भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे..
उगा जाहला आठवांचा पसारा
खळेना कशा आज डोळ्यांत धारा
सुगंधी क्षणांना जपावे उराशी
उडू लागला गंध हा आज सारा
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
जरी वादळी घेतली झेप मी ती
तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा
जरी टाळतो मी तुझ्या आठवांना
तुला पाहता देहि येतो शहारा
चला संपला अर्थ या जीवनाचा
दिला नीयतीने मला हा इशारा
- प्राजु
प्रतिक्रिया
19 Oct 2008 - 2:11 am | ऋषिकेश
वा प्राजुताई,
सुंदर कविता.. एकेक कडवे उ त्त म! आणि वृत्तातही चपखल बसलंय.. (कसंकाय जमतं बॉ एकेकाला भावनांसकट वृत्त सांभाळणं देव जाणे ;) )
त्यातही
हे सर्वात जास्त आवडलं :)
-("निवृत्त" व्रूत्तीचा परंतू वृत्तातील इतरांच्या कविता आवडणारा किंचित कवी) ऋषिकेश
19 Oct 2008 - 5:34 am | नंदन
ऋषिकेशशी सहमत आहे. कविता आवडली. विचार वृत्तात चपखलपणे बसवणे हे खरंच कौशल्याचं काम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Oct 2008 - 2:13 am | बेसनलाडू
वृत्त जमले आहे; कल्पनाही आवडल्या. सरावाने पर्यायी शब्दयोजनेवर विचार करता येऊ लागला की वृत्तातील गेयता कशी सांभाळायची, 'जपूनी','नीयती', 'देहि' यांसारखी वळणे टाळण्यासाठी काय करायचे हे सुद्धा कळेलच.
कविता आवडली, हे वेगळे सांगायला नको. पाकळ्यांचा पिसारा सर्वाधिक आवडला. शुभेच्छा.
(आस्वादक)बेसनलाडू
19 Oct 2008 - 7:28 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो. सुबद्ध रचना. कवितेची पणती मनात तेवत ठेवणे महत्त्वाचे.
20 Oct 2008 - 2:26 am | भडकमकर मास्तर
हेच म्हणतो...
कविता चांगली झाली आहे...
शुभेच्छा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Oct 2008 - 12:06 am | धनंजय
असेच म्हणतो
19 Oct 2008 - 2:24 am | फटू
नितांत सुंदर कविता...
विशेषतः
जरी टाळतो मी तुझ्या आठवांना
तुला पाहता देहि येतो शहारा
हे भावलं मनाला... (हा अनुभव आम्ही भारतात असताना खुप वेळा घेतला आहे. आणि तोही प्रत्येक वेळी नविन "तू" च्या बाबतीत ;) )
("भुजंगप्रयाती य ये सहा वेळा " असा रटटा मारलेला)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.
19 Oct 2008 - 4:50 am | शितल
प्राजु,
सुंदर काव्य रचना केली आहेस. :)
19 Oct 2008 - 6:35 am | अरुण मनोहर
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
भाव उत्तम रित्या शब्दबंध आणि मुख्य म्हणजे वृत्तबंध देखील केले आहेत.
अभिनंदन प्राजु.
19 Oct 2008 - 9:21 am | संदीप चित्रे
>> असा ठेवला मोगरा मी जपूनी
>> सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
ह्या ओळी तर खूपच आवडल्या :)
(वृत्त सांभाळल्याचे १०० मार्क्स :) )
------
(अवांतर -- मला तरी ही गझल वाटतेय !!!)
19 Oct 2008 - 9:40 am | चन्द्रशेखर गोखले
केवळ अप्रतिम काव्यरचना..!
19 Oct 2008 - 11:52 am | मदनबाण
जरी वादळी घेतली झेप मी ती
तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा
व्वा. फारच सुंदर..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
19 Oct 2008 - 12:27 pm | मनिष
सु-रे-ख!!!!!!!!!!!!!!!!! या ओळी तर प्रतिभेच्या लख्ख साक्षात्काराच्या - गंधावलेल्या, मंतरलेल्या!
शब्दच नाहीत दुसरे!!!! खूप आवड्ल्या ह्या ओळी :)
- (कोण्या एका काळचा कवी) मनिष
19 Oct 2008 - 1:03 pm | दत्ता काळे
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
- हे आवडलं
19 Oct 2008 - 3:54 pm | विसोबा खेचर
सर्वच कविता उत्तम परंतु,
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
या ओळी खासच!
प्राजू, जियो...! :)
तात्या.
19 Oct 2008 - 6:36 pm | बिपिन कार्यकर्ते
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
या ओळी सर्वात जास्त आवडल्या. बाकी ते वृत्त वगैरे काही कळत नाही. पण एकंदरित वाचून छानच वाटले.
बिपिन कार्यकर्ते
19 Oct 2008 - 9:17 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Oct 2008 - 11:54 pm | मीनल
माझी आधी दिलेली प्रतिक्रिया का दिसत नाही इथे?
परत लिहिते ----
मोगरा सुकलेला असला तरीही सर्वात सुगंधित आहे .
आता मराठी व्याकरण विसरायला झाले आहे.
वृतांबद्दल अजून लिहिले असते तर उजळणी झाली असती.
20 Oct 2008 - 12:01 am | चतुरंग
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
हे फारच छान!
कविता प्रगल्भ होते आहे. (वरती बेला म्हणतो तसे सरावाने शब्दांची होणारी किंचितशी ओढाताण कमी होऊन अधिक सहजता येईल.)
चतुरंग
20 Oct 2008 - 9:33 pm | दत्ता काळे
वृत्तबंध कविता करणे जरा जिकिरीचे असते, तरीसुद्धा तुम्ही ती केलीत, ग्रेट ...
20 Oct 2008 - 10:16 pm | रामदास
लिहायला बघतो पण तो पर्यंत मोगरे सुकून जातात.
कविता आवडली.
21 Oct 2008 - 12:18 am | मानस
कविता आवडली ....
सुगंधी क्षणांना जपावे उराशी
उडू लागला गंध हा आज सारा
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
ह्या ओळी खासच .....................
21 Oct 2008 - 4:17 am | प्राजु
मीनल, चतुरंग, बाळकराम, रामदास आणि मानस..
आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Oct 2008 - 8:11 am | श्रीकृष्ण सामंत
प्राजु,
खूप दिवसानी अशी कविता वाचली.
"प्रतिभा उरी धरूनी तूं काव्य करीत रहावे"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
22 Oct 2008 - 3:08 pm | राघव
वाहवा! प्राजुताई, खूप सुंदर कविता.. बेश्टेश्ट!!
बाकी ते वृत्त वगैरे शब्द डोळ्यापुढे आले तरीही आपली भंबेरी उडते... :D
मुमुक्षु