आम्ही दोघीच्या निमित्ताने

पारा's picture
पारा in जनातलं, मनातलं
17 Apr 2018 - 6:20 pm

पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल?

आम्ही दोघी तसं काहीच करत नाही. कुठल्याच व्यक्तिरेखेशी मी समरस होऊ शकलो नाही. प्रिया बापट आणि तिच्या बाबांमधला असंवाद मला कुठेच स्पर्श करून गेला नाही. त्या दोन्ही व्यक्तिरेखा कोरड्या आणि प्लास्टिकच्या वाटल्या मला. नाही म्हणायला मुक्ता बर्वेचा संयत अभिनय थोडा कुठे मनाला भिडतो, पण तिचा रोल तसा फार नाहीच. गावाकडच्या एका मुलीचं बेअरिंग ती पहिल्या सीनला जे पकडते ते अगदी शेवटपर्यंत. तिच्या व्यक्तिरेखेला प्रवास असा नाहीच.

प्रवास आहे तो प्रिया बापटच्या सावित्रीला, तीच तिची कथा सांगते आहे म्हणल्यावर तिच्या स्वभावानुसार ती आधीच हे सांगून मोकळी होते की ही तिचीच कथा असणार आहे. नीट पाहिलं तर ‘मी प्रॅक्टिकल, फटकळ होत गेले’ ह्या एका वाक्याने ती पुढचा सर्व चित्रपट सांगून मोकळी होते. मग उरतो तो एक प्रॅक्टिकल माणसाच्या दृष्टीने समोर येणारा जीवनपट. जो नीरस नसला तरी सरधोपट होतो.

दोघींच्या वेगळेपणाची कारणं चित्रपट देत नाही आणि त्या दोघींच्या टोकाच्या स्वभावांचा एकमेकांवर होणारा परिणामही चित्रपट दाखवत नाही. तिथेच चित्रपट थोडा अविश्वसनीय होतो. इतके दिवस एकत्र राहून साविचा मोकळेपणा अम्मी मध्ये येत नाही, आणि अम्मीचा संयतपणा थोडादेखील सावी मध्ये येत नाही. तिच्या बाबांचं काहीतरी वेगळंच. व्यक्तिरेखा एवढ्या साचेबद्ध आहेत की आयुष्यातील अनुभवांनी त्यांच्यात फार फरक पडत नाही,

मी सध्या castle नावाची इंग्रजी TV मालिका पाहत आहे. आणि योगायोगाने त्यातल्या एकट्या वडिलांचं-मुलीचं चित्रण पाहता आम्ही दोघी मधल चित्रीकरण अगदीच कोरडं वाटतं. त्यांचं नातं फिसकटायला दाखवलेली कारणं पुरेशी वाटत नाहीत. आणि नेहा सारखे मित्र कमावण्यासारखं साविचं व्यक्तिमत्व पण नाही.

Dune म्हणून एक वैज्ञानिक कादंबरीसंच आहे. त्यात mentat म्हणून एक व्यक्तीचा प्रकार आहे. अतिशय हिशोबी आणि तार्किक विचार करणारी ती जमात आहे. स्टार ट्रेक मधल्या स्पॉक सारखी. साविअगदी तशी आहे. अश्या लोकांना भावनांना फार भाव दिलेला आवडत नाही, पण सर्वच कथांमध्ये अशी माणसे शेवटी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. बाकी सर्व cliche बाजूला टाकणारा हा चित्रपट ह्या बाबतीत अगदी फिट बसतो.

बाकी मराठी चित्रपटांची निर्मितीमूल्य खूपच सुधारलेली आहेत आता. कॅमेरा आणि छायाचित्रण वगैरे सुरेख आहे. ‘कोणते नाते हे’ असं एक गाणं आहे, पण फार लक्षात राहील असं त्यात काही नाही. शब्द जरी वेधक असले तरी गद्याला संथ लय देऊन पद्य करण्याच्या परंपरेतलं गाणं असल्याने जास्त बोललेले नकोच.

लहान प्रिया बापट जितकी पचायला जड जाते, तितकीच मोठी प्रिया बापट सुंदर जमलेली आहे. तिची राहणी, वेशभूषा, कामाला वाहून घेण्याची वृत्ती, हे सर्व सुरेख. मुक्ता बर्वे ची अम्मी पाहून सरळ जोगवा मधली सुली आठवली. (btw, उपेंद्र लिमये कुठे आहे सध्या?)

चित्रपटाचा विषय पाहता, कितीतरी अजून शक्य झालं असतं अशी हुरहूर राहते. दोन अतिशय भिन्न विचारसरणीच्या व्यक्ती एकत्र येताना अनेक कंगोऱ्यांना हात घालता आला असता, मात्र, जसा दिल चाहता है, उत्तरार्धात फक्त अमीर खान मध्ये अडकतो, तसं झाल्याने आम्ही दोघी नावाशी आणि अपेक्षांशी फारकत घेत जातो.

तरीही, वेगळ्या विषयासाठी आणि प्रयोगशीलतेसाठी आम्ही दोघी कौतुकास पात्र ठरतो.

कलाचित्रपटसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

17 Apr 2018 - 6:45 pm | पिलीयन रायडर

परीक्षण आवडले. का कोण जाणे ट्रेलर पासूनच चित्रपट फसणार असं वाटत होतं. म्हणूनच प्राईम वर असूनही बघावा वाटत नव्हता.

हर्मायनी's picture

19 Apr 2018 - 10:44 am | हर्मायनी

मला पहिलं ट्रेलर बघून तर आधी त्या दोघी कपल आहेत असा वाटलं होतं. :D अग्ग्रीड टु पिराताई! अमेझॉन प्राईमवर असूनही अजून बघावासा वाटत नाही.

बाकी, तुम्ही कॅसल बघताय हे बघून बरं वाटलं. मस्त सिरीज आहे. :)