फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट नाही. साधारण ७-८ वर्षांपूर्वीची असेल.
पण, त्या आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल हे म.मु. काय आहे! तर म.मु. म्हणजे मराठी/मध्यमवर्गीय मुली.
तर साधारण ७-८ वर्षांपूर्वी आम्ही (म्हणजे अस्मादिक आणि आमची एक घनिष्ठ मैत्रीण - म्हणजेच म.मु.) कानपूरला जाण्यासाठी कुर्ल्याला ट्रेन मध्ये चढलो. (हो हो, असा उलटा प्रवास पण करतात लोक.) आधीच पुणे ते मुंबई असा ऐन उन्हाळ्यातला एक अत्यंत घामेजलेला प्रवास करून स्टेशनला पोहोचलो होतो. त्यात उशीर इतका झाला होता, की मुंबईतल्या त्या भर दुपारी, हातात चार सुटकेसेस नाचवत DDLJ style ट्रेन पकडावी लागली. (आमच्या नशिबी कुठला आलाय 'राज' वर ओढून घ्यायला.. एका सिमरननेच दुसऱ्या सिमरनला हात दिला.) आम्हाला AC सीट्स मिळू शकल्या नव्हत्या, त्यात साईडबर्थ मिळाला होता. दुष्काळात तेरावा! भयंकर त्रासलेपण आणि चिडचिड होण्याच्या काही वेळा असतात, त्यातलीच ही वेळ होती. UP च्या ट्रेन्स मध्ये (विशेषतः सेकंड क्लास मध्ये) रिझर्वेशन असलं म्हणजे सीट आपलीच असं काही नसतं. तिथे first come first असा साधा सरळ हिशेब असतो. हे एव्हाना आम्हाला चांगलंच माहीत असल्याने आम्ही चढल्या चढल्याच कालीमाता बेअरिंग घेऊन, दात ओठ खात, हातातली शस्त्रं (actually पिशव्या) परजत सीटपर्यन्तची वाट कापायला लागलो. ट्रेन सुटत असल्याने आमच्या सीट्स वर कुणीतरी आपला संसार आधीच मांडला असणार याची आम्हाला खात्रीच होती.
मजल दरमजल करत एकदाचे सीट्सपर्यन्त पोचलो. तिथे पाहिलं तर संसार मांडलेला नसून एक bachelor's pad मांडलेलं होतं. ५-६ प्रॉप्पर मवाली वेशभूषा केलेले टगे पुरुष सिगारेट्स फुंकत, 'तेरको क्यों भेजा फ्राय करानेका है' टाईप बातचीत करत बसले होते. आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. एखाद्या पोरगेल्या भैय्याबरोबर किंवा एखाद्या भाभीबरोबर झिंज्या उपटाव्या लागतील ही मनाची तयारी आम्ही करून आलो होतो, पण आयत्या वेळेला पडलेली ही गुगली कोण खेळणार?! मैत्रीण जरा जास्त धाडसी असल्याने तिने लीड घेतला.
मैत्रीण: "Excuse me भैया"
मवाली१: "क्या है?"
मैत्रीण: "यह हमारा सीट है"
मवाली२: "टिकिट है क्या?"
मी (हिम्मत करून): "हां है ना" मी लगबगीने बॅगेतून तिकीट दाखवायला काढलं. पण मैत्रिणीने मला थांबवून त्यालाच विचारलं
"भैया, आपके पास टिकिट है क्या?"
मवाली३: "नही जी, आपकी सीटका टिकट हमारे पास कैसे होगा.. ह्यॅ: ह्यॅ: ह्यॅ: "
सगळे त्याच्या या 'बढिया' जोकवर जोरजोरात हसून बाजूला झाले.
आम्ही हैराण! हे लोक मवाली दिसले तरी सज्जन असावेत. भांडले तर नाहीतच पण साधी हुज्जत पण नाही घातली! हुश्श.. एकदाचे आसनस्थ झालो. बॅगा ठेवून, लॉक वगैरे करून settle झालो. सगळे मवाली भैय्ये आता आमच्या समोरच्या आडव्या सीट्स वर बसले. ते जरी कितीही सभ्यपणे बाजूला झाले असले, तरी आम्हाला थोडं awkward होतच होतं.
"इतक्या समोर हे बसून राहिले तर मोकळेपणाने राहणं सोडाच बोलताही येणार नाही की गं!" मैत्रीण माझ्या कानात कुजबुजली.
"अगं, ती सीट पण त्यांची थोडीच असणारे! तिथले मालक सुद्धा चढतीलच पुढच्या १-२ स्टेशन्स वर कुठेतरी" मी.
त्यानंतर आम्ही दोघी थोड्या रिलॅक्स झालो आणि मी वरच्या बर्थ वर झोपायला गेले. मैत्रिणीला झोप येत नसल्याने ती खालीच बसून राहिली.
अर्ध्या तासाने मी खाली आले तेंव्हा ती सर्व मंडळी अजूनही समोरच बसली होती. 'यांचेच reservation आहे का काय' असं पुटपुटत मी मैत्रिणीकडे बघितलं. ती थोडी tensed दिसली. तिने हळूच मला 'नंतर सांगते' अशी खूण केली. आता ट्रेन जोरात धावत होती आणि गावंच्या गावं मागे पडू लागली.
समोरची मंडळी आपापसांत गप्पा मारत होती आणि त्यांचे बरेच कॉल्स पण चालले होते. Actually, त्यांचे कॉल्स ऐकून मला फारच मज्जा वाटायला लागली होती. खूपच घरगुती बोलणी चालली होती फ़ोनवर! म्हणजे मधेच एकाने फोनवर विचारले "अबे $%#^&, वो इस्त्री का कपडा घर क्यों नहीं आया अभी तक?"
मग मध्ये बराच वेळ पत्त्याचा काहीबाही घोळ होत फायनली दुसऱ्याने परत अजून एक फोन लावला "ओय चंपक, वो कपडा अपने घाटकोपर वाले घरपे भेज.. और वो आम का बक्सा किधर है? मिल गया क्या?"
"वाटलं नव्हतं नाही एवढे family-man type असतील हे लोक? उगाच शंका घेतली आपण त्यांच्यावर" मी कुजबुजले. पण मैत्रीण मात्र अजिबात impressed वाटली नाही.
काही वेळ गेला आणि पुढच्या स्टेशनवर दोन तरुण आमच्या सीटवर हक्क सांगायला आले. आम्ही अशा भांडणाची मानसिक तयारी केली होतीच पण ते करायची वेळच आली नाही. आम्ही काही बोलायच्या आतच तिकडून एक भैय्या खेकसला
"क्या मंगता बे?"
"ये हमरा सीट है" हे दोन तरुण बिहारी असावेत.
"कौन बोला?" भैय्या.
"कौन मतलब? हमरा ही है" म्हणजे एकंदरीत त्यांच्याकडे काही प्रूफ किंवा मुद्दा नव्हता. नुसता हवेत गोळीबार चालला होता.
"ये अपना बहनलोग है. इसको तंग किया तो @#$%%$&#$!" इथे तो काय बोलला हे आठवत नाही (हे आपलं उगाच. खरं तर जे बोलला ते लिहिण्यासारखं नाही!)
आम्ही दोघी गहिवरून या मवाली भैय्यांकडे बघत होतो. एवढी काळजी! सख्खा भाऊपण नाही घेणार. थोड्या वेळातच ती पोरं सटकली.
जरा वेळाने TC आला तेंव्हा पण त्यांनी आमची बाजू घेत (उगाच! आमच्याकडे तिकीट होतं!) त्याला दम दिला "इनको उठानेका नही". बिचाऱ्या TC ने हो हो म्हणत काढता पाय घेतला.
"हे लोक बरोबर असणार हे आधी कळतं तर? उगाच एवढ्या खटपटी करत तिकीट काढायचे कष्ट घेतले" हे आपलं मनात!
संध्याकाळ होऊन गेली आणि थोड्याच वेळात त्यांनी खायला काढलं. त्यातला एक जण आमच्याकडे आला आणि म्हणाला
"ये लो, खा लो आप लोग भी" आम्ही कसनुसं हसून नाही म्हणालो पण तो ऐकेचना.
"थोडासा तो ले लो. डरो मत, हम भी यही खा रहे है, ये देखो" परत सगळे जोरजोरात हसले. यांचे फालतू जोक्स यांना स्वतःलाच एवढे काय आवडतात कुणास ठाऊक!
मग आम्ही नाईलाजाने थोडंसं खाल्लं. आता आम्हालाही आमचे डबे शेअर करणं भाग होतं. आमच्या डब्यातलं सुद्धा त्यांनी थोडं घेतलं. जेवणं झाल्यानंतर सर्वांनी पत्ते काढले. एकीकडे आमच्या गप्पा सुरूच होत्या. त्यातल्या एकाने विचारलं
"पोकर खेलते क्या?"
"ऑं?" आम्ही.
"नहीं आता क्या? हम सिखाते फिर"
"नहीं नहीं. हमें नहीं खेलना. और हमारे पास पैसे भी नहीं है"
परत एक सार्वजनिक हास्याची लाट येऊन गेली. फार हसरे आहेत बुवा सगळे!
"किसने बोला पैसा लागानेको? चलो खेलो"
आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि मी धीर करून म्हणलं "पोकर नहीं खेलना. मेंढीकोट आता क्या तुमको?"
आता एकमेकांकडे पाहायची पाळी त्यांची होती. त्यांना ते काही येत नव्हतं पण शिकायची तयारी होती. मग काय! आम्ही दोघींनी कसलेल्या शिक्षकाप्रमाणे त्यांना सर्व नियम शिकवून तयार केलं आणि झाला आमचा गेम सुरु. जाम धमाल आली खेळताना! नंतर नंतर तर चीटिंग करण्याच्या क्लृप्त्या पण शोधल्या प्रत्येकाने. बराच वेळ झाल्यावर आम्ही दोघी झोपायला गेलो तरी भैय्ये मात्र उशिरापर्यंत खेळत बसले होते. मध्येच एका स्टेशनला त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण उतरला आणि त्यांच्यातलाच एक नवीन मनुष्य बरंच सामान घेऊन चढला.
हे सर्व काही चालू असताना आम्ही एक गोष्ट मात्र बघत होतो. त्यांचे कॉल्स मधून मधून अखंड चालत होतेच. आणि तेही इस्त्री किंवा घरातली नळदुरुस्ती सारख्या क्षुल्लक गोष्टी बोलण्यासाठी! असेल बुवा. मोठी फॅमिली असेल आणि त्यामुळे रोजच्या कटकटी पण बऱ्याच असणार, नाही का. त्या रात्री आम्ही सेकंड क्लास मध्ये देखील बिनधास्त झोपलो. एवढे शूर भैय्ये असताना काय बिशाद कोणाची आम्हाला हाकलायची!
दुसऱ्या दिवशी गाडीने MP ची हद्द ओलांडून UP सुरु झालं आणि काही पोलीस गाडीत चढले. ते सरळ आमच्या compartment पाशी आले आणि त्यातल्या दोघांना बाहेर घेऊन गेले. आता मात्र आम्हाला घाम फुटला. हे लोक नक्की आहेत तरी कोण आणि यांचा नक्की चाललंय काय! तेवढ्यात जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात ते दोघे परत आले. आता मात्र त्यांची सगळी code language मुसळीत घालून ते सरळ सरळच बोलू लागले. एकाने पप्पू यादवला (UP चा कुविख्यात गुंड) फोन लावला
"हां भाई, काम हो गया. पंटर आये थे. निपट लिया उनसे अभी अभी."
त्याचवेळी अजून एक जण त्यांच्या त्या नवीन चढलेल्या मित्राने आणलेलं सामान उचकटत होता. आणि आम्ही जे पाहिलं त्याने आम्हाला घेरीच आली. त्यात काही चॉपर्स आणि तलवारी होत्या! आणि अजून काही सामान होते जे नक्कीच चोरीचे किंवा smuggled असणार.
आता आम्हाला हळूहळू कालच्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येऊ लागला. इस्त्रीचे कपडे घरी पोचवा काय, आंब्याचे खोके काय, आणि नळदुरुस्ती काय! आम्ही कोणाबरोबर अख्खा दिवस प्रवास केलाय हा विचार करून आम्हाला घाम फुटला. गेले २४ तास आपण नक्की यांच्याबरोबर काय बोललो, काय share केलं हे आठवून आठवून आणि ते २४ तास त्यांच्याबरोबर असल्याने आपण कुठल्या जाळ्यात तर अडकणार नाही ना या विचाराने डोक्याला मुंग्या आल्या.
आश्चर्य म्हणजे इतकं सगळं आमच्यासमोर होऊनही आमच्याशी सर्वजण तितकेच normally बोलत राहिले. आमच्या सुदैवाने आमच्या मागे नंतर कोणी पोलीस वगैरे आले नाहीत. शेवटपर्यंत सगळे भैय्ये, सॉरी.. भाई, आमच्याशी भावांसारखेच वागले. आदल्या संध्याकाळी मी झोपले असताना माझ्या मैत्रिणीने त्यांच्या सामानात एक रक्त लागलेला कपडा पहिल्यासारखं तिला वाटलं होतं, त्यात त्यांचे ते विचित्र फोन कॉल्स. त्यामुळेच ती tensed होती.
आता त्यांनी जे काही कर्म केलं असेल त्यामुळे त्यांना गुंड म्हणावं, का त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला प्रोटेक्ट केलं (नक्की कशापासून ते माहित नाही!) त्यामुळे त्यांना सज्जन म्हणावं हा विचार करत करतच आम्ही त्या ट्रेन मधून पायउतार झालो!
मात्र त्या प्रसंगानंतर आमच्या मित्रमंडळींमध्ये आमची बरीच हवा झाली, कारण आम्ही पप्पू यादवच्या गुंडांना पोकर सोडून मेंढीकोट खेळायला लावलं होतं!!
प्रतिक्रिया
5 May 2018 - 1:00 am | एस
चांगलाच थरारक अनुभव आहे.
5 May 2018 - 3:09 am | इडली डोसा
छान किस्सा.
म.मु उत्तर प्रदेशात काय करायला गेल्या होत्या तेही काहितरी रंजक असेल असं वाटतयं. ते ही लिहा.
5 May 2018 - 5:30 am | कंजूस
धम्माल आहे.
नेहमी स्लीपर क्लासनेच जा.
5 May 2018 - 7:20 am | आनन्दा
बाबो..
5 May 2018 - 7:38 am | प्रचेतस
मस्त ओघवतं लिखाण.
बाकी तुमचं आयडीनाम रोचक आहे.
5 May 2018 - 7:58 am | जेम्स वांड
पप्पू यादव म्हणून कोणी लैच वट असणारा भाई युपी मध्ये असल्याचे कधी ऐकिवात आले नाही खरे, पण काय फरक पडतोय, यादव म्हणजे युपी अन बिहार मध्ये पैश्याला पासरी! असेलच कुठलातरी डॉन पप्पू भाई
5 May 2018 - 10:32 am | उगा काहितरीच
छान किस्सा . लिहीलं पण मस्त . आवडलं !
5 May 2018 - 11:15 am | शाली
मस्त आहे अनुभव.
5 May 2018 - 11:32 am | manguu@mail.com
छान
5 May 2018 - 12:15 pm | दुर्गविहारी
बाप रे ! खरच थरारक किस्सा. पण पुन्हा असे प्रयोग नकोत.
5 May 2018 - 12:34 pm | सस्नेह
सगळेच 'भाई' भावासारखे असतील याची काय गॅरंटी ?
5 May 2018 - 2:33 pm | चायवाली
पहिल्याच लेखास प्रतिसाद आणि उत्तेजन दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद!
इडली डोसा: कानपुरात शिक्षणासाठी होतो त्यावेळेस सतत ट्रेन ट्रॅव्हल करायचो. अजूनही किस्से आहेत, ते लिहिण्याचा मानस आहेच :)
प्रचेतस: धन्यवाद! हा आयडी काढला तेंव्हा चायवाला या शब्दाला फारच भाव होता :प त्यामुळे त्याचंच स्त्रीलिंग वापरलं. आणि अर्थात चहा या पेयावर आत्यंतिक प्रेम हे आणखी एक कारण.
जेम्स वांड : पप्पू यादव हेच नाव होतं त्यांच्या बोलण्यात आणि नंतर आम्हाला असंही कळलं होतं कि most wanted वगैरे होता तो. ख.खो.दे.जा.
दुर्गविहारी : छे हो, आम्ही कुठे मुद्दाम गेलो होतो त्यांच्यापर्यंत.. नाईलाज म्हणून कधी कधी sleeper ने प्रवास करावा लागायचा. तिकिट्स मिळणं बरेचदा अवघड असायचं. सुदैवाने इतका थरार परत कधी नाही अनुभवला :)
5 May 2018 - 3:11 pm | जेम्स वांड
हे बिहार मधील सुपौलचे पूर्वाश्रमीचे डॉन नेताजी सापडले जन अधिकार पार्टी अशी त्यांची पार्टी आहे (म्हणे)
5 May 2018 - 3:05 pm | खिलजि
सुंदर लिखाण . असे थरारक अनुभव यावेत कधीतरी ... त्याने जीवनाला चार चांद लागतात असं माझं वैयक्तिक मत आहे .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
5 May 2018 - 3:08 pm | जेम्स वांड
घामाचा थेंब अन टारझन वगैरे थरारक अनुभव लोकांना देताय होय खिलजि पाटणकर साहेब :द
(कृपया हलके घ्या , सहज चेष्टा करतोय) :)
5 May 2018 - 3:16 pm | खिलजि
अहो त्या कल्पना आहेत आणि प्रचंड अनुभव पाठीशी आहेत . एक सांगितला होता मागे बघितलं ना काय झालं त्याच ते . अजून बरेच काही आहेत . हा बेचाळीस वर्षांचा प्रवास तूम्हाला थक्क करून सोडेल जर सांगितलं तर . अक्षरशः लहानपणापासून ते लग्नापर्यंत, ह्या आत्ता इथल्या क्षणापर्यंत .. फक्त थक्क व्हाल दुसरं काही नाही . दिनचर्या ऐकाल तर तुम्हाला वाटेल कि फसवतोय म्हणून . विश्वास नाही बसणार कि आजही कोणी असं जगू शकत म्हणून . इतका बेफिकीर आहे मी आणि पुढेही राहीन . माझ्या झोपेचे तर हज्जार किस्से आहेत . सांगायला गेलो ना तर हसून हसून पॉट दुखेल .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
5 May 2018 - 3:07 pm | खिलजि
बाकी तुमची अभिप्रायांना प्रतिसाद देण्याची स्टाईल आवडली आपल्याला ... मला पण अशीच एक कटिंग मिळेल काय ?
सिद्धेश्वर विलास पाटणकर
5 May 2018 - 4:00 pm | माहितगार
आत्मविश्वासाने प्रवास आणि लेखन शैली कौतुकास्पद आणि पुढील प्रवासांना आणि लेखनास शुभेच्छा.
5 May 2018 - 6:01 pm | पद्मावति
खुप मस्तं लिहिलंय. खतरनाक किस्सा आहे =))
6 May 2018 - 2:19 am | चित्रगुप्त
छान लिहिलेस, पण थोडक्यात वाचलीस गं चायवाल्ये, त्या पंटरांना थोडक्यात निपटवता आले म्हणून. जर का त्या गुंडांचा एनकाऊंटर करायला पोलिस आलेले असते, तर तुम्हा दोघींच्या कानपटीवर घोडा टेकवून, सिनेमातल्यासारखे तुमच्या ढाली बनवून गुंड जीव वाचवून निसटले असते, आणि अनायसे हाती लागल्याच आहेत तर 'अगवा' करून 'फिरौती' सुद्धा मागितली असती, असे 'ह्यांचे' मत.
आता म्हणशील की 'ह्यांना' कसे एवढे माहिती, तर लग्नापूर्वी 'हे' सुद्धा बिहारमधल्या टकल्या यादवच्या गँगेत 'बिहारी गुंडा' या नावने फेमस होते. तेंव्हा हे शंभर जणांना सुद्धा भारी पडायचे. मला पण 'ह्यांनी' असेच ट्रेनीतून 'अगवा' केले होते. फिरौतीची रक्कम जमवायला माझ्या बाबांना बराच वेळ लागला, त्या काळात आमचे दोघांचे सूत जुळले, मग ती रक्कम आमचे शुभमंगल करायच्या कामास आली. उगाच नाहीत 'हे' एवढे चतुर आणि हुशार.
'ह्यां'च्यावर पिच्चर सुद्धा निघाला होता तेंव्हा, 'एक बिहारी 'सौ.' पे भारी' नावाचा. पिच्चरच्या नावात माझा सुद्धा 'सौ.' म्हणून उल्लेख करायला विसरले नाहीत.
6 May 2018 - 2:22 am | चित्रगुप्त
अगबाई, जुन्या आठवणींच्या नादात सही करायला विसरल्ये मी वेंधळी.
----- बाईसाहेब फुर्सुंगीकर 'बिहारी'.
6 May 2018 - 11:07 am | दुर्गविहारी
म्हणजे माई आपलं बाई एवढ्या हॉट आहेत तर ? ;-)
बाकी माईसाहेबांचे एकदाचे दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस कारणी लागला.
7 May 2018 - 3:43 pm | चायवाली
हा हा हा.. म्हणजे तुमचे अनुभव तर लैच ग्रेट असणार की हो बाइसाहेब! टन्का ना मग ते इकडे :-)
6 May 2018 - 11:55 am | पैसा
गुंडासोबत मेंढी कोट?
6 May 2018 - 7:05 pm | जव्हेरगंज
मस्त लिखाण !!
लिहीत रहा...!!
7 May 2018 - 3:47 pm | चायवाली
सर्वांना धन्यवाद!
खिलजी साहेब: सुदैवाने एवढा एकच थरार अनुभवला life मध्ये!
9 May 2018 - 2:42 am | बॅटमॅन
जबरदस्त प्रकार आहे. चोरांचीही एक नीतिमत्ता असते म्हणतात ती अशी.
9 May 2018 - 3:02 pm | चांदणे संदीप
चायवाली...चा हा चा कडक होता! :)
Sandy
9 May 2018 - 3:29 pm | विशुमित
मस्तच लिहलंय..
बऱ्याच गोष्टी रिलेट केल्या.
===
गुंड-भाई म्हणवणारी/असणारी लोकं थोडी सेंटी असतात. त्यानच्या सेंटिपणाला थोडी हवा द्यायची. कोणापासूनच धोका नसतो मग.
9 May 2018 - 3:34 pm | सुखीमाणूस
कसला थरारक अनुभव आहे
लेखनशैली आवडली. अजून अनुभव लिहा.