.

- शंतनु

(हा लेख २०१५ मध्ये लिहिलेल्या माझ्याच ब्लॉगवरून पुनःप्रकाशित)

भाषाप्रतिशब्दवाक्प्रचारलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

15 Oct 2018 - 3:56 pm | श्वेता२४

शेवट तर फारच गंमतशीर. कानडी हिंदीबद्दल स्वतंत्र लेख लिहाच. खूप आवडलं

पुष्कर's picture

16 Oct 2018 - 10:30 am | पुष्कर

धन्यवाद श्वेता२४

अनिंद्य's picture

15 Oct 2018 - 4:20 pm | अनिंद्य

फार आवडला लेख.

'च वै तु हि च वै तु हि' हे माहित नव्हते.

कुठेतरी (आणि त्याचं हिंदी भावंडं 'कहीं-न-कहीं), याठिकाणी, निश्चितपणे (म्हणजे आपलं 'निच्चीतपणे' हो) आणि वगैरे .... कोणी हे वापरत असल्यास त्याचवेळी 'म्यूट' बटन दाबायची अनिवार इच्छा होते राव :-)

टीव्ही बातम्यांमध्येही 'नेमकं काय घडलंय' हे वार्ताहराकडून जाणून घेण्याच्या भागाचा उबग येतो - अर्थहीन शब्दप्रपातातून 'नेमकं' काहीच हाती लागत नाही :-)
तसेच 'हे जे आहे - ते जे आहे'.... 'जसे की तुम्ही बघू शकता' ..... 'खरेतर' ... 'तसे बघायला गेलं तर'

'क्या होना' हैद्राबादेतही आहे, विदर्भातही.

कानडी-हिंदी ड्युएटच्या प्रतीक्षेत,

अनिंद्य

पुष्कर's picture

16 Oct 2018 - 10:34 am | पुष्कर

नेमकं काय घडलंय - खरंच की! तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं. तो निलेश साबळे तर सगळ्याच लोकांचा उल्लेख 'दिग्गज' असा करतो. त्याने मूळ दिग्गज्जांच्या दिग्गजत्वाला आता तेवढी व्हॅल्यूच राहिली नसावी असं वाटतं. तसंच बरेच मराठी कलाकर 'विलक्षण' शब्द फार वापरतात असं माझ्या बायकोचं निरीक्षण आहे.

सुबोध खरे's picture

15 Oct 2018 - 6:23 pm | सुबोध खरे

याचे मराठी भाषांतर असलेला श्लोक मी लहानपणापासून ऐकत आलो आहे तो म्हणजे असा
उठ उठ महाराजा धू त्वरे वदनासी डा
पहाटे आरवे कोंब च वै तु हि च वै तु हि

सक्काळी सक्काळी रामप्रहरी रेल्वे रूळ जवळ करणाऱ्या महाभागांसाठी -

उठ उठ महाराजा धू त्वरे पार्श्वभागाशीं डी
ओरडे दूर हॉर्न आगगा च वै तु हि च वै तु हि

पुष्कर's picture

16 Oct 2018 - 10:36 am | पुष्कर

हे खत्तरनाक आहे! फक्त दुसर्‍या ओळीच्या पहिल्या चरणात मीटर गडबडला आहे. तेवढा 'दूर' शब्द दूर केलात की काम होईल.

पुष्कर's picture

16 Oct 2018 - 10:35 am | पुष्कर

हा श्लोक भारी आहे! आधी ऐकला नव्हता. आवडेश!

नाखु's picture

15 Oct 2018 - 8:26 pm | नाखु

बॅटोबाने एक भांडे गडगडले त्यावरचा मोरोपंत रचित काव्य आठवलं.
त्याचा मिपावरील वावर असं आठवायला भाग पाडतो.

नाखु वाचकांचीही पत्रेवाला

पुष्कर's picture

16 Oct 2018 - 10:38 am | पुष्कर

त्याचे लिखाण मी बरेच दिवस वाचले नाही; बरी आठवण केलीत. लगेच (अंधारात) त्याचा शोध घेतो.

श्रीनिवास टिळक's picture

15 Oct 2018 - 8:28 pm | श्रीनिवास टिळक

आपल्या लेखात केरळमधील एक संस्कृत कवी "तोल" याचा उल्लेख आहे, त्याच्याबद्दल अधिक माहिती असल्यास ती येथे द्यावी हि विनंती. किंवा इतरत्र ती कुठे मिळू शकेल?

पुष्कर's picture

16 Oct 2018 - 10:44 am | पुष्कर

हा प्रश्न मला देखिल पडला होता. पण त्याबद्दल फार माहिती मिळत नाही. काही ठिकाणी त्याचं नाव 'तोलन' असं आहे (मुख्यतः मल्याळी लेखांत). काही मल्याळी ब्लॉगलेखकांनी तोलन विषयीच्या आख्यायिका लिहिलेल्या आहेत. त्यावरून तो 'विनोद' हा प्रकार बर्‍याच प्रमाणात हाताळत असावा असं मानायला जागा आहे. काहींनी तोलच्या नावावर आणखीही काही श्लोक दिलेले आहेत. परंतु हे सर्व संभाषण-स्वरूप किंवा/आणि ब्लॉग-स्वरूप लिखाण असल्यामुळे त्याबद्दल अधिकृत माहिती मिळण्यासाठी योग्य नाहीत.

ज्योति अळवणी's picture

22 Oct 2018 - 4:23 am | ज्योति अळवणी

आवडला आणि पटला सुद्धा हा लेख

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2018 - 5:32 am | नगरीनिरंजन

आवडला.