मराठी दिन २०१८: मुलखावेगळी ‘पैज’ (ॲन्टन चेकोव यांची अनुवादित कथा - प्रमाण मराठी)

शशिधर केळकर's picture
शशिधर केळकर in जनातलं, मनातलं
2 Mar 2018 - 12:18 am

मुलखावेगळी ‘पैज’

मूळ कथा - ॲन्टन चेकोव (१८६०-१९०४)

रात्र टळून चालली होती. तो म्हातारा बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालत होता, पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका रात्री त्याने दिलेल्या पार्टीच्या आठवणी मनात जाग्या करीत होता. त्या पार्टीला आलेल्यांत विद्वान मंडळी कमी नव्हती. विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यातही विशेषतः ‘फाशीची शिक्षा असावी की नसावी’ याबाबत भरपूर चर्चा झाली. आलेल्या पाहुण्यांमधे कोणी उच्चविद्याविभूषित होते, काही पत्रकार होते, आणि बहुतेकांचा कल फाशीची शिक्षा नसावी याकडे होता. त्या सर्वांना फाशीची शिक्षा कालबाह्य वाटत होती, धर्माच्या शिकवणीच्या, नीतीच्या विरुद्ध वाटत होती. फाशीची शिक्षा पूर्णतः बंद करून तिची जागा ‘आमरण कारावासा’ने घ्यावी, असा सर्वांचाच सूर होता.

"मी तरी काही तुमच्याशी सहमत नाही", तो त्या सर्वांना उद्देशून म्हणाला. "आमरण कारावास किंवा फाशी यांपैकी कोणत्याच शिक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मला नाही हे जरी खरे असले, तरी अनुमानाने, विचाराने त्यातले तर-तम ठरवता येऊ शकते. माझ्या विचारात, आमरण कारावासापेक्षा, फाशीची शिक्षाच मला अधिक नीतियुक्त, माणुसकीची वाटते. असे पाहा, की फाशीत माणूस तत्काळ मरतो, याउलट कारावासात तो तिळातिळाने मरतो. तुम्हीच सांगा ना, जास्त चांगला मृत्यू कुठला – काही क्षणात मुक्त करणारा, की वर्षानुवर्षे तुम्हाला पोखरून मारणारा?"

"दोन्ही मृत्यू सारखेच अनीतिकारक आहेत." एक महाशय उद्गारले, "कारण दोघांचाही उद्देश एकच आहे – प्राण हिरावून घेणे. सरकार म्हणजे कोणी देव नव्हे. पुढे केव्हातरी चुकीचे वाटले तर जी गोष्ट परत देता येत नाही, ती हिरावून घेण्याचा त्यांना मुळात अधिकारच नाही."

पार्टीला आलेल्यांमध्ये पंचविशीतला एक तरुण उमदा वकील होता. त्याला कोणीतरी या विषयावर त्याचे मत विचारले. तो म्हणाला, "नीतिमत्तेच्या दृष्टीने मला विचाराल, तर फाशीची शिक्षा काय, किंवा आमरण कारावास काय, दोन्ही सारखेच वाईट आहेत. पण मला कोणी जर कुठल्या एकाची निवड कर म्हटले, तर मी निश्चितच दुसरी शिक्षा स्वीकारीन. अगदी जगायलाच न मिळण्यापेक्षा कारावासात का होईना, जगायला मिळणे केव्हाही बेहतर!"

अचानक त्यातून पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली. आपला हा बँकर त्या काळात पुष्कळच तरुण आणि उतावळ्या स्वभावाचा होता आणि या चर्चेने हे नवीन वळण घेतल्यावर तो एकदम भडकला. टेबलावर मूठ आपटून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आणि त्या तरुण वकिलावर घसरला, "हे सपशेल खोटे आहे. चल, लावतोस पैज? वीस लाखाची! अरे काय उगीच बोलायचे म्हणून बोलतोस? तू तर एका खोलीत उणीपुरी पाच वर्षेसुद्धा काढू शकणार नाहीस."

"तू खरोखरच म्हणत असशील," वकील उत्तरला, "तर मी तर पाचच काय, पंधरा वर्षांचीही पैज लावू शकतो!"

"पंधरा? ठरले तर!" बँकर चित्कारला. "ऐका रे ऐका, हे मी वीस लाख लावतोय!"

"मला मान्य आहे. तू वीस लाख लाव, मी माझं स्वातंत्र्य लावतो." वकील उत्तरला.

आणि अशा तर्‍हेने ही विचित्र, मुलखावेगळी पैज अनपेक्षितपणे लावली गेली आणि सर्वांसमक्ष मान्यही झाली.

कोट्यवधींची माया जमवलेला, धनराशीत लोळणारा तो बँकर स्वतःच्याच नादात धुंद होता. जेवण चालू असताना किंचित घमेंडीतच तो त्या तरुण वकिलाला म्हणाला, "फार उशीर होण्यापूर्वीच भानावर ये, बाबा रे; वीस लाख म्हणजे माझ्यासारख्याला तर काय, कवड्या आहेत कवड्या! तू मात्र फुक्कट आपल्या आयुष्यातल्या सुवर्णकाळातली किमान तीन–चार वर्षे बर्बाद करशील. तीन-चारसुद्धा मी म्हणतोय! कारण यापेक्षा अधिक काळ तू एकटा राहूच शकणार नाहीस. एक गोष्ट लक्षात ठेव की कोर्टाने निर्णय करून मिळालेल्या शिक्षेपेक्षा स्वतःवरच निष्कारण लादून घेतलेली शिक्षा माणसाला भारी पडते. आपणच घातलेल्या बंधनातून आपण मुक्त होऊ शकत नाही, ही जाणीवच मुळात जबरदस्त विषवत आहे आणि ती एकच व्यथा, तुझे एका छोट्या खोलीतले अवघे जिणे पोखरून टाकू शकते. मला तुझी फार कीव करावीशी वाटते."

आणि आता तो बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत येरझारा घालत, हे सगळे आठवून स्वतःलाच प्रश्न करू लागला, "कशासाठी लावली मी ही पैज? काय फायदा झाला त्याने? या वकिलाची आयुष्याची पंधरा वर्षे अडकली आणि माझे वीस लाख अडकले. पण यातून फाशीची शिक्षा आमरण कारावासापेक्षा अधिक वाईट किंवा चांगली असा काही निर्णय होणार आहे का? छे छे! सगळाच भोंगळ कारभार झाला हा. मी स्वतः तर माझ्या पैशाच्या धुंदीमुळे आणि तो त्याच्या पैशाच्या लालचीमुळे यात नाहक फसलो."

संध्याकाळी पार्टीनंतर पुढे काय काय घडले, तेही सगळे त्याच्या दृष्टीसमोरून एकाद्या चित्रपटाप्रमाणे सरकत गेले.

सर्वसंमतीने त्या वेळी असे ठरले की बँकरच्या घराला लागून असलेल्या बगिच्याच्या बाजूच्या इमारतीतल्या, एका खोलीत वकिलाने आपला कारावास सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत भोगावा. या पंधरा वर्षांच्या काळात वकिलाला आपली खोली सोडून बाहेर लोकांना भेटायला किंवा माणसांचा आवाजही ऐकायला, वृत्तपत्रे वाचायला, पत्रव्यवहार मिळायला पूर्ण बंदी असावी. पण संगीत, वाद्ये, कोणत्याही पुस्तकांचे वाचन, पत्रलिखाण करणे, मद्य अथवा धूम्रपानाला बिनशर्त परवानगी असावी. करारानुसार त्याला कोणताही गाजावाजा न करता, बाहेरच्या विश्वाशी केवळ एकतर्फी संवाद साधायलाही परवानगी होती. आणि त्यासाठी खास, एका भिंतीत एक लहानसा खिडकीवजा झरोका बांधून घेतला गेला. पुस्तके, संगीताची साधने, मद्य इत्यादी जे काही हवे असेल ते आणि हवे तितके, खिडकीतून केवळ एक चिठ्ठी लिहून टाकून मागवून घेण्याची सोय ठेवली होती. ह्या कराराचा मसुदा अतिशय काळजीपूर्वक तयार केला गेला होता. वकिलाने त्याची सर्व पंधरा वर्षे एकांतातच राहाण्याची अट काटेकोरपणे पाळावी, हेही नमूद केलेले होते. कराराच्या अटी मोडण्याचा थोडासाही प्रयत्न झाला किंवा कारावासातून मुदतीच्या अगदी दोनच मिनिटेही आधी पळण्याचा जर वकिलाने प्रयत्न केला, तरीही करारभंग होऊन बँकर त्याच्या देण्यातून मुक्त होणार असे स्पष्ट केले होते.

कारावासाच्या पहिल्या वर्षात वकिलाने लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आढावा घेतला, तर त्यांच्या सुरावरून असे जाणवले की त्याला एकटेपणाचा प्रचंड त्रास झाला आणि एकंदरीत परिस्थितीला तो अतिशय कंटाळला. त्याच्या गढीतून दिवस-रात्र पियानोचे सूर ऐकू येत. मद्य किंवा धूम्रपान त्याने वर्ज्य केले. एका चिठ्ठीत तो लिहितो की ‘मद्य घेतल्याने विविध इच्छा जागृत होतात आणि या इच्छाच कैद्याच्या मुख्य शत्रू आहेत. शिवाय, मद्य एकट्याने बसून पिणे हे तर अत्यंत कंटाळवाणे आहे. धूम्रपानाने माझ्या खोलीतले वातावरण असहनीय होते.’ पहिल्या वर्षी त्याला पोह्पचवलेली पुस्तके हलकीफुलकी, सामान्य आशयाची होती; गुंतागुंतीच्या प्रेमाच्या, गुन्हेगारीच्या, अद्भुतरम्य, सुखांतक अशा कथा कादंबर्‍या त्यात होत्या.

दुसर्‍या वर्षीच पियानो गायब झाला. पुस्तके ऐतिहासिक मागवली गेली. पाचव्या वर्षी पुन्हा एकदा संगीत ऐकू यायला लागले आणि कैद्याने मद्यही मागवून घेतले. ज्यांनी कोणी त्याला पाहिले, त्यांनी म्हटले, की या काळात कैद्याचा कार्यक्रम केवळ खाणे, पिणे आणि आपल्या पलंगावर लोळणे इतकाच होता. सतत मोठमोठ्या जांभया देत बसावे, स्वतःशीच रागारागाने बोलावे; पुस्तके वाचणे जवळजवळ बंद पडले. रात्री-अपरात्री उठून बसून काहीबाही लिखाण चाले. बराच वेळ असे लांबलचक काही लिहून, सकाळी सगळे फाडून टाकलेले असे. क्वचित कोणाला त्याचे रडणेही ऐकू आले.

सहाव्या वर्षाच्या उत्तरार्धात कैद्याने नवीन उत्साहाने भाषा, तत्त्वज्ञान आणि इतिहासाचा जोरदार अभ्यास सुरू केला. त्याचा वाचनाचा सपाटा इतका होता, की कित्येक वेळा बँकरला त्याने सांगितलेली पुस्तके वेळेत आणून द्यायला जमेना. त्या अवघ्या चार वर्षांच्या अवकाशातच त्याने कैद्याच्या मागणीनुसार जवळपास सहाशे खंड पुरवले. या वाचनाच्या वेडात बँकरला कैद्याकडून एक मजेशीर पत्र गेले, ‘प्रिय जेलर मित्रा, पत्रातला यापुढचा मजकूर मी वेगवेगळ्या सहा भाषांत लिहिला आहे. तो भाषातज्ज्ञांना दाखव. त्याना तो वाचू दे. त्यांना भाषांतरित मजकुरात कुठे एकही चूक जर सापडली नाही, तर कृपया तुझ्या बागेतच तुझ्या माणसांकरवी बंदुकीचे बार काढून घे. त्या बारांमुळे मला समजेल की माझे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. जगातले सगळे विद्वान, त्यांच्या भाषा विविध असल्या, तरी जगाला एकच संदेश देतात; त्यांच्या पोटातली आग अखेर एकच असते. आता त्या सर्वांचे विचार समजल्यानंतर मला कोण स्वर्गीय आनंद होतो आहे!’

कैद्याची इच्छा पूर्ण केली गेली. बँकरने एका संध्याकाळी बंदुकीचे दोन बार ओढून घेतले.

दहा वर्षे होऊन गेल्यानंतर, हा वकील आपल्या खोलीतल्या टेबलासमोर बसून बायबलमधल्या ‘नवीन करारा’चे वाचन करू लागला. जो माणूस अवघ्या चार वर्षांत उत्तमोत्तम तत्त्वज्ञांची सहाशे पुस्तके आत्मसात करू शकतो, तोच हा माणूस नव्या करारासारखे लहानसे, सहज आणि सोपे पुस्तक जवळजवळ वर्षभर वाचत राहातो याचे बँकरला राहून राहून आश्चर्य वाटत राहिले. नवीन करारानंतर विविध धर्मांचे इतिहास आणि धर्मशास्त्रावरील पुस्तके मागवली गेली.
कैदेच्या अखेरच्या दोन वर्षांत या कैद्याने विस्कळीत स्वरूपात पण प्रचंड संख्येने पुस्तके मागवली. कधी विश्वाच्या उत्पत्तीवर, तर कधी एकदम शेक्सपियर किंवा बायरनची. त्याच्या चिठ्ठ्यांमधून एकाच वेळी एक रसायनशास्त्राचे, एक औषधांवरचे, एक कादंबरी, काही पुस्तके तत्त्वज्ञानाची आणि धर्मशास्त्रावरची मागवली गेली. जणू एकाद्या वादळात खडकांवर आपटून फुटलेल्या गलबताचे अवशेष समुद्रात वाहत असावेत आणि जीव वाचवण्यासाठी कष्टाने एकेका अवशेषाचा आधार घेत पोहावे, तसे त्याचे वाचनाचे विषय अस्ताव्यस्त विखुरलेले होते.

हे सगळे आठवून बँकर आता काळजीत पडला - ‘उद्या बारा वाजता तो कैदेतून मुक्त होईल. करारानुसार मी त्याला वीस लाख देणे लागतो. ते जर मी त्याला द्यायचे म्हटले, तर अगदीच खेळखंडोबा होईल. मी तर कायमचा आयुष्यातून उठेन....’

पंधरा वर्षांपूर्वी बँकरकडे मोजदाद करण्यापलीकडे पैसा होता. परंतु आता मात्र खेळ पालटला होता. आपली देणी जास्त आहेत की ठेवी, याचा विचारही त्याला नकोसा झाला होता. अगदी उतारवयातही त्याच्या सट्टाबाजारातल्या, शेअरबाजारातल्या आत्मघातकी धोरणाने, निष्काळजीपणाने केलेल्या व्यवहारांमुळे त्याचा व्यवसाय उताराला लागला होता आणि एके काळचा निर्भीड, आत्मविश्वासाने आणि अभिमानाने वावरणारा उत्तम, यशस्वी धंदेवाइकाचा आज मात्र शेअर बाजाराच्या प्रत्येक चढ-उतारानिशी भीतीने थरकाप होऊ लागला होता.

‘ती पैज एक शापच होऊन बसली मला’, आपले बधिरर डोके हातांनी गच्च धरून नैराश्याने बँकर पुटपुटला. ‘हा माणूस मेला कसा नाही? छ्या! जेमतेम चाळीस वर्षे असेल त्याचे वय. माझ्याकडची अगदी फुटकी कवडीही तो आता हिरावून घेऊन मस्तपैकी लग्न करेल, सट्टाबाजारात खेळेल, सगळी मजा करेल, आणि मी मात्र दिसेन एकाद्या आशाळभूत भिकार्‍यासारखा. सतत त्याच्याकडून ऐकायला मिळेल की ‘हे माझ्या आयुष्यातील सर्व ऐश्वर्य आज केवळ तुझ्यामुळे आहे. तुझ्या कठीण परिस्थितीत तुला मदत करणे माझे कर्तव्यच आहे.’ काय अर्थ आहे याला? हे असे दिवाळे निघून सर्वत्र छी:थू: होण्यातून मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे हा प्राणी कैदेत असतानाच मरणे.’

घड्याळाने तीनचा ठोका दिला. बँकर लक्षपूर्वक ऐकत होता. घरातले बाकी सर्व जण सुखाने झोपले होते आणि खिडकीतून बाहेर फक्त पानगळीचा आवाज येत होता. अजिबात आवाज न करता, त्याने तिजोरीतून गेल्या पंधरा वर्षांत न उघडलेल्या दरवाजाची किल्ली हलकेच बाहेर काढली. आपल्या कोटाच्या खिशात ती ठेवून तो घराबाहेर पडला. बागेत मिट्ट काळोख होता.; हवेत गारठा होता. हलकासा पाऊसही पडत होता. ओला झोंबरा वारा आपल्या हातांनी बागेतल्या झाडांना हलवत होता, पानगळ चालू होती. फाडफाडून पाहिले, तरी बँकरला बागेतली झाडे, जमीन, तिथले सफेद पुतळे, समोरची इमारत यातले काही एक दिसत नव्हते. गुरख्याला दोनदा त्याने हाकारले, तरी त्याचा प्रतिसाद काही आला नाही. खराब मौसमामुळे गुरख्याने बहुतेक बाजूच्या शेडवजा खोलीचा आसरा घेऊन तो आता झोपला असावा.

‘माझे ईप्सित साध्य करण्याइतके मनोबल मी राखू शकलो, तर संशयाची सुई सर्वप्रथम त्या गुरख्यावर जाईल.’ बँबॅंकर मनातल्या मनात उद्गारला.
अंधारात चाचपडत त्या खोलीकडे जाणारा जिना, दरवाजा हे पार करून तो हॉलमध्ये शिरला. हलकेच एका चिंचोळ्या गल्ल्लीत शिरून त्याने काडी शिलगावली. त्या प्रकाशात त्याला कोणीही दिसले नाही. एक रिकामी खाट, बाजूला एक लोखंडी चूल इतकेच त्या खोलीतला अंधार वाढवत होते. कैद्याच्या खोलीकडे जाणार्‍या दरवाज्याचे सील जसेच्या तसे होते. शिलगागवलेली काडी विझली, तशी अस्वस्थपणे बँकरने कैद्यासाठी बनवलेल्या झरोक्यातून आत डोकावायचा प्रयत्न केला.
त्या खोलीत एक मेणबत्ती मंदपणे तेवत होती. कैदी टेबलाजवळ बसला होता. त्याची पाठ, केसांनी झाकलेले डोके आणि हात इतकेच त्याच्या दृष्टीस पडले; शिवाय इतस्ततः विखुरलेली पुस्तके, दोन खुर्च्या आणि टेबलाजवळ सतरंजी हे सामान.

पाच मिनिटे झाली आणि या अवधीत कैद्याने एकदाही काही हालचाल केली नाही. पंधरा वर्षांच्या कारावासाने त्याला स्वस्थपणे पुतळ्यागत राहायला शिकवले होते. बँकरने खिडकीवर बोटांनी टकटक केले, तरीही कैद्याने काही प्रतिसाद दिला नाही. आता बँकरने सावधपणे कुलपाचे सील उघडले, हलकेच कुलपात किल्ली घालून कुलूपही उघडले. गंजलेले ते कुलूप प्रयासाने आवाज करत उघडले. दार करकरले. बँकरला अपेक्षित होते ते कैद्याचे दचकून उठणे, आश्चर्याने उठून पाहायला येणे. तीन मिनिटे झाली, तरीही मघाशी होती तितकीच शांतता खोलीत अद्यापही होती. अखेर त्याने आत शिरायचे ठरवले.

टेबलासमोर बसलेली आकृती सामान्य मनुष्यप्राण्याची वाटतच नव्हती. ओढून ताणून त्वचा बसवलेला तो जणू एक हाडांचा सापळाच होता. एकाद्या स्त्रीप्रमाणे लांबसडक कुरळे केस, आणि लांबलचक दाढी. चेहर्‍याचा रंग मातकट झालेला, खप्पट गाल, अरुंद आणि लांब धनुष्याकृती वळलेली पाठ आणि ज्या हातांवर त्याचे केसाळ डोके रेलले होते, ते हातही इतके रोडावलेले आणि शुष्क की त्यांच्याकडे अगदी पाहवत नव्हते. डोक्याचे केस पांढरे पडायला लागले होते. ओढलेल्या निस्तेज चेहर्‍याकडे पाहून ही आकृती कोणा चाळीस वर्षांच्या इसमाची असेल असे कोणी म्हणू धजले नसते. टेबलावर त्याच्या डोक्याच्या पुढेच, बारीक अक्षरात लिहिलेला एक कागद पडला होता.

‘गरीब बिचारा!’ बँकर मनात म्हणाला, ‘झोप लागलेली दिसते आहे, आणि स्वप्ने पाहत असेल लक्षाधीश होण्याची. आधीच अर्धमेली झालेली ही ब्याद नष्ट करायला मला फारसे कष्ट पडू नयेत. नुसते उचलून पलंगावर भिरकावले, क्षणभरच उशीनेच नाकावर दाबून धरले, तरी अगदी काळजीपूर्वक केलेल्या त्याच्या शव-विच्छेदनातूनही ते काही सापडणार नाही. पण तत्पूर्वी एकदा या कागदावर काय लिहिले आहे, ते तर पाहू!’

बँकरने टेबलावरचा तो कागद घेऊन वाचायला सुरुवात केली. ‘उद्या रात्री बारा वाजता मी स्वतंत्र होईन, आणि माणसांत मिसळण्याचा अधिकार मला पूर्ववत प्राप्त होईल. परंतु, ह्या खोलीतून बाहेर पडून सूर्यदर्शन करण्यापूर्वी तुला दोन शब्द सांगण्याची गरज आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीने आणि परमेश्वराचे स्मरण करून मी सांगू इच्छितो की तुझ्या पुस्तकांमध्ये ज्यांचा उल्लेख आहे, त्या जगातल्या सर्व सुखांचा, स्वातंत्र्य, जीवन, स्वास्थ्य वगैरेंचा मी तिरस्कार करतो.

पंधरा वर्षे मी अतिशय परिश्रमाने सृष्टीतल्या जीवनाचा अभ्यास केला आहे. हे तर खरेच, की प्रत्यक्ष जमीन किंवा माणसे ही मी पाहिलीच नाहीत. पण तू दिलेल्या पुस्तकांतून मी उंची मद्य सेवन केले, गाणी म्हटली, जंगलांमध्ये हरणे, रानडुकरे यांच्या शिकारी केल्या, प्रेयसींवर प्रेम केले.... आणि त्यातल्या कवींच्या काव्यप्रतिभेने निर्मिलेल्या सुंदर अप्सरांनी ढगांवर स्वार होऊन माझ्या खोलीत मला भेट दिली, छानछान कानगोष्टी सांगितल्या, आणि मला धुंद, स्वैर बनवले. तुझ्या पुस्तकांतून मी इराणमधले अल बुर्झ आणि आल्प्सचे मॉन्ट ब्लँक ही अत्युच्च शिखरे सर केली, तिथून पहाटे उगवत्या सूर्याचे दर्शन घेतले, तर संध्याकाळी क्षितिजावर सूर्याने बुडताना समुद्र, आकाश आणि पर्वतरांगांवर केलेली गुलालाची आणि सोन्याची उधळण पाहिली. आकाशात ढगांना कवटाळत चमकून जाणार्‍या विजा पाहिल्या, हिरवी गर्द जंगले, तळी, नद्या, उभी पिके, शहरे पाहिली; पुरातन ग्रीक कथांतल्या सायरन्सची गाणी ऐकली, ग्रीक पॅन देवतेचा शंखनाद ऐकला; मला भेटून देवांचे निरोप द्यायला स्वर्गातून उडत उडत आलेल्या सुंदर यक्षकन्यांच्या मखमली पंखांना स्पर्श केला. तुझ्या पुस्तकांद्वारे उंच उंच पर्वतराजींनी निर्मिलेल्या खाईंच्या तळापर्यंत स्वतःला नेऊन आणले, विविध जादू करून पाहिल्या, अनेक शहरे जाळून भस्मसात केली, नवे पंथोपपंथ सुरू केले, अनेक देश पादाक्रांत केले....

तुझ्या पुस्तकांनी मला ‘शहाणपण’ शिकवले. शतकानुशतके घडलेल्या मनुष्याच्या इतिहासातून तयार झालेला मानवतेचा विचार माझ्या मेंदूमधे एकाद्या गोळीप्रमाणे साकळून बसलेला आहे. तुमच्या सर्वाहून मी अधिक हुशार आहे, याची मला जाणीव आहे.

आणि तरीही, मी तुमच्या या सर्व पुस्तकांचा, माणसाला मिळालेल्या वरदानाचा, त्याच्या या शहाणपणाचा कमालीचा तिरस्कार करतो. हे सर्व अगदी क्षणभंगुर, शून्यवत्, मृगजळाप्रमाणे फसवे आणि अदृष्ट असेच आहे. स्वतःला तुम्ही अभिमानाने शहाणे, सुंदर म्हणवत असला, तरी हा मृत्यू तुम्हाला बिळांमध्ये बसलेल्या उंदरांप्रमाणे समूळ उखडून नष्ट करून टाकेल. तुमच्या भावी पिढ्या, तुमचा इतिहास आणि तुम्हा मनुष्यांची अमूर्त अशी जी प्रतिभा, हे सर्व काही पृथ्वीवरील सर्व अस्तित्वाबरोबर जणू अशुद्ध मळीप्रमाणे जळून खाक होईल.

तुम्ही सगळे अगदी मूर्ख आहात आणि अतिशय चुकीच्या मार्गाने तुमचा प्रवास चालू आहे. तुम्ही असत्याला सत्य आणि कुरूपाला सुंदर मानता. उद्या जर अचानक सफरचंदांच्या आणि संत्र्यांच्या झाडांना फळांच्या ठिकाणी बेडूक आणि पाली लागल्या, किंवा गुलाबाच्या फुलांना घोड्याच्या घामाचा वास यायला लागला, तर तुम्ही थक्क व्हाल. तसाच मीही, तुम्ही स्वर्ग हातचा सोडून पृथ्वी आपलीशी केली आहे, त्यामुळे कमालीचा चकित झालो आहे. मला तुमच्याबद्दल याहून अधिक काही समजून घ्यायची इच्छा नाही.

माझ्या या तिरस्काराच्या भावनेचे व्यक्त स्वरूप दाखवायचे, म्हणून मी एके काळी ज्याला अत्युच्च वैभव असे मानले, त्या वीस लाखांचा मी त्याग करीत आहे. माझ्या त्या हक्कापासून स्वतःला वंचित करण्यासाठी मी आपल्या ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटे आधीच या कारावासातून बाहेर येईन आणि अशा तर्‍हेने करारभंग करीन.’

हे पत्र वाचल्यावर बँकरने तो कागद टेबलावर ठेवला, त्या विचित्र माणसाच्या डोक्याला चुंबले, आणि अश्रू ढाळू लागला. तो त्या कक्षातून बाहेर पडला. त्याला स्वतःच्या वागण्याचा अतोनात पश्चात्ताप व्हायला लागला. स्वतःबद्दल इतका तिरस्कार तर त्याला यापूर्वी अगदी सट्टाबाजारात हरल्यानंतरही वाटला नव्हता. घरी येऊन तो पलंगावर आडवा झाला खरा, पण मनाची तगमग आणि अश्रूंची संततधार, यांमुळे कितीतरी वेळ त्याला झोप लागली नाही.

दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे गुरखा धावतच त्याच्याकडे आला आणि त्याला सांगू लागला की त्या इमारतीतल्या खोलीत राहणार्‍या माणसाला त्याच्या खोलीतल्या झरोक्यातून त्याने बागेत उतरताना पाहिले. तो दरवाजातून बाहेर पडला आणि नाहीसा झाला. तत्काळ बँकर आपल्या नोकरांना बरोबर घेऊन त्या खोलीत गेला, परिस्थितीची शहानिशा करून कैदी पळाल्याबद्दल पुरावा गोळा केला आणि मग इतर अनावश्यक चर्चांना ऊत येऊ नये, म्हणून तो कालचा कागद टेबलावरून उचलून, परतपावली घरातल्या तिजोरीत बंद करून ठेवला!
.
.
1

वाङ्मयकथाआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

2 Mar 2018 - 12:36 am | मार्मिक गोडसे

+१

चेखॉव म्हणजे काय...! _/\_

अनुवादही तितकाच उत्कृष्ट केला आहे.

पैसा's picture

2 Mar 2018 - 1:50 pm | पैसा

परिणामकारक कथा आणि अप्रतिम अनुवाद!

नूतन's picture

2 Mar 2018 - 3:16 pm | नूतन

कथा आणि अनुवाद दोन्ही

कलंत्री's picture

2 Mar 2018 - 7:57 pm | कलंत्री

चेकाव च्या कथा वाचायच्या बाकी आहे ही खंत मनात भरुन आली आहे.

कथा आणि अनुवाद दोन्हीही आवडले.

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2018 - 11:03 am | प्राची अश्विनी

कथा आधी वाचलं होती. अनुवाद सुंदर झालाय.

किसन शिंदे's picture

3 Mar 2018 - 2:30 pm | किसन शिंदे

अतिशय उत्कृष्ट अनुवाद केलाय. कथाही आवडली.

नाखु's picture

5 Mar 2018 - 9:54 am | नाखु

अनुवाद
अगदी समर्पक शब्द योजना केली आहे

सुधीर कांदळकर's picture

5 Mar 2018 - 8:21 pm | सुधीर कांदळकर

रशिया सोविएत असतांना तिथल्या अभिजात वाङ्मयाची मराठी भाषांतरे स्वस्तात मिळायची. तेव्हा त्याचे मोल कळले नाही ही खंत जाणवते. वामन पात्रीकरांनी भाषांतरित केलेले अश्विनी आणि मटा मध्ये आलेल्या सौ देशपांडे अनुवादित काही लघुकथांच ठसा अजून स्मरणात आहे. तिथले समाजजीवन, विविध नातेसंबंध, नात्यांमधले ताणतणाव आणि बदलत्या परिस्थितीच्या या नातेसंअबंधावर होणारे परिणाम सारे पुन्हा जिवंत झाले. खासकरून आपल्याकडे बायका लोण्ची पापड घालतात तसे तिथे वोदका घरी गाळून बाटल्यात भरून त्या बाटल्या घरातल्या पुरुषांपासून लपवून ठेवून एकत्र कुटुंबातल्या घरी पावणेरावणे जमल्यावर ठेवणीतली वोदका काढणे, सारे अपहलातून आहे. अर्थातच पास्तरनॅकचा डॉ झिवॅगो पण आठवला, इंग्रजीतून वाचलेला.

आणि एका एकाकी मरणासन्न म्हातारीला मोत्सार्ट मोडक्या व्हायलीनमधून दैवी सुरावट ऐकवतो आणि मग ती सुखाने प्राण सोडते ती तर भिडणारी कथा.

या सर्व आठवणी जागवल्यात. अनेक अनेक धन्यवाद. चेखवबरोबर बेल्कीनच्या कथा पण येऊद्यात. वाचायला नक्की आवडेल

प्रदीप's picture

5 Mar 2018 - 8:35 pm | प्रदीप

चेकॉव्हच्या ह्या विलक्षण कथेचा अनुवादही अप्रतिम झाला आहे. ही कथा निवडून, ती सुबकपणे येथे पोहोचवल्याबद्दल लेखकाचे शतशः आभार.

असेच अजून चेकॉव्ह, गोर्की इत्यादींचे येऊ देत.

शशिधर केळकर's picture

9 Mar 2018 - 5:14 pm | शशिधर केळकर

सर्व वाचकांचे, प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार!

त्यामुळे, माझ्या उत्साहात भर पडली. लौकरच एकादी नवीन अनुवादित कथा लिहीन, तेव्हा परत भेटूच!

शशिधर केळकर