काल "एबीपी माझा"वर एक बातमी पाहिली. त्यात सुरुची त्रिवेदी या मुलीने एका गतीमंद मुलाशी लग्न केले आणि त्यांचा संसार कसा सुखाचा आहे वैगेरे दाखवत होते. त्यांना एक मुलगी देखील आहे वैगेरे दाखवत होते. त्या बातमीला “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील”, हे गाणे पार्श्वसंगीत म्हणुन वापरले होते. त्यात त्या मुलीच्या सासू सासऱ्यांची, गतीमंद नवऱ्याची मुलाखत दाखवली , तो माणूस फक्त ती खूप प्रेम करते एवढेच बोलू शकला पण बाकी ती कशी खुश आहे, कुटुंब कसे सावरलेय वैगेरे वर भाष्य चालले होते.
घरातल्यांचा तिच्या कौतुकाचा पाढा चालू झाला, प्रेम असे असावे वैगेरे. त्या मुलीने म्हणे त्याला पूर्वी कधीच पहिले नव्हते आणि ती त्याला पहिल्यांदा भेटायला गेली तेंव्हा म्हणे तो म्हणाला, “तू अजून पर्यंत कोठे होतीस?”, या एवढ्या वाक्यावर ती भाळली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने हा निर्णय स्वतः घेतला , पण तिचे आई वडील यांची काय प्रतिक्रिया दाखवली नाही. त्या मुलीच्या निवडीचा आदर आहेच पण घरच्यांनी तिचे केलेले कौतुक डोक्यात गेले.
व्हिडीओ पाहून मला माझ्या मैत्रिणीच्या वहिनीचा भाऊ आठवला, तो ही गतिमंद होता. त्याचे कसे होणार ही चिंता खानदान, पै- पाहुण्यांना लागली होती. मुलाचे वडील मात्र शांत होते. त्यांनी अत्यंत गरीब घरातली अतिशय सुंदर मुलगी पहिली आणि मुलाचे तिच्याशी लग्न लावून दिले. त्यांनाही आता एक मुलगा झाल्याचे कळले. आता मुलाचे आईवडील वारले, आता ती मुलगी अशा नवऱ्याला आणि मुलांना कशी सांभाळते कोणास ठावूक? पण ते विचारण्याचे धाडस काही मला झाले नाही.
पहिला व्हिडीओ पाहिल्यानंतर अजून एक सांगोल्याचा कुठलातरी व्हिडीओ युट्युब दाखवत होते. त्यात मुलाला एड्स झाला होता तरीही त्या मुलीला त्याच्याजवळ राहायचा निर्णय घेतला होता आणि tagline होती, “ I accept your HIV “.
गावी माझी एक चुलत आत्त्या आहे, उच्चशिक्षित, दिसायला सुंदर पण परिस्थिती गरीब. चुलत आजोबा वारले आणि तिला स्थळ आणणारे लोक सर्व स्थळे बिजवरच आणत होते. शेवटी आजींनी तिला कमीत दिली तर उभ्या भावकीने त्यांच्यावर डूक धरला. भावकीला ना त्या पोरीची चांगले करण्याची हिम्मत होती ना तिच्या आईने घेतलेला निर्णय मान्य होता. आम्हाला कमीचे लोक पाहुणे म्हणतील याचा त्यांना राग होता.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे पहिल्या दुसऱ्या उदाहरणात मुलाच्या ऐवजी मुलगी गतीमंद असती तर असे कोणी लग्न केले असते का? त्याच्याही पुढे जावून समाजाने त्याचे कौतुक केले असते का? आणि केलेही असते तरी तो मुलगा तिच्याशी प्रामाणिक असता का?
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार आणि एखादे वृत्तवाहिनी तिचे गोडवे गात त्याची न्यूज बनवणार? किती दिवस गरीब मुलींचा असा बळी जाणार?
हे सर्व वाचून, ऐकून, प्रत्यक्षात पाहून “बेबी डोल मै सोने दि, ये दुनिया पित्तल दि” असेच वाटले.
प्रतिक्रिया
19 May 2018 - 8:29 pm | जेम्स वांड
हे काथ्याकूट मध्ये हलवता आले तर बघा...
19 May 2018 - 8:42 pm | एस
फारच वाईट वाटतं हो अशा स्त्रियांबद्दल. 'त्यागाची मूर्ती' म्हणून आरती ओवाळतो समाज. पण तिच्या माणूस असण्याचं काय? आणि तुम्ही विचारलेला प्रश्न तर अगदी मर्मभेदी आहे. मुलीमध्ये समजा असे एखादे व्यंग वगैरे असेल, तर किती मुले तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतील? तिला मनापासून स्वीकारतील? अशी उदाहरणे समाजात नसतातच असे नाही. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. साधा सावळा रंगदेखील चालत नाही मुलांना. बाकीचं तर सोडूनच द्या.
19 May 2018 - 10:52 pm | पिलीयन रायडर
एस भाऊ, आहेत की समाजात अशी मुलं. ऍसिड अटॅक झालेल्या मुलींशी लग्न करणारे, बलात्कार झालेल्या मुलीशी (बलात्कार हे व्यंग नव्हे, पण समाजातला एक टॅबु म्हणूया) लग्न करणारे आहेतच. एका मुलीनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलाय. तर तो तिच्यावर लादला गेलेला निर्णय आहे असं कशावरून? जशी काही मुलं चेहरा विद्रुप केल्या गेलेल्या मुलीला मनापासून स्वीकारतात, तशा काही मुली ह्या मुलांना स्वीकारू शकत नसतील का?
इतकं टोकाचं नाही पण एक अगदी परिचयातील उदाहरण म्हणजे ओळखीतल्या एका काकूंना जबरदस्त फिट्स येतात. त्या सरकारी नोकरीत. पण नवरा दहावी पास. तसा माणूस मेहनती. इतर अनेक व्यवसाय करून त्यांनी बायकोपेक्षा जास्त पैसा कमावला. पण त्यांनी आपण कमी शिकलेले आहोत म्हणून फिट्स येणारी मुलगी स्वीकारली. काकूंनी कमी शिकलेला मुलगा स्वीकारला. उत्तम संसार झाला. चालू आहे. काकूंचे खूप शाररिक त्रास आहेत, काकांना ताण पडतो- चिडचिड होते. पण तरी साथ निभावली एकमेकांची. अशी अनेक जोडपी असतात. म्हणून मुलींनी काही केलं की मुलं करतील का असं हा प्रश्न मला इथे योग्य वाटत नाही. ही लग्न मुळात पठडीतली नाहीत. त्यामुळे सरसकटपणे काही बोलता येणार नाही असे माझे मत.
(ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे. अर्थात परिस्थिती वेगळी असली तरी त्याने बायको म्हणून तिची जबाबदारी स्वीकारली आहेच.)
19 May 2018 - 11:17 pm | जेडी
>>>ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे.<<, ह्या केसमध्ये एकतर दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत आणि नात्यातल्याच आहेत. शिवाय धाकट्या बहिणीने आपल्या गतिमंद बहिणीशी दुसरे कोणीच लग्न करणार नाही आणि तिला सांभाळणार कोण म्हणून तिच्या भावी नवर्याला तशी अट घातली होती म्हणून ते लग्न झाले.
शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात.
अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले .
तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...
19 May 2018 - 11:20 pm | जेडी
"ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे."
त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत, त्यातल्या एका मुलीनेच आपल्या बहिणीला कोण सांभाळणार म्हणून आपल्या भावी पतीला हा निर्णय घ्यायला लावला शिवाय त्या मुली अगदी नात्यातल्या आहेत त्या मुलाच्या.
शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात.
अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले .
तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...
19 May 2018 - 11:41 pm | पिलीयन रायडर
तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...
मग प्रॉब्लेम काय आहे? तिने स्वीकारलं ना? कुणीही मिळत असताना? मग इथे लादणे वगैरे मुद्दे कसे आले?
मला ह्यात "मुलं करतील का असं?" हा मुद्दाही कसा आला हे लक्षात येत नाहीये. ह्या काही नेहमी घडणाऱ्या घटना नाहीत. आधीच दुर्मिळ घटनेत पुरुष ते करणार नाहीतच हे गृहीतक कसं आलं?
20 May 2018 - 4:47 am | एस
पिराताई, हो आहेत अशी उदाहरणे दोन्ही बाजूंना. मी काही एकजात समस्त मुलांना काळीजशून्य किंवा स्वार्थी ठरवत नाहीये. माझ्याही पाहण्यात बायकोसाठी असीम त्याग करणारे पुरुष आहेत. कोणाला थेट काळ्या-वा-पांढऱ्या शेडमध्ये रंगवणे चुकीचेच. मी फक्त या प्रमाणातील तफावत अधोरेखित करत आहे. जितक्या प्रमाणात मुलींकडे अशी उदाहरणे दिसतात, तितक्या प्रमाणात मुलांमध्ये ती दिसत नाहीत. दुसरे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा सर्वसाधारण दृष्टिकोन. मुलीने केलं तर ते काहीतरी थोर, पण योग्यच म्हणायचं. आणि मुलानं केलं तर त्याला दुसरी भेटली नसती का अशा स्वरूपाची चर्चा करायची, किंबहुना त्याला आडून आडून तसे सल्ले देत राहायचे असा दांभिकपणा मला आढळून आला. समाजाच्या किंवा लोकांच्या अशा वागण्यामागे अधिक खोलवर विचार केला तर अनेक कारणे असू शकतात. स्त्रियांना योनिशुचिता व पातिव्रत्य सांगणारा समाज पुरुषांना पॉलिगामीची मुभा असावी असे धरून चालतो (उदा. पहा अनेक टीव्ही मालिका किंवा सिनेमे), तेव्हा ही विसंगती अधिकच जाणवते.
20 May 2018 - 8:14 am | पिलीयन रायडर
अनेक मुद्दे एकत्र येत आहेत.
1. मला मुलींना ग्रेट म्हणून मुलांना मात्र दुसरी नसती का मिळाली असं म्हणणारे लोक दिसले नाहीत. आणि मुळात अशी लग्नच इतकी दुर्मिळ आहेत तुलनेनं, की आपण कोणताही ट्रेंड कसा शोधू शकतो? मी त्या पुरुषाला ग्रेट म्हणणारी बाजू पाहिली आहे. तुम्ही दुसरी बाजू पाहिली आहे. पण ह्यातून "नेहमी असंच होतंय" असा दावा आपण दोघेही करू शकत नाही ना.
2. लग्न संस्थेचे प्रॉब्लेम्स काही नवीन विषय नाही. पण एक मुलगी स्वखुशीने असे लग्न करत असताना हा मुद्दा का यावा? भारतात मुलींना जास्त त्रास आहेत हे किमान मी तरी अमान्य करणार नाही. पण ते इथे गैरलागू आहेत. सगळा मामला राजीखुशीचा आहे.
मला अगदी मनातून एक प्रश्न पडलाय. अशी लग्न सर्रास होत आहेत का? कारण माझ्या पाहण्यात ऐकण्यात तरी असे नाही. जर मुलींना फशी पाडणे आणि गतिमंद मुलांशी लग्न लावून देणे हे सर्रास घडत असेल तर मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय.
पण हे बहुदा सर्रास घडतही नाहीये आणि मुलीला जबरदस्ती सुद्धा झालेली दिसत नाहीये. त्यामुळे मला ह्या सगळ्याचे प्रयोजन कळत नाहीये. मुलीचं आयुष्य खडतर असणारे, पण ते तिनी accept केलंय.
की Am I missing something here?
19 May 2018 - 10:09 pm | दुर्गविहारी
लेख मनापासून पटला आणि या मुलींचा विचार मनात येउन खिन्नता आली.
कठीण आहे.
19 May 2018 - 10:20 pm | गामा पैलवान
जेडी,
जोपर्यंत मुलगी लादवून घेतेय तोपर्यंत.
आ.न.,
-गा.पै.
22 May 2018 - 1:47 am | पिवळा डांबिस
हा मराठी शब्द पहिल्यांदाच वाचतो आहे म्हणून विचारतो.
'मतिमंद' हा शब्द पूर्वी वाचला आहे पण गतिमंद = ?
22 May 2018 - 1:19 pm | मराठी कथालेखक
मतिमंद आणि सामान्य बुध्दीचा यात कुठेतरी गतिमंद हा वर्ग येतो. वैद्यकीयदृष्ट्या नेमकी व्याख्या माहीत नाही पण ही मुले बहुतेक सगळ्या सामान्य गोष्टी शिकतात पण शिकणे खूप संथ असते, भावनिकदृष्ट्या खूप अस्थिरही असतात बहूधा (आनंद , दु:ख , राग अगदी लगेच आणि खूप ठळकपणे व्यक्त करतात).
मिपावरील डॉक्टर्स या धाग्यावर फिरकतील तेव्हा याबद्दल अधिक वाचायला मिळेल अशी आशा करुयात.
22 May 2018 - 3:37 am | ट्रेड मार्क
या उदाहरणात असलेल्या जोड्या कमी असल्या तरी व्यसनी, बाहेरख्याली, कामधंदे न करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा सगेसोयरे म्हणतात की लग्न लावून द्या मग सगळं ठीक होईल. मग अशीच एखादी गरीब घरातली किंवा परिस्थितीमुळे गांजलेली मुलगी बघायची आणि लग्न लावून द्यायचं. मुलगा तर काही सुधारत नाहीच पण त्या मुलीच्या आयुष्याची मात्र वाट लागते. ही उदाहरणं तर कितीतरी आहेत.
अर्थात हे दुसऱ्या बाजूनी पण आहेच. काही मुलं सुद्धा अश्या गोष्टींचे बळी आहेतच. मुलाला किंवा मुलीला लग्न नसेल करायचं तरी सामाजिक प्रेशर एवढं असतं की काहीही करून लग्न करायलाच लावतात. लग्न झाल्यावर सगळं मार्गाला आपोआप कसं लागेल याचा कोणी विचार करत नाही. ज्याला जबाबदारी घ्यायची असते तो लग्न न होता पण घेतच असतो. पण वाट चुकलेली मुलं बायकोमुळे सरळ होतील हा समज का असावा?
22 May 2018 - 1:13 pm | मराठी कथालेखक
ती त्याच्या निर्व्याजपणावर भाळली.
जबरदस्ती कुठे दिसतेय यात ?