चार चारोळ्या

Primary tabs

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
18 Sep 2007 - 3:21 am
- १ -
वसंतातल्या पालवी-कळ्या
मोठ्या खट्याळ असतात छकुल्या
आसुसलेल्या डोळ्यांना, दडून,
हळूच आडून करतात वाकुल्या
-*-

- २ -
व्याकूळ दुपारची ऊन झुळूक
तहानेला करते त्राही त्राही
मिळता तोकडी तुझी चिठ्ठी
तळमळ होते लाही लाही
-*-

- ३ -
शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं
फारच दिलदार नाही वाटत?
शिलंगणाचं सोनं काही
दसऱ्यालाच नाही वाटत
-*-

- ४ -
परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
गतप्रेमाच्या पत्रामधले
अक्षर देखील दिसते गचाळ
-*-

(याचा कच्चा मसुदा "अप्रकाशित"वर टिचकी मारली असून मनोगतावर दिसतो आहे :-( दोन्ही ठिकाणी प्रकाशित करण्याचा हेतू नव्हता. अजूनतरी मनोगतावर कोणी प्रतिसाद दिलेला नाही, म्हणून कोणी कविता तिथे वाचली नसेल अशी आशा आहे.)

चारोळ्याप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

नंदन's picture

18 Sep 2007 - 3:31 am | नंदन

शेवटच्या दोन विशेष आवडल्या.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विकास's picture

18 Sep 2007 - 6:27 am | विकास

सर्व कवीता/चारोळ्या मस्त आहेत. आता "रटाळ बर्फ" पाहाताना आपल्या चारोळीची आठवण होईल :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2007 - 7:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
गतप्रेमाच्या पत्रामधले
अक्षर देखील दिसते गचाळ''

सर्वच चारोळ्या खास आहेत,पण वरील ओळी जरा हटके आहेत,पहिल्या दोन ओळीतून सुंदर कधी तरी रटाळ वाटते आणि तीच अवस्था प्रेमपत्रांची, नव्हे आयुष्यात पहिल्यांदा जे जे सुंदर वाटते त्या त्या सर्वांची नंतर अवस्था अशीच असते.
बहोत खूब !

अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकास's picture

18 Sep 2007 - 8:43 am | विकास

>>>>अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) )

व्याकरणंच काय प्रकरणं पण माहीती दिसाताहेत...
:-) (ह. घ्या.)

गुंडोपंत's picture

18 Sep 2007 - 8:03 am | गुंडोपंत

आपल्याला हायकु ही छान जमतील!
वाचायला आवडतील.

आपला
(शांता शेळकेंच्या हायकुंचा फॅन)
गुंडोपंत

सहज's picture

18 Sep 2007 - 8:08 am | सहज

आजूबाजूला तसेच आतमधे धनंजय यांची पारखी नजर काहीतरि छान तर शोधतेच पण सहज, सुंदरपणे शब्दबध्द्देखील करुन टाकते.

भारतीय क्रिकेट टिमला ऑलराउंडर ची कमतरता भासते आहे, एकदा ते पण तुम्ही अजमावून बघा म्हणतो. :-)

अजून येऊ द्या...

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 8:17 am | आजानुकर्ण

चारोळी अतिशय आवडली. :)

चित्रा's picture

18 Sep 2007 - 8:55 am | चित्रा

शेवटची खासच आहे, आवडली.

धनंजय's picture

18 Sep 2007 - 8:56 am | धनंजय

प्रेमात पडलेले शाळकरी, युवक, तरुण, आणि चटके खाल्लेला प्रौढ, असे चौघे जण चार ऋतूंचे क्रमाने वर्णन करत आहेत अशी कल्पना आहे. त्यामुळे शैली बालिश ते प्रगल्भ चार टप्प्यांनी गेली. उगाच आपले स्व-समीक्षण! बघा पटते का.

विकास's picture

18 Sep 2007 - 9:02 am | विकास

>>>प्रेमात पडलेले शाळकरी, युवक, तरुण, आणि चटके खाल्लेला प्रौढ, असे चौघे जण चार ऋतूंचे क्रमाने वर्णन करत आहेत अशी कल्पना आहे.

एकदम चांगली कल्पना आहे. चारोळ्यांइतकीच आवडली.

पण जरासे ध्यानात आले होते. जे केले ते तसे का केले, नियोजन प्रयोजन या प्रकाराचा तुम्ही छान वापर करता.

मी ऋतू(आजूबाजूचे/बाहेरचे) व (आतले)मनाची अवस्था / मूड / दृष्टीकोन असा काहीसा अर्थ मी घेतला होता.

कोलबेर's picture

18 Sep 2007 - 12:33 pm | कोलबेर

..जाम आवडले.. माझ्या मते सर्व कवींनी आपल्या कवितेविषयी असे थोडे मार्गदर्शन केल्यास आमच्या सारख्या ह्या प्रातांतल्या 'ढ' लोकांना देखिल त्याचा रसास्वाद घेता येईल... समीक्षण वाचल्यावर कविता खरंच खूप आवडली!!

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 4:14 pm | आजानुकर्ण

म्हणतो ;)

सृष्टीलावण्या's picture

16 Mar 2008 - 8:45 pm | सृष्टीलावण्या

बालकवींची औदुंबर कविता शिकवताना आमच्या प्राध्यापकांनी ह्याच चार दशा कश्या त्या कवितेतून
टप्प्याटप्प्याने दाखविल्या आहेत ते छान वर्णन करून सांगितले होते.
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

नंदन's picture

18 Sep 2007 - 11:32 am | नंदन

चारही चारोळ्यांना जोडणारे हे सूत्र आवडले. चार ऋतुंचा क्रम आणि त्यांच्यातून व्यक्त होणारा मूड तुमच्या समीक्षेनंतर ध्यानी आला.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 11:37 am | विसोबा खेचर

सुंदर लिहिले आहेस रे धन्याशेठ!

विशेषतः

वसंतातल्या पालवी-कळ्या
मोठ्या खट्याळ असतात छकुल्या
आसुसलेल्या डोळ्यांना, दडून,
हळूच आडून करतात वाकुल्या

या ओळी अधिक आवडल्या!

तात्या.

रंजन's picture

18 Sep 2007 - 5:36 pm | रंजन

आता समजल.क्स वाचायच आनि काय आहे

चित्तरंजन भट's picture

19 Sep 2007 - 1:36 am | चित्तरंजन भट

परवा पडलेला शुभ्र बर्फ
आज कसा दिसतो रटाळ
गतप्रेमाच्या पत्रामधले
अक्षर देखील दिसते गचाळ

फारच उत्तम

इसम's picture

16 Mar 2008 - 9:07 pm | इसम

अवांतर ;) असे नाजूक आणि सुंदर विषय हाताळणारा माणूस त्या व्याकरणाच्या भानगडीत पडतो कशाला कळत नाही :)) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापकसाहेब,
आडून शरसंधान कशासाठी?

उदयोन्मुख आहेत, आत्ताच कविता आणि व्याकरण यातील अन्योन्यसम्बंध जाणवला तर ठीक अन्यथा रसिक वाचकांना "त्राहि त्राहि माम" म्हणायची पाळी यायची.

-एक इसम

प्राजु's picture

16 Mar 2008 - 9:13 pm | प्राजु

शेवटची जास्ती आवडली..

- (सर्वव्यापी)प्राजु

सचिन's picture

16 Mar 2008 - 9:26 pm | सचिन

शिशिराच्या शिवेवर जर्द झाडं
फारच दिलदार नाही वाटत?
शिलंगणाचं सोनं काही
दसऱ्यालाच नाही वाटत
..हे निव्वळ उच्च !!

अवधुत पुरोहित's picture

17 Mar 2008 - 5:55 am | अवधुत पुरोहित

गचाळ अश्करातही आम्ही प्रेम बघतो
ते पत्र मात्र बायको पासून लपवून ठेवतो..

चतुरंग's picture

17 Mar 2008 - 9:47 pm | चतुरंग

आणि धनंजय तुझ्या विवेचनामुळे त्यांची रंगत आणखीनच वाढली.

चतुरंग