पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती...
आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती!
काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी...
वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!
ओळख झाली केंव्हा,कोठे?कधीतरी हे आठवताना...
एकांताचे पडते कोडे... समोर दिसते वर्दळ नुसती!
जेंव्हा जेंव्हा ती आठवते,उगाच स्मरते काही-बाही...
ओठावरती श्रावण फुलतो,उरात होते जळ-जळ नुसती!
मोहरलो होतो तेंव्हाचा..ऋतू मनाने जपला आहे...
घमघमते बघ अजून माझी,फुलावाचुनी ओंजळ नुसती!
—सत्यजित
प्रतिक्रिया
15 Mar 2018 - 6:58 am | प्राची अश्विनी
सकाळी सकाळी एवढी सुंदर कविता! दिन बन गया.
15 Mar 2018 - 10:20 am | अनन्त्_यात्री
सुंदर कविता!
15 Mar 2018 - 1:28 pm | चांदणे संदीप
आवडली. वाखूसा!
Sandy
15 Mar 2018 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा
सुप्पर लाइक करणेत येत आहे.
16 Mar 2018 - 1:51 pm | खिलजि
सुंदर कविता झाली आहे ...
17 Mar 2018 - 2:10 am | पद्मावति
अतिशय सुंदर.
17 Mar 2018 - 1:33 pm | मदनबाण
वा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic
18 Mar 2018 - 8:39 am | सत्यजित...
सर्व प्रतिसादक रसिकांचे मनःपूर्वक आभार!
19 Mar 2018 - 1:44 pm | खिलजि
सुंदर कविता आहे ... वाचता वाचता अनेक अडगळी समोर आल्या ,, आणि परत नवीन झाल्या ... त्यापैकीच हि एक ..... मी तेव्हाही तसाच होतो जो आज आहे ... माझं मन कधी बदललंच नाही .... तिने मात्र सांगून टाकलं सहज .. तूला भरपूर माज आहे ...
छान कविता सत्यजित साहेब .... काही कविता अपरोक्षपणे दुसऱ्याच्या आयुष्याशी जोडलेल्या असतात किंबहुना प्रत्येक वाचक किंवा अभिप्राय देणारा त्या कवितेत कुठेतरी स्वतःला ठेवून पाहतो किंवा जोडून पाहतो .. अशीच हि कविता आहे ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर
21 Mar 2018 - 10:09 am | Naval
क्या बात है! अप्रतिम!!
21 Mar 2018 - 11:26 am | सस्नेह
सुरेख कविता !
आवडली.
21 Mar 2018 - 11:57 am | एस
आजकाल मुक्तछंदातून गेयता हरवत चालली आहे. या पार्श्वभूमीवर 'घमघम करिती पिवळे लोलक...' सारख्या किंवा 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले...' सारख्या तालात म्हणता येऊ शकणाऱ्या जुन्या कवितांसारखी एक कविता 'भेटली' असं वाटलं. फारच छान!
21 Mar 2018 - 1:44 pm | पुंबा
अहाहा!!!
जियो..
फार सुरेख कविता. आज आंतरराष्ट्रीय कविता दिनाची सुरेल भेट दिलीत तुम्ही. धन्यवाद!
25 Mar 2018 - 5:53 pm | यशोधरा
वा!!
26 Mar 2018 - 5:19 pm | सत्यजित...
नवल, स्नेहांकिता, एस, पुंबा, यशोधरा... सर्वांचे खूप-खूप धन्यवाद!
खिलजी आपले पुनःश्च धन्यवाद!
19 Apr 2018 - 6:44 pm | राघव
आयला.. ही रचना कशी काय सुटली म्हणायचें !! :-)
खूप सुंदर! भा.पो. !!