इंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते.
मी लॉंगऑफला उभा होतो. विकेटमागे धोनी, ही जोडी कशी फोडावी या विचारात होता. ॲलिस्टर कुक जरा चाचपडत होता पण उपुल थरंगा अगदी फॉर्मात बॅटींग करत होता. हरभजनला अगदी निष्प्रभ करून टाकले होते त्याने. तरी हरभजननेही अजून हार मानली नव्हती. अचानक हरभजनने त्याची नेहमीची बॉलींग ॲक्शन सोडून मिडीयम फास्ट टाकायला सुरूवात केली. कॉमेंटेटरही हैराण झाले. असे काही सर्वजण पहिल्यांदाच बघत होते. उत्सुकता याची होती की आता तरी हरभजनला यश येईल का नाही याची. अगदी आखूड टप्प्याचे हळू पण विकेट टू विकेट अशी हरभजन बॉलींग करू लागला. आधीच वैतागलेल्या कुकला ही नवी बॉलींग ॲक्शन काहीच कळेना. थरंगा मात्र बधला नाहीच पण अशा प्रकारच्या हरभजनच्या दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला कुकचा संयम सुटला आणि त्याने स्टेप आऊट केले. तो बॉल अगदी लेगसाईडला वाईड जाणारा होता. कुकने जोरात बॅट फिरवली पण बॉलशी संपर्क झाला नाही आणि गिरकी घेऊन एक क्षण त्याने मागे धोनीकडे पाहिले. विकेटमागे धोनीला कुकच्या आडोशामुळे बॉल आजिबातच दिसला नव्हता त्यामुळे त्याच्या हातात तो आला नाही पण ग्लोव्ह्जला लागून बॉलने विकेटपाशी एक टप्पा घेतला आणि तो मागच्या बाजूला जाऊ लागला. साऱ्यांच्या काळजाचे ठोके चुकले. मीही श्वास रोखून धरला. बॉल धोनीच्या हातातून सुटला हे पाहून कुकने क्रिजकडे झेप घेतली. त्याची बॅट हवेतून क्रीजमध्येही आली पण त्याच वेळेला लेग स्लीपमध्ये उभा असलेला बिन्नी समोरच्या बाजूला अंग झोकून देत बॉलला स्पर्श करीत स्टम्प्सवर दाणकन आदळला. आता विखुरलेल्या स्टम्प्सवर बिन्नी आणि कुक दोघे पडले होते. एव्हाना, माझ्यासह सर्व फिल्डर्स जल्लोष करीत पिचकडे धावू लागले होते.
निकाल अर्थातच थर्ड अंपायरकडे गेला. मैदानावरच्या मोठ्या स्क्रीनमध्ये स्लो-मोशनमध्ये रिप्ले दिसू लागला. बिन्नीच्या हाताने स्टम्प्स उखडले होते खरे पण त्याचवेळेला त्याच्या हातातून बॉल निसटल्याचेही दिसत होते. सर्वांचे चेहरे पडले. दुसऱ्या अँगलने बघताना मात्र स्टम्प्स पडताना बॉलचा हाताशी संपर्क असल्याचे स्पष्ट दिसत होते. प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष झाला. आमच्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. थर्ड अंपायरने आऊटचा सिग्नल देताच कुक चालू लागला. हरभजनच्या नव्या बॉलींग ॲक्शनने कमाल केली. सर्वांनी हरभजनचे कौतुक केले. विशेषतः धोनीने आणि सर्वांना चिअर करत तो विकेटमागे परतला. आमच्यामध्ये पुन्हा एकदा मॅच जिंकण्याविषयीचा आत्मविश्वास जागा झाला. आणि झालेही तसेच, पुढच्या अवघ्या ३५ रन्समध्ये इंग्लडच्या पुढच्या ६ विकेट्स गेल्या आणि आम्ही अतिशय रोमांचकपणे ही टेस्ट मॅच जिंकलो.
मॅच संपल्यानंतर माझ्यासहित सर्वजण आमच्या नेहमीच्या चकाट्या पिटायच्या अड्ड्यावर गेलो. विराट अजून आला नव्हता तिथे. सकाळी मॅच सुरू व्हायच्या आधी त्याचं आणि माझं बोलणं झालं होतं. तेव्हा तो म्हणाला होता की आज संध्याकाळी त्याला आत्याकडे शिरवळला जायचंय म्हणून. दोन कारणं होती, एक म्हणजे आत्याच्या गावची जत्रा होती आणि दुसरी म्हणजे आत्याची मुलगी अर्चना.
आमच्या टवाळक्या सुरू होत्या तेवढ्यात धोनी मला म्हटला, "विराटला कॉलव रे. येडं हिंडत असतंय सदा. कुठं तडफडलाय बघ." मी त्याला सकाळच्या विराटच्या शिरवळच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले. धोनीसहित सगळे फिदीफिदी हसायला लागले. सर्वांना माहीत होते की जत्रा म्हटले की तमाशा आणि तमाशा म्हटले की विराट पोचलाच. धोनी बसल्याठिकाणी बिन्नीला बगलेत दाबून त्याची खेचत होता तेवढ्यात विराट तिथे आला.
धोनी, "का बे? पावसापाण्याचं जरा बस की घरात. कुठं उलताय चाललाय शिरवळला?" विराट काही बोलणार इतक्यात मी अजून पेटवून दिला धोनीला. "अरे, ह्ये येडं तर येवढ्या पावसात टू व्हीलर काढून सगळेच निघूया म्हणत होतं." धोनीने असं काही बघितलं विराटकडे की, विराटला, मला खाऊ का गिळू असं झालं. विराट लगेच डोळे मिचकावत म्हणाला, "दाद्या, एकदा अलका पानगावकरची लावणी बघ, तुझं सगळं अंग नाही झुलायला लागलं ना तर सेंचुऱ्या मारायचं बंद करीन!" "अलकाकडं चाललाय का आत्याची अर्चनाकडं?" धोनीच्या ह्या बोलण्यावर सगळे फिदीफिदी हसले आणि मग विराटची खेचायला लागले. विराट म्हणाला, "दोन्हीकडं" पुन्हा धुमाकूळ.
लगेच धोनीने बिन्नीला सोडून देत बसल्या जागेवरून खाली उडी मारली आणि विराटाच्या गळ्यात हात घातला आणि म्हणाला, "मग जाऊ की ठोंब्या, पण एवढ्या गाड्या घेतल्यास मॅन ऑफ द मॅचच्या, त्या काय हळद-कुंकू लावून ठेवल्यात का? तू सोड, माझीच स्कॉर्पिओ काढतो. चला रे सगळे." मग तो मला म्हणाला, "संदीप तू तुझे सोसायटीचे मित्र घेऊन ये" लगेच ती बैठक बरखास्त झाली आणि सर्वजण त्या चौकातून महात्मा फुले नगराच्या आपल्या आपल्या घराकडे निघाले. मी एकटाच माझ्या कृष्णानगरकडे शीळ घालीत निघालो. धोनी सोसायटीचे मित्र म्हटला म्हणून माझ्या डोळ्यासमोर लगेच काही नावं आली, गांगुर्डेसाहेब, गणेश, खोलमकर, उत्तम पाटील, विक्रम, दत्ताभाऊ, विनायक पाटील, श्रीनाथ वगैरे. आता माझ्या किडनॅपिंग व्हॅनमध्ये कोण कोण येणार याचा विचार करत मी चालू लागलो.
अचानक पाऊस जोराचा सुरू झाला पण पाणी फक्त माझ्या तोंडावरच पडत होते. नीट डोळे फिरवून इकडे तिकडे पाहिले तर मी माझ्या खाटावर झोपलो होतो आणि बायको सकाळी सकाळी वैतागून माझ्या तोंडावर पाणी मारून मला उठवत होती. च्याआयला, स्वप्न होतं सगळं, बरंच झालं म्हणायचं. उगं पावसापाण्याचं शिरवळला काय गठुडंय का? असा विचार करीत संडासमार्जनासाठी मी निघालो.
वि.सू.: वरील लेख हा सत्यात घडलेल्या स्वप्नावर आधारित कोणताही मीठ-मसाला न लावता जसाच्या तसा लिहिला आहे. तेव्हा, केवळ योगायोग वगैरे… ध्यानात असू द्या!
- संदीप चांदणे (२८/०८/२०१८)
प्रतिक्रिया
28 Aug 2018 - 7:28 pm | यशोधरा
मजेशीर!
28 Aug 2018 - 7:59 pm | टवाळ कार्टा
=))
28 Aug 2018 - 8:12 pm | टर्मीनेटर
खुमासदार :)
28 Aug 2018 - 8:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
28 Aug 2018 - 10:12 pm | अनुप देशमुख
ठिकाणे ओळखीची असल्याने विज्युअलायज़ेशन लगेच झाले. मस्तच
28 Aug 2018 - 10:42 pm | जव्हेरगंज
भारीच की.. =))
29 Aug 2018 - 10:39 am | सिरुसेरि
मजेशीर स्वप्न . सुरुवातीला ॲलिस्टर कुक आणी उपुल थरंगा एकत्र कसे हा प्रश्न पडला . पण लेख वाचताना उलगडा झाला . हे दोघे एकत्र एकतर स्वप्नात नाहीतर आयपील मधेच खेळु शकतात . धोनी आणी टीमच्या बोली भाषे वरुन ही मॅच बेळगाव / सोलापुर नाहीतर सातारा ( कृष्णानगर ) इथे चालु असावी .
29 Aug 2018 - 3:46 pm | संजय पाटिल
मलाही हाच प्रश्न पडलेला....
29 Aug 2018 - 6:10 pm | चांदणे संदीप
Is the right answer! ;=)
Sandy
29 Aug 2018 - 12:27 pm | झेन
धमाल आली
29 Aug 2018 - 1:43 pm | उपेक्षित
:) :)
29 Aug 2018 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
हहही हही हही हही!
29 Aug 2018 - 4:31 pm | चिगो
लैच इचीबिंद्र सपान.. आवडलं.
29 Aug 2018 - 5:36 pm | संजय पाटिल
मनि वसे ते स्वप्नी दिसे !!!!=))
29 Aug 2018 - 7:19 pm | ट्रम्प
संदीप भाऊ ,
एकदम खुसखुशीत लिहलय !!
मला सुद्धा क्रिकेट खेळण्याची स्वप्न पडतात !!
त्या शिवाय जंगलात ट्रेक करणे , नदीवर पोहायला जाणे , उसाच्या शेतात घुसून रसदार ऊस खात बसणे ही स्वप्ने वारंवार पडतात .
हे तर काहीच नाही , मनी असे ते स्वप्नी दिसे ही म्हण खरी व्हावी म्हणून झोपण्यापूर्वी सुंदर हिरोईन ची आठवण करून झोपतो पण हाय राम !!!
त्यांच्या बरोबर सुद्धा क्रिकेट खेळत बसतो =) =)
29 Aug 2018 - 8:48 pm | नाखु
पण कुकचा बुकणा पाडलाय,त्येनं खेळावं का गुरामागं राखाणीला जावं त्ये सांगिटल तर बरं!!
भैरु आचारी झोडें पाटील
सरपंच यार्कशायर खुर्द
29 Aug 2018 - 9:25 pm | चांदणे संदीप
सरपंच नाखुनचाचा, वर मनी वसे..स्वप्नी दिसे म्हटल्याप्रमाणे कुक चा बुक'णा पाडावा असं मला कायमच वाटतं. आणि चुकूनमाकून त्याला गुरामागं राखणीला जावं लागलं तर मीच गीर गाया, जाफराबादी म्हशी, शेरडं-मेंढरं पाळीन.
=))
Sandy
1 Sep 2018 - 2:17 am | ज्योति अळवणी
मज्जा आली वाचताना
1 Sep 2018 - 9:37 pm | अभ्या..
हाण्तिज्ज्यायला,
परवा अशीच एक टीम आलेली. एकजणाला ए कवल्या म्हणुन हाक मारत होते. मी अपलं इज्जतीत विचारलं कैवल्य नावय का तर गडी म्हणला नाही, त्यो मेन बॅटसमन हाय, ते कोहली कोहली म्हणतेत चेष्टेत त्याचं कवल्या झालंय.
6 Sep 2018 - 9:20 am | सोन्या बागलाणकर
संडासमार्जनासाठी की सडासंमार्जनासाठी ?
6 Sep 2018 - 12:08 pm | चांदणे संदीप
विनोदाचा क्षीण प्रयत्न हाणून पाडल्याबद्दल ढण्यवाड…
Sandy
7 Sep 2018 - 3:59 am | सोन्या बागलाणकर
वैतागू नका हो!
मला फक्त जाणून घ्यायचं होतं कि टंकनदोष आहे कि जाणूनबुजून केलेला विनोदाचा प्रयत्न आहे.
7 Sep 2018 - 10:41 am | शब्दबम्बाळ
भारी लिहिलंय! ;)
7 Sep 2018 - 4:23 pm | विनिता००२
सुरुवातीला क्रिकेटवरती काही लिहीलयं म्हणून वाचायला लागले.
विराट शिरवळला कशाला जाईल? डोकंच गरगरलं :) परत वाटलं, असेल कोणी नातेवाईक....पण अर्चना!:)
मग अनुष्का !??
शेवटी कलळ्ळं :)