सेक्रेड गेम्स: ठो-कळे

Primary tabs

वनफॉरटॅन's picture
वनफॉरटॅन in जनातलं, मनातलं
3 Sep 2018 - 10:55 am

भारतीय woke लोकांसाठी कंटेंटचं इतकं दुर्भिक्ष्य आहे, की अक्षरश: कोणतीही नवीन कलाकृती मस्त खपून जाते. त्या कलाकृतीला खरोखर चांगलं निर्मितीमूल्य, दर्जेदार लेखन/दिग्दर्शन मिळालं की ती प्रेक्षकांच्या मनात अढळपद मिळवते. ह्यामुळे इतर म्हणाव्या तर बारीक, म्हणाव्या तर गंभीर चुकांकडे सरसकट दुर्लक्ष होतं.
(पुढील लेखात पांढऱ्या ठशांत 'रसभंग' आहेत.)
नेटफ्लिक्सची सेक्रेड गेम्स ही आजकाल अतिशय चर्चेत असलेली भारतीय मालिका. मालिका त्रैभाषिक आहे. मुख्य पात्रांतले संवाद हिंदी/इंग्रजीत असले तरीही कथा मुंबई पोलिसांभोवती फिरणारी असल्यामुळे मराठीचा वापर इंग्रजीपेक्षा जास्त आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने ह्या दिग्दर्शकांची कामगिरी खरंच दर्जेदार आहे. मूळ कथा, लेखक विक्रम चंद्रा ह्यांची आहे. समांतर कथानके अत्यंत वास्तवदर्शी आणि आशयघन आहेत.

मुंबईत एका इमारतीच्या खालून आपल्याला दिसतं, की एक पांढराशुभ्र कुत्रा खाली पडत आहे. तो पडतो. रक्ताच्या थारोळ्यात त्याचं शव दिसतं. बाजूला उभ्या शाळकरी मुलांचा थरकाप उडतो, आणि प्रेक्षकाला कथानकाची एक झलक दिसते. त्यानंतर एन्ट्री होते नवाझुद्दीन सिद्दीकीची. ह्याचं नाव असतं गणेश गायतोंडे. ह्याचे वडील भिक्षुक असतात. साधारण दहा मिनीटांत गणेशचं बालपण, हिंदुत्व, ब्राह्मण्य, निरागसता इ. आटपते. तो अर्थातच मुंबईला जातो. इथे येऊन, हा इसम बरेच उद्योग करतो. कथानकाच्या सुरुवातीच्या दिवशी इन्स्पेक्टर सरताज सिंग (सैफ अली खान) ह्याला फोन करतो. सरताज स्वत:च्या वडिलांचं नाव गणेशकडून ऐकल्यावर गंभीर होतो आणि फोनचं लोकेशन शोधून काढतो, आणि गायतोंडेच्या बंकरसदृश खोलीमध्ये शिरतो. इथे गणेश, 'मी अश्वत्थामा आहे, आणि २५ दिवसांत मुंबईला वाचवायचं असेल तर वाचव' असं म्हणून सरताजसमोर आत्महत्या करतो.
सरताज हा एका प्रकरणात खोटी साक्ष न दिल्यामुळे वरिष्ठांच्या दबावाखाली पिचलेला असतो. त्याला अतिमहत्त्वाची केस मिळते, आणि हे हलाहल रिचवून तो स्वत:ची कारकीर्द मुंबई वाचवण्यासाठी सिद्ध होतो.

मग एन्ट्री होते रॉ अधिकारी अंजली माथुरची. राधिका आपटे ह्या व्यक्तीस आर्ट्स-डिग्री-कॉलेजवयीन woke मुलीचं व्यक्तिमत्त्व सोडून बाकी काही साकारता येतं असं वाटत नाही. मालिकेत अनेक पात्रे आहेत. जितेंद्र जोशीने हवालदार काटेकर जीव ओतून साकारला आहे. प्रत्येक बारीकसारीक चेहऱ्यावरचे आविर्भाव त्याने ताकदीने पेश केलेले आहेत. मुळात मराठी असल्यामुळे मराठीचा लहेजा त्याच्या संवादांत उतरलेला आहे.
ह्यानंतर गृहमंत्री बिपीन भोसले (गिरीश कुलकर्णी), डीसीपी पारुलकर (नीरज काबी), झोया मिर्झा (एल्नाझ नरौझी) दीपक 'बंटी' शिंदे (जतिन सर्ना) इत्यादी पात्रे येतात. मुळात वेबसिरीज असल्यामुळे प्रत्येक भागाची रुपरेषा सांगण्यात कथानकाचाच रसभंग होऊ शकतो. कथा इतकी वास्तवदर्शी करायचीच होती, तर मराठीचा लहेजाही पात्रांकडून घोळवून घ्यायला हवा होता. अमराठी पात्रांकडे अत्यंत कमी मराठी संवाद आहेत. पारुलकराचं मराठी कानांना चरे पाडतं. लहान गणेश गायतोंडे साकारणाऱ्या सनी पवारच्या एकमेव वाक्यातही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर काटेकरची (खरंतर जितेंद्र जोशीची अत्यंत अस्खलित असलेली, पण भूमिकेसाठी बेतलेली) मुंबई-मराठी, मुंबई-हिंदी अत्यंत दर्जेदार आहे. काटेकर आणि सरताजच्या भाषा शिवराळ आहेत, तरीही काटेकर अगदी 'इथला'च वाटतो.

अंजली माथुर हा प्रकार डोळ्यांना त्रासदायक आहे. रॉची अधिकारी ती अगदीच वाटत नाही. एखाद्या महाविद्यालयातील स्टुडंट्स युनिअनची प्रमुख इ. वाटते. तिचा अभिनय अत्यंत ठोकळ्यासारखा झालेला आहे. तिच्या चालण्याबोलण्यात उसना आणलेला आत्मविश्वास भासतो. सरताजचंही तेच. सैफचा 'दिल चाहता है' पासूनचा 'कूल' ॲक्सेंट अजूनही गेलेला नाही. तरीही त्याने बऱ्यापैकी जीव ओतून काम केलेलं आहे. पण शेवटी, त्याला बऱ्याच चित्रपटांतून पाहिलेलं असल्यामुळे इथेही तो ठोकळाच भासतो. नवाझुद्दिन सिद्दीकीचा अभिनय तसाच ठोकळेबाज. शिवाय त्याचा स्वत:चा अत्यंत जड उत्तर प्रदेशी लहेजा त्याला सोडता आला नाही. त्याचे 'अस्वत्थामा', 'बालब्रम्मचारी' इ. उच्चार वडील भिक्षुक असलेल्या ब्राह्मण इसमाचे असतील, हे पटत नाही. मुळात नवाजुद्दिन सिद्दीकीने नवाजुद्दीन सिद्दीकीच साकारलेला आहे इतकंच त्याच्या भूमिकेचं सार आहे.

बंटी आणि बिपन भोसले हे प्रकार उत्तम आहेत. गिरीश कुलकर्णीने टिपीकल मराठी मंत्री उत्तम साकारलेला आहे. त्याचा लहेजा, अभिनय, रुबाब, भिती अतिशय उत्तम. बंटीचं मराठी सदोष असलं तरी ते खपून जातं, कानाला चरे पाडत नाही. जतिन सर्नाने 'म्याटर' करणारा मराठी मुलगा मस्त साकारलेला आहे. ल्यूक केनीचा माल्कमही भाव खाऊन जातो. संगीत आणि टायटल सिक्वेन्स बराच 'गेम ऑफ थ्रोनी' आहे.

कथेबद्दलचा एक मुद्दा म्हणजे टिपीकल हिंदूंच्या (पदोपदी दुखावल्या जाणाऱ्या) भावना दुखावणारी आहे. हिंदू हॉटेलातल्या जेवणात चिकन टाकणे, बंटीने मशिदीबाहेरच्या भिक्षुकांना पान थुंकलेला शिधा देणे, नंतर निरपराध मुसलमानांना ठार करण्याचे आदेश गणेशने देणे, मुसलमान युवकांची होणारी परवड, इ. दाखवून मुद्दाम हिंदूंना डिवचून फूटेज गोळा करण्याचा इरादाही असण्याची शक्यता आहे. टिपीकल हिंदुत्ववादी भाष्य म्हणजे: "असं 'त्यांच्या'बाबतीत होताना दाखवलं असतं तर..." करता यायला बर्राच वाव ठेवलेला आहे.

निष्कर्ष म्हणजे, कथा आणि हिंसा आवडत असेल तर जरुर पहावी. प्रत्येक भागात सरासरी तीन मुडदे पडतात. आठ भागांची मालिका असल्याने एका 'ठ्ठो!' नंतर त्यामागचा संदर्भच कळायचा राहून जातो, किंवा कळेपर्यंत प्रेक्षक तो विसरलेला असतो. ठो आणि कळणे ह्या दोन्ही भागांतले दुवे ठोकळ्याठोकळ्याने, अनेक समांतर कथानकांनी जोडलेले आहेत. ही कथानके आणि त्यायोगाने पूर्ण कथा मात्र वेगाने घडणाऱ्या अनेक गोष्टींमुळे अतिशय रंगीत आणि आकर्षक, वेगवान झालेली आहे, आणि परिणामत: अख्खी मालिका एक रुबिकचा ठोकळा बनलेली आहे. आवडणाऱ्यांना अत्यंत आवडेल, न आवडणाऱ्यांना सरळ किळस येईल.

कलाkathaaचित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

3 Sep 2018 - 11:09 am | महासंग्राम

आणि २० दिवसांत मुंबईला वाचवायचं असेल तर वाचव'

२० नाही २५ दिवसांत वाचवायचे असते.

आपला नम्र,

गणेश गायतोंडे
( सारे मरणार फक्त त्रिवेदी वाचणार )

वनफॉरटॅन's picture

3 Sep 2018 - 11:27 am | वनफॉरटॅन

क्षमस्व. जमल्यास बदल करेन.

कंजूस's picture

3 Sep 2018 - 2:42 pm | कंजूस

जबरी -
नॅाटॅठोम पांढरे ठोकळे कुठेत?

कभी कभी लगता है की साला अपूनहीं भगवान है!

धर्माच्या नावावर लोकांना कसं वेडं बनवून त्यांचं ध्रुवीकरण करुन आपला फायदा करून घ्यावा हे अगदी ठसठशीतपणे दाखवलंय.

राधीका आपटेच्या अभिनयाबद्दल सहमत. तीने सगळ्या भागांत मोबाईल हरवल्याप्रमाणं भाव चेहर्यावर दाखवत अभिनय केलायं.

नाखु's picture

3 Sep 2018 - 5:10 pm | नाखु

नाही आणि आता तर नक्कीच बघितला नाही तरी चालेल

वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

मार्कस ऑरेलियस's picture

3 Sep 2018 - 10:07 pm | मार्कस ऑरेलियस

नकाच बघु नाखुन चाचा,

अत्यंत बटबटीत आणि बीभत्स आहे काही काही सीन्स ! उगाचच काहीतरी सेक्स आणि व्हायोलन्स दाखवायचा म्हणुन दाखवलं आहे !

अर्थात ज्या लोकांना ही अभिजात कलाकृती, अभिव्यक्ती स्वातंत्र वगैरे वाटते त्या लोकांना पाहुन मला एक प्रकारचे आसुरी समाधान लाभले ! समाजातील काही विशिष्ठ वर्गाच्या साहित्य संगीत कलेविषयीच्या मुल्यांचे इतके अधःपतन होत असेल तर ही बाब नक्कीच दुसर्‍या वर्गासाठी दिलासादायक आहे =))))

महासंग्राम's picture

4 Sep 2018 - 11:12 am | महासंग्राम

चाचा, पहाणार असाल तर फक्त जितेंद्र जोशी साठी पहा एकदा

आपला नम्र,

इन्स्पेक्टर सरताजसिंग
( सारे मरणार फक्त त्रिवेदी वाचणार )

सतिश गावडे's picture

4 Sep 2018 - 10:26 pm | सतिश गावडे

चाचा, पहाणार असाल तर फक्त जितेंद्र जोशी साठी पहा एकदा

आय कावली ;)
अर्थात +१

उगा काहितरीच's picture

3 Sep 2018 - 8:45 pm | उगा काहितरीच

ओके! मला वाटलं होतं मलाच आवडलं नाही. आत्ता पर्यंत पाहिलेल्या सिरीजेसशी (GOT , Breaking Bad वगैरे) तुलना केल्यास खरंच आवडलं नाही. GOT मधे पण हिंसक दृश्य आहेत , नग्नता आहे पण कुठेच अस्थानी , बळजबरी टाकण्यात आलंय असं वाटत नाही. पण इथे काही काही दृश्य उगाच टाकण्यात आले असं वाटतं ! पण , तरीही एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच झालेल्या प्रयोगाचे कौतुक आहे. थोडी अजून परिपक्वता (निर्मात्यात अधिक दर्शकातही) यायची गरज आहे. बनतील अजून चांगल्या मालिका.

वनफॉरटॅन's picture

8 Sep 2018 - 7:42 am | वनफॉरटॅन

सहमत. भारतीय साधारण मालिका मी माझ्या तराजूत ठेवलेल्याच नाहीत. ते स्वतंत्र प्राधिकरण आहे. त्यांच्यातला अभिनय, कथा इ. गोष्टींसाठी पिकोग्राममधली वजने लागतात.

मला वाटलं "पुढील पांढऱ्या भागात~~~" एक लिंक दडलीय आणि माझ्या मोबाइलमध्ये ती उघडत नै.

रघुनाथ.केरकर's picture

4 Sep 2018 - 2:58 pm | रघुनाथ.केरकर

अशिच एक वेब सिरिज, नेट-फ्लिक्स वर आहे, तशी जुनी च आहे, पण एकदा बघावी अशी आहे.

तसेच फौडा नावाची आजुन एक सिरिज आहे. ती पण छान आहे.

...केरकर

कंजूस's picture

4 Sep 2018 - 10:01 pm | कंजूस

Woke लोक ?

सतिश गावडे's picture

4 Sep 2018 - 10:24 pm | सतिश गावडे

तुम्ही म्हणताय तशी "सेक्रेड गेम्स" अगदी हटके नसली किंवा त्यात बरेच दोष असले तरी ती टीव्हीवरील वर्षानुवर्षे चालणाऱ्या रतीबापेक्षा नक्कीच उजवी आहे.

ज्यांनी हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून ही सिरीज पाहायची नाही असं ठरवलं आहे त्यांनी ही सिरीज जितेंद्र जोशींनी साकारलेल्या "काटेकर" या मुंबई पोलीस दलातील पोलिसाच्या भूमिकेसाठी तरी आवर्जून पाहा. मला तर सर्व पात्रांमध्ये जितेंद्रचा अभिनय सरस वाटला.

वनफॉरटॅन's picture

8 Sep 2018 - 7:36 am | वनफॉरटॅन

माझंही हेच म्हणणं आहे. बघायचीच नाही, ही भूमिका चुकीची आहे. काटेकरसाठी तरी नक्की बघावी. तितकंच टाकाऊ काही असेल, (उदा. सरकार-३, ओशन्स ८) तर मी लिहीन की सरळ! त्याउप्परही सगळ्यांनी ते पहावंच आणि स्वतःचं मत बनवावं असं मला वाटतं.

उपेक्षित's picture

5 Sep 2018 - 2:45 pm | उपेक्षित

लेखाशी अंशत: सहमत
सरताज बाबत नाही पटले. दिल चाहता है नंतर ओमकारा आणि नंतर सरताज सैफने अगदी जीव ओतून काम केलय यात.
प्रामाणिक पण वरिष्ठांकडून सतत दुर्लक्षिलेला थोडा बल्की (जाड) पोलीस अधिकारी मस्त साकारला आहे.
जित्या आणि सैफ ची जोडी मस्त वाटली बघायला.

बाकी लेखाशी सहमत.

अथांग आकाश's picture

5 Sep 2018 - 7:07 pm | अथांग आकाश

रधिका आपटे सोडली तर बाकी स्टारकास्ट चांगली वाटली. काही सेक्स सिन्स उगीच घुसडल्या सारखे आहेत. तरी एकंदर मालिका चांगली वाटली. मोठं बजेट आणि चांगले दिग्दर्शक असले तर सादरीकरण कसे दमदार करता येते त्याचे उत्तम उदाहरण आहे हि मालिका. एकूण ४ सिझन्स आहेत असं वाचलंय कुठेतरी. बघू कधी येतोय पुढचा सिझन.

वनफॉरटॅन,

रॉची अधिकारी ती अगदीच वाटत नाही. एखाद्या महाविद्यालयातील स्टुडंट्स युनिअनची प्रमुख इ. वाटते. तिचा अभिनय अत्यंत ठोकळ्यासारखा झालेला आहे. तिच्या चालण्याबोलण्यात उसना आणलेला आत्मविश्वास भासतो.

राधिका आपटे ही संशोधन व चिकित्सा विभागाची (रीसर्च अँड अॅनॅलिसिस विंग ची) अधिकारी अजिबात वाटंत नाही. नेमक्या याच कारणामुळे मालिका वास्तववादी वाटते ना?

आ.न.,
-गा.पै.

विशुमित's picture

6 Sep 2018 - 3:11 pm | विशुमित

मान गए, गापै की पारखी नजर और निरमा सुपर दोनो को.

वनफॉरटॅन's picture

8 Sep 2018 - 7:39 am | वनफॉरटॅन

ती रॉच्या ऑफिसात, रस्त्यावर रॉची अधिकारी म्हणून वावरताना, गुन्ह्याच्या जागीही तेच बेअरिंग घेऊन वावरते. मालिकेच्या बाहेर, तिचं सगळीकडे (इतर चित्रपटांतही) तेच बेअरिंग असतं. म्हणून ती टिप्पणी आहे.

गामा पैलवान's picture

8 Sep 2018 - 2:42 pm | गामा पैलवान

वनफॉरटॅन,

तुमचा मुद्दा तत्त्व म्हणून मान्य. खरंतर संहितेत चूक आहे. रॉ चे क्षेत्रीय हस्तक ( = फील्ड एजंट) नेहमी व्यवस्थित सोंग वठवणारे असतात. याउलट कचेरीतले अधिकारी फक्त खोटा परिचय देतात. राधिका आपटे या दोहोंपैकी एकही वाटंत नाही. कारण की तिला सोंग वठवायला लावलंच नाही. संहिता या बाबतीत भोंगळ आहे.

आ.न.,
-गा.पै.