७: औरंगाबाद- जालना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
योग सायकल यात्रेचा सहावा दिवस, १६ मेची पहाट. काल औरंगाबादमध्ये चांगली चर्चा झाली आणि आता औरंगाबादहून जालनाला जायचं आहे. जालना एका अर्थाने ह्या पूर्ण योग- यात्रेचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा ह्या मोहीमेची योजना बनवली, हा विषय सर्वांपुढे ठेवला, तेव्हापासून जालन्याचे लोक त्यात अगदी पुढे राहिले. त्यांनी ह्या मोहीमेच्या आयोजनामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केला व चांगला प्रतिसाद तर दिलाच, शिवाय माझा उत्साहही वाढवला. जालनाच्या चैतन्य योग केंद्रामधूनच शिकलेल्या योग साधकांना आधी परतूर व अंबडमध्ये भेटलोच आहे, आज जालन्याचं केंद्र बघायचं आहे व इथल्या लोकांसोबत बोलायचं आहे. काल डॉ. पटेल सरांना भेटणं, हे ह्या प्रवासातलं एक शिखर होतं आणि आज जालन्यामधलं विस्तार झालेलं काम बघणं, हा एक दुसरा परमोच्च बिंदू असेल. जालना आणि औरंगाबादमध्ये माझ्या सायकल मोहीमेविषयी पेपरमध्ये बातम्याही आलेल्या आहेत. जेव्हा निघणार होतो, तेव्हाही बातमी आली होती. ह्या मोहीमेत कमीत कमी दहा- बारा बातम्या तरी आल्या असतील. आणि हेसुद्धा तिथल्या साधकांची तयारी व कामाची खोली दर्शवतं.
रोजच्याप्रमाणेच अगदी पहाटे निघालो. आज अंतर तसं ६० किलोमीटर आहे. पण आता शरीरासाठी हे अंतर काहीच वाटत नाही. आणि आजचा रस्ता तर ह्या प्रवासातला सर्वोत्तम रस्ता असेल- अगदी टू बाय टू हायवे! आणि माझ्या आवडीचा रस्ता! त्यामुळे आज लवकरच पोहचेन. तसंच ह्या रस्त्यावर औरंगाबादवरून जालन्याला जाताना किंचित उतार आहे शिवाय आजपर्यंत मी वा-याच्या उलट दिशेने चालवत होतो; आज परतीचा प्रवास सुरू होत असल्यामुळे काही प्रमाणात वारा मला अनुकूल असेल. पहाटेच्या प्रसन्न वेळेत मस्त निघालो आणि न थांबता जात राहिलो. लवकरच कळालं की, आज पूर्ण रस्ता बॅटींग पिच आहे भावा! आत्तापर्यंत काही साध्या व काही त्याहून कमी दर्जाच्या रस्त्यांवर सायकल चालवली होती. आजचा दिवस मात्र माझ्यासाठी व माझ्या सायकलीसाठी बॅटींग पिचसारखा आहे. प्रसन्न हवा, 'पर्वतांची दिसे दूर रांग' आणि तितकाच रोमँटीक रस्ता! अजून काय पाहिजे!
इतकी मजा येतेय की, मनात हसतच जातोय. हसूच येतंय. मनातल्या मनात गाणी ऐकत चेकाळत जातोय. अचानक समोर कोणी आलं तर नाइलाजाने चेहरा गंभीर करावा लागतोय... थांबण्याची इच्छाच होत नाही. पण लवकरच जाणवलं की, मी वेळेच्या खूपच आधी जालन्याला पोहचेन. आज कमी वेळ लागणार हे माहिती होतं, पण इतका कमी हे वाटलं नव्हतं. त्यामुळे सुमारे ३८ किलोमीटरवर पहिला व शेवटचा ब्रेक घेतला. जालन्यात श्री. कुलकर्णींना कळवलं की मी वेळेच्या आधीच पोहचतोय. मला रिसीव्ह करण्यासाठी जे लोक येतील, त्यांना कळवायला हवं ना. मग दोन चहा व दोन बिस्कीट पुडे हा नाश्ता घेतला. माझ्या प्रवासाविषयी तिथल्या लोकांना माहिती दिली व निघालो. शरीर जेव्हा इतक्या लयीत असतं, तेव्हा थांबायची इच्छाही होत नाही. एक प्रकारचा टेंपो बनतो, एक प्रकारे ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे जर मध्ये अचानक ट्रॅफिकमुळे थांबावं लागलं तर रागही येतो. पण आज तसं झालं नाही. आणि दिवसामधली गर्दी वाढण्याच्या आधीच जालन्याच्या जवळ पोहचलो.
मी फोनवर त्यांना ठरलेल्या जागी ९.२० पर्यंत पोहचतो असं सांगितलं होतं. पण ९.०५ लाच पोहचलो. पण तेही तयार होते! आजवर त्यांनी प्रत्येक ठिकाणी माझं स्वागत मॅसेजवर केलं होतं, आज प्रत्यक्ष स्वागतही केलं! आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ८३ वर्षांचे तरुण श्री अनंत दाबके सायकल चालवत माझ्या स्वागताला आले! त्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकेल! तिथून त्यांच्या घरी गेलो, श्री. मोडक सर, श्री. कवडी सर इ. काही साधकांसोबत थोडा वेळ बोलणं झालं. जालना जिल्हा केंद्र असल्यामुळे मी परतूर व अंबडमधले अनुभव त्यांना सांगितले. माझं निरीक्षण आणि माझ्या प्रतिक्रियाही सांगितल्या. आज लवकर पोहचल्यामुळे त्यासाठी वेळ होता. त्यानंतर मग आराम आणि माझं लॅपटॉपवरचं ऑफीसचं काम केलं.
जालनाच्या साधकांद्वारे स्वागत!
आज फक्त तीन तासांमध्ये ६० किमी!
संध्याकाळी साडेसातला चर्चा सुरू झाली. आजवरच्या सर्व चर्चा घरा किंवा छोट्या हॉलमध्ये झाल्या होत्या. आज पहिल्यांदा एका मोठ्या हॉलमध्ये चर्चा आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा हा कार्यक्रम फारच मोठा आहे! हळु हळु बोलणं रंगत गेलं. सगळ्यांचा परिचय झाला. मी अगदी थोडक्यात माझ्या प्रवासाविषयी सांगितलं. इथे मला साधकांचे अनुभव जाणण्याची उत्सुकता होती. हळु हळु सर्वांनी आपले अनुभव सांगितले. सगळ्यांचेच अनुभव साधारण असे होते- की कसं आधी मला योगाविषयी माहिती नव्हती/ मग कसं कळालं, इथे वर्ग कसे सुरू झाले, मग मी कसा शिकायला आलो/ आले (त्यासाठी किती उशीर केला), नंतर कसा योग- शिक्षक कोर्स पूर्ण केला व त्यानंतर कशा प्रकारे योग करणं सुरू ठेवलं इ. इ. इथे असेही साधक आहेत जे एखाद्या रोगामुळे किंवा काही ताणामुळे योगाकडे वळले आणि आजही योगामध्येच आहेत. योग व ध्यानाच्या भाषेत तर हा पॉईंट ऑफ नो रिटर्न आहे! एकदा जो ठीक योगामध्ये येतो, तो बाहेर जाऊच शकत नाही. काही वर्षांपूर्वी परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या टीमच्या मार्गदर्शनामध्ये जालन्यात चैतन्य योग केंद्र सुरू झालं, पुढे योग शिक्षक बनले, योग प्रसार सुरू झाला. काम वाढत गेलं. आणि आता इथे १५० पेक्षा जास्त प्रशिक्षण प्राप्त केलेले योग शिक्षक आहेत. त्याशिवायही अनेक साधक नियमित प्रकारे योग करतात. कार्यक्रमामध्ये अनुभव सांगितल्यानंतर काही साधकांनी स्वत:हून इथून पुढे योग साधनेबरोबर योग प्रसार करेन, असंही सांगितलं. आणि मग सगळ्याच साधकांनी तशीच एक प्रकारे शपथच घेतली! त्यामुळे कार्यक्रमाचं वातावरण आणखी योगमय झालं! ह्या कार्यक्रमामध्ये चैतन्य योग केंद्राच्या सर्व पदाधिका-यांबरोबर पांजली योग पीठाचे आचार्यही आले. काही रोग किंवा अपघात झाल्यानंतरही योग करणं सुरू आहे, असंही अनेक योग साधकांनी सांगितलं.
जालन्यामधल हे काम मला समजलं तेव्हा सुरुवातीलाच मला जाणवलं की, ह्यांचा एक जालना पॅटर्नच आहे. जसं परभणीच्या निरामय टीमच्या संदर्भात त्यांचं काम मुख्यत: परभणी शहरात आहे. परभणी शहराच्या बाहेर जिल्ह्याच्या इतर गावांमध्ये जास्त योग- वर्ग होत नाहीत; जास्त ग्रूपही सक्रिय नाहीत. पण जालन्यातल्या चैतन्य योग केंद्राचं काम जिल्ह्यामध्ये परतूर- अंबड अशा ठिकाणीही पसरलं आहे. त्याशिवाय ते इतरही अनेक उपक्रम करतात- योग स्पर्धांमध्ये अनेक साधक भाग घेतात व राष्ट्रीय पातळीवरही जातात (अर्थात् योगामध्ये स्पर्धा होऊच शकत नाही, कारण साधक किती सजगतेने आसन करत आहे, श्वासाचा फोकस कुठे आहे, स्थितीमधली सहजता किती आहे, हे बाहेरून बघता येत नाही). त्याशिवाय लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ते शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा व इतर उपक्रमही घेतात. पण ह्या कामाची माहिती फार कमी लोकांना आहे. आणि जे सच्चे कार्यकर्ते असतात, ते प्रकाशात येऊही इच्छित नाहीत. पण तरीही हे सगळं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. त्यांना त्याची माहिती असली पाहिजे. म्हणून मी म्हणालो की, सर्व साधकांनी आपले अनुभव लिहावेत आणि ते चैतन्य योग केंद्राची वेब साईट, ब्लॉग किंवा फेसबूक पेजवर पण टाकावेत. आज आपल्याकडे ती टेक्नोलॉजी सहज उपलब्ध आहे. आणि फक्त मॅसेज पाठवण्याच्या ऐवजी टेक्नोलॉजीचा जास्तीत जास्त क्षमतेने वापर करणं, म्हणजेसुद्धा एक प्रकारे योगच आहे. जसे काही जण शरीराचा वापर फक्त रूटीन गोष्टींसाठी करतात, पण योगामध्ये मात्र आपण शरीराच्या क्षमतांमध्ये खोलवर जातो. असो.
कार्यक्रम खूप चांगला झाला व सर्वांनी अनुभव सांगितले. जेव्हा कोणी स्वत:हून एखादी गोष्ट समोर मांडतो; एखादी इच्छा व्यक्त करतो; तेव्हा ती गोष्ट अंतर्मनातही खोलवर जाते. आणि सगळ्या लोकांच्या एकत्र उपस्थितीमुळे ती इच्छा आणखी बळकट होते. कार्यक्रमानंतर काही साधकांना भेटलो. त्याबरोबर ह्या प्रवासाचा सहावा दिवस पूर्ण झाला. आता अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे आणि पाच टप्पे बाकी आहेत. तीनशे किलोमीटर पूर्ण झाले आहेत. काही कारणामुळे प्रवासातला एक टप्पा कमी झाला (एका ठिकाणच्या योग साधिकांची डिलिवरी आल्यामुळे) आणि उद्याचा टप्पाही छोटा झाला आहे. उद्या जालन्यावरून सिंदखेड राजाला जाईन.
आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.
निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- http://www.niramayyogparbhani.org त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!
पुढचा भाग: जालना- सिंदखेडराजा
माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत: www.niranjan-vichar.blogspot.in
प्रतिक्रिया
12 Jun 2018 - 4:12 pm | एस
खडबडीत रस्त्यावर सायकल चालवून चालवून दमल्यावर जेव्हा रुंद, गुळगुळीत महामार्ग येतो तेव्हा एका सायकलस्वाराच्या दृष्टीने खरेच 'रम्य ही स्वर्गाहून...' अशीच मनस्थिती असते.
पुभाप्र.
12 Jun 2018 - 9:56 pm | शाली
हा ही भाग आवडला!
सायकल घ्यावी म्हणतोय आता.
13 Jun 2018 - 1:53 pm | सिरुसेरि
मस्तच . पुभाप्र .
13 Jun 2018 - 5:47 pm | भुजंगराव
आधीच्या मानाने हा प्रवास द्रुतगती आहे न , पण उर्जा तीच भर उन्हातान्हात