मुंबईकर . . . . .

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
30 Sep 2017 - 11:54 pm

मृत्यूचे दूत आले कुठून हे प्रत्यक्ष मृत्यूलाही सांगता नाही आलं . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

रोजची सकाळ तुझ्यासाठी एक नवीन युध्द . . . काल तुला चिलखतही घालता नाही आलं . . .
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

घड्याळाचे काटे तसे रोजच बोचतात नजरेत . . . अजून एक दिवस त्यांना नजरेआड का नाही करता आलं ?
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

भिजला असतास पावसात तर सुकवता आलं असतं स्वतःला . . पण भिजण्यापेक्षा मरण कधी आणि कसं जवळचं झालं ?
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

तुझ्या पाच मिनिटांच्या घाईने तुझ्या आप्तांचं सर्वस्व हिरावून नेलं . . . उघडे पडले संसार ,मूलबाळ पोरकं झालं !
अशी कुठली घाई होती मुंबईकरा जे तुला पाच मिनिटं थांबता नाही आलं ?

मुंबईकर म्हणवून घेतलेस आयुष्यभर पण आयुष्य तुला कुठे जगता आलं . . . . .
अशी घाई काय कामाची मुंबईकरा जिच्यामुळे तुला हवं तिथं कधीच पोचता नाही आलं ?

कविता माझीकरुणमुक्तकराहती जागानोकरीव्यक्तिचित्र