मागल्या आठवड्याची गोष्ट. आता दिवाळी, खरेदी, आवराआवर, गाठीभेटी अश्या वातावरणात घडू नये अशी एखादी तरी घटना घडतेच. व ती घडली. ओळखीच्या एका व्यक्तिचा अपघात. ही व्यक्ती खूप जवळची अशी नाही पण जे घडले ते काही डोक्यातुन जात नाही. म्हणुन इथे उतरवण्याचा खटाटोप.
ही व्यक्ती तरुण. नुकतेच ३ महीन्यापुर्वी लग्न झालेले. पेशाने डॉक्टर. अपघात झाला, दोन्ही पाय गेले. अपघात झाला तरी कसा? समोरुन रेल्वे येतीय हे दिसतेय तरी रुळ ओलांडून जायची घाई. असे अनेकदा केले असणार आयुष्यात. नेमकी वेळ यायची होती. झालं पाय अडखळून पडला; वेळेत उठू शकला नाही. रेल्वेचे धुड त्याच्या दोन्ही पायाचे तुकडे करुन गेले.
बरं माणूस मोठा जिद्दीचा. अजिबात खचला नाही, अपघाताचा प्रसंग स्व:ता वर्णन करत होता. धडक बसल्यावर म्हणे लगेच काही जाणवले नाही फक्त गरागरा गोल शरीर फिरत होते हे जाणवत होते.
उच्चशिक्षीत तरुण व्यक्ती असा बेजबाबदार निर्णय घेउच कसा शकते. एका "डॉक्टरला" ह्यातील संभाव्य धोक्याची कल्पना नसावी? वर्तमानपत्रात कधी रेल्वेअपघातसंबधी बातम्या वाचल्या नसतील. कधी रेल्वे येण्या अगोदर ५ ते १० मिनिटे बंद असलेले फाटक पाहीले नसेल? समोर रेल्वे दिसत असताना अगोदर बरेचदा नियम मोडून रुळ ओलांडून अंगवळणी पडलेली सवय, आपल्याला असे होउच शकत नाही हा फाजील आत्मविश्वास?
स्व:ताच्या निर्णयामुळे जवळच्या लोकांना अशी सजा देउच कशी शकते ह्या पलीकडे माझे डोके विचार करायलाच तयार नाही आहे.
आता रागाच्या भरात मी असा विचार केला की, च्यायला ही व्यक्ती आहेच बेरकी, पुढे मागे अपंग आरक्षण मिळवण्यासाठी मुद्दाम तर केले नसावे? मंडळी मी असा विचार करणे जास्त चुकीचे की ह्या व्यक्तीचे असा जीव धोक्यात घालून वागणे जास्त चुकीचे.
परत विचार करता हेच जाणवले की जागतीक अर्थबाजारातील बडी धेंडं अगदी असेच तर वागली. नको तेवढी जास्त रिस्क घेउन झाला की अपघात. स्वःता तर कोसळलेच पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थीती बिकट करुन गेले. समभाग बाजारातील भाव चढणे अथवा ढासळाणे याची पुर्व कल्पना ह्या बाजारात प्रवेश करणार्या सर्वांना असते पण म्हणुन काही कायदे, नियम पाळणे आवश्यक असते. नक्कीच यातील महत्वाचे नियमांकडे दुर्लक्ष करुन निर्णय घेतले गेले. पण या खेळात सगळेच इतके मुग्ध झाले होते की या अपघाताची झळ जगातील सर्व देशातल्या बाजारात पोहोचली.
निदान तो अपघातात अडकलेला मनुष्य मनाने खंबीर आहे, लवकरच आपल्या खोट्या पायांवर उभे राहू असे सर्वांना सांगत होता. त्याचे घरचे, मित्रमंडळ हे सोबतीला आहेतच. आशा आहे की जागतीक अर्थबाजार देखील त्याच धडाडीने लवकर उभा राहून दाखवेल.
प्रतिक्रिया
28 Oct 2008 - 2:43 pm | अवलिया
सहजराव,
शेअरबाजाराची अन कथानायकाच्या वैयक्तिक आयुष्याची जी आपण सांगड घातलीत ती चांगली आहे. फक्त एक सुधारणा ती अशी की ज्या लोकांनी हे सगळे घडवुन आणले ते मोठमोठ्या बैंकांचे तसेच ट्रेडींग हाउसेसचे सीईओ किंवा प्रमुख निर्णय घेणारे यांनी हा जो तमाशा केला आहे, त्यात त्यांचे वैयक्तिक काहीही नुकसान झाले नाही. उलट त्यांनी जास्तीत जास्त यात फायदा मिळवलेला आहे. आता ते ज्या कंपन्यात कामाला होते, त्या कंपन्यांना जरुर नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम म्हणुन यापुढे कदाचित त्यांना नोकरीला मुकावे लागेल किंवा पगार कमी, बोनस कमी वगैरे होईल. पण या पडझडीत त्यांचे विशेष नुकसान झालेले नाही. कारण असे होणार हे माहीत असल्याने त्यांनी आधीच त्यांचे हात दगडाखालुन काढुन घेतले असणारच.
(यानिमित्ताने भारतातील काही प्रमुख मोठ्या कंपन्यांच्या मालकांनी तसेच प्रमुख अधिका-यांनी साधारणतः फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत आपले किती शेअर विकले ह्याकडे नजर टाकली तर कोणाचे पाय किती मातीचे आहेत ते नीट कळुन येईल.)
28 Oct 2008 - 3:02 pm | सुनील
एखाद्याचा व्यक्तिगत अपघात आणि जागतिक अर्थव्यवस्था यांची सांगड घालण्याचा प्रयत्न चांगला. परंतु, वर नानांनी म्हटल्याप्रमाणे, मोठमोठ्या बँका, वित्तिय संस्था यांची संचालक यांचे व्यक्तिगत नुकसान फारसे झालेले नाही, हे ही खरेच.
असो, ह्या मंगल वातावरणात अशी बातमी मन खिन्न करून गेली हे खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Oct 2008 - 4:43 pm | सर्वसाक्षी
रेल्वे रुळातुन चालत जाणारे लोक लवकर स्थानकाबाहेर पडतात आणि ते पाहुन एरवी सरळ मार्गाने जाणारे सुद्धा त्या झटपट मार्गाकडॅ आकर्षित होतात, त्यांनाही 'झटपट' चा मोह पडतो आणि ते धोका माहित असूनही मोहात पडतात. यात अनेकदा सराईत वाचतात आणि नवखे बळी पडतात.
29 Oct 2008 - 1:43 am | धनंजय
रेल्वे रूळ ओलांडून जाण्यात थोडासा फायदा (काही मिनिटे वेळेची बचत) प्रत्येक वेळी होते. पण करोड वेळा ओलांडला तर एकदा अपघात होतो. अपघात भयंकर असतो. नीट हिशोब करून फायद्या-तोट्याचे गणित केले तर तोटा बहुधा अधिक निघेल.
आताच आणि हमखास मिळणारा फायदा-आनंद (आताची दोन मिनिटांची बचत, किंवा आताच्या आता अवाच्यासवा किमतीचे आईसक्रीम) हा खूप कालांतराने मिळणार्या फायद्या-आनंदापेक्षा (पंगू न होता आयुष्यभर जगणे, किंवा पुढच्या चौकात मिळणारे वाजवी किमतीचे आईसक्रीम) अधिक असतो. हे अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना फार आधीपासून माहीत आहे. याला भविष्याच्या मूल्यात दिलेली सूट (डिस्काउंट) म्हणून अर्थशास्त्राच्या पुस्तकांत शिकवले जाते.
डिस्काउंट रेट आणि कर्जाचा व्याज दर (किंवा गुंतवणुकीचा वृद्धी दर) हे साधारणपणे समसमान (किंवा जवळजवळ समान) असतात. तुमच्या ओळखीच्या सुशिक्षित तरुणाने मिनिटाच्या सोयीचा डिस्काउंट रेट फार धरला - हे विश्लेषण बहुधा ठीक आहे.
आर्थिक संस्थांनी डिस्काऊंट रेट(=गुंतवणुकीचा अपेक्षित वृद्धी दर) फार जास्त ठरवला असेही विश्लेषण केले जाऊ शकते. पण आर्थिक संस्थांनी गुंतवणुकीचा अपेक्षित वृद्धी दर कसा ठरवावा? त्यांनी कमी ठरवला, की पर्याप्त ठरवला, की फार याचे गणित कसे करणार? एखाद्याच संस्थेने वाजवीपेक्षा कमी किंवा अधिक ठरवला, तर ती कंपनी बुडते. त्या कंपनीच्या उदाहरणाने बाकी संस्था कमी-काय-अधिक-काय हा आडाखा बांधतात. पण बाजारबुडीच झाली, तर असे करता येत नाही.
लोक म्हणतात की "हव्यासामुळे बाजार बुडला". त्या वाक्यापासून मला काहीच बोध घेता येत नाही. गुंतवणुकीवर १-२-५-१०-२०-५०% वार्षिक उत्पन्न मिळवण्याच्या नेमक्या कुठल्या पायरीला "हव्यास" म्हणणार? आता कुठल्या बँकेने ०% दिले तर हव्यास नाही, हे निश्चित. पण तीही योग्य आर्थिक नीती नाही, हे कोणीही मान्य करेल. "हव्यास" ही टीका शिवीसारखी आहे : प्रामाणिक पण कर्तव्य-दिशा-न-सांगणारी.
बाजार बुडायचे कारण त्यापेक्षा मूलभूत आहे, असे मला वाटते. "आर्थिक मूल्य म्हणजे काय", "किमतीचा आणि आर्थिक मूल्याचा संबध काय" अशा प्रकारच्या किचकट वाटणार्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.* या प्रश्नांचा ऊहापोह नीरस वाटू शकेल. या प्रश्नांची काही उत्तरे आपण, प्रत्येक जणानेच, विचार न करताच गृहीत धरलेली असतात. त्याचे गृहीत-धरलेले-उत्तर तरी प्रत्येकाने स्वतःसाठी शोधून काढावे.
सहज यांनी वैयक्तिक सोयीच्या गणिताचा संबंध जागतिक अर्थकारणाशी लावला आहे - त्यांनी विचारांचे योग्यच तर्हेने मंथन केले आहे.
(*शेअर बाजार म्हणजे सर्व स्थावर-जंगम-मानवसंसाधन मालमत्तेच्या किमतीची सांगड मूल्याशी [फंडामेंटल्स वगैरे] लावण्याची प्रक्रिया होय.)
30 Oct 2008 - 5:22 pm | सुनील
(नेहेमीप्रमाणेच) भारदस्त प्रतिसाद!
कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन करताना त्यातील रिस्कचा विचारही कराचाच लागतो. रिस्कचा इंपॅक्ट (घातकता) आणि प्रोबॅबिलिटी (संभाव्यता) इथे जर गंडायला झाले, तर सगळे मूल्यमापनही बाराच्या भावात जाते.
रूळ ओलंडण्याच्या घटनेचेच उदाहरण घेऊ - संभाव्यता कमी पण घातकता खूपच. साहजिकच एकूण गुणांकन ( घातकता x संभाव्यता) वाढते. तेव्हा ते टाळणे हेच इष्ट.
हेच गुंतवणूकीबाबतही म्हणता येईल. स्वतःच्या गुंतवणूकीयोग्य पुंजीपैकी किती शेअर मार्केटम्ध्ये घालावी आणि किती सुरक्षित ठेवीत ठेवावी हे तुमचे वय, जबाबदार्या, पुढील उत्पनाच्या शक्यता यावर अवलंबून असते. इथे गणित चुकता कामा नये.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
30 Oct 2008 - 9:41 pm | मन
आणि धनंजय ह्यांचा प्रतिसाद .
दोन्ही आवडले.
लेखानं एक नवीनच प्रकारे तुलना केलिय. आणि धनंजयनं नेहमीप्रमाणच सांगोपांग
प्रतिसाद दिलाय.
दोन्ही झकास!
आपलाच,
मनोबा
30 Oct 2008 - 4:01 pm | प्रकाश घाटपांडे
कल क्या होगा किस को पता | अभी जिंदगीका ले लो मजा|
या तत्वाने वागणारा म्हणेल की रेल्वे अपघातात रेल्वेत बसणार्याची काही चुक नसते. तेव्हाही असे घडु शकते. रिस्क घेण्यात देखील एक उन्मत्तपणा असतो. सहज यांनी विचारचक्राची सांगड बरोब्बर घातली.
प्रकाश घाटपांडे
30 Oct 2008 - 4:32 pm | ऋषिकेश
रोचक सांगड.. आवडली :)
अजून वेगवेगळ्या विचारांवरील येऊ दे!
मात्र
हे मात्र जर एका व्यक्तीबाबत बोलत असाल तर खटकले.. रादर कोरडे वाटले.. त्याने इतरांना सजा दिली (ते ही मुद्दाहून नाहि पण त्याच्याच निष्काळजीपणाने तेव्हा) हे कबुल पण त्या व्यक्तीला स्वतः कीती त्रास होत असेल. बिचारा!!!
त्याच्या इतरांपेक्षा त्याच्याबद्दल वाईट वाटले
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
30 Oct 2008 - 9:48 pm | स्वाती दिनेश
तुमचे मुक्तक वाचून मन खिन्न झाले,
स्वाती
30 Oct 2008 - 9:48 pm | स्वाती दिनेश
तुमचे मुक्तक वाचून मन खिन्न झाले,
स्वाती