शेजाऱ्याचा डामाडुमा- मालदीवचा 'जाहिलिया' इतिहास आणि इस्लामी सत्तावतरण - मालदीव भाग ४

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
20 Dec 2017 - 4:59 pm

मालदीव मालिकेतील आधीचे ३ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील

मालदीवमधल्या काही कट्टर इस्लामधर्मीय लोकांच्या मते इस्लामच्या आगमनापूर्वी सगळीकडे 'जाहिलिया' काळ म्हणजे अज्ञान-अनागोंदीचे वातावरण होते. त्यामुळे त्याआधीचा इतिहास हा काही फारसा महत्वाचा नाही. पण तसे अर्थातच नाही. काळाच्या ओघात मालदीवच्या सांस्कृतिक मुख्य धारेला वेगवेगळ्या धर्म-वंश-जमातीच्या लोकसंस्कृतींचे प्रवाह येऊन मिळाले आहेत. तसेही धर्म आणि संस्कृती एकमेकांत गुंफली गेली तरी स्वतःचा वेगळा सुवास जपणारी फुले आहेत - एकमेकांना पूरक असली तरी एकमेकांचा पर्याय नाहीत.

म्हणून मालदीवमध्ये इस्लामच्या प्रचार- प्रसाराची चर्चा करण्यापूर्वी ह्या दुर्लक्षित मूळ घटकांबद्दल थोडेसे :-

ऐतिहासिक नोंद असलेले मालदीवचे सर्वात पुरातन रहिवासी म्हणजे 'गिरावरू' (उच्चारी - तीवरु) या जमातीचे राजधानी मालेजवळील तत्कालीन 'गिरावरू' नावाच्या बेटावर राहणारे लोक. इस्लामपूर्व मालदीवमध्ये त्यांची भाषा, संस्कृती आणि चालीरीती अन्य स्थानिकांपेक्षा वेगळ्या होत्या. हे लोक भारतातील तामिळनाडूच्या किनारी भागातून आले असावेत असे एक मत आहे. पुढे ह्या लोकांना सक्तीने दुसऱ्या 'हुलहुले' नावाच्या बेटावर वसवण्यात आले. आज ह्याच हुलहुले बेटावर मालदीवचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मालदीवच्या सुलतानाला आणि मालेतील त्याच्या दरबाऱ्यांना ह्या लोकांचे आणि त्यांच्या वेगळेपणाचे खूप आकर्षण होते, विशेषतः त्यांच्या स्त्रियांची वस्त्रे आणि आभूषणे अगदी वेगळी असल्यामुळे तो सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. काहीसे आपल्याकडच्या लमाण/बंजारा बांधवांसारखे.

पारंपारिक वेशात गिरावरू स्त्रिया

ह्या गिरावरू लोकांबद्दल मला माझ्या एका स्थानिक मैत्रिणीच्या वयोवृद्ध आजीने एक वेगळीच गोष्ट सांगितली. जुन्याकाळी ह्या लोकांचे जसे आकर्षण होते तसे त्यांच्याबद्दल रागही होता. ह्यांना म्हणे बेडूक ह्या प्राण्याची किळस होती. त्याच कारणाने अन्य लोक त्यांच्यावर मुद्दाम बेडकांची पिल्ले फेकत, त्यांना त्रास देण्यासाठी. आणिक एक वेगळेपण म्हणजे मालदीवमध्ये वसलेल्या पुरातन जमातींपैकी फक्त ह्याच जमातीमध्ये घटस्फोट घ्यायची मुभा नव्हती. आता ह्या जमातीचे लोक मुख्य धारेत (!) मिसळून गेले आहेत आणि पूर्णपणे मालेच्या शहरी जीवनात समरसून जगताहेत. त्यांची वेगळी भाषा-संस्कृती आता अर्थातच नाश पावली आहे. अगदी काही वृद्ध लोक सोडले तर खुद्द मालदीवमध्ये कोणी तुम्हाला यांच्याबद्दल फार काही सांगू शकणार नाही.

मालदीवची दुसरी एक अति-प्राचीन रहिवासी जमात म्हणजे हूवधू अटॉलवर राहणारी जमात. त्यांच्या राजधानीच्या शहराचे पुरातन नाव 'सुवा दीपा' किंवा सुवादीव (शुभ द्वीप?). त्यांची स्वतःची भाषा आहे, मुख्य धिवेही भाषेपेक्षा बरीच वेगळी - हूवधू भास ('भास' हा शब्द इथे वाचून संस्कृतमध्ये 'भाषा' हा बोध सहज होतो). ह्या लोकांचा माले आणि मालदीवच्या अन्य द्वीपवासीयांशी संबंध फार कमी आला. त्यामुळे की काय, त्यांच्या प्रथा-परंपरा आणि चालीरीती श्रीलंकेतील सिंहली लोकांशी जवळीक असलेल्या आहेत. मालदीवमध्ये अन्य कोणालाही नसलेला एक विशेष अधिकार ह्या जमातीच्या नेत्याला आहे - ह्या जमातीच्या प्रमुखाला स्वतःचा ध्वज आहे, त्याच्या मालकीच्या सर्व बोटींवर (त्यांच्या हूवधू भाषेत होड्यांना 'ओडी' असा शब्द आहे, मला गमतीशीर वाटला) आणि अटॉल मधल्या अनेक इमारतींवर तो फडकावण्याची मुभा आहे. आश्चर्य म्हणजे हा ध्वज दिसायला नेपाळच्या प्राचीन ध्वजासारखा आहे.

ह्या हूवधू अटॉलच्या मध्यावर एक नांदते बेट आहे - देवधू नावाचे. मालदीवचे अनेक सुलतान ह्या देवधू बेटाला स्वतःचे आद्य स्थान म्हणवत. त्यामुळे की काय आजही मालदीवच्या अनेक पावरबाज घराण्यांमध्ये, श्रीमंत व्यापारी, समाजातील मानांकित आणि राजकारणी लोकांमध्ये आपले मूळ स्थान हे देवधू असल्याचे सांगण्याची 'फ्याशन' आहे, इतका त्याचा मान.

ह्या हूवधू लोकांची वेगळेपणाची भावना मात्र प्रखर आहे. आधी भारतीय समुद्रात सगळ्या भूमीवर आणि समुद्रावर ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे हूवधू, कराची, कोलंबो, कोचीन आणि तुतिकोरिन बंदरांमध्ये नियमित व्यापार आणि संपर्क होता, त्याला सीमेचे कुंपण नव्हते. पण ब्रिटिश गेले आणि स्थिती बदलली. ब्रिटिशांनी मालदीव सोडले आणि मालेतील स्थानिक सरकारला व्यापार आणि करविषयक धोरण ठरवण्याचे अधिकार मिळाले. त्यांनी हूवधूच्या सागरी व्यापारात लुडबुड सुरु करताच हूवधूच्या लोकांनी आजूबाजूचे काही अन्य अटॉल मिळून एक वेगळा देश स्थापण्याचे आंदोलन जोरात सुरु केले - सुवादीव रिपब्लिक नावाने. त्यांना बराच पाठिंबाही मिळाला. मालदीव स्वतंत्र राष्ट्र म्हणून आकारास येत असतांना १९५९ मध्ये हे लोक स्वतःला वेगळे राष्ट्र घोषित करते झाले होते.

वेगळ्या सुवादीव रिपब्लिक या अल्पजीवी राष्ट्राचा ध्वज

पुढे सहा-सात वर्षे बऱ्याच जाळपोळी - राजकीय हत्या - सैनिक कारवाई - वाटाघाटी इत्यादी होऊन बरेच उशिराने म्हणजे १९६६ मध्ये हे लोक मालेतील मध्यवर्ती सरकारच्या अधिपत्याखाली आले. आता तिथे काही वेगळेपण जाणवत नाही पण वेळोवेळी होणाऱ्या उत्खनन आणि संशोधनात त्यांच्या वेगळ्या संस्कृतीचे पुरावे सापडतात. स्थानिक कारभारात आता त्यांना बऱ्यापैकी स्वायत्तता आहे.

* * *
मालदीवमधे इस्लाम - एक आढावा

मालदीवमध्ये इस्लामचा प्रवेश आणि वाटचाल समजून घ्यायची झाली तर भारतीय उपखंडाच्या इतिहासात थोडे मागे जावे आणि आजूबाजूच्या भूमीवर काय काय आणि कसे कसे घडले त्याकडे एक कटाक्ष टाकावा.

अरब व्यापारांनी श्रीलंकेत थोडीफार वस्ती करायला सुरवात केली ती ८ व्या शतकाच्या शेवटी शेवटी. त्यांच्यासोबत त्यांचा धर्म आला, स्थानिक लोकांशी झालेल्या संकरामुळे इस्लामचे अनुयायी वाढले. सातव्या शतकात मालदीवच्या बाजूच्या लक्षद्वीप बेटांवर इस्लामी संत-धर्मप्रचारक उबेदुल्लाह स्थायिक झाले. त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकांपैकी काही इस्लामचे अनुयायी झाले. सातव्याच शतकात मुहम्मद बिन कासिमने सिंधच्या राजा दाहीर ला आऱोरच्या युद्धात हरवून त्याच्या ताब्यातला प्रदेश इस्लामच्या पूर्ण प्रभावाखाली आणला होता. ह्यात आजच्या पाकिस्तानातील आणि अफगाणिस्तानातील काही बुद्ध धर्मावलंबी प्रदेशही होते. सिंधच्या कराची बंदरातून मालदीवला जहाजे नियमित जात, पण तेथील इस्लामिक धर्मप्रचारक काही मालदीवला गेले नाहीत.

आठव्या शतकात आपल्याकडे केरळच्या मलबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अरब व्यापारी वसले. ह्या श्रीमंत व्यापारांच्या प्रभावा-आग्रहामुळे चेरामन पेरुमल सारखे काही स्थानिक राजे इस्लाम धर्मानुयायी झाले. त्यामुळे इस्लामी धर्म-प्रचाराला गती आणि धन - प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढे काही वर्षातच त्यांच्यापैकी काही मलबारी-अरबी लोक मालदीवमध्येही राहायला आले, त्यांच्यासोबत इस्लामिक धर्माचरण मालदीवच्या काही बेटांवर प्रवेशले.

पण हे सर्व झाले तरी मालदीवच्या बहुसंख्य लोकांनी धर्म बदलला नाही, तिथे बुद्ध धर्मच प्रभावी होता. मालदीवमध्ये इस्लाम स्वीकृत व्हायला आणि रुजायला बराच काळ जावा लागला - सिंध, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये इस्लामच्या आगमनाच्या सुमारे ५००-६०० वर्षानंतर थेट ११९३ मध्ये मालदीवच्या राधून नी इस्लाम कुबूल करेपर्यंत.

थिमुगे-होमा वंशाच्या ह्या राधूनचे नाव रासगेफानू-महाराधून 'धोवेमी'. त्याला इस्लामची दीक्षा कोणी दिली ह्याबद्दल थोडा संभ्रम आहे. दोन नावे प्रमुखतः घेतली जातात, पहिले मोरोक्को येथून आलेले सुन्नी संत - अबू अल बरकत आणि दुसरे इराणहून आलेले धर्मप्रचारक योसुफ शमसुद्दीन तबरीझ.

दोघांचीही स्मृतिस्थळे माले शहराच्या हुकुरू मिस्की मशिदीनजीक बांधलेली आहेत.

(अलीकडच्या काळापर्यंत भारत-पाकिस्तान-श्रीलंका-बांगलादेश प्रमाणेच ह्या मजारींवर दुवा मागण्याचे आणि उर्स साजरे करण्याचे कार्यक्रम होत असत. जहाल विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे आता बंद पडले आहेत.)

मालदीवच्या राजाच्या धर्मपरिवर्तनाला हिंसक घटनांची पार्श्वभूमी नाही. पुढे हा राधून 'सुलतान मोहम्मद अल-अदिल -धर्मवंथ रासगेफानू’ - म्हणजे दयाळू राजा म्हणून प्रसिद्धी पावला. लवकरच सुलतानाने स्वतः सर्व मोठ्या बेटांवर प्रत्यक्ष जाऊन जनतेला इस्लामची दीक्षा दिली.

आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे ह्या लोकांनी बौद्ध धर्माची अहिंसेची शिकवण मनापासून स्वीकारली असल्याकारणाने बहुतेक बुध्दविहार आणि मंदिरे तोडफोड न करता त्यावर दगड-माती रचण्यात आली.

त्यापुढे ८४ वेगवेगळ्या सुलतानानीं मालदीवच्या बेटांवर राज्य केले आणि ह्यामध्ये बऱ्याच स्त्री शासक सुद्धा आहेत.

बुद्धविहाराची झाली मशीद - लामू बेटावरील एक प्राचीन मशीद

राजा आणि सर्व प्रजेने बौद्ध धर्म टाकून इस्लाम स्वीकारला तरी मालदीव मध्ये धार्मिक वातावरण कट्टर नव्हते. उदा: १९४३ मध्ये पदच्युत झालेला शेवटचा सुलतान नुरुद्दीन दुसरा याची पदवी बघा - 'कुलसुद्धा सर्वरसासथुरा आयुध भवनाकीरथी महाराधून (कुलशुद्ध सर्व-शास्त्र आयुध भुवन कीर्ती महा राजन). हे इस्लाम स्वीकारल्याचे शेकडो वर्षानंतर !

मुळातच स्वच्छंदी- साधी सोपी माणसं इथं असल्यामुळे येथील धर्म आणि धार्मिक वातावरण बरेचसे मुक्त - भारतीय उपखंडातील सूफी मतासारखे - स्थानीय प्रथापरंपरांना सामावून घेणारे, इथल्या लोकांप्रमाणेच थोडे अघळपघळ होते.

धर्माचरण बरेच ऐच्छिक होते. समाजात स्त्रियांचे मानाचे स्थान आणि त्यांचा राजकारणात, अर्थार्जनात आणि एकूणच सामाजिक कार्यात मुक्त आणि ठळक सहभाग, एकपत्नित्व, बुरखा पद्धतीचा अभाव, नृत्य-गायनादी कलांना असलेली प्रतिष्ठा असे थोडे वेगळे वातावरण इथे होते.

बोडू-बेरू वर हाताची थाप पडली - नृत्यमग्न तरुणींचा समूह.

भारतातल्या केरळ भागातून येऊन वसलेल्या काही लोकांमुळे असेल पण बरीच कुटुंबे मातृसत्ताक पद्धतीचीही होती. त्या प्रभावामुळे अनेक बेटांवर स्थानिक सरकारच्या प्रमुखपदी स्त्रिया असणे आणि मालदीवच्या सर्वोच्च शासक 'सुलताना' असणे नवीन नव्हते. स्त्रियांनी प्रार्थनेसाठी मशिदीत जाणे अगदीच सामान्य बाब होती.

भुताखेतांवर विश्वास असलेले, पीर - मजार - चादर - नवस - दुआ - मिरवणुका - उरूस असे सगळे 'गैर-इस्लामी' आणि 'जाहिल' रीती-रिवाज पाळणारे लोक बहुसंख्य होते, पण त्यात भाबडेपणा जास्त होता. अगदी १००% मुस्लिमधर्मीय जनता असली तरी साधारण सार्वजनिक जीवन बऱ्यापैकी मोकळे-ढाकळे आणि पुढारलेले होते.

पण हे सगळे झपाट्याने बदलते आहे. गेल्या एक-दोन दशकातच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसमर्थित सलाफी-वहाबी जहाल मतांच्या प्रचारकांनी आणि मौलवींनी मालदीवला धार्मिक कट्टरतेकडे ढकलले आहे. त्याबद्दल पुढे.

सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.

थोडे अवांतर:

मागच्या भागाच्या शीर्षकामधे धिवेही भाषेत महिने, वर्षे आणि शतकं झालीत, मग आठवड्याचे सर्व दिवस नकोत?
हे घ्या -

आधीतथा - रविवार (त चा उच्चार हलन्त - आदित्य)
होमा - सोमवार (स' ला 'ह' म्हणायचं)
अंगारा - मंगळवार (अंगारकी आठवली, राईट ?)
बुधा - बुधवार (सोप्प आहे हे)
बुरासफथी - गुरुवार (बृहस्पतीवार, बरोबर ?)
हुकुरू - शुक्रवार (तेच ते, 'स' ला 'ह' म्हणायचं)
होनीहिरू - शनिवार (हे जमलं हो आता)

क्रमश:

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

20 Dec 2017 - 5:03 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

हा भाग कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

तुषार काळभोर's picture

20 Dec 2017 - 5:43 pm | तुषार काळभोर

भाषा व शब्दांमुळे मालदीव विषयी आत्मीयता वाटू लागली आहे...

अनिंद्य's picture

21 Dec 2017 - 4:45 pm | अनिंद्य

@ पैलवान
भाषा - शब्द - संगीत....माणसांना जोडणारी शक्ती आहे ती !
आभार !

काय नेहमीप्रमाणेच अप्रतिम वगैरे वगैरे लेख! पुभाप्र.

संग्राम's picture

21 Dec 2017 - 12:54 am | संग्राम

वगैरे वगैरे

पहाटवारा's picture

21 Dec 2017 - 2:28 am | पहाटवारा

अतिशय छान लिहिता आहात. याचे ऊत्तम पुस्तक तयार होउ शकेल.

जाताजाता : शालेय पाठ्य-पुस्तकामधे फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती यांबरोबर आप्ल्या देशाच्या शेजार्‍यांबाबत हि अशी माहिति असलेले धडे असायला काय हरकत आहे ?

-पहाटवारा

अनिंद्य's picture

22 Dec 2017 - 11:45 am | अनिंद्य

@ पहाटवारा,

आभार !

...शालेय पाठ्य-पुस्तकामधे आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती असलेले धडे ....... यू हिट द बुल्स आय - वृषभनेत्रगामी आहात ! माझेही असेच मत आहे.

खरे तर शेजाऱ्याचा डामाडुमा ह्या लेखमालेची सुरवातच एका शालेय विद्यार्थिनीच्या प्रेरणेने झाली आहे. त्याबद्दल इथे वाचता येईल : http://www.misalpav.com/node/38362

अनिंद्य

अरविंद कोल्हटकर's picture

21 Dec 2017 - 3:53 am | अरविंद कोल्हटकर

प्राचीन जलमार्गांचे अभ्यासक थोर हेयेरधाल (Thor Heyerdahl - ह्यांचे Kon tiki Expedition हे पुस्तक खूप गाजलेले होते.) - ह्यांना मालदीवच्या शासनाने तेथील कोरल दगडांचे रचलेले ढीग आणि अशाच जुन्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले होते. तेथील hawitta असे ओळखले जाणार्‍या इस्लामपूर्व रचनांचे उत्खनन करून त्यांनी काढलेले निष्कर्ष त्यांच्या Maldive Mystery ह्या पुस्तकात वाचायला मिळतात. तुमच्या मालेच्या तिसर्‍या भागातील बुद्धमस्तकाचे चित्र तेथेच पूर्वी पाहिल्याचे आठवले. त्यांना सापडलेले बौद्ध अवशेष स्थानिक मुस्लिम जनतेच्या दबावाखाली त्यांना परत गाडून टाकावे लागले.

त्यांच्या पुस्तकाचा सारांश असा: "The lion, the bull, the lotus flower, the long-eared images, the semi-precious beads, the copper spikes, the fingerprint masonry and the classical profiles of the hawitta plinths tied the pre-Muslim Maldive artists to the culture founders on the continents. One by one, or jointly, these elements had come to the Maldive atolls with seafarers from some other lands. But which lands?"

परराष्ट्र मन्त्रालयातील उच्च अधिकारी ज्ञानेश्वर मुळे हे अगदी अलीकडे २००९-१३ ह्या काळात मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त होते. त्यांचे मालदीववरचे बरेच लेखन वृत्तपत्रांमधून वाचलेले आहे.

१४व्या शतकातील प्रसिद्ध मोरोक्कन प्रवासी इब्न बतूता ह्याला महम्म्द तुघ्लकाने चीनकडे आपला राजदूत म्हणून पाठविले होते. प्रवासातील अनेक संकटांमुळे तो इंडोनेशियाच्या पुढे जाऊ शकला नाही पण परतीच्या वाटेवर त्याने मालदीवमध्ये ९ महिने काढले. त्याच्या ह्या प्रवासाचे मनोरंजक वर्णन येथे वाचता येईल.

अनिंद्य's picture

22 Dec 2017 - 11:17 am | अनिंद्य

तुमचा व्यासंग दांडगा आहे. _/\_
लेखमालेच्या शेवटच्या भागात संदर्भग्रंथांची यादी देण्याचा शिरस्ता आहे, तसेच करीन म्हणतो.

रुपी's picture

21 Dec 2017 - 4:26 am | रुपी

उत्तम!
अरविंद कोल्हटकर यांचा प्रतिसादही छान आहे.

कुमार१'s picture

21 Dec 2017 - 12:13 pm | कुमार१

उत्तम!
फोटोही आवडले

दीपक११७७'s picture

21 Dec 2017 - 12:43 pm | दीपक११७७

हा भाग ही छान झाला आहे!
पुभाप्र!

अतिशय नवी माहिती तुमच्यामुळे मिळत आहे, धन्यवाद मालक...

arunjoshi123's picture

21 Dec 2017 - 1:17 pm | arunjoshi123

मस्त.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Dec 2017 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत रोचक आणि माहितीपूर्ण लेख. आपल्या शेजारी असलेला पण जवळ जवळ पूर्णपणे अनोळखी असलेल्या या देशाबद्दल सुंदर माहिती मिळत आहे.

तुमच्या एका फोटोतील हुकुरू मिस्की मशिदीच्या पायथ्यावर कोरलेले जहाजाचे शिल्प आणि बोरोबुदूर (इंडोनेशिया) येथील मंदिरावर कोरलेले आउटरिग्गर प्रकारातल्या प्राचीन व्यापारी जहाजाचे शिल्प, यांच्यात कमालीचे साम्य आहे !

450
(चित्र जालावरून साभार)

एवढ्या दूरच्या प्रदेशांत इतके साम्य असलेली शिल्पकला, माझ्या एका लेखात मांडलेल्या समुद्रमंथनासंबंधीच्या संकल्पनेला सज्जड आधार देत आहे.

अनिंद्य's picture

21 Dec 2017 - 3:20 pm | अनिंद्य

@ डॉ सुहास म्हात्रे,

मी जालावरून फोटो टाकला, माझाच फोटो चुकलाय !
लेखाचे संक्षिप्त भाषांतर वाचलेल्या माझ्या मालेतील एका मित्राने ही पडताळणी करून फोटो चुकला आहे असे कळवले आहे.

तुमच्या ह्या प्रतिसादामुळे चूक लक्षात आली, तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच. _/\_

संपादकांना विनंती - कृपया लेखातून हा फोटो आणि त्याखालील ओळ काढून टाकावी. योग्य फोटो नंतर टाकतो.

अनिंद्य

अनिंद्य's picture

21 Dec 2017 - 4:30 pm | अनिंद्य

चूक दुरुस्त केल्याबद्दल संपादकांचे आभार, फोटो चुकल्यामुळे मला फारच वाईट वाटत होते.

तुमच्या लेखाची समुद्रमंथनाची थीम जबरदस्त !

वाचायला उत्सुक . नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख . पु भा प्र

अनिंद्य's picture

22 Dec 2017 - 11:09 am | अनिंद्य

@ वरुण मोहिते,

पुढील भागांमध्ये लिहीन त्या बद्दल.
प्रोत्साहनाबद्दल आभार!

पुभाप्र.. माहितीपूर्ण लेख.

अनिंद्य's picture

22 Dec 2017 - 11:02 am | अनिंद्य

@ एस
@ संग्राम,

आभारी आहे, पण ह्या 'वगैरे वगैरे' बद्दल जरा सांगितले असते तर :-)

'वगैरे वगैरे' म्हणजे आमच्याकडील कौतुकास्पद विशेषणांची यादी संपली, इतका छान लेख.

अनिंद्य's picture

26 Dec 2017 - 5:35 pm | अनिंद्य

यू आर व्हेरी काइंड _/\_

अतीउत्तम लेख नेहमीप्रमाणेच.
पुभालटा.

अनिंद्य's picture

24 Dec 2017 - 6:16 pm | अनिंद्य

@ रुपी
@ कुमार१
@ दीपक११७७
@ उपेक्षित
@ arunjoshi123
@ डॉ सुहास म्हात्रे

आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

- अनिंद्य

अनिंद्य's picture

24 Dec 2017 - 6:17 pm | अनिंद्य

@ रुपी
@ कुमार१
@ दीपक११७७
@ उपेक्षित
@ arunjoshi123
@ डॉ सुहास म्हात्रे

आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

- अनिंद्य

सुखीमाणूस's picture

24 Dec 2017 - 11:49 pm | सुखीमाणूस

नेपाळची मस्तच झालीये. परत परत वाचायला मजा येते आहे.
मालदीव चे वर्णन पण मस्त करत आहात.
चान्गल्या लेखमाले बदल धन्यवाद

अनिंद्य's picture

26 Dec 2017 - 5:39 pm | अनिंद्य

@ सुखीमाणूस,
आभार!
आत्ताच बघितले, नेपाळ मालिका लिहायला एक वर्ष झालेसुद्धा !

Nitin Palkar's picture

29 Dec 2017 - 8:28 pm | Nitin Palkar

*वगैरे! वगैरे!! वगैरे!!!
लेखमालेची स्तुती करायला विशेषणे शिल्लक नाहीत.
तुमच्या व्यासंगाबद्दल, लेखमालेकरता केलेल्या अभ्यासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
भरपूर लिहित रहा, भरभर लिहित रहा. पुलेशु! पुभाप्र!

अनिंद्य's picture

30 Dec 2017 - 3:27 pm | अनिंद्य

@ Nitin Palkar,

उत्साहवर्धनासाठी आभार !

.... भरपूर लिहित रहा, भरभर लिहित रहा ....

तुमच्या सारख्या अनेक मिपाकरांकडून मिळत असलेल्या कौतुकाच्या शब्दांमुळे थोडेफार लिहू शकतो आहे. पण भरपूर-भरभर नाही अजून :-)

शेजाऱ्याचा डामाडुमा मालदीव मालिका संपली की माझा दीर्घ संपर्क आलेल्या कलकत्ता, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद ह्या शहरांविषयी प्रत्येकी एक मालिका लिहिण्याचे मनात आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी पैकी एक किंवा तीनही भाषेत. हजारों ख्वाहिशें ऐसी .... :-) बघू कसे जमते ते.

पुनःश्च आभार आणि येत्या नववर्षाच्या शुभेच्छा

अनिंद्य

अनिंद्य's picture

4 Jan 2018 - 5:50 pm | अनिंद्य

@ संपादक / साहित्य संपादक मंडळी,

आजच मालिकेतील पुढील भाग प्रकाशित केला आहे, कृपया अनुक्रमणिकेला जोडावा.

अग्रिम आभार !

अनिंद्य

पैसा's picture

10 Jan 2018 - 9:25 pm | पैसा

खूप्मेहनत घेऊन लिहिता आहात. तुमचे फोटो तर खास असतातच नेहमी!

अनिंद्य's picture

11 Jan 2018 - 4:25 pm | अनिंद्य

@ पैसा,

आभार _/\_

राघवेंद्र's picture

8 Jan 2024 - 11:28 pm | राघवेंद्र

आजच्या वातावरणात ही लेखमालिका मालदीव कसा होता आणि आता काय होत आहे, यासाठी खूप उपयोगी पडत आहे.