आज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे.
लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!
लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून मग लताला शिव्या घालणारे हि काही लोक आहेत. मी लताचा भयंकर चाहता असलो तरी अंध भक्त नाही. आणि लताची गाणी आवडतात म्हणजे इतर गायिकाकडे ढुंकूनहि पाहायचे नाही असले दळभद्री विचारसुद्धा माझ्या मनात येत नाहीत.बऱ्याचदा आपण चाहते लोक असाच सारासार विवेक हरवून बसतो आणि स्वतःची गोची करून घेतो असं मला वाटतं. लता कितीही आवडली तरी तिच्या काही गोष्टी मला खटकतात त्या पहिल्यान्दा नमूद केल्या पाहिजेत
माझी लताबाबत सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही. तिच्या गायकीला आत्मसात करणारे आणि तिला पुढे नेणारे शिष्य तिने तयार केले नाहीत. आपला वारसा पुढे चालेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी तिची नाहीतर मग कुणाची होती? बर भारतात अशी गायकीची घराणी विपुल आहेत तेव्हा स्वतःचा वारसा निर्माण करून जपण्याची गोष्ट आपल्याला काही अगदी नवखी नाही. माझा हा आरोप खरतर फक्त लतावर नाही तर बालगन्धर्वांपासून ते अगदी दिलीपकुमार पर्यंत सगळ्याच महान कलावंतांवर आहे.बर आपल्या महान भारतवर्षाला घराणे शाहीची परंपरा अगदीच नवखीही नाही,(तिचे भरपूर दुष्परिणाम आपण भोगले आहेत थोडे सुपरिणाम दिसले तर काय हरकत आहे?). आजकाल तंत्रज्ञानाने यांची गाणी, अभिनय इ. कामं जतन करता येतात, पुढच्या पिढीला उपलब्ध होतात पण पूर्वी हे नव्हत. म्हणजे तानसेन खूप मोठा गायक असेल पण आता आम्हाला तो काय आणि कसा गायचा हे कस कळणार? त्याच्या घराण्याच्या गायकीवरूनच ना! आणि पुढे चांगले गायक जर तुमच्या घराण्यात निपजले तर तुमचीच गायकी ते अधिक समृद्ध करतील कि नाही? मुख्य काय आहे की तुम्ही जेव्हा खूप महान आणि यशस्वी कलावंत असता तेव्हा तुम्ही तुमच्या अंगच्या कलागुणाचे नुसते मालक नसता तर विश्वस्तही असता. खरे मालक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणारे रसिक असतात. तेव्हा तिच्या संवर्धनाची जबाबदारी तुमचीच असते.
लताबाबत आणखी एक तक्रार करण्याजोगी गोष्ट म्हणजे तिची इतकी प्रचंड मोठी कारकीर्द आहे तिने इतक्या विविध प्रकारची गाणी इतक्या वेगवेगळ्या संगीतकारांच्या कडे म्हटली आहेत. तीचं एकूण अनुभव विश्व किती समृद्ध असेल! पण तीने स्वतःचे अनुभव सविस्तर कथन करणारे एक आत्मचरित्र सुद्धा लिहीलेलं नाही. (हरीश भिमाणीने लिहिलेलं पुस्तक इतकं भिकार आहे कि इथे त्याचा उल्लेख सुद्धा करायला नको.)खरतर तिच्या नुसत्या फिल्मी किशश्यावर २-३ खंड लिहून होतील. आत्मचरित्र सोडा तिच्या प्रदीर्घ अशा मुलाखती, Documentaries जवळपास नाहीतच.ज्या आहेत त्यात ती मोकळेपणाने, खुलून बोलत नाही.लता आज ८८ वर्षांची झाली आहे आजपर्यंत तिच्याकडे कोणी आत्मचरित्र/ चरित्र, मुलाखतीसाठी गेलच नसेल का! पण बहुधा ती स्वतःचं आयुष्य असं उलगडून सांगायला उत्सुक नसावी.
आणखी एक तक्रार म्हणजे काही गाणी म्हणायचं तिनं टाळायला हवं होत. “चंदनसा बदन...” हे सरस्वती चंद्र मधलं गाजलेलं मुकेशच गाणं, ते तिने म्हणायचा मोह टाळायला हवा होता तीच गोष्ट बरसात कि रात मधल्या “जिंदगी भर नही भूलेगी वो ... “ या गाण्याची किंवा जंगली मधल्या “एहेसान तेरा होगा मुझपर...” या गाण्याची. असे मोह तिने टाळायला हवे होते.(असं आपलं माझं नम्र मत आहे.... तुम्ही असहमत होऊ शकता.)आणखी एक “हम को भी गमने मारा, तूमको भी गमने मारा, हम सबको गमने मारा, इस गम को मार डालो...” हि असली गाणी तिने का गायली असावीत कुणास ठाऊक.
बास यापेक्षा जास्त तक्रार मी करू शकत नाही.
आपल्याकडे सुरांची ४ सप्तक आहेत खर्ज, मध्य, तार आणि अति-तार सप्तक. या अशा २८ सुराच्या दुनियेत लता ज्या सहजतेने संचार करते, तसं आज पर्यंत एक आशा भोसले सोडली तर इतर कुणाही गायिकेला जमलेले नाही. पुढे जमू शकेल असे वाटत नाही. साध्या तार सप्तकातला सा लावताना गायक-गायिकांचा आवाज चिरकतो, फाटतो, केविलवाणा वाटतो, तिथे लता अति तार सप्तकात मुक्त बागडून इतक्या सहज मध्य सप्तकात येते कि पाहून, ऐकून अचंबित व्हायला होतं. तिच्या ह्या सामर्थ्याची जाणीव बहुधा शंकर जयकीशनला प्रथम झाली( तुम्हाला त्या आधीचे उदाहरण माहित असेल तर सांगावे.) आणि “रसिक बलमा...” मध्ये तिचा आवाज टिपेला गेला त्यानंतर जवळपास सगळ्या संगीतकारांनी तिच्या ह्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला. ( आता कधी कधी त्याचा दुरुपयोगही झाला आहे. उदा. तेरे मेरे बीच मे, कैसा ही ये बंधन अंजाना...आणि सोला बरस कि बाली उमर को सलाम)
सज्जाद सारख्या संगीतकारांनी तिच्या आवाजाला अति किंवा तार सप्तकात न नेताही कमाल केली आहे. तुम्ही त्याचं संगदिल या पिक्चर मधलं “दिल मे समा गये...”हे तलत बरोबर गायलेलं राजेंद्र कृष्णने लिहिलेलं आणि दिलीपकुमार मधुबाला वर चित्रित झालेलं गाणं ऐका किंवा सी. रामचंद्र चं १९५८ साली आलेल्या “अमरदीप” मधलं “ दिल कि दुनिया बसके सावरिया...” हे गाणं ऐका. म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल .खाली लिंक दिलेल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=vFXPWUduCCk
https://www.youtube.com/watch?v=bnnyd15Z_kM
हे दोन महान संगीतकार केवळ लताच आपल्या संगीताला न्याय देऊ शकेल असे मानत. सज्जदचं “ एक लता बस गाती है बाकी सब रोती है.” हे प्रसिद्ध पण जरासं अतिशयोक्तीपूर्ण विधान असलं तरी त्यातून त्याच्या भावना पुरेपूर व्यक्त होतात. लताशी काही बेबनाव होऊन लताने त्याच्याकडे गायचे सोडल्यावर सी रामचंद्राची तर कारकीर्दच संपली. काय झालं हे नक्की कुणाला कधीच कळले नाही.
लताची मला सगळ्यात जास्त आवडलेली गाणी (“लग जा गले...” किंवा “नैना बरसे रिमझिम...” चित्रपट “वो कौन थी” सोडून)आहेत- ‘धीरे धीरे मचल’ हे अनुपमा मधलं गीत- हेमंत कुमारने संगीतबद्ध केलेलं आणि कैफी आजमी ने लिहिलेलं आणि ‘परख’ मधलं सलील चौधरीने संगीत दिलेलं आणि शैलेंद्रने लिहिलेलं “ ओ सजना, बरखा बहार आई ...”हे, या गाण्यांच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=qFJBl5_TxWU
https://www.youtube.com/watch?v=5a7l2UzZ654
https://www.youtube.com/watch?v=TAb9IktpLGY
यातल्या शेवटच्या लिंक मधले ‘अनुराधा’ मधले “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना..”लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका. ‘पिया’ च्या पि आणि या मधली ती सूक्ष्म, नाजूक थरथर, अनुराधाचे दबलेले दु:खं उघड करते. ह्या गाण्यात “ कजरा ना सोहे...” हे कडवं सुरु होण्याच्या अगदी थोड आधी डॉ. निर्मल (बलराज सहानी) अनुराधा गाता असतानाच ( त्याचे तिच्या कडे लक्ष नसते)शेजारच्या खोलीत जातो त्यावेळी अनुराधा म्हणजे लीला नायडूने चेहऱ्यावरचे दु:ख, निराशा फार उत्तम दाखवली आह. लीला नायडू फार सुंदर अभिनेत्री होती पण ती इतका सहज सुंदर अभिनय करू शकते हे हा चित्रपट पहायच्या आधी मला ठावूकच नव्हते.कदाचित हृशिदांची हि कमाल असेल!
१९४२ ते आता आता पर्यंत भारतीय सिने संगीतातलं लताचं स्थान म्हणजे दशांगुळे व्यापून उरले असेच होते. इतकी प्रदीर्घ, यशस्वी आणि देदीप्यमान कारकीर्द अक्ख्या होल वर्ल्ड मध्ये कुणाच्या नशिबी आली असेल असे वाटत नाही. या बाईने जवळ जवळ एकछत्री राज्य केले आहे म्हणाना. मी लताचा भयंकर चाहता पण म्हणून मला दुसऱ्या गायक गायिका आवडत नाहीत असं अजिबात नाही. लता नावाच्या झन्झावाताच्या प्रचंड सामर्थ्यापुढे अनेक लहान लहान कलाकाराची तारवं फुटली त्याला काय करणार!. माझं मन त्याबद्दल लताला दोष द्यायला तयार नाही, पण अनेक गुणी गायिकांना एकतर संधीच मिळाली नाही किंवा ज्यांना मिळाली त्यांची लताशी तुलना झाली आणि ते साहजिकच मागे पडत गेले याची हळहळ मात्र खूप वाटते.
जस्वीन्दर कौर(खय्याम ची बायको- हीचं ‘तुम अपना रंज ओ गम...’ हे गाण खूप गाजलं होतं ), मीना कपूर-अनिल बिस्वास ची पत्नी (“कूछ और जमाना कहता है- छोटी छोटी बाते” या गाण्यात प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या दोन ओळी रिपीट करताना ती शब्द असे काही तोडते आणि अशा हरकती घेते कि ज्याच नाव ते – खाली या गाण्याची लिंक दिली आहे लक्षपूर्वक ऐका).
https://www.youtube.com/watch?v=MoCUt4Qtu9w
गीता दत्त, मुबारक बेगम( ‘कभी तनहाइयोमे युं, हमारी याSSSSद आयेगी…’ वाली ...), शमशाद बेगम, सुमन कल्याणपूर, जोहराबाई अम्बालेवाली या अन अशा कितीतरी गुणी गायिका लता नावाच्या वावटळीपुढे टिकू शकल्या नाहीत. असं म्हणतात कि नूरजहा जर फाळणीच्या वेळी पाकिस्तानांत गेली नसती, तर आज लता एवढी यशस्वी झाली नसती. आता नुरजहा पाकिस्तानात गेल्यावर फार उजेड पाडू शकली नाही (म्हणजे ती अगदीच यशस्वी झाली नाही असे नाही पण लताच्या तुलनेत ...कीस गल्ली मे गलबला!)तिची पाकिस्तानात गेल्यानंतरची काही गाणी मी ऐकली आहेत आणि ती तद्दन फालतू आहेत आणि नूरजहानची गान कारकीर्द लताच्या मानाने फारच आधी म्हणजे १९८४ मध्येच संपली आणि १९८६ मध्ये तर तिचा मृत्यूच झाला. असो, पण नुरजहा जर भारतात राहिली असती तर कदाचित तीची गान कारकीर्द जास्त फुलली असती हे मात्र खरं. भारतीय फिल्म इंडस्ट्री आणि संगीत ह्यांच्या पुढे पाकिस्तानची फिल्म इंडस्ट्री म्हणजे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी.पाकिस्तानात तिला तोडीचे गीतकार, संगीतकार, सहगायक, आणि श्रोतृवर्गहही मिळाला नाही हेही खरच.मी तिची १९४७ पूर्वीची जवळपास सगळी गाणी ऐकली आहेत आणि सगळी जबरदस्त आहेत. तिचा आवाज, त्याचा पोत, त्याचा बाज काही औरच होता.ती स्वतः सिनेमात नायिकेचं काम करीत असे. दिसायला हि तशी बरी होती,अभिनय वगैरे चुकूनही करीत नसे.(तो सचिन हि करत नाही पण ते एक असो...) पण फक्त स्वतःलाच आवाज द्यायची, पार्श्व गायन करीत नसे.(१९६० पर्यंत). तीचं गाण ऐकताना वाटत राहत कि हिने नक्की समोर माईक धरला नसेल, एव्हढा स्पष्ट खणखणीत आवाज.
“ दिया जलाकर आप बुझाया “, “आवाज दे कहा है...” आणि “जवान है मुहब्बत, हसी है जमाना...” हि तिची विशेष गाजलेली आणि मला स्वतःला प्रचंड आवडलेली गाणी. खाली लिंक दिलेल्या आहेत. आवर्जून वेळ काढून ऐका ...
https://www.youtube.com/watch?v=ANptt7VMxXU
https://www.youtube.com/watch?v=IL5EbdnQm0s
https://www.youtube.com/watch?v=Mttp129cf8o
त्यातूनही मला सगळ्यात आवडलेलं तिच गाण म्हणजे “जवा है मुहब्बत... “ हे. ह्यात मुहब्बत मधल्या ‘त’ वर ती सूर किंचित तोडते, आणि नंतर “हसी ही जमाना..” असं अलगद उचलते कि बास! याच गाण्यातलं शेवटच कडवं जे “तुम आये के बचपन मेरा लौट आया.. हे ती जरा खालच्या पट्टीत घेते म्हणजे ते ऐकताना असं वाटत कि कुणीतरी बंदुकीत गोळी भरतोय, मग barrel वर करीत खटका मागे ओढून नेम धरतय आणि एवढी वातावरण निर्मिती झाल्यावर संणकन गोळी सुटावी तसे “ मिला है मुझे जिंदगी का बहाना” आपल्या कानावर येऊन आदळतात. जितक्या वेळा ऐकतो तितक्या वेळा अंगावर शहांरेच येतात राव!
इतके चांगले गुण असलेली गायिका आम्हाला सोडून पाकिस्तानात जाऊन बसली आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली म्हणून हळ हळ वाटते दुसरं काय.तिनेच १९८२ साली भारतात आली असताना म्हटल्याप्रमाणे कलाकारची कला हि त्याची स्वतःची मिळकत नसते तर ती रसिकांची मालमत्ता असते. आमची मालमत्ता घेऊन शत्रू राष्ट्रात जाऊन बसायचा तिला काही हक्क नव्हता.जाऊ दे ..आता बोलून काय उपयोग!
---आदित्य
प्रतिक्रिया
28 Sep 2017 - 11:05 pm | एस
लता मंगेशकर यांच्याबद्दल लिहावं-बोलावं तितकं कमीच आहे. लेख आवडला. अजून बरंच काही निसटून गेलंय असं वाटलं. ज्यांच्या-ज्यांच्याशी लता मंगेशकरांचं जमलं नाही त्या त्या कलाकारांना कारकीर्द जवळपास संपल्याचं बघावं लागलं. ते एक असो.
बादवे, हिंदी चित्रपटसृष्टीत एक अलिखित नियम आहे. एकाच गाण्याचे मेल आणि फिमेल अशी दोन्ही व्हर्जन करायचे झाल्यास मेल व्हर्जन हिट होतं आणि फिमेल व्हर्जन फ्लॉप होतं किंवा लोकांच्या तितकं लक्षात राहत नाही. कुठल्याही गीतकार/संगीतकाराला विचारून बघा.
29 Sep 2017 - 12:33 am | कपिलमुनी
हमारी अधुरी कहानी ऐकून सांगा , मेल पेक्षा फिमेल व्हर्जन सुपरहिट आहे
29 Sep 2017 - 1:30 am | रुपी
'तेजाब'चं 'एक दो तीन..' मात्र मोठा अपवाद आहे याला :)
28 Sep 2017 - 11:06 pm | एस
डुप्रकाटाआ.
29 Sep 2017 - 1:42 am | पद्मावति
लेख आवडला.
रूपी +१
29 Sep 2017 - 1:43 am | रुपी
लेख आवडला..
‘अनुराधा’ मधले “कैसे दिन बिते कैसे बीती रतीया” ह्या गाण्यातले “पिया जानेना..”लता किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणते ते लक्ष पूर्वक ऐका. >> हेच पाकीजामधलं "ठाडे रहियो" गाण्यात 'जागे ना कोई..' च्या बाबतीत. मला वाटतं चार वेळा अगदी वेगवेगळ्या प्रकारे म्हटलंय..
'रसिक बलमा..' आणि 'यूं हसरतों के दाग..' ही दोन गाणी म्हणजे माझ्या लहानपणीच्या रेडिओबाबतच्या पहिल्या आठवणी..
टाळायला हवी होती अशी आणखी काही गाणी म्हणजे 'दिल तो पागल है', 'वीर झारा' अश्या चित्रपटांतली.. ते 'हम तो भाई जैसे है..' तर मुळीच ऐकवत नाही..
त्याउलट साधारण त्याच काळातला 'लुकाछुपी..' अक्षरशः अंगावर शहारे आणतं.
29 Sep 2017 - 1:48 am | गामा पैलवान
आदित्य कोरडे,
माझ्या मते लता ही व्यावसायिक कलाकार असल्याने तिने गायकी पुढेबिढे न्यायची गरज नाही. तुमचे निकष बहुधा शास्त्रीय गायकीस लागू पडतात.
अर्थात हा माझा केवळ अंदाज आहे. जाणकार लोकं काय ते स्पष्ट करतीलंच
आ.न.,
-गा.पै.
आ.न.,
-गा.पै.
29 Sep 2017 - 6:38 am | आदित्य कोरडे
भारतीय संगीतात परंपरा/घराणी फार पूर्वी पासून आहेत.ते आपल्या संगीताचे वैशिष्ट्य आहे म्हणाना. संगीत म्हणजे शास्त्रीय , सुगम, लोक नाट्य कि चित्रपट संगीत ह्याने त्यात काही फरक पडता कामा नये. लता ही दिनान्थांची मुलगी त्यांची( तिला बळवंत संगीत परंपरा म्हणतात) गायकी तिने जशी च्या तशी उचलली नाही, दिनानाथांची गायकी खर्या अर्थाने वसंतराव देशपांडे ह्यांनी पुढे नेली. हे स्वत: त्यानीच सांगितले आहे. त्यांच्या गायकीतला आक्रमकपणा आशा आणि हृदयनाथ ह्यांच्या संगीतात जाणवतो.( खरेतर ते वारले तेव्हा आशा आणि हृदयथ फारच लहान होते) लताचे गाणे तसे आक्रमक नाही. तसे ते असावे असेही नाही, आणि ते फार छान आहे.....
29 Sep 2017 - 8:24 am | उगा काहितरीच
लेख आवडला. लतादिदींची एवढी दीर्घ कारकीर्द शब्दबद्ध करायची तर खरंच काही खंड सहजपणे होतील. लेखात एक गोष्ट प्रचंड खटकली ! ती म्हणजे दिदींचा एकेरी उल्लेख !! लता मंगेशकर , भिमसेन जोशी वगैरे काही मंडळींना ज्या उंचीवर पाहीलं आहे त्या उंचीवरच्या व्यक्तींचा एकेरी उल्लेख खटकतो. थोडं विषयांतर करून म्हणेल की सचिन तेंडुलकरचा उल्लेख एकेरीच छान वाटतो . ;-)
29 Sep 2017 - 8:27 am | तिमा
लता व आशाचा मी अंधभक्त नाही, पण तरीही, त्यांच्या आवाजाच्या आणि भावना व्यक्त करण्याच्या हुकमी कसबाच्या जवळपासही कोणी जाऊ शकत नाही. मागे एकदा, आशाच्या दुबईला जाऊन रहाण्याच्या आततायी कॉमेंटवर टीका करताना मी लिहिलं होतं की,
लता आणि आशा यांचे आवाज लहानपणापासून कानावर पडल्याने, तो प्राणवायुच आहे, अशी आमची समजूत होती. कळायला लागेपर्यंत, आपण श्वास, हा कानानेच घेतो अशी ठाम समजूत होती.
29 Sep 2017 - 9:13 am | रविकिरण फडके
श्री. कोरडे,
तुम्ही म्हणता, "सगळ्यात गंभीर तक्रार म्हणजे तिने तिची गायकी पुढे नेली नाही"
म्हणजे काय? तिच्या पद्धतीने गाणारे शिष्य तिने जाणीवपूर्वक तयार केले नाहीत, असे? त्याने काय झाले असते? खुद्द लता जरी आज गाती असती तरी तिने जी असंख्य गाणी गाजवली तशी गाणी आता तिच्यासाठी कोणी लिहिली आणि compose केली असती? तिला एक तर आत्ताच्या गायिकांसारखं गावं लागलं असतं किंवा घरी बसावं लागलं असतं.
सोनू निगमचेच उदाहरण घ्या. (माझ्या मते) तो गुणवत्तेत रफीच्या तोडीचा आहे. तो रफीला प्रचंड मानतो हेही सर्व जाणतात. पण रफी साहेबांची जी गाणी आजही आपण पुन्हा पुन्हा ऐकतो तशी गाणी आज आहेत कुठे त्याला गायला?
थोडक्यात काय, कालचे, वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको!
29 Sep 2017 - 9:28 am | पैसा
हल्ली लताची गाणी न ऐकता किंवा ती कोणत्या परिस्थितीतून शिखरावर पोचली त्याची माहिती करून न घेता पिंका टाकायची बरेच जणांना सवय असते. आता अजून काय वाचावे लागणार म्हणून किमान अपेक्षेने लेख उघडला आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
सारेगामा आणि तत्सम कार्यक्रमात लताची मास्टरपीस गाणी म्हणायचा किती थोडेजण प्रयत्न करतात आणि त्यातल्या बहुतेकांची कशी भंबेरी उडते एवढेच विचारात घेतले तरी लता गायक म्हणून किती थोर आहे हे समजेल.
29 Sep 2017 - 10:29 am | अनुप ढेरे
हा लेख वाचा. त्या लेखातलं खालील निरिक्षण बरच पटण्यासारखं आहे.
29 Sep 2017 - 10:30 am | अनुप ढेरे
http://theladiesfinger.com/lata-female-singers/
29 Sep 2017 - 10:32 am | माईसाहेब कुरसूंदीकर
लेख आवडला रे आदित्य.
कला ही थोड्याफार प्रमाणात त्या व्यक्तीत उपजत असावी लागते. हिंदी चित्रपटसृष्टीत नाव काढायचे तर कलेबरोबर अंगात अनेक 'कला' असाव्या लागतात. मंगेशकर घराण्याने असे प्रयत्न केले नसतील असे वाटत नाही.१७/१८ वर्षापुर्वी लतादीदीदीच टी.व्ही.वर 'माझी भाची राधा छान गाते.. लोकांनी समजून घ्यावे' अशी विनंती केल्याचे आठवते.
असो. खुद्द राधा अव्वल दर्जाची हिंदुस्तानी संगीत गायिका आहे.
लतादिदीनी किंवा मंगेशकर घराण्याने असे प्रयत्न केले नाहीतच असे म्हणता येईल का?
29 Sep 2017 - 11:58 am | सस्नेह
तरीही त्रोटक, काहीसा एकांगी वाटला.
वर गा.पै.व उगा काहीतरीच यांच्याशी सहमत.
दीदींचा एकेरी उल्लेख खटकला. तसेच गायकी वगैरे म्हणायला दीदी काही शास्त्रीय घराणे गायकी करीत नव्हत्या. तसेही कोणत्या चित्रपट गायक/गायिकेने आपले शिष्य तयार केलेत ? तलत, रफी, किशोरकुमार यांच्यापासून ते अलीकडच्या अनुराधा पौडवाल किंवा आणखी कुणी कुणी यांच्यापर्यंत ?
तसेच लतादीदी व्यावसायिक गायिका होत्या तर काही काही गाणी म्हणणे टाळणार कसे ? त्या थोडीच फक्त दर्जेदार गाणी म्हणायची असे काही ठरवून गात होत्या ?
आणखी म्हणजे दीदींच्या उत्कृष्ट गाण्यांची यादी इतकी त्रोटक का हे कळले नाही. मी तरी आजवर हाताने ही यादी लिहून काढू शकले नाहीये !
आयेगा आनेवाला, आयेगा..
आपकी नजरोने समझा
जो हमने दस्त अपनी सुनाई आप क्यू रोये
अजीब दासता है ये
आजी रुठ्कर अब कहां
अल्ला तेरो नाम
बहारो, मेरा जीवन भी सवारो
चांद फिर निकला
डील अपना और प्रीत परायी
दो हंसोका जोडा
दुनिया करे सवाल तो हम
घर आया मेरा परदेसी
गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा
जा रे जारे उड जारे पंछी
हम तेरे प्यारमे सारा आलम
मेरा दिल ये पुकारे आजा
जादुगार सैया
ये जिंदगी उसीकी है
ज्योती कलश छलके
कहे झूम झूम रात ये सुहानी
लग जा गले
लागे ना मोरा जिया
मन डोले मेरा तन डोले
मौसम है आशिकाना
महाफिलमे जल उठी शमा
...टंकाळ्यामुळे एवढीच.
ही तर सोलो आहेत. युगुलगीते आणि वेगळीच !
असो. लतादीदी हा आमचा वीक प्वाईंट आहे !
29 Sep 2017 - 6:43 pm | दुर्गविहारी
लेख खुपच त्रोटक आहे कोरडे साहेब, तसा तो असणे अपेक्षित आहे. लताबध्दल खरं तर मालिका लिहायला पाहिजे. पण तुम्ही नक्कीच चांगला प्रयत्न केला आहे.
हरिश भीमानी आणि राजु भारतन यांनी जवळपास एकाच वेळी लतावर लिहीलेली पुस्तके बाजारात आली. मी दोन्ही वाचलीत आणि राजु भारतनचे पुस्तक माझ्या संग्रही आहे. तुम्ही वाचले नसेल तर नक्कीच वाचा. बाकी माझ्या माहितीत त्या शिरीष कणेकरांकडे बर्याच मोकळ्या बोललेल्या आहेत. नवखे चॅनेलीय पत्रकार उगाच जातात आणि 'दिदि तुमचे पहिले गाणे कोणते?' असे प्रश्न विचारतात. हि यांची मुलाखतीची तयारी. आणखी एक गोष्ट मी वाचली आहे, कि दिदिंच्या आयुष्यात बर्याच वादग्रस्त बाबी आहेत, त्या हयात असताना सार्वजनिक करण्यापेक्षा त्यांनी त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले आहे आणि ते आकाशवाणी कडे आहे, दिदि गेल्यानंतर ते प्रसारित करायचे आहे.
अशी गाणी त्यांना काही संगीतकाराना पाठींबा देण्यासाठी गावी लागली. ह्या संगीतकारांचे करीयर व्हावे यासाठीच अशी गाणी गाणे हे प्रोत्साहनच म्हणायला हवे.
याबाबत मात्र सहमत. याबरोबरच दाग चित्रपटातील तलतने गायलेले 'ए मेरे दिल कही और चल' समोर लताचे केवीलवाणे वाटते.
एकच उदाहरण देतो, उजाला चित्रपटातील मन्नाडे सोबत गायलेल, ' झुमता मौसम मस्त ' यात तार सप्तकात गाताना मन्नादासमोर लताच उभी राहु शकली.
सचिन खेळत असताना किती खेळाडूंवर अन्याय झाला असेल असे माझ्या मनात येते.
बाकी नुरजहांबध्दल काही बोलायचे तर( गावसकर बोललेला आहे तेच) ईतकेच म्हणेन कि, 'हम तो सिर्फ लता जानते है'.
30 Sep 2017 - 10:30 am | हुप्प्या
मराठी भाषा ही थोडी विचित्र भाषा आहे. आदर नसेल तेव्हा एकवचनी उल्लेख केला जातो. आदर असेल त्या व्यक्तीचा बहुवचनी उल्लेख केला जातो हेही खरे आहे. पण काही वेळा आत्मीयता जेव्हा साधारण मर्यादेच्या पलीकडे जाते तेव्हाही एकवचन वापरले जाते. तुकाराम, जनाबाई वा नामदेव विठोबाचा विठू, क्वचित विठ्या असाही उल्लेख करतात तेव्हा तो अनादरामुळे नसून उलट जास्त प्रेमापोटी असतो. लताबाईंचेही तसेच आहे. इतकी वर्षे लोकांचे कान तृप्त करणारे संगीत ऐकवणारी एक महान, प्रतिभावती गायिका ह्या नात्याने लताबाईंना लता मंगेशकर म्हटले तो अनादर समजू नये.
शिरीष कणेकर ह्या साहित्यिकाची लताभक्ती किती पराकोटीची आहे हे सांगायची गरज नाही. पण त्यांनीही कायम लता मंगेशकरांचा एकवचनी उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल एक लेखही लिहिलेला आहे. त्यातही हाच मुद्दा आहे.
बहुतेक मराठी घरात आई, आजी ह्या नातेवाईकांना एकवचनी उल्लेखाने संबोधले जाते. पण त्यामुळे आपण असे म्हणू का की लोकांना आजी वा आईबद्दल आदरच नाही? लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, किशोर कुमार ह्या लोकांचे चाहते कित्येकदा ह्या आत्मीयतेपोटीच त्या लोकांना एकवचनाने ओळखतात, अनादरापोटी नाही. असो.
लता मंगेशकरच हवी असा आग्रह अनेकदा निर्मातेच धरायचे. त्यामुळे आशा भोसले ह्या त्यांच्या बहिणीलाही काही गाण्यांना मुकावे लागले. अगदी आर डी बर्मनसारखा आशा भोसल्यांशी जवळिक असतानाही कित्येक गाण्यांचा स्वभाव हा आशाबाईंच्या आवाजाला साजेलसा असतानाही ती गाणी लताबाईंना मिळाली असा इतिहास आहे. त्यामुळे बाकी गायिकांना गाण्यांना मुकावे लागले असेल ह्यात आश्चर्य नाही. लताबाईंच्या आवाजाला मिळणारे यश बघून धंदेवाईक वृत्तीचे निर्माते त्यांचा आग्रह धरत असतील. खुद्द लताबाईंच्या आवाजाचे नाणे इतके खणखणीत असल्यामुळे त्यांना इतर गायिकांच्या भवितव्याला सुरुंग लावण्याचे उद्योग करण्याची काहीही गरज नव्हती. आणि त्यांनी तसे केले असेल असे मला तरी वाटत नाही.
30 Sep 2017 - 12:16 pm | चौकटराजा
माझी सरळ साधी अशी पहिली प्रतिक्रिया अशी की की दीदीनी लता या नावाला दिलेली प्रतिष्ठा अशी की आज " लता" असे नुसते उच्चारले तरी दुसरे कोणी डोळ्या समोर येत नाही. त्यांच्या उल्लेख एकेरी केला गेला तर आदर कमी आहे असे मी मानीत नाही. आता एखादा यशस्वी का होतो...? तर एक स्वतः अद्वितीय असतो म्हणून.. दुसरे त्याच्या काळात त्याला स्पर्धा करील असे दुसरे कोणी अद्वितीय उपलब्ध नसते म्हणून .लता बाईंचा आवाज, गायची पद्धत हे स्वयंभू आहेत. त्याची परंपरा कशी होणार... ? त्यांच्या नशीबाचा भाग असा की त्यांचा आवाजाला पडद्यावर प्रस्तुत करतील अशा नायिका त्या काळात झाल्या. जीनत अमान, परवीन बाबी कटरिना कैफ ईईई प्रकारच्या नायिका त्यावेळी नव्हत्याच. तसेच लोकांची सांगितिक आवड ही त्यांच्या गायकीला, आवाजाला अनुकूल अशी होती. दुसरे असे की आशा व लता या दोन गायिकांचा आवाज हा " जनरल" आहे म्हणजे असे की तो कसल्याही गाण्यात चालतो. जसा रफींचा चालायचा. म्हणजे असे की "मुझपे इल्जामे बेवफाई है " किंवा मुहब्बत ऐसी धडकन है अशी गीते आपण आशाबांईंच्या आवाजात देखील असण्याची कल्पना करू शकत नाही . मग शमशाद, गीतादत्त, नूरजहान, सुरैया यांचे काय ? काही प्रमाणात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाची जात लताबाईंच्या आवाजासारखी असल्याने त्याना फिल्मसंगीतात व रसिकांच्या मनांत स्थान आहेच की !
माझ्या मते तरी लता हा एक अद्वितीय आवाज आहे गायकी असलेला. तर आशा बाई ही एक अद्वितीय गायकी आहे आवाज असलेली.
3 Oct 2017 - 12:13 pm | मराठी_माणूस
का ? आणि मोह झाला म्हणून ती गाणी गायली गेली आहेत का ?
5 Oct 2017 - 6:30 am | अभिजितमोहोळकर
मोजक्या शब्दात सुरेख आढावा घेतलात तुम्ही.
एकच गीत एकदा स्त्री गायिकेने आणि एकदा पुरूष गायकाने म्हणणे ह्यात फरक मुख्यत्वे चाल कुणासाठी रचली आहे ह्यामुळे पडत असावा. लताने गायलेल रात और दिन दिया जले हे मुकेशने गायलेल्या त्याच गाण्यापेक्शा गाजल, सरस्वतीचन्द्र मधील फूल तुम्हे भेजा है खत मे, दोन्ही आवाजात गाजल. तलत ने ऐ मेरे दिल कही और चल दोन प्रकारे गायलय, त्यातल एकच गाजल, तलतनेच गायलेली दुसरी आवृत्ती आणि लताने गायलेल गाण तर फक्त चित्रपटात दिसत. लताने गायलेली ही गाणी संगीतकार, दिग्दर्शक व निर्माता ह्यांना आवडली म्हणूनच चित्रपटात राहिली.
तलत ने अजरामर केलेल ऐ गम-ए-दिल क्या करू हे आशाने सुद्धा सुरेख गायलय, त्यात संगीतकार सरदार मलीक ह्यांनी, आशाला दिलेल्या चालीत थोडे बदल केले, त्यामुळे ते गाण, तलत च न रहाता आशा भोसले साठी बनवलेल गाण झाल. शेवटी प्रत्येक गळा वेगळा असतो. आरजू मध्ये, लतासाठी रचलेल अजी रूठकर अब कहां जाइयेगा गाताना रफी फारसा प्र्भावी वाट्त नाही आनि लताने गायलेल गाण जास्त भावत. अजून एक उदाहरण म्हणजे न ये चांद होगा न तारे रहेंगे गीता दत्त ने हे गाणं प्रभावीपणे म्हणून सुद्धा हेमंत कुमार नी गायलेल गाण म्हणून ते जास्त स्मरणात आहे. शेवट्च उदाहरण म्हण्जे, कुदरत मधील परवीन सुल्ताना ने गायलेल्या हमें तुमसे प्यार कितना पेक्शा किशोर कुमारच गाणं जास्त गाजल.
त्यामुळे हे चाल कुणासाठी रचली आणि अन्य गायकाला वा गायिकेला देताना त्यात काय बदल केले हे महत्वाचे आहे अस मला वाट्त.
5 Oct 2017 - 5:53 pm | सिरुसेरि
छान लेख . छान प्रतिसाद .
6 Oct 2017 - 7:23 am | Ram ram
खूप बरं वाटलं