शेजाऱ्याचा डामाडुमा- राय रुफिया आणि ड्रॅगनची मिठी - मालदीव भाग ७

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
1 Feb 2018 - 3:59 pm

मालदीव मालिकेतील या आधीचे ६ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. सहावा भाग इथे आहे :-
https://www.misalpav.com/node/41819

आकारमान आणि लोकसंख्या बघता मालदीव हा अगदीच पिटुकला देश. गर्भश्रीमंत सौंदर्यप्रेमी पर्यटक सोडले तर इतर कोणाच्या खिजगिणतीतही नसला तरी आश्चर्य वाटू नये असा. पण तसे नाही. जगाशी आणि जागतिक संस्थांशी मालदीवचा व्यापक संपर्क आहे. शेजारी देश म्हणून भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे निवासी राजदूतावास राजधानी मालेत आहेत. क्षेत्रीय बाहुबली आणि उगवती महासत्ता म्हणून चीन आणि ह्या व्यतिरिक्त जपान आणि सौदी अरेबिया यांनीही आपले राजदूत मालदीवला नियुक्त केले आहेत. जवळपास ७० देशांच्या भारत किंवा श्रीलंकेतल्या राजदूतांना मालदीवची अतिरिक्त जबाबदारी दिलेली असते, त्यामुळे ते येऊन जाऊन असतात. मालदीवमध्ये सगळ्याच देशांना का एवढी रुची ? त्याचे उत्तर मालदीवच्या भौगोलिक स्थानात आहे. भारतीय महासागरातील मालदीवचे भौगोलिक स्थान असे की भारतच काय पूर्व आशियातील सर्वच तेल-पिपासु देशांसाठी हा देश फार महत्वाचा आहे. जगतातील सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन (SLOCs) - सागरी मार्गाच्या जाळ्यातील अनन्यसाधारण महत्व असलेला दीपस्तंभच जणू. अरब जगातून सागरी मार्गाने पूर्वेकडे जवळपास सर्व देशांना जाणारे सगळेच कच्चे तेल मालदीवच्या समुद्रातून जाते. ह्या एकाच मुद्द्यावरून मालदीवचे भूराजकीय आणि सामरिक महत्व लक्षात येते.

* * *

जुलै १९६५ मध्ये मालदीव स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला तेंव्हा ब्रिटन आणि श्रीलंके पाठोपाठ मालदीवला सर्वप्रथम स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा देश भारतच होता. १९७२ मध्ये माले शहरात भारतीय दूतावास उघडले. (मालदीवचे निवासी राजदूतावास दिल्लीत उघडायला मात्र २००४ साल उजाडावे लागले. त्याआधी मालदीवचे श्रीलंकेतील राजदूतच भारतातले काम बघत असत.)

मालेतील भारतीय राजदूतावास - १

मालेतील भारतीय राजदूतावास - २

पुढील काही वर्षात नवीन शासनाशी वाटाघाटी करून भारत मालदीव सागरी सीमा निश्चित करण्यात आली. त्यावेळी बेटांची मोजणी करण्याची यंत्रणा तोकडी होती. त्यामुळे ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ ठरली. काही बेटांच्या मालकीवरून वाद झाले पण ते नाजूक हातांनी सोडवण्यात यश आले.

सगळीकडे समुद्र असल्यामुळे आणि जमीन फार कमी असल्यामुळे मालदीवकरांच्या लेखी जमिनीचे महत्व प्रचंड आहे. इतके की ऐतिहासिक काळापासून सुलतान / शासन / सरकार सोडून अन्य कोणाला आजही तिथे जमिनीचे मालक होता येत नाही. (सरकार भाडेपट्टीनी देऊ शकतं, देतं सुद्धा) त्यामुळे जमिनीच्या छोट्या तुकड्याच्या मालकीसाठीही मालदीवचे शासक फार काटेकोर होते. भारतातील मिनीकॉय बेटं आमचीच आहेत असा त्याचा दावा होता. त्यामुळे भारताशी मिनीकॉय बेटांबद्दल थोडा वाद झाला. मिनीकॉयच्या स्थानिक लोकांची भाषा-संस्कृती मालदिवसारखी होती, मिनीकॉयचे उल्लेख मालदीवकरांच्या ऐतिहासिक दस्तावेजात होते, त्यामुळे दावा अगदीच अस्थानी नव्हता. ही बेटं भारताच्या लक्षद्वीप आणि मालदीवच्या थुराकूनु बेटाच्या मधे आहेत, फार काही मोठी नाहीत.

मिनीकॉय बेटे - लक्षद्वीप, भारत

भारताची बाजू सांगायची तर भारत स्वतंत्र झाल्याच्या ९ वर्षांनंतरही मिनीकॉयच्या दीपगृहावरील डौलाने फडकणारा युनियन जॅक उतरला नव्हता ! सरकारी यंत्रणेपैकी तेथे कुणीच जात नव्हते खरेतर. दीपगृहाच्या चौकीदाराला भारत स्वतंत्र झाल्याची आणि भारताचा नवीन तिरंगा ध्वज चलनात आल्याची काही खबरच नव्हती (!). शेवटी १९५६ मधे दीपगृह बांधणाऱ्या ब्रिटिश कंपनीने दीपगृहाच्या डागडुजीसाठी पाठवलेल्या पथकाला हे लक्षात आले आणि त्यांनी सन्मानाने त्यांचा ध्वज उतरवून परत नेला.

मिनीकॉय दीपगृह 1 - लक्षद्वीप, भारत.

मिनीकॉय दीपगृह 2 - लक्षद्वीप, भारत.
(स्थानिक भाषा आणि लिपीवर मालदीवच्या धिवेही भाषेचा प्रभाव स्पष्ट दिसतो.)

भारत स्वतंत्र होतांना अडचणीच्या प्रांतांमध्ये सार्वमत आजमावण्याची सूचना चलनात होती. भारतात मुख्यभूमीत नाही पण लक्षद्वीप समूहातल्या मिनीकॉय बेटांसाठी खरोखरीच सार्वमत घेण्यात आले ! स्थानिक जनतेला 'भारतात सामील व्हायचे आहे का' असा प्रश्न विचारून त्याचे हो किंवा नाही असे उत्तर विचारण्यात आले. बहुसंख्य जनतेने हो म्हणल्यानंतरच मिनीकॉय बेटे भारतात सामील करण्यात आली. अधूनमधून 'आमची मिनीकॉय बेटे तुम्ही बळकावली' असा विषय येतो पण फार ताणला जात नाही कारण भारताकडून सार्वमताची प्रक्रिया अगदी पारदर्शी होती, चोखपणे पार पाडण्यात आली होती.

* * *
मालदीवच्या संरक्षणासाठी भारताच्या मदतीबद्दल आपण मागच्या भागात वाचले. त्याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात सुद्धा भारतीय योगदान भरपूर आहे. सुरवात झाली ती मालदीवच्या शिक्षण क्षेत्राची घडी बसवण्यापासून. मालदीवमध्ये सत्तरीच्या दशकात सुरु झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या पहिल्यावहिल्या शाळेपासून ते उच्चशिक्षणासाठी भारतीय संस्थांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीपर्यंत भारतीय सरकारची मदत मालदीवच्या शिक्षणक्षेत्रात पावलोपावली दिसून येते. आधुनिक इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रत्येक मोठ्या अटॉलवर शाळा आणि तेथे लागणारे शिक्षक हे बहुतांशी भारताने पुरवलेले आहेत. आजही भारतीय शिक्षकांना मालदीवमध्ये मोठी मागणी आहे, त्यांना मान आहे. मालदीवमध्ये असलेल्या एकूण शिक्षकांपैकी ३० टक्के शिक्षक भारतीय आहेत.

एका शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या भारतीय शिक्षिका, अड्डू अटॉल, मालदीव

रुग्णसेवेसाठी मालेचे सुसज्ज इंदिरा गांधी रुग्णालय असो की तंत्रशिक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्त्या, कमी व्याजाचे कर्ज, व्यावसायिक प्रशिक्षण अशी भरघोस मदत भारताकडून मालदीवकरांना सातत्याने लाभत आली आहे. भारतीय स्टेट बँक ही १९७४ पासून मालदीवच्या पर्यटन आणि मत्स्यव्यवसायाला पतपुरवठा करीत आहे. अनेक व्यवसाय आणि रिसॉर्ट उभे करण्यात बँकेचा वाटा आहे. घरबांधणीसाठी भारतीय मदत आहेच. भारतीय कंपन्यांनी मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, विशेषतः पर्यटन आणि घरबांधणी क्षेत्रात. स्थानिक आस्थापनांमध्ये भारतीय तज्ञ डॉक्टर्स, तंत्रज्ञ, शिक्षक, व्यवस्थापक आणि अभियंते यांची संख्या मोठी आहे. वेळोवेळी आर्थिक मदत, अल्पव्याजी-बिनव्याजी कर्ज, वस्तुरूपात मदत, संस्थात्मक सक्षमीकरणासाठीची मदत अशी अनेक हातांनी भारतीय मदत होत असतेच, त्याची जाणीव स्थानिक राज्यकर्ते आणि जनतेला आहे. त्यामुळे भारताकडे आदराने, मैत्रीदृष्टीने पाहिले जाते.

* * *

गेली काही वर्षे भारताच्या अन्य शेजाऱ्यांप्रमाणे मालदीवमध्येही चिनी वावर वाढला आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये चीन ने मालदीव मध्ये स्वतःचे दूतावास थाटात सुरु केले आणि मालदीवमध्ये ड्रॅगनपर्वाची सुरवात झाली. अनेक चिनी कंपन्यांनी स्थानिक कंपन्या, हॉटेल, बांधकाम व्यवसाय ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करायला सुरवात केली ती ह्याच वेळेस.

मालेमध्ये चिनी दूतावासाच्या उदघाटनचा सोहळा - ६ नोव्हेंबर २०११

मालदीवचे अर्थकारण आजही पर्यटनक्षेत्रावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ७०% स्थानिक जनतेचे नोकरी-व्यवसाय ह्या एकाच क्षेत्रावर चालतात. पूर्वी ब्रिटिश आणि रशियन पर्यटकांचे आकडे मोठे होते, गेल्या ४-५ वर्षात ती जागा चिनी पर्यटकांनी पटकावली आहे. गेली चार-पाच वर्षे मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या बघितली तर चिनी पर्यटक एकूण पर्यटकांच्या ५०% चा आकडा पार करतांना दिसताहेत. शेजारी असूनही भारतीय पर्यटकसंख्या जेमतेमच.

चीनच्या साहाय्याने अनेक मोठे प्रकल्प इथे उभे राहात आहेत. आजवर माले विमानतळ आणि माले शहर ह्या दोन बेटांवर फेरी बोटींनीच वाहतूक होते. आता ह्या दोन बेटांमध्ये चीन-मालदीव मैत्री पूल बांधून त्यांना रस्त्यानी जोडायचा प्रकल्प मंजूर झाला आहे. सर्व खर्च चीन सरकार देणार आहे. जानेवारी २०१६ पासून ह्या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे.

भारतीय कंपनी जीएमआर कडून काढून घेतलेले माले विमानतळाच्या विस्तारीकरणाचे कंत्राट आता चिनी कंपन्यांना मिळाले असून त्यासाठी मालदीवला सुमारे ५० कोटी डॉलर्सची विशेष मदत चीन सरकार देत आहे. प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे.

चीनच्या 'समुद्री रेशीममार्ग' ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी २०१४ पासून चीनकडून मालदीवला देण्यात येणाऱ्या मदतीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक प्रकल्पांना सवलतीच्या दराने वित्तपुरवठा, चीन सरकारकडून भेट म्हणून मिळणारे अनेक प्रकल्प अशी आतिषबाजी सुरु आहे. मालदीवमध्ये असलेल्या जमिनीच्या दुर्भिक्षामुळे तेथिल संविधानात कोठल्याही विदेशी सरकार किंवा कंपनीला जमीन विकण्यास कडक बंदी आहे. हवे असल्यास सरकार जमीन भाडेपट्ट्यावर देऊ शकते, पण बऱ्याच अति-शर्तीनंतर. चीनच्या विनंतीवरून नुकतेच संविधान संशोधन करून १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुणवणूक करणाऱ्या विदेशी कंपन्या / सरकारे यांना जमीन विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. ह्याचा फायदा फक्त चिनी कंपन्यांना मिळावा यासाठी ड्रॅगन आग्रही आहे हे ओघानेच आले.

आज मालदीवच्या डोक्यावरील एकूण कर्जात तीन चतुर्थांश कर्ज एकट्या चीनचे आहे. कर्जाव्यतिरिक्त अन्य 'मदत' आहेच. पूर्वापार भारताकडून होणारी आर्थिक मदत ह्या चिनी धनवर्षावाच्या पासंगालाही पुरणारी नाही.

नवीन नोकऱ्या-धंदा येतोय चीन कडून, त्यांच्या प्रकल्पांमुळे. नवीन गुंतवणूक येतेय ती बहुतेक चीन आणि काही प्रमाणात सौदी अरेबियामधून. त्यामुळे नवीन पिढीला ‘राय रुफिया’ची म्हणजे 'लाल' रुफियाची भुरळ पडणे स्वाभाविक म्हणता येते. आता भारतीय आणि चिनी कंपन्यांमध्ये कंत्राटांबद्दल स्पर्धा आहे, सध्या चीनला अधिकचे झुकते माप मिळते असे म्हणता येईल. हिंदी आणि मल्याळी सिनेमा आणि टीव्ही मालिका, भारतीय भोजन, भारतात पर्यटन आणि खरेदी, भारतीय वस्त्रांच्या-दागिन्यांच्या फ्याशन अश्या गोष्टी स्थानिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असल्या आणि भारत-मालदीव मैत्रीचे गुणगान यथावत असले तरी भारताचे तेजोवलय मंदावतांना दिसते आहे.

* * *

बातम्या - टेलिव्हिजन - वृत्तपत्रे यातून आपण देशोदेशीच्या प्रमुखांच्या भेटींचे उत्सव, भव्य आगत-स्वागत, पोषाखी लष्करी तुकड्यांच्या मानवंदना, महत्वाच्या समाधीस्थळी वाहिलेली पुष्पचक्रे, करारमदार सही करण्याचे समारंभ, भाषणे, सन्मानभोज असे प्रसंग बघतो, त्याबद्दल वाचतो. हे फार वरवरचे असते. ते म्हणतात ना - नो वन इज ऍन एनिमी ऑन कॉफी टेबल. कोणीही विदेशी पाहुणा आपल्या यजमानाबद्दल वाईट बोलत नाही, सभ्यतेचा आणि शिष्टाचाराचा संकेतच आहे तो. पण सर्व राष्ट्रे, जागतिक संस्था यांचे एकमेकांशी संबंध हे एका भक्कम मेरूभोवती फिरणाऱ्या वासुकीसारखे आहेत. हा मेरू आहे स्वार्थाचा ! मंथनातून अमृत निघो वा हलाहल, दोन देशांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांची मजबुती आणि उपयोगिता स्वार्थाच्या जगन्मान्य कसोटीवरच तपासली जाते. मग हा स्वार्थ आर्थिक असो, सैद्धांतिक असो वा रणनैतिक. 'मला यात काय मिळेल' हा प्रथम विचार घेऊन प्रत्येक देश पुढे पाऊल टाकतो. ह्यात चुकीचे अर्थातच काही नाही. त्यामुळे मालदीव काय आणि भारताचे अन्य शेजारी काय, प्रत्येक लहानमोठा देश सदैव स्वार्थ बघणार हे निश्चित.

सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.

* * *
थोडे अवांतर :

अवांतर नाही, कोण वाचतं का ते ? :-)

पुढचा भाग बहुतेक शेवटचा - त्यात मालदिवबद्दल काही रंजक-रोचक गोष्टी वाचूयात. आणि थोडे भाषा- भूषा- भोजन- भजन वगैरे बद्दल.

क्रमशः

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

1 Feb 2018 - 4:01 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

हा भाग कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2018 - 4:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

हाही भाग आवडला.

चीन आपल्या अर्थबळावर भारताभोवतालच्या देशांवर वाढवित असलेला प्रभाव (?दंडेली... कारण हे बहुतेक आर्थिक व्यवहार दिल्या जाणार्‍या कर्जांच्या स्वरूपात आणि हवा तसा परतावा मिळेल असे करार केलेल्या गुंतवणुकिंच्या स्वरूपात आहेत) चिंताजनक आहे हे निश्चित. हे जेवढे भारतासाठी धोकादायक आहे तितकेच ते (त्या देशांच्या वाढत जाण्यार्‍या आर्थिक आणि पर्यायाने राजकिय परावलंबित्वामुळे) देशांसाठीही धोक्याचे आहे.

कपिलमुनी's picture

1 Feb 2018 - 5:08 pm | कपिलमुनी

नेपाळ , पाकिस्तान , श्रीलंका आणि मालदिव ! ड्रॅगनचा विळखा आपल्या भोवती घट्ट होत आहे .

पगला गजोधर's picture

2 Feb 2018 - 5:19 pm | पगला गजोधर

डॉ सिंग सरकारच्या काळात, भारत सरकारने व्हिएतनाम फिलिपिन्स तैवान बर्मा जपान वैगरे "मैत्रीपूर्ण" करून यथाशक्ती
प्रयत्न केल्याचे वाचनात आले असे काहीसे स्मरते.
उदा भारतीय क्रूझ मिसाईल व्हिएतनाम/फिलिपिन्स ला देणार वैगरे.
ओ एन जी सी तिथे उत्खनन करणार.. (मग भविष्यात कदाचित ओ एन जी सी च्या रिग्सला संरक्षण वैगरे साठी भारतीय नौदलही उपस्थित राहील आपसूक ... )

अनिंद्य's picture

5 Feb 2018 - 5:50 pm | अनिंद्य

@ पगला गजोधर,

खाली प्रतिसादात पैसा यांचेशी झालेला संवाद बघा.

हा भाग तुमच्या (भाग ६ मधील) प्रश्नांमुळे थोडा विस्ताराने लिहिला. कॅक्टसबद्दल अमितदादा यांच्या प्रतिसादांमुळे विस्ताराने लिहिले होते. ही मालिका संवादी / interactive होतेय हे मला फार आवडले आहे.

आभार !

अनिंद्य

अनिंद्य's picture

5 Feb 2018 - 5:09 pm | अनिंद्य

@ कपिलमुनी,

सहमत,

हळूहळू का होईना त्याचा भारतीय व्यत्यासही आकार घेतोय ही समाधानाची बाब.

प्रतिक्रियेबद्दल आभार !

- अनिंद्य

छान.. हाही भाग आवडला. शेवटचा परिच्छेदात खूप सुरेख शब्दांत लिहिले आहे.

अनिंद्य's picture

4 Feb 2018 - 10:19 am | अनिंद्य

@ रुपी
आभार.
शेवटच्या परिच्छेदात खूप सुरेख शब्दांत लिहिले आहे...... ते माझे खरेखुरे मत आहे.

शलभ's picture

2 Feb 2018 - 3:04 pm | शलभ

हा ही भाग आवडला.

कुमार१'s picture

2 Feb 2018 - 4:18 pm | कुमार१

हाही भाग आवडला.
तुम्ही आमची घरबसल्या सफर घडवताहात !

कुमार१'s picture

2 Feb 2018 - 4:18 pm | कुमार१

हाही भाग आवडला.
तुम्ही आमची घरबसल्या सफर घडवताहात !

उपेक्षित's picture

2 Feb 2018 - 5:23 pm | उपेक्षित

मस्त चालू आहे लेखमाला.

निशाचर's picture

2 Feb 2018 - 7:46 pm | निशाचर

हा भागही नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे.

अमितदादा's picture

2 Feb 2018 - 11:03 pm | अमितदादा

लेख आवडला...

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2018 - 11:53 am | पिवळा डांबिस

भाग १-७ वाचतो आहे. उत्तम आहेत यात शंका नाही.
फक्त एकच प्रश्नः
डामाडुमा या शब्दाचा अर्थ काय?
आजवर पन्नास वर्षे मराठी माणूस म्हणून जगलो, पण हा शब्द याआधी कधी दिसला नाही.
तेंव्हा तुम्हीच सांगा याचा, अ‍ॅटलिस्ट तुम्हाला अभिप्रेत असलेला, अर्थ काय ते.

अनिंद्य's picture

3 Feb 2018 - 7:47 pm | अनिंद्य

@ पिवळा डांबिस,

मालदीव मालिका आवडल्याचे सांगितल्याबद्दल आभार.

बरोबर आहे. नागर मराठीत 'डामाडुमा' हा शब्द नसावाच. तुमच्या प्रश्नाचे उत्तर, माझ्या नेपाळ मालिकेत धर्मराजमुटके यांना सांगितले तेच :

लहानपणी माझ्या मैत्रिणींच्या तोंडून हा शब्द ऐकला पहिल्यांदा. पूर्व महाराष्ट्रात / विदर्भात एक 'भुलाबाई' म्हणून सण/खेळ असतो, मुलींचा. त्यातल्या एका गाण्यात 'शेजाऱ्याचा डामाडुमा वाजतो तसा वाजू द्या - आम्हाला खेळ मांडू द्या' असे एक गाणे आहे - थोडक्यात 'शेजाऱ्याच्या घरातील घटनांकडे दुर्लक्ष करा' असा अर्थ होतो.

ह्या लेखमालिकेला शीर्षक म्हणून समर्पक वाटला, वापरला :-)

- अनिंद्य

पिवळा डांबिस's picture

7 Feb 2018 - 12:27 am | पिवळा डांबिस

अनेक धन्यवाद.

पैसा's picture

3 Feb 2018 - 2:29 pm | पैसा

चीन अतिशय बेभरवशी शेजारी आहे. त्याला आवर घालणे फार कठीण आहे. आपल्याच देशातले लोक घरभेदे असताना तर ते अशक्यच वाटते. जपानी लोकांसारखे आपण स्वदेशीचे तीव्र अभिमानी नाही त्यामुळे आपल्या देशात तरी चीनची बाजारपेठ कमी व्हावी असे प्रयत्न यशस्वी होत नाहीत.

अनिंद्य's picture

3 Feb 2018 - 8:02 pm | अनिंद्य

@ पैसा, चीनबद्दलच्या एका धाग्यावर मागीलवर्षी मी हे लिहिले होते, ते अजून लागू असावे:

चीनचे अभ्यासक असलेले आमचे एक स्नेही म्हणतात त्याप्रमाणे China is a country with everything in surplus. तो एक ताकदवान देश आहे आणि त्याची महासत्ता होण्याची आकांशा दुर्दम्य आहे ह्यात वादच नाही. त्यासाठी स्वतःच्या आर्थिक साम्राज्याची मजबूत बांधणी आधी करण्याएव्हढे शहाणपणही त्यांच्याकडे मुबलक आहे. पण शक्ती वाढली की शत्रूपण वाढतात आणि तिथेच खरी संधी असते.

चीन हा एक असा देश आहे ज्याचे उत्तर कोरिया, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, म्यांमार, लाओस आणि वियतनाम अश्या स्वतःच्या सर्व १३ शेजारी देशांशी सीमावाद आहेत. (तिबेट आता वेगळा देश किंवा स्वायत्त प्रदेश राहिलेला नाही आणि पाकिस्तानला चीनच्या सीमा पाकव्याप्त काश्मीर प्रदेशातून आता थेट भिडलेल्या आहेत त्यामुळे तेराच शेजारी म्हणूयात.)

चीनला त्याच्या समुद्री सीमांवरही जोरदार आव्हानाचा सामना करावा लागत आहे - दक्षिण-पूर्वेतले झाडून आठही समुद्र-शेजारी म्हणजे जापान, दक्षिण कोरिया, फिलीपींस, वियतनाम, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया आणि तैवान चीनच्या अरारेवीला उत्तर देण्यासाठी एकत्र आले आहेत. सगळ्याच देशांवर विकासाची स्वप्ने विकणे, दादागिरी करणे किंवा पैसे उधळण्याची खेळी कामी येतेच असे नाही. त्यामुळे चीनला त्याच्या वसाहतवादी धोरणांना मुरड घालावीच लागणार आहे.

जपानचा तीव्र देशाभिमान आणि चीनच्या बाजारपेठेबद्दल पुढे कधीतरी :-)

तुम्ही वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार !

- अनिंद्य

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2018 - 3:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता मालदीवमध्ये राजकारणाचा एक नवीन अध्याय (किंवा जुन्या अध्यायाची सुधारून वाढवलेली आवृत्ती) सुरू आहे.

Maldives top court seeks to impeach president, attorney general says

Maldives president declares war on SC, court seeks India help

होय, गेल्या गुरुवारपासून धमाल आहे नुसती.

The less explained part of the events - भूतपूर्व राष्ट्रपती नाशिद ह्यांना यावर्षी २०१८ मधेच होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला उभे राहायला योग्य पार्श्वभूमी तयार होत आहे असे वाटते.

प्रचेतस's picture

5 Feb 2018 - 4:05 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेखन

अनिंद्य's picture

5 Feb 2018 - 5:00 pm | अनिंद्य

@ प्रचेतस,

आभार !

अनिंद्य's picture

6 Feb 2018 - 1:51 pm | अनिंद्य

सद्यस्थिती - The paradise is in trouble, again !

गेली ४-५ दिवसांपासून मालदीवमधून येणाऱ्या बातम्या निराशाजनक आहेत. सद्य सरकारने आणीबाणी जाहीर करून प्रतिपक्षीय नेते आणि स्वतःविरुद्ध निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना अटक करण्याचे सत्र चालवले आहे.

आज भूतपूर्व राष्ट्रपती नाशीद यांनी तर 'मालेत भारताने प्रत्यक्ष फौज पाठवावी - physical intervention' अशी मागणी केली आहे ! तसे होईल असे वाटत नाही, बघूया काय काय होते ते :-(

- अनिंद्य

अमितदादा's picture

7 Feb 2018 - 1:11 am | अमितदादा

गेली ४-५ दिवसांपासून मालदीवमधून येणाऱ्या बातम्या निराशाजनक आहेत

नक्कीच, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या, तज्ञांची मते वाचतो आहे. भारत सध्यातरी सावध पणे पाऊले टाकतो आहे. पाश्चात्य राष्ट्रे, सयुंक्त राष्ट्रे आणि भारत राजनैतिक दबाव बनवून आहेत बागूया काय काय घडामोडी होतात त्या.

पगला गजोधर's picture

9 Feb 2018 - 4:43 pm | पगला गजोधर

भारत सध्यातरी सावध पणे पाऊले टाकतो आहे.

अवांतर: भारत आज (इंटरव्हेंशन सारखी ) कणखर भूमिका, घ्यायची वेळ आल्यावर, घेईल काय ?
(इंदिरा गांधींच्या काळात कणखर भूमिका घेण्याची जशी धमक भारताने दाखवली, तशी धमक, भारत आज दाखवू शकेल काय,
विशेषतः आजच्या आंतरराष्ट्रीय चावडीमध्ये जर भारताची इमेज अभूतपूर्व झाली असेल तर ... )

सध्यातरी मालदीवमध्ये दुसरे कॅक्टस घडेल अशी चिन्हे दिसत नाहीत.
बाकी बडे लोग जाने.

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2018 - 3:03 pm | श्रीगुरुजी

मालदीवमध्ये फक्त इस्लाम धर्माचे पालन करायला परवानगी आहे, इतर धर्मियांना जाहिररित्या आपल्या धर्माचे पालन करता येत नाही, विमानतळावर सामानाची काटेकोर तपासणी होते व देवांची चित्रे, तसबिरी, देवांच्या मूर्ती असलेली कीचेन्स इ. गोष्टी काढून घेतल्या जातात असे ऐकले आहे (म्हणजे मालदीव सौदी अरेबियाप्रमाणेच आहे) हे कितपत खरे आहे?

अनिंद्य's picture

6 Feb 2018 - 3:29 pm | अनिंद्य

इस्लाम व्यतिरिक्त अन्य धर्माचे जाहीर पालन निषिद्ध आहे.
बाकी गोष्टी पुढच्या भागात लिहीनच.

पद्मावति's picture

6 Feb 2018 - 3:05 pm | पद्मावति

उत्कृष्ट लेखमाला.

अनिंद्य's picture

6 Feb 2018 - 3:34 pm | अनिंद्य

@ शलभ
@ कुमार१
@ उपेक्षित
@ निशाचर
@ अमितदादा
@ पद्मावति

उत्साहवर्धनासाठी तुम्हां सर्वांचे आभार.

- अनिंद्य

आणि हो, कुमार१ यांचे दुप्पट आभार :-)

सुन्दर मालिका आणि महितीपूर्ण विवेचन.
मागच्या काही दिवसातल्या घटना थोडक्यात - भारताबरोबरच्या काही वर्षापूर्वी झालेल्या व्यापारी करारानुसार मालदीवला भारतात माल पाठवण्यावर काहीही बन्धने नाहीत. त्या कराराच्या वेळी मालदीवहून Tuna वगैरे मासे मिळू शकतील हा अन्दाज होता पण मालदीवच्या export वर काही अटी, बन्धने इ. इ. नव्हती. मालदीवने हल्लीच अतीशय घाईने चीनबरोबर केलेल्या व्यापारी करारात चीन बर्‍याच वस्तू मालदीवला विकू शकणार आहे. म्हणजे त्याच वस्तू भारतात मालदीवहून re-export होण्याकरता भारताचा मागचा दरवाजा सताड उघडा राहिला आहे. जर भारताला हा गुन्ता सोडवता आला नाही तर चीन भारताविरुद्ध आणखी एक बाजी मारून जाईल आणि राजरोस आपल्याकडच्या वस्तू मालदीवमार्गे भारतात पाठवू शकेल.

अनिंद्य's picture

13 Feb 2018 - 11:23 am | अनिंद्य

@ शेखरमोघे,

चीनला भारतात निर्यात करण्यासाठी मालदीवसारख्या मागील दाराची गरज नसावी असे वाटते, त्यासाठी महाद्वार उघडे आहे :-)

बाकी एका सूत्रबद्ध योजनेप्रमाणे चीन अगदी २००० पासून सार्क देशांशी (प्रत्येकाशी वेगळे वेगळे) FTA - मुक्तव्यापार करार करण्याच्या मागावर आहे. पाकिस्तान-चीन FTA जुलै २००६ मध्ये अस्तित्वात आले. आता मालदीव झाले. नेपाळशी चीनची प्राथमिक चर्चा चालू आहे. श्रीलंका-चीन कराराबद्दल गेली ३ वर्षे 'गंभीर वाटाघाटी' चालू आहेत. बांग्लादेश-चीन FTA चा मसुदा तयार करण्याचे काम चाललेय. भारत-चीन किंवा चीन-अफगाणिस्तान FTA ही शक्यता अजून क्षितिजावरही नाही. बराच गुंतागुंतीचा विषय आहे हा.

मालिकेबाबत दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभार !

अनिंद्य

अनिंद्य's picture

13 Feb 2018 - 4:08 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

आजच मालदीव मालिकेतील ८ वा आणि शेवटचा भाग प्रकाशित केला आहे, तो कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

अनिंद्य's picture

13 Feb 2018 - 4:13 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

आजच मालदीव मालिकेतील ८ वा आणि शेवटचा भाग प्रकाशित केला आहे, तो कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य